Home व्यक्ती जिंदा दिल! सुभाष गोडबोले

जिंदा दिल! सुभाष गोडबोले

1

इंदूरचे सुभाष गोडबोले हा दहा लाखांमधील एक माणूस आहे. मूत्रपिंड आरोपण करून यशस्वी जीवन जगणारी जगात किती माणसे आहेत ते मला ठाऊक नाही. तथापी गोडबोले तसे दुर्मीळ जीवन गेली तेरा वर्षे जगत आहेत. त्यांना त्या करता मुंबईच्या रेल्वे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या नजरेखाली सतत राहावे लागते आणि उकळून पाणी पिणे यांसारखी संसर्गजन्य रोग प्रतिकारक काळजी नित्य घ्यावी लागते. सुभाष गोडबोले असे दुर्मीळ जीवन त्यांची पत्नी सुमित्रा यांच्या साहचर्याने सुखासमाधानात जगत आहेत.

सुभाष म्हणजे उत्साहाचा आणि आनंदाचा धबधबा आहेत. ते पश्चिम रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक या पदावरून बारा वर्षांपूर्वी निवृत्त झाले. असे मराठी उच्चाधिकारी केंद्रीय प्रशासनात विरळा आहेत, आणि जे आहेत त्यांपैकी बहुसंख्य बृहन्महाराष्ट्रातून पुढे आलेले आहेत- त्यांचे पूर्वज दोन-तीनशे वर्षांपूर्वी महाराष्ट्र सोडून परप्रांतात गेले. सुभाष गोडबोले यांचे वडील मूळ कोकणातले, ते मध्यप्रदेशातील सीतामऊ या चिमुकल्या संस्थानातील दिवाण होते. इतके चिमुकले की गावांत पाण्याचे नळ, वीज, डांबरी रस्तेसुद्धा नव्ह्ते. जेमतेम 3-4 हजार वस्तीचचे गाव. पण मॅट्रिक नंतर पुढे इंदूरला येऊन होळकर कॉलेजात शिकले. त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण स्वेच्छेने केली व ते उमदे, रसीले, परोपकारी जीवन जगत राहिले. त्यांना त्यांच्या जीवनातील प्रत्येक हकिगत सांगताना ऐकणे हाच एक अनुभव असतो. ते प्रसंग सर्वसामान्य जीवनांतले असतात, परंतु गोडबोले यांच्या सद्भावनेने व सत्कृत्याने इतके लोकविलक्षण बनतात, की त्यामुळे ब-याच वेळा हृदय भरून येते व मन सद्गदित होते. प्रसिध्द लेखिका प्रतिभा रानडे (त्यांची मोठी मावस बहिण) त्यांना सतत बजावत असतात, की ‘‘अरे सुभाष, तुझे अनुभव तू नक्की लिहून काढ’’.

ते इंदूरच्या कॉलेजातून बी.एससी. झाले आणि त्यांनी १९६३ साली जमालपूरच्या रेल्वे इन्स्टिट्यूटमधील अवघडातील अवघड प्रवेश परीक्षा यशस्वीपणे पार केली. रेल्वेने स्वत:चे अभियंते स्वत: घडवण्यासाठी ब्रिटिश काळात, १९२७ साली ‘इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अॅण्ड मॅकॅनिकल इंजिनीयरिंग’ ही प्रथम दर्जाची संस्था निर्माण केली. तेथे रेल्वेचे अनेक अभ्यासक्रम चालतात, परंतु स्पेशल क्लास रेल्वे अॅप्रेंटिसशिप हा अभ्यासक्रम विशेष व युपीएससीतील उच्च श्रेणीच्या तोडीचा मानला जातो. तेथील शिक्षण-प्रशिक्षणाची अपवादात्मकता अशी, की तेथे फक्त एक हजार बावीस मुलांना गेल्या पंचाऐंशी वर्षांत शिक्षणासाठी प्रवेश मिळाला आहे! नोबेल पुरस्काराचे मानकरी आर. के. पचौरी हे त्यांतले एक. सारी पंगतच तशा गुणवान लोकांची आहे. गोडबोले त्यांच्यामधील एक. म्हणूनही गोडबोले दहा लाखांतले एक म्हणता येतील.

