Home वैभव गावांच्‍या अंतरंगात तामसवाड्याचा अभिनव जलप्रयोग

तामसवाड्याचा अभिनव जलप्रयोग

1

वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यात गाळाने बुजलेल्या तामसवाडा नाल्याचे ‘माथा ते पायथा’ तत्त्वानुसार पुनरुज्जीवन करण्यात आले आहे. ते काम ‘पूर्ती सिंचनसमृद्धी कल्याणकारी संस्था’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे करण्यात आले. तो प्रकल्प ‘पर्जन्यसंवर्धन, संधारण, संचय व भूजल पुनर्भरण’ असा होता. केंद्रीय महामार्ग आणि परिवहन मंत्री नितिन गडकरी हे ‘पूर्ती सिंचन संस्थे’चे संस्थापक अध्यक्ष आहेत, तर सिव्हिल इंजिनीयर, ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधव गोविंद कोटस्थाने हे संस्थेचे सचिव आणि तामसवाडा प्रकल्पाचे प्रमुख मार्गदर्शक व कार्यवाहक आहेत. शेती हा तेथील एकमेव व्यवसाय. तेथे पुरेशी सिंचन व्यवस्था नसल्यामुळे शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून होती. पावसाळ्यात निर्माण होणारी पूरस्थिती हा प्रश्न गंभीर होता.

तामसवाडा गाव डोंगरपायथ्याशी वसले आहे. ते आदिवासीबहुल आहे. गावाची लोकसंख्या तीनशे-साडेतीनशे आहे. पाणी पावसाळ्यात डोंगरउतारावरून वेगाने वाहत येते व गावच्या शिवारातील शेतांमध्ये थेट घुसते. त्यामुळे सगळी शेती उद्ध्वस्त होई. पाण्याचे असे न अडखळता थेट येणे याचे प्रमुख कारण म्हणजे त्या पाण्याला पुढे, नदीकडे वाहून नेणारे ओहोळ व नाले गाळाने बुजले होते. त्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना पीक घेणे अवघड होऊन बसले होते; तसेच, गावात पाणी शिरत असल्याने घरांचेही नुकसान होई. शिवाय, पावसाळा संपताच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असे. गावात मोलमजुरीशिवाय दुसरा रोजगार नव्हता. त्यामुळे तेथील कुटुंबांना जनावरांसह स्थलांतर करावे लागत असे. ‘पूर्ती सिंचन संस्थे’ने पाण्याची समस्या, आर्थिक चणचण, बेरोजगारी, व्यसनाधीनता, घरांची दुरवस्था यांमुळे गांजलेल्या स्थानिकांची परिस्थिती सुधारण्यासाठी 2010 मध्ये पुढाकार घेतला आणि ‘पाणी’ या विषयाला प्राधान्य देत मुख्य नाल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने पाणलोट उपचार करण्याचे ठरवले. ग्रामस्थांच्या मदतीने बारा किलोमीटर लांबीच्या तामसवाडा नाल्यातील गाळ काढण्यात आला. त्यासाठी सहकार्य ‘जलसंधारणासाठीचा विशेष निधी’, ‘स्थानिक विकास योजना’ आणि ‘लोकप्रतिनिधी’ यांचे मिळाले. नाल्याचे रुंदीकरण धाम नदीपर्यंत केले गेले. त्यासाठी टोपॉलॉजी आणि जिऑलॉजी या शास्त्रानुसार अभ्यास केला गेला. नाल्याच्या प्रवाहात ठरावीक अंतरावर मातिबांध, गॅबियन बांध, सिमेंट नाला बांध घालण्यात आले. नाल्यावर आधीपासून अस्तित्वात असलेल्या सिमेंट बांधांची दुरुस्ती आणि मजबुतीकरणही करण्यात आले. पावसामुळे नाल्याच्या दोन्ही बाजूंना टाकलेली माती पुन्हा पात्रात जाऊ नये यासाठी बांधांवर वृक्ष लागवड करण्यात आली. शिवाय, पात्राच्या दुतर्फा रस्ते; तसेच, नाल्यावर दोन पूल बांधण्यात आले. त्यामुळे शेतात जाण्या-येण्यासाठी सोय होऊन तंटेबखेडे थांबले.

माधवजींच्या तल्लख बुद्धीतून जन्मलेला एक अनोखा ‘पाणलोट उपचार’ आमच्या ‘आनंदवन’कार्यकर्त्यांच्या भेटीत निदर्शनास आला. त्यांनी डोंगरउतारावरून वेगाने शेतात घुसणाऱ्या पाण्यास, शेताखालून मोठ्या व्यासाचे पाइप घालून थेट नाल्यात आणून सोडले आहे. त्यामुळे शिवारातील जमीन पूरमुक्त झाली आणि शेतातील मातीचा वरील सुपीक थर (टॉप सॉईल) वाहून जाण्याचा प्रकार संपुष्टात आला. शिवाराचे रूप या बहुआयामी प्रकल्पामुळे पालटले आहे. तामसवाडा आणि इतर पाच गावे यांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे. शेतकरी कसेबसे एक पीक घेऊ शकत; ते भूजल पुनर्भरणामुळे पुनरुज्जीवित झालेल्या आणि पार मे महिन्यातही न आटणाऱ्या विहिरींच्या माध्यमातून तीन-तीन पिके घेत आहेत.

_Tamaswada_3.jpgगावातील दारूच्या भट्ट्या उदरनिर्वाहाची सोय झाल्याने आपोआप गेल्या. पक्की घरे आली. नितीन गडकरी यांचा सक्रिय पाठिंबा व दूरदृष्टी हे ‘तामसवाडा प्रकल्पा’च्या यशाचे गमक आहे, पण प्रसिद्धीपराङ्मुख माधवजींचा साधेपणा, जिद्द आणि चिकाटी नजरेत भरावी अशी आहे. त्यांनी प्रकल्पाचे कित्येक नकाशे चक्क हातांनी काढले आहेत. त्या त्यांच्या प्रचंड मेहनतीतही तामसवाडा प्रकल्पाचे यश दडले आहे.

प्रकल्पाविषयी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैज्ञानिक दाखले देऊन केलेली पाणलोटाची कामे, उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि त्याबरोबरीने टप्प्याटप्प्याने प्राधान्यक्रम ठरवून इतर प्रश्न हाताळण्यावर दिला गेलेला भर. आम्हाला प्रत्यय वारंवार असा येतो, की ज्या ज्या गावात परिस्थिती पालटून बदल सर्वांगांनी चांगले झाले आहेत, तेथे सर्वप्रथम पाण्याचा प्रश्न हाताळला गेल्याने बाकी प्रश्नांवर उत्तरे मिळत गेली! त्या परिसरातील आकोली, जामनी, म्हसाळा, शिरसमुद्र, बाभूळगाव व बोपापूर या गावांनाही या प्रकल्पाचा फायदा झाला आहे.

– माधव गोविंद कोटस्थाने (सेक्रेटरी) 9765426117, 9422142781, mkotasthanem@gmail.com

– कौस्तुभ आमटे, kvamte@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version