लंडनमधील ती स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण मानावी व एकमेव वाटावी अशी आहे. काणेगावकरांनी बाहत्तराव्या वर्षी लंडनची बेचाळीस किलोमीटरची ती मॅरॅथॉन पूर्ण केली! स्पर्धेचा मुख्य हेतू उदात्त कार्यासाठी पैसा गोळा करणे हा असतो. स्पर्धा १९८१ मध्ये सुरू झाली. त्या स्पर्धेतून तशा विविध उद्दिष्टांसाठी अनेकांनी आतापर्यंत ६६.३० कोटी पौंड निधी जमवला. स्पर्धेत वेगवेगळे गट असतात. एकूण घटनेचे आकर्षण वाढावे व निधी अधिक गोळा होण्याची संधी तयार व्हावी म्हणून स्पर्धात्मक गटात आंतरराष्ट्रीय पातळीची शर्यत आयोजित केली जाते. स्पर्धेची ‘जगातील सर्वात मोठी देणगी संकलक’ अशी ख्याती झालेली आहे! शर्यतीत ‘गोल्डन बाँड चॅरिटी’ आणि ‘सिल्व्हर बाँड चॅरिटी’ हे विशिष्ट कारणांकरता मदत गोळा करणाऱ्यांसाठी खास विभाग असतात. ‘गोल्डन बाँड चॅरिटी’ या विभागास २०१३ या वर्षी डॉ. काणेगावकर यांनी देणगीदार पुरस्कर्ते मिळवून ‘मराठी मंडळा’साठी दोन हजार पौंड निधी जमवला. २१ एप्रिल २०१३ रोजी झालेल्या या स्पर्धा विभागात चौतीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर स्पर्धकांनी भाग घेतला. देणगी संकलन विभागात सहभाग घेण्यासाठी किमान रक्कम आणि कार्यक्षेत्र अशा दोन अटी पूर्ण कराव्या लागतात. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी प्रत्येक केंद्रावर भलीमोठी रांग लागते. काणेगावकरांनी १९८३ मध्ये त्यासाठी प्रथम प्रयत्न डोव्हर केंद्रातून केला. शनिवारी सकाळी सहा वाजता स्पर्धकांना प्रवेश देणार म्हणून काणेगावकरांनी रात्री बारा वाजता रांग लावली! पण दोनशे स्पर्धक घेणार असूनसुद्धा त्यांचा क्रमांक त्यावेळी लागला नाही. त्यांनी २०१३ साली चोवीस तास आधी रांग लावली तेव्हा कुठे त्यांचा दोनशेमध्ये एकशेएकाहत्तरावा क्रमांक लागला!
ते लंडन मॅरॅथॉन पूर्ण करणारे पहिले मराठी धावपटू ठरले. ते त्यासाठी स्पर्धेचा सराव रोज सकाळी अर्धा ते पाऊण तास आणि अधुनमधून दुप्पट वेळ धावून करत होते.
त्यांना त्यांच्या वैद्यकीय कारकिर्दीतील दोन प्रसंग आठवतात. पहिला २००० सालच्या सुमाराचा. त्यांच्या लंडनच्या रुग्णालयात बावीस-तेवीस वर्षांच्या इंग्लिश तरुणीने काणेगावकरांकडे पाहून मंद स्मित केले. त्यांना ती परिचयाची वाटली नाही. म्हणून ते तिच्याकडे दुर्लक्ष करून पुढे चालू लागले. ती मुलगी पळत पळत मागे आली. “ सर, मला तुम्ही ओळखणं कठीण आहे.” काणेगावकर प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहत राहिले. ती म्हणाली, “मी व्हिक्टोरिया.”
काणेगावकरांना अर्थबोध होईना. व्हिक्टोरियाच पुढे बोलू लागली.
“माझ्या आईने मी तीन-चार वर्षांची असताना १९८० साली मला तुमच्याकडे नाकातून रक्त येतं म्हणून आणलं होतं. तुम्ही कॅन्सर असल्याचं निदान केलंत. मी वेळीच उपचार झाले म्हणून वाचले.” हे सांगत असताना तिच्या डोळ्यांत अश्रू तरळले. ती सद्गदित झाली. ती पुढे बोलू लागली. “मी लग्न करतेय. त्याचं आमंत्रण द्यायला आले आहे. अवश्य या.”
“गोविंद, तुला काय शंका होती? ”
“निश्चित अंदाज येत नव्हता. काहीच उलगडा होत नाही.”
“उलगडा झाला. कॅन्सर आहे.”