पण मग या असाधारणत्वापलीकडे सुभाष गोडबोले यांचा आगळेपणा काय? तर त्यांनी नोकरशाहीत उच्चपदी जाऊनदेखील नोकरशाहीचा ‘नो’ नाकारला; सतत माणूसपण जपले. ते त्यांच्या एका बॉसची गोष्ट सांगतात. बॉसचा गोडबोले यांच्या क्षमतेवर विश्वास. ते म्हणत, की तुम्हाला वर चढायचे असेल तर सभोवतीची माणसे ‘क्रश’ करत जावे लागते. करियरमध्ये गुणवान व्यक्तीला सतत Y (वाय) प्रॉब्लेमला तोंड द्यावे लागते. दोन वाटा समोर असतात. करियरमध्ये वर जायचे की चांगुलपणा, जिव्हाळा जपत माणुसकी दाखवायची? बॉस करियरच्या वाटेने जावे या मताचे होते, गोडबोले यांनी माणुसकी जपली. ते मुंबईला चीफ पर्सोनेल मॅनेजर असतानाची गोष्ट. सेवेतल्या व निवृत्त कर्मचा-यांची  त-हेत-हेंची अगणित पत्रे येत. त्यात डोंबिवलीच्या चौ-याऐंशी वर्षांच्या बाईचे पत्र एके दिवशी त्यांच्या हाती आले. तिचा नवरा रेल्वेतून निवृत्त होऊन निधन पावला होता, म्हाता-या बाईंना पेन्शन मिळत होती, पण त्यांची अडचण वेगळीच होती. त्यांना एकच मानसिक दुर्बल बासष्ट वर्षांची मुलगी होती. आपल्या पश्चात तिचा सांभाळ कसा होणार? ही चिंता म्हाता-या बाईंना वाटे. त्यांनी ती व्यक्त केली होती. गोडबोले यांनी त्या बाईकडे त्यांचा एक दूत व मेडिकल ऑफिसर यांना पाठवून, अगदी दुर्मीळातील दुर्मीळ केस करून त्या अवलंबित मुलीला पेन्शन मिळवून दिले, एवढेच नव्हे तर तिचे चेक नियमित बॅंकेत कसे जमा होतील याची व्यवस्था लावून दिली. त्या म्हाता-या बाईंनी कृतज्ञतेचे जे पत्र पाठवले ते गोडबोले यांनी जतन करून ठेवले आहे. ते म्हणतात, की लोकांचे अशा त-हेचे आशीर्वाद ही माझी संपत्ती आहे.
ती त्यांच्याकडे उदंड आहे.

ते अजमेरला चिफ वर्कस् मॅनेजर होते. तेथे त्यांच्या हाताखाली वर्कशॉपमध्ये सतरा हजार कामगार होते. त्यांचे कुटुंबीय वगैरे धरून लाखाच्या आसपासची वस्ती. अजमेरच्यास ‘नवज्योती’ दैनिकाची हकिगत गमतीदार आहे. त्याचे संपादक दीनबंधू चौधरी एका पार्टीत गोडबोले यांना भेटले. चौधरी यांनी ‘आपले वर्तमानपत्र कसे वाटते?’ असे गोडबोले यांना सहजच विचारले. गोडबोले त्यांना म्हणाले, की तुम्ही वर्तमानपत्रवाले खमंग, मसालेदार, गुन्हेगारी बातम्या फार प्रामुख्याने छापता. त्यामुळे समाजात चांगले काही घडतच नाही असे वाटते. उलट, समाजात चांगलेच अधिक घडत असते. ते छापा की!

