Home व्यक्ती डॉ. दामोदर खडसे

डॉ. दामोदर खडसे

0

इंग्रजीचा भडिमार असणार्‍या आणि विद्यापीठांमधील भाषाविभाग ओस पडत असलेल्या काळातही खडसेसर हिंदी भाषेच्या भवितव्याबद्दल आशावादी आहेत. त्यांच्याकडे भाषासंवर्धनासाठी ‘लँग्वेज इंजिनीयरिंग’ चा भक्कम पर्याय आहे. कालौघात आपली भाषा जिवंत, रसरशीत ठेवायची असेल, तर तिचं रूपही काळानुसार बदलत राहिलं पाहिजे आणि हे बदल खुलेपणानं स्वीकारले पाहिजेत असं खडसेसरांचं म्हणणं आहे. टीव्ही, जाहिराती, सिनेमा, इंटरनेट, पत्रकारिता अशा अनेक माध्यमांना हिंदी भाषातज्ज्ञांची व लेखकांची गरज सतत असते. भाषेचं क्षेत्र हे अनुवाद ही पूर्णवेळ करिअर करता येण्याइतकं विस्तारलेलं आहे. ‘सी डॅक’ सारख्या माहिती तंत्रज्ञान कंपनीत दीड हजारांहून अधिक हिंदी भाषा व्यावसयिक आहेत. वेगवेगळ्या भाषांसाठी खास सॉफ्टवेअर बनवली जात आहेत. अशा परिस्थितीत भाषेचं काय होणार ही चिंता करण्यापेक्षा भाषांमधील उत्तम करिअरची माहिती अधिकाधिक लोकांपर्यत पोचली पाहिजे असं खडसेसर आवर्जून नमूद करतात.

भाषेच्या सद्यस्थितीबद्दल भाष्य करण्याचा अधिकार खडसेसरांना आहे. खडसेसरांचा जन्म छ्त्तीसगडमध्ये असलेल्या सरगुजा संस्थानात 11 नोव्‍हेंबर 1948 रोजी झाला. तिथंच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अकोल्यात म्हणजे त्यांच्या मूळ गावी एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर शिक्षकी पेशात असताना. नागपूरातून बी.एड., एम.एड. ह्या पदव्या आणि हिंदी भाषेतील डॉक्टरेट संपादन केली

त्यांनी स्वत: दहावीत असल्यापासून लेखन करायला सुरुवात केली होती. त्यांना समानशील मित्रांची साथ मिळाली. त्यामुळे नंतर ‘बँक ऑफ महाराष्ट्र ’मध्ये अधिकारीपदावर नोकरी करत असतानाही साहित्याचे बोट कधी सुटले नाही. पाच कथासंग्रह, साहित्यसंपदा पाच कवितासंग्रह, दोन कादंबर्‍या, दोन प्रवासवर्णने आणि चार भाषाविषयक विवरणात्मक पुस्तकं एवढी त्यांची स्वतंत्र हिंदी आहे. नाटक हा साहित्यप्रकार त्यांनी स्वतंत्रपणे लिहिला नसला, तरी ‘छावा’, ‘कालचक्र’ अशा प्रथितयश मराठी नाटकांचे हिंदी अनुवाद त्यांनी केले आहेत

खडसे यांनी मराठीतील समृद्ध आणि विविधतापूर्ण लेखनाचा ओघ हिंदीत नेण्याचं काम केलं आहे. खडसेसरांनी दया पवारां चं ‘बलुतं’, लक्ष्मण मानेंचं ‘उपरा’, राम नगरकर यांचं ‘रामनगरी’ अशा प्रसिद्ध आत्मकथनांचा अनुवाद केला आहे. ‘रामनगरी’च्या अनुवादाला आणि ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक ‘पुढारी’ चे निवासी संपादक अरुण खोरे यांच्या आत्मकथनाच्या अनुवादाला भारत सरकारचा श्रेष्ठ अनुवादाचा पुरस्कारदेखील मिळाला आहे