त्यानंतर सर्व उपचार सुरळीत पार पडले. मुलगी पूर्ण बरी झाली. चित्रपटातील फ्लॅशबॅकप्रमाणे सर्व घटना काणेगावकरांच्या मन:चक्षूसमोर उभ्या राहिल्या. ती चिमुरडी नववधू झाली आहे! काणेगावकर मनोमन सुखावले.
तो प्रसंग ऐकताना माझ्या मनात कॅन्सरच्या भस्म्या राक्षसाची भीती दाटून आली. त्यांना लगेच प्रश्न विचारावासा वाटला. “डॉक्टर, इतक्या लहान वयात कॅन्सर कसा काय झाला असावा?”
“निसर्गाचा आघात. दुसरं काय?” डॉक्टर चटकन् बोलले. आपुलकीने वैद्यकीय उपचार करण्याची वृत्ती असलेल्या काणेगावकरांमधील माणूस पुढे बोलू लागला.
“असे आघात आणि अपघात क्वचित होतात. आपल्या शरीरात रोग प्रतिबंधक भिंत असते. तिला सहज तडे जात नाहीत. मात्र वाईट सवयींमुळे माणूस त्या भिंतीला तडे पडले जाण्यास मदत करतो”. इंग्लंडमध्ये या बाबतीत सातत्याने शैक्षणिक मोहीम आखली जाते. कॅन्सरची लक्षणे फार उशिरा कळतात. त्यामुळे दक्षता फार घ्यावी लागते.
प्रसंग दुसरा : कॅन्सरमधून बरा झालेला आफ्रिकन रोगी काणेगावकरांना अद्याप आठवतो. तो रुग्णालयात आला तेव्हा नाक आणि घसा यांचा त्याचा कॅन्सर बरा होईल याची सुतराम शक्यता नव्हती. परंतु आशा अमर असते. डॉक्टरने तर प्रयत्न सोडायचे नसतात. केमोथेरपी सुरू करण्यात आली. काही दिवसांत त्याच्या तब्येतीत फरक पडू लागला. लवकरच तो बरा झाला. तो न चुकता प्रत्येक नाताळला डॉक्टरांना शुभेच्छा कार्ड पाठवतो.
त्याग दोघांना राष्ट्रीय आरोग्य योजनेत (एन.एच.एस.) नोकरी मिळाली. जागेची तजवीज झाली. काणेगावकर पती-पत्नींनी उच्च शिक्षणाचा अभ्यास सुरू केला. गोविंदने कान, नाक, घसा यांचा विशेष अभ्यास करून प्रथम डिप्लोमा मिळवला. नंतर ते एफ.आर.सी.एस. (फेलो ऑफ रॉयल कॉलेज ऑफ सर्जरी) झाले. विजया स्त्री-रोगतज्ज्ञ झाल्या.
गोविंदरावांचा लौकिक घशाच्या कॅन्सरचे तज्ज्ञ म्हणून वाढत गेला. त्यांच्या हाताखाली पंधरा-वीस डॉक्टर्स काम करत. अशा वेळी काणेगावकर दांपत्याने धाडसी निर्णय घेतला. लंडन सोडायचे! त्यांनी लंडनपासून शंभर मैल दूर केंट काउंटीमधील समुद्रकिनाऱ्यावरील शांत अशा हायथ या छोट्या गावाची निवड केली. रुग्णालय दहा मैलांवर अॅशफर्डला होते. त्या रुग्णालयात स्त्री-रोगतज्ज्ञ एकच असल्यामुळे सौ. काणेगावकर यांना तेथे रात्री-अपरात्री धावावे लागे. काणेगावकरांनी सात वर्षांनी गावातील वरच्या पाखाडीतील प्रासादतुल्य घर विकत घेतले. कालांतराने, मुलगा राहूल हाही डॉक्टर झाला. मुलगी रोहिणी ऊर्फ रिटा इंजिनीयर झाली. दोघांची लग्ने झाली. रोहिणी इंग्लिश कुटुंबात गेली. त्यांना रिटापेक्षा रोहिणी हे नाव आवडते. नातवंडे आली.
अशाच एका प्रसंगी काणेगावकरांच्या बंगल्यात पुण्याच्या निजामपूरकरांचा वेगळा कार्यक्रम झाला होता. ते दक्षिण ध्रुवावर गेले होते. त्यांनी पारदर्शिका दाखवत अनुभवकथन केले. तो रोमांचक अनुभव होता अशी छान आठवण काणेगावकर सांगतात.