चौधरींनी त्यांना सुचवले, की तुम्हीच अशा चांगल्या बातम्या आम्हास द्या बरे! गोडबोले यांनी त्यांच्या वार्ताहराला दर शनिवारी दुपारी आपल्याकडे येण्यास सांगितले. गोडबोले म्हणाले, की माझ्या एक लाख माणसांच्या कुटुंबांतच इतक्या चांगल्या गोष्टी घडत असत! मी त्या टिपून वार्ताहराला देई. त्या छापून येत. त्यामुळे आमचा स्टाफदेखील औत्सुक्याने पेपर वाचू लागला. ती वार्ता गावात पसरली. सारे वातावरणच बदलून गेले. नंतर ते रतलामला डिव्हीपजनल रेल्वे. मॅनेजर होते. बावीस हजार कर्मचारी वर्गाचा फक्तो एक कार्यप्रमुख म्हणून न राहता त्यांनी या सर्वांचे कुटुंबप्रमुख म्हणून काम करायचे ठरवले. इतर कनिष्ठ अधिकारी वर्ग, फोनमेन, चार्जमेन, इन्स पेक्टर ऑफिस स्टाफ आणि त्यांचे कुटुंबीय अशा सर्वांना बरोबर घेऊन जायचा त्यांनी सतत प्रयत्न केला.
रतलाम येथे साजरा करण्यात आलेल्या स्वातंत्र्यदिनाचे क्षणचित्र स्वातंत्र्यदिनाची परेड आणि गोडबोलेगोडबोले पती-पत्नी स्वत: मुलांना दर आठवड्यात शनिवारी गोष्टी सांगत. महिन्यातून एकदा मुलांसाठी घरी पार्टी योजत. डीआरएम म्हणून घरी मोठा स्टाफ असे. ते लोक मुलांसाठी उत्तमोत्तम पदार्थ बनवत. दिवसभर धमाल असे. गोडबोले सांगतात, की पाडगावकर म्हणतात त्याप्रमाणे जीवन रडतरुसत जगायचे की हसतमुरडत जगायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते. मी व माझ्या पत्नीने दुसरा पर्याय स्वीकारला होता.

गोडबोले यांच्या आनंदात, मौजेत विधायकता होती. रतलामच्या एका हिंदी दैनिकाने ते रतलाम सोडून गेल्यानंतर अग्रलेख लिहिला, की त्यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीत तेथे एकही संप अथवा निदर्शन घडून आले नाही! अशा अधिका-याचे दुसरे उदाहरण नाही.

गोडबोले यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी – रतलाम, अजमेर, कोटा, बडोदा वगैरे – बदल्या झाल्या. त्यांनी प्रत्येक ठिकाणी असेच वातावरण निर्माण केले. त्यामुळे रेल्वे कर्मचा-यांना त्यांच्या कार्यशैलीचे कौतुक होई. ते म्हणाले, की ऑफिसचे काम दुपारी संपले, की ब-याच वेळा मी इंटरकॉमवरून प्रत्येक विभागात चौकशी करे. उगाच कोणी खोळंबले नाही ना हे पाहात असे. लोकांना वेळेवर घरी जाण्याबाबत नेहमीच सांगे. म्हणे, ‘बिवीबच्चे घरमें राह देखते होंगे!’ त्यांना गोडबोले यांची आपुलकी स्पर्शून जाई.

त्यांच्या कामाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या जबाबदा-यांमत जमालपूरलाच रेल्वे इन्स्टिट्यूटचे प्रमुख म्हणून जावे लागले. ती पाच वर्षे त्यांना फार अभिमानाची वाटतात.

गोडबोले म्हणतात, की मी प्रेमळपणाने वागलो तरी फटकळ होतो. काय ते स्पष्ट सांगत असे. उत्तरेकडे आढळणारी जी हुजरेगिरी, ती तर माझ्यात अजिबात नव्हती. नीतीशकुमार रेल्वेमंत्री असताना एका बिहारी खासदाराला त्यांच्या फटकळपणाचा अनुभव आला. त्या प्रसंगातून त्यांचा चटपटीतपणा, मातृभाषाप्रेम असे अनेक गुण व्यक्त होतात. हिंदी सलाहकार समितीच्या एका खासदार सदस्यांनी ‘‘अंग्रेजी का भूत जब तक सिर से नही उतरता तब तक हिंदी का विकास होना असंभव है’’ असे प्रतिपादले. नंतर सर्व अधिका-यांना आपापले मत मांडण्या साठी थोडा वेळ दिला होता. त्यारत गोडबोले असे म्हीणाले, की ‘‘हिंदीवर प्रेम जरूर करावे, परंतु इंग्रजीचा दुस्वास करू नये. त्यामुळे हिंदीचा विकास थोडीच होणार आहे.’’