त्यांच्याकडून, दया पवार यांच्या हिंदी ‘बलुतं’ची रंजक जन्मकथा ऐकायला मिळाली. कमलेश्वर हे हिंदीतील नामवंत साहित्यकार. त्यांनी त्यांच्या ‘सारिका’ या पत्रिकेत लेखकांचा संघर्ष मांडणारं ‘गर्दिश के दिन’ हे सदर सुरू केलं होतं. त्यासाठी दया पवारांनी त्यांच्या संघर्षाबद्दलचं लेखन पाठवलं. ते लेखन हिंदीत अनुवादित करण्याचं काम खडसेसरांकडे आलं. त्या लिखाणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि कमलेश्वर यांच्या प्रेरणेतून ‘बलुतं’ साकार झालं. या समग्र आत्मकथेचा अनुवादही खडसेसरांनीच केला. दया पवारांची कन्या प्रज्ञा हिचाही लिहिता हात आहे. योगायोग म्हणजे प्रज्ञा पवारांच्या कथांचा हिंदी अनुवादही खडसेसरांनीच केला आहे.

बाबा आमटे यांच्यावर खडसेसरांनी खूप लेखन केलं. त्यांतला काही भाग ब्रेल लिपीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. त्यांच्या स्वत:च्या हिंदी साहित्याचेही मराठी अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ‘इस जंगलमें’ या कथेवर दिल्ली दूरदर्शननं टेलिफिल्म बनवली आहे. ज्येष्ठ हिंदी साहित्यकार पं. हरिनारायण व्यास यांच्यावर बनवलेल्या लघुपटासाठी खडसेसरांनी खूप काम केलं आहे.

साहित्यात इतकं रंगून आणि रमून कार्य करताना अनेक मानसन्मान आणि पुरस्कारही खडसे यांना मिळाले.

* हिन्दी सलाहकार समिती, रसायन व उर्वरकमंत्रालय, भारत सरकार, 1986-89

* हिन्दी सलाहकार समिती, ऊर्जा मंत्रालय, भारत सरकार, 1989-90

* महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी, महाराष्ट्र सरकार, मुंबई, 1992-95

* बोर्ड ऑफ स्टडीज, एस.एन.डी.टी. विश्वविद्यालय, पुणे, 2005

* भारतीय रिजर्व बँक, के.का.मुंबई शब्दावली समिती, 2005

* हिन्दी सलाहकर समिती, पोत परिवहन मंत्रालय, भारत सरकार, 2008

* हिन्दी सलाहकार समिती, रेल मंत्रालय, भारत सरकार, 2010

अशी अनेक पदे त्यांनी भूषवली आणि नुसतीच भूषवली नाहीत, तर भरीव कामही केले.

त्यांच्या ‘काला सूरज’ या कादंबरीला 1998 साली राष्ट्रपती डॉ.शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते राष्ट्रीय साहित्य पुरस्कारही मिळाला.

खडसे हे केवळ हिंदीचे लेखक, अभ्यासक, मार्गदर्शक राहिलेले नाहीत; तर हिंदी साहित्यविश्वात त्यांना स्वतंत्र स्थान, स्वतंत्र ओळख मिळालेली आहे. उज्जैन, कोल्हापूर, अमरावती, पुणे अशा विद्यापीठांमधून अनेक विद्यार्थी पीएच.डी. आणि एम.फिल.साठी त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत आहेत.

खडसेसर ऋजू, आतिथ्यशील आहेत. खडसेसरांमध्ये सर्जनशील आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्व दडलेलं आहे. हे त्यांच्याशी बोलताना उलगडत जातं आणि आपल्या मनात आदराची जागा घेऊन बसते.