एका अनंत चतुर्दशीला डॉन थॉम्सन या अॅथलिटची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. इंग्लंडच्या थॉम्सनने १९६० च्या रोम ऑलिंपिकमध्ये पन्नास किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. त्याच्याशी प्रश्नोत्तरे सुरू असताना प्रत्येकजण त्याला मिळालेले ऑलिंपिक सुवर्णपदक कौतुकाने न्याहाळत होता. काहींनी ते गळ्यात घालून फोटोही काढले. विनम्र स्वभावाच्या थॉम्सनने सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. तो दानशूर आणि दयाळू आहे. त्याने विविध कार्यासाठी निधी जमवण्याच्या हेतूने चालण्याच्या स्पर्धेत एकशेबावऩ्न वेळा भाग घेतला! काणेगावकरांच्या जवळच राहणाऱ्या थॉम्सनला बागकामाची आवड; तो काणेगावकरांच्या बागेची निगराणी करत असे. बी.बी.सी.ने त्याची मुलाखत त्याच बागेत चित्रित केली होती.
काणेगावकरांच्या बंगल्यात श्रीकांत पारगावकर, अनुराधा मराठे आणि सलील कुलकर्णी यांच्याही मैफली रंगल्या आहेत. सौ. काणेगावकर त्या आठवणी सांगताना तल्लीन होतात.
श्री आणि सौ. काणेगावकर यांचा महाराष्ट्र मंडळाची वास्तू खरेदी करताना सहभाग होताच. त्यानंतर त्यांनी विस्तार व दुरुस्ती या कामासाठी पैसा उभा करताना व प्रत्यक्ष काम करताना फार परिश्रम घेतले. मंडळात कोणताही कार्यक्रम असो, त्याला ते शंभर मैलांवरून वेळेपूर्वी येऊन हजर असतात. काणेगावकर दांपत्य घरच्या कार्यासारखे त्यात गुंतलेले दिसते. मंडळात येणाऱ्या प्रत्येकाचे ते ‘काका-काकू’ बनून गेले आहेत.
विष्णुसहस्रनाम म्हणताना मन:चक्षूपढे ईश्वराची मूर्ती साकारली गेली पाहिजे, इतके मन एकाग्र व्हावे.
हे खा, ते खाऊ नकोस असे सांगत बसायला देवाला दुसरा उद्योग नाही का?
येशू ख्रिस्त आणि गुरू नानक यांनी लोकांना सांगितले नाही, की माझ्या नावाने धर्म सुरू करा.
आपण स्वत: विचार करावा, पारख करण्यास शिकावे.
ते सांगत होते, मी एकदा आजीला विचारले, “आजी, तू डोक्यावर पदर का घेतेस?” छोट्या गोविंदला आजी म्हणाली, “अरे, देवबाप्पा रागावतो. त्याची भीती वाटते.”
गोविंदचे समाधान झाले. काळ सरला. गोविंदचे वय वाढल्यानंतर, आजीने त्याला विचारले, “तुला आठवतंय, तू मला एकदा डोक्यावर पदर का घेतेस असं विचारलं होतंस. तेव्हा मी तुला सांगितलं होतं, की देव रागावतो. परंतु तसं काही नसतं. बायका नावं ठेवतात. देवापेक्षा त्यांचीच भीती जास्त वाटते!”
काणेगावकरांनी प्रेमाने, आपुलकीने, परिश्रमाने माणसे जिंकली. ते परमेश्वरावर अंधविश्वास न दाखवता त्याची सेवा करतात. गणेशोत्सवात दहा दिवस न चुकता लंडनलाच मुक्काम ठेवतात. न लाजता सभागृह स्वच्छ करतात. सौ. काणेगावकर बार्शीच्या. त्यांचे बालपण, प्राथमिक शिक्षण आणि लग्न बार्शीला झाले. त्यांनी तेथील भगवंताला पंचामृत अभिषेक करून त्यांनी २००९ मध्ये लग्नाचा चाळिसावा वाढदिवस साजरा केला. काणेगावकर असे भावबंध जपतात!
डॉ. गोविंद काणेगावकर
३०, नॉर्थ रोड, हायथ, केन्ट, सीटी २१ ५ डिटी
govindsk@hotmail.co.uk
– आदिनाथ हरवंदे
९६१९८४५४६०
adharwande@gmail.com
Last Updated On – 13th Jan 2017
माहिती छान हे..
माहिती छान आहे..
Think Maharashtra मुले 50
Think Maharashtra मुले 50 वर्षांनी डॉ. काणेगाववकर भेटल्याचा आनंद अवर्णनीय आहे. १९६० साली पुण्याच्या BJMedical College एकाच वर्षी प्रवेश घेतला.
Comments are closed.