बिहारी खासदार हिंदीप्रेमी. त्यांना गोडबोले यांचे शब्द लागले. त्याने गोडबोले यांना विचारले, की तुमची मराठी भाषा आहे. तिची व हिंदीची तुलना कशी कराल? गोडबोले म्हणाले, की मराठी तर माझी आईच आहे. तिची तुलना कशी करणार? पण हिंदी माझी आवडती मावशी आहे.

मागील वर्षीच ममता बॅनर्जी यांच्यार हस्ते इंग्रजी निबंधाचा पहिला पुरस्कार गोडबोले यांना मिळाला होता. त्याला उद्देशून खासदार म्हणाले, की पण मग इंग्रजीला काय म्हणायचे? वाक् गोडबोले उत्तरले, की ती तर आपली दासी आहे. तिच्याशिवाय आपली सेवा कोण निभावणार?

गोडबोले यांच्या बोलण्यावर नीतीशकुमार एवढे खूष झाले, की त्यांनी आपल्या सचिवांकडून गोडबोले यांच्याकडे विचारणा केली, “अशी उद्धृते कोठे मिळतात? ती आम्हाला भाषणात वारंवार योजावी लागतात” गोडबोले म्हणाले, की मला सुचले ते मी बोललो.

गोडबोले मुंबईत होते, तेव्हा अर्थातच अनेक विभागांत मराठी माणसे जास्त असत व त्यातही काही विभाग तर महिलांनी भरलेले असत. एका विभागात कर्मचारी महिलांची ‘फार घाण झाली आहे, जुने रेकॉर्ड –फायलींचे गठ्ठे साफ केले जात नाहीत’ अशी तक्रार होती. गोडबोले म्हणाले, की मी एका शनिवारी त्या विभागात गेलो आणि म्हटले, की तुम्ही स्त्रिया स्वयंपाकघर स्वत:चे समजता व ते कसे साफ स्वच्छ, नीटनेटके ठेवता, मग ज्या ठिकाणी तुम्ही आठ तास बसून काम करता, तेथे ही घाण तुम्हाला सहन कशी होते? तुम्ही कोणाची वाट पाहात का थांबता? तुम्हीच साफसफाई करा. एकदा तुंबलेला कचरा-घाण दूर केली की मग नियमित सफाई सोपी होईल.

गोडबोले यांच्या भाषणाचा प्रभाव पडला. त्या नंतरच्या शनिवारी सर्व महिला मुद्दाम साफसफाईसाठी कामावर आल्या. मुख्य स्वच्छता त्या दिवशी झाली व नंतर आठवडाभर सर्व विभाग नीटनेटका लावून झाला. महिला खूष झाल्या, गोडबोले यांनाही समाधान वाटले. त्या स्वच्छता मोहिमेचा शेवट मात्र गोडबोले यांच्या बहिणीकडे ठाण्याला गमतीदार पध्दतीने झाला. बहिणीकडे सत्संग चाले. तेथे एक बाई येत. त्या नेमक्या रेल्वे विभागात कामाला होत्या. त्या बहिणीला म्हणाल्या, “खरा सत्संग तुमच्या भावाने आमच्याकडून करवून घेतला!” बहीणदेखील भावाच्या ‘पराक्रमा’ने अचंबित झाली.

