सप्रेम नमस्कार,
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला सहा वर्षे पूर्ण झाली. आम्हाला हे काम करत असताना संशोधक, अभ्यासक, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, शास्त्रज्ञ, वक्ते, कलाकार, छांदिष्ट अशा, महाराष्ट्रातील अनेक ‘वेड्या’ व्यक्ती भेटल्या. त्याचबरोबर सांस्कृतिक महत्त्वाच्या किल्ले-लेणी-मंदिरे– नदीघाट वगैरे वास्तू, गावोगावच्या प्रथा–परंपरा, यात्रा-जत्रा, खाद्यपदार्थ, बाजार असे संस्कृतिसंचित प्रत्ययास आले. त्यांच्या माध्यमातून आम्हाला येथील विधायकतेचा, प्रज्ञाप्रतिभेचा अनुभव आला. महाराष्ट्राची ही शक्ती आमच्या कामाला ऊर्जा पुरवत राहिली. वाचकही ते पाहून-वाचून-जाणून हरखून गेले. वाचकांचे प्रतिसाद, त्यांनी प्रकल्पाला केलेली उत्स्फूर्त मदत इत्यादी कृतींतून ती गोष्ट प्रत्ययास येत राहिली.
‘थिंक महाराष्ट्र’चे माहितीसंकलन तोपर्यंत विकेंद्रित पद्धतीने चालत असे. त्यामध्ये परिणाम जाणवत नसे. परंतु सोलापूरची मोहीम माहितीसंकलनाचे मॉडेल ठरली. मात्र त्यामध्ये मनुष्यबळ, पैसा यांचा व्यय फार झाला. कारण एकाच वेळी अकरा तालुक्यांचे लक्ष्य फार मोठे होते. तरीसुद्धा ‘सोलापूर मोहीम’ यशस्वी झाली. त्यानंतर ‘थिंक महाराष्ट्र’चा प्रतिसाद प्रचंड वाढला. प्रत्येक महिन्याची वाचकसंख्या पंचवीस हजारांत गेली आणि हिट्स साडेचार लक्षांच्या पुढे!
त्यानंतर ‘थिंक महाराष्ट्र’ने ‘नाशिक जिल्हा संस्कृतिवेध’ उपक्रम राबवला. मात्र कार्यपद्धत बदलून. सिन्नर आणि निफाड या दोन तालुक्यांमध्ये पंधरा कार्यकर्ते गेले व त्यांनी प्रभावी रीत्या माहितीसंकलन केले. स्थानिक संपर्क जोडला. तेथील माहिती यशावकाश वेबपोर्टलवर येईलच. या पद्धतीने नाशिक जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमध्ये कार्यकर्ते जात राहतील.
सोलापूरमध्ये मोहिमेचा तालुकावार खर्च लाख रुपयांपर्यंत गेला होता. तो नाशिकच्या दोन तालुक्यांत प्रत्येकी साठ हजार रुपयांपर्यंत खाली आला. त्यामध्येही स्थानिकांचा सहभाग हा मोठा आहे. त्यामुळे ‘थिंक महाराष्ट्र’च्या आम्हा कार्यकर्त्यांना असे वाटते, की प्रत्येक तालुक्यातील संस्कृतिवेध मोहिमेचा साठ ते सत्तर हजार रुपये खर्च स्थानिकांनी उचलला तर ते सोयीचे होईल. ‘थिंक महाराष्ट्र’ अजूनही आर्थिक बाबतीत फार कमी पडत आहे. या समाजात सकारात्मकतेला व्यासपीठ आवश्यक आहे यावर सर्वांचे एकमत आहे आणि त्या जोरावरच गेली सहा वर्षे काम करता आले. प्रत्यक्षात वर्षाला एक कोटी रुपयांचा खर्च आवश्यक असलेला हा प्रकल्प वार्षिक आठ ते दहा लाख रुपयांच्या अल्प निधीवर चालवला जात आहे.
सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या या टप्प्यावर ‘थिंक महाराष्ट्र’ला मदतीबरोबरच सहभागाची आवश्यकता वाटते. तो सहभाग आर्थिक असू शकेल, माहिती पुरवण्याचा किंवा लेख लिहिण्याचा असू शकेल, संदर्भांची जोड देऊन लेखांची उपयुक्तता वाढवण्याचा असू शकेल किंवा वेबपोर्टलसाठी जाहिराती मिळवून देण्याचा असू शकेल. ‘थिंक महाराष्ट्र’चे आवाहन असे, की तुम्ही स्वतःला या प्रकल्पाशी जोडून घ्यावे. पैसा उभा राहिला तर महाराष्ट्राच्या गावखेड्यांपर्यंत पोचता येईल. तेथील योग्य व्यक्ती-उपक्रमांची वेबपोर्टलवर कायमस्वरूपी नोंद करता येईल. महाराष्ट्र सर्वसामान्य व्यक्तींमधील असामान्यत्वामुळे बांधला गेला आहे. त्याची यथार्थ नोंद जर आपण करू शकलो तर त्यापुढचा टप्पा मराठी माणसाच्या नेटवर्किंगचा असेल. त्यामुळे सकारात्मक कामांचा समाजावर परिणाम होत असलेला जाणवेल आणि ती सर्वांत महत्त्वाची गोष्ट आहे. तीच महाराष्ट्राची ताकद होय.
– किरण क्षीरसागर
Updated On – 8 Mar 2016