तमाशा कलावंत तुटपुंज्या मानधनावर तमाशांच्या फडात काम करत असतात. तमाशा कलावंतांच्या पुढील पिढीच्या आयुष्याचा ‘तमाशा’ होऊ नये यासाठी ब्रह्मनाथ येळंब (ता. शिरुर जि. बीड) येथील ‘सेवाश्रम’ नावाची संस्था काम करत आहे. ती ‘निर्मिती प्रतिष्ठान’ या संस्थेमार्फत चालवली जाते. सुरेश राजहंस या तरुणाची ती कामगिरी. त्या शैक्षणिक प्रकल्पात पन्नास मुले आणि मुली शिक्षण घेत आहेत.
तमाशा…महाराष्ट्राची लोककला. मानसन्मानाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या त्या कलेने राज्याच्या लोककलेचा नाद सातासमुद्रापार नेला. पण काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली आणि तमाशाच्या दुर्दैवाचा नवा ‘खेळ’ सुरू झाला. नामवंत तमाशा फड बंद पडले, फडमालक कर्जाच्या ओझ्याखाली दबून रस्त्यावर आले. त्यात उघड्यावर आला तो ज्याच्या जिवावर ही लोककला टिकून आहे तो तमाशा कलावंत!
‘सेवाश्रम’ ही तमाशा कलावंतांच्या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी काम करणारी राज्यातील एकमेव संस्था आहे. सुरेश राजहंस म्हणतात, “बीड हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा. तेथील मजूर सहा महिने ऊसतोडणीसाठी स्थलांतरित होतात. त्यावेळी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न समोर येतो. त्यासाठी शिरूर तालुक्यात ‘शांतिवन’ नावाची संस्था काम करते. मला तमाशा कलावंतांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न प्रकर्षाने जाणवला. तमाशा कलावंतांचे हाल ऊसतोड मजुरांपेक्षा वेगळे व अधिक आहेत. ते कलावंत घराबाहेर वर्षाचे जवळपास नऊ महिने असतात. त्यांना दरकोस दरमुक्काम तमाशाचे कार्यक्रम करत जायचे असते; जत्रा-उरुस-यात्रा या सगळ्यांमध्ये तंबू लावायचा असतो. त्यांना कुटुंब नावाचा प्रकारच नसतो. समाजाचे हिणकस शेरे, वाईट नजरा तर तमाशा कलावंतिणींच्या अंगवळणी पडलेल्या असतात. त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मोठा असतो.”
सुरेश राजहंस हे ब्रह्मनाथ येळंब गावात राहणाऱ्या प्रभाकर व कौसल्या या दांपत्याच्या पोटी जन्मले. ते घरातील शेंडेफळ. दोन मोठे भाऊ. बालपणी घरची परिस्थिती गरिबीची, पण शाळेत कुशाग्र असलेल्या सुरेश यांनी दहावीत केंद्रातून प्रथम येण्याचा मान मिळवला. त्यांनी बारावीनंतर बीए व इंग्रजी विषय घेऊन एमएची पदवी मिळवली. त्यांना शिक्षक होण्याची आवड असल्याने, त्यांनी बीएड करून सुरुवातीला काही वर्षें गेवराई तालुक्याच्या सैदापूरमध्ये कायम विनाअनुदानित शाळेत इंग्रजी अध्यापक म्हणून नोकरी केली. तेथे पगार नव्हता. तेथे त्यांना केवळ शिकवण्याचा अनुभव मिळाला.
त्यानंतर त्यांनी शिरूर तालुक्याच्या ‘इंदुवासिनी संस्थे’च्या शाळेत तासाप्रमाणे मानधन तत्त्वावर काही वर्षें शिक्षक म्हणून नोकरी केली. दरम्यानच्या काळात पत्रकारितेची आवड असल्याने ग्रामीण वार्ताहर म्हणून विविध दैनिकांत कामही केले. त्यांचा आर्वीच्या ‘शांतिवन’ या ऊसतोड कामगार मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या दीपक नागरगोजे यांच्याशी पत्रकारितेच्या निमित्ताने संपर्क आला. त्यांनी मुळातच सामाजिक भान व समाजकार्याची आवड असल्याने शाळा, पत्रकारिता सुरू ठेवत ‘शांतिवन’साठी काम सुरू केले. त्यावेळी तमाशा कलावंतांच्या मुलांचा प्रश्न त्यांना अधिक महत्त्वाचा वाटला. त्यांना त्या विषयावर काम करावेसे वाटले. त्यांनी किशोर शांताबाई काळे यांचे ‘कोल्हाट्याचं पोर’ हे आत्मचरित्र वाचले होते. त्याचाही प्रभाव त्यांच्यावर होता. त्यातूनच 2011 मध्ये ‘सेवाश्रम’ या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला त्यांना मोठा विरोध झाला. तो प्रकल्प शासनाच्या अनुदानाशिवाय सुरू आहे. त्यांच्या कामाची दखल घेत विविध संस्थांनी त्यांचा पुरस्काराने गौरव केला आहे. भारत स्काऊट शाखेच्या शिरूर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.
सुरेश राजहंस यांच्या कुटुंबाचे पाठबळ त्यांच्यामागे आहे. त्यांची पत्नी मयुरी ही त्या मुलांची आईप्रमाणे काळजी घेते. मुले ‘सेवाश्रम’ आणि ‘शांतिवन’ या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. दीपक व कावेरी नागरगोजे यांची ‘शांतिवन’ ही संस्था आहे. त्यापासून प्रेरणा मिळाल्याचे सुरेश म्हणाले. दीपक नागरगोजे यांनी सुरेश यांना मार्गदर्शनही केले. ‘शांतिवन’चे उपाध्यक्ष सुरेश जोशी व विनायकराव मेटे यांच्या सहकार्यातून वसतिगृह इमारतीचे बांधकाम होत आहे. त्याशिवाय ‘आनंदवन मित्र मंडळ’, ‘मैत्र’, ‘मांदियाळी’ यांच्यासह इतर अनेक ग्रूप मदत करत असतात.
सुरेश यांचा प्रयत्न त्या मुलांना मराठीबरोबरच इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्याचा आहे. ‘सेवाश्रमा’चे स्वयंसेवक शाळेचा गंध नसलेल्या त्या मुलांना शिक्षणाची गोडी लागण्यासाठी विविध उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांना अक्षरओळख करून देण्यापासून तयारी करून घ्यावी लागते. डॉ. विकास आमटे, डॉ. रवी व स्मिता कोल्हे, अनिकेत आमटे, राज्याचे माजी शिक्षण संचालक महावीर माने यांच्यासह इतर अनेक मान्यवरांनी सुरेश यांच्या कामाला दाद दिली आहे.
‘सेवाश्रम’ सात वर्षांपासून सुरू आहे. ‘सेवाश्रम’ मुलींच्या बाबतही काम सुरू करत आहे. कापडी पिशव्यांचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. भविष्यात सॅनिटरी नॅपकीन उत्पादन सुरू करून महिला-मुलींच्या आरोग्याबाबत काम करण्याचा व कमी किंमतीत सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देऊन, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून प्रकल्प स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे सुरेश सांगतात. ‘सेवाश्रमा’तील शाळा डिजिटल व इ-लर्निंग करण्यात येत आहे. त्यासोबतच इतर काही खोल्यांचे बांधकामही करण्याचा प्रयत्न असून भौतिक सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
सुरेश राजहंस 9922365675
– अमोल मुळे, amol.mule@dbcorp.in