गोडबोले यांना रेल्वेच्या वतीने इराकमध्ये तीन वर्षे जावे लागले. गोडबोले यांची इराकमधील ती तीन वर्षे अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली. त्यांचा स्वभावविशेष पक्का झाला आणि रेल्वेमधील जबाबदार, जिव्हाळा जपणारा अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा छान, गहि-या रंगांनी भरून गेली. भारतातील रेल्वे धरून सात संस्थांचे मोठे अधिकारी त्या कामगिरीवर एकत्र आले होते. त्याच काळात अमेरिकेने कुवेत युध्द पुकारले. सर्व मंडळी धास्तावली. इराकमधील भारतीय उच्चायुक्तांनी या बड्या लोकांना लगेच भारतात परत पाठवण्याची सोय करण्याचे ठरवले. गोडबोले यांनी भूमिका घेतली, की रेल्वेचे सर्व लोक सुखरूप भारतात परतल्याशिवाय ते इराक सोडणार नाहीत. त्यांना परराष्ट्रमंत्री गुजराल यांच्याबरोबर परत येण्याची संधी होती. सातापैकी चार संस्थांचे उच्चाधिकारी भारतात सुरक्षिततेसाठी परतले. गोडबोले धरून तिघेजण मागे राहिले. त्यांचे धैर्य, कार्यनिष्ठा, सहभावना या गुणांचे नंतर कौतुक झाले.
गोडबोले यांचा इराकमधील ड्रायव्हर तरुण सरदार होता. रेल्वेचे पंचेचाळीस जणांचे शेवटचे पथक मागे राहिले होते. सगळ्यांना भारतात परत केव्हा व कसे जायचे याबद्दल चिंता वाटत होती. त्या सरदार ड्रायव्हरलादेखील परत जाण्याची ओढ लागली होती. तो त्याच गोष्टी बोले. गोडबोले यांनी त्याला बजावून सांगितले, की तू निर्धास्त राहा. तुला परतीच्या विमानात बसलेले पाहिले, की मी स्वत: विमानात बसेन. तोपर्यंत इराक सोडणार नाही. गोडबोले यांना तो शब्द पाळायला नियतीनेही मदत केली. झाले ते असे, की पूर्ण पथक दुबई पर्यंत एकाच विमानाने आले. तेथून फक्त गोडबोले पती-पत्नी् मुंबईला व बाकी सर्व मंडळी दिल्लीिला जाणार होती. सुदैवाने दिल्ली चे विमान पंधरा मिनिटे अगोदर सुटणार होते. भजन सिंग ड्रायव्हलरला गोडबोले मिश्किलपणे म्हणाले, ‘‘देखो तुम सही सलामत हो और तुम्हारा जहाज भी मुझसे पंधरा मिनिट पेहले छुट रहा है. पाला के नही मैने अपना वादा.’’ तेव्हा त्या तरुण सरदाराने गोडबोले यांच्या पायावर कृतज्ञतेने फेटा ठेवला. सरदार लोक असा सन्मान क्वचित कोणाला देतात. इराक सरकारबरोबर जे करार करायचे त्याची किंमत सुमारे एकशेऐंशी दशलक्ष डॉलर होती. ते काम पूर्ण करूनच आम्ही भारतात परतलो असे गोडबोले अभिमानाने सांगतात.