डॉ. दामोदर खडसे, 
बी-503-504, हाय ब्लिस, कैलाश जीवन जवळ, नरहे रोड, धायरी, पुणे – 411041
9850088496, 020-24104006

परिचय –

नाव– डॉ. दामोदर खडसे

जन्‍म– 11 नोव्‍हेंबर, 1948, सरगुजा, छत्‍तीसगढ

शिक्षण– एम्.ए., एम्.एड., पीएच्.डी. (हिंदी)

मातृभाषा– मराठी

अनुभव– 9 वर्षे अध्‍यापन, बँक ऑफ महाराष्‍ट्रमध्‍ये 30 वर्षे सहाय्यक महाव्‍यवस्‍थापक म्‍हणून कार्य अनुभव

प्रकाशित पुस्‍तके: कथासंग्रह– भटकते कोलंबस (1980), पार्टनर (1989), आखिर वह एक नदी थी (1990), जन्‍मांतर गाथा (1996), इस जंगल मे (2008), निखडलेली चाकं (मराठी संस्‍करण) अनु. विजया भुसारी (2008), उत्‍तरायण (मराठी संस्‍करण) अनु. चंद्रकांत भोंजाळ (2008),

कादंबरी– काला सूरज (1980), भगदड (1996), खंडित सूर्य (मराठी संस्‍करण) अनु. चंद्रकांत भोंजाळ (1996), कोलाहल (मराठी संस्‍करण) अनु. चंद्रकांत भोंजाळ (2006),

कविता संग्रहअब वहॉं घोसले है(2000), जीना चाहता है समय मेरा(2006), सन्‍नाटे मे रोशनी(2008),

राज्‍यभाषा विषयकराजभाषा प्रबंधन : संदर्भ व आयाम(2000), व्‍यावहारिक अनुवाद(2002), कार्यालयीन व व्‍यावहारिक हिंदी(2002), बैंको मे हिंदी : विविध आयाम(2008),

अनुवादीत पुस्‍तके‘अछूत’, दया पवार यांची ‘बलुतं’ ही आत्‍मकथा (1981), ‘रामनगरी’राम नगरकर यांची आत्‍मकथा (1983), बीरबल साहनी, साहनी यांची आत्‍मकथा (1983), ‘कालचक्र’जयवंत दळवी लिखित नाटक (1993), ‘पराया’केंद्रीय साहित्‍य अकादमी पुरस्‍कृत लक्ष्‍मण माने यांच्‍या ‘उपरा’ हे आत्‍मकथन (1993), ऐसे लोग ऐसी बाते, शिवाजी सावंत यांचे पुस्‍तक (1996), सवाल अपना अपना,मराठी नाटक (1998), संघर्ष, शिवाजी सावंत लिखित मराठी नाटक (1999), भुले बिसरे दिन, अरूण खोरे यांची आत्‍मकथा (2001), विशिष्‍ट मराठी कहानियॉं,संपादन व अनुवाद (2008), ‘अपने ही होने पर’ज्ञानपिठ पुरस्‍काराने सन्‍मानित विं. दा. करंदीकर यांच्‍या कवितांचे हिंदी संकलन, (या पुस्‍तकाचे प्रकाशन भारताचे माजी राष्‍ट्रपती डॉ. एपीजे अब्‍दुल कलाम यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.)

प्राप्‍त सन्‍मान– केन्द्रीय हिन्दी निदेशालय, नई दिल्ली

महाराष्ट्र राज्य हिन्दी साहित्य अकादमी, मुंबई

मध्य प्रदेश साहित्य परिषद, भोपाल

विश्व हिन्दी न्यास, न्यूयॉर्क

हिन्दी साहित्य सम्मेलन, प्रयाग

उत्तर प्रदेश हिन्दी संस्थान, लखनऊ

‘काला सूरज’ कादंबरीसाठी माजी राष्‍ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्‍या हस्‍ते ‘राष्‍ट्रीय साहित्‍य पुरस्‍काराने’ सन्‍मानित (1992)

About Post Author

Exit mobile version