सरकारी नोकरीत राहिलेल्या माणसांचे रक्त सरकारी होते आणि त्याचा उत्साह थंडावून जातो, उपक्रमशीलता नष्ट होते, पण गोडबोले हे त्यास अपवाद आहेत, त्याचे कारण त्यांच्या वृत्तीतील रसिकता. त्यांचे पु.ल.देशपांडे हे दैवत. त्यांच्या लेखनावर, कार्यक्रमांवर गोडबोले यांच्या वृत्ती जोपासल्या गेल्या. ते त्याचे तेवढेच श्रेय त्यांचे राजाकाका गोडबोले यांनाही देतात. किंबहुना, राजाकाकांनी आपल्यात गायनप्रेमाचे बीज पेरले असे ते मोठ्या अभिमानाने नमूद करतात. दिल्लीत राजाकाका आणि बंडोपंत सरपोतदार यांची घरे म्हणजे महाराष्ट्रातील लेखक-कलावंतांचे अड्डे असत. सुभाष गोडबोले काकांकडे जात तेव्हा त्यांना तो मैफिलीचा आनंद लाभे. ते म्हणाले, की तरुण होतो. 1967 साली दिल्लीत एक परीक्षा द्यायला गेलो होतो. परीक्षेचा दबाव मनावर होताच, त्यात दिल्लीत संगीत महोत्सव होता. माणिक वर्मा, हिराबाई बडोदेकर आणि गुलाम अली खां अशी तिघांची तीन दिवस गाणी होती. राजाकाकांनी त्यांना गाण्याला चलण्याचा आग्रह धरला. ते म्हणाले, की “दोन दिवस येऊन पाहा. रमलास तर बघ, नाही तर सोडून दे.” गोडबोले यांनी परीक्षेच्या तयारीची सबब सांगितली, तेव्हा राजाभाऊ यांचा युक्तिवाद झकास होता. ते म्हणाले, की “आधी जर परीक्षेची तयारी केली असेल तर आता अभ्यास करण्याची गरज नाही आणि जर तयारीच केली नसेल तर आयत्या वेळची धावपळ काहीच कामाची नाही.”

गोडबोले सांगतात, की “माणिक वर्मांच्या पहिल्या दिवशीच्या गाण्याची छाप माझ्यावर पडली नाही आणि मी मारूनमुटकूनच दुस-या दिवशी हिरावाईंच्या गाण्याला गेलो. मी ते ऐकून मात्र पुरता गारद झालो आणि तिस-या दिवशी, गुलाम अलींच्या गाण्यासाठी माझे पाय आपोआप संगीत महोत्सवाकडे वळले.” गोडबोले यांना तेव्हापासून शास्त्रीय गाण्याचे वेड लागले ते कायमचे. किंबहुना, अशाच घटनांनी आपल्यातील कलारसिकता जोपासली गेली असे ते म्हणतात. त्यांनी खरे तर एक अद्भुत ठसा निर्माण केला आहे तो त्यांच्या सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाचा. त्यांनी ज्या ज्या गोष्टींनी त्यांची रुची घडवली त्या तेथे नमूद केल्या आहेत. त्यामध्ये लता मंगेशकर स्वाभाविक येतात, गीतरामायण येते, ‘सर्वेपि सुखिन: संतु’ ही प्रार्थना आहे. ‘तुझे आहे तुजपाशी’ हे सर्वोत्तम नाटक आहे असे त्यांना वाटते, ते आणि ‘तिसरी कसम’, ‘आनंद’ हे सिनेमा… असे पंधरा-वीस नामनिर्देश, काही उद्धृते अशी ती त्यांनी खास बनवून घेतलेली ‘प्लेक’ आहे. त्यांनी ती त्यांच्या घराच्या दर्शनी भागात लावली आहे. सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वाचा तो ठसा मला फारच समर्पक व उपयुक्तही वाटला. त्यांच्या अभिरुचीचे ते विधान आहे.

गोडबोले इंदूरचे आहेत, त्यामुळे ते उदार हृदयी आहेत, उत्तम आश्रयदाते आहेत. मी एका रविवारी सकाळी इंदूरला त्यांच्या घरी गेलो होतो, तेव्हा एक फकीर आला आणि चार गाणी म्हणून निघून गेला. गोडबोले यांनी त्या फकिराचे गाणे रस्त्यात ऐकले होते. तेव्हाच त्यांनी त्याला घरी बोलावून घेतले व तेव्हापासून दर रविवारची ही प्रथा पडली. गोडबोले अर्थातच त्या फकिराचा योग्य तो मानसन्मान करतात. हा इंदूरी दिलदारपणा त्यांच्या रक्तात भिनला आहे. त्यामुळे गेली साताठ वर्षे आरोपित मूत्रपिंड सांभाळतदेखील अतिशय रसीले जीवन जगत आहेत.

त्यांना मूत्रपिंड त्यांच्या भावाने सुधाकरने दिले आहे. सुधाकर मुकबधिर आहेत. त्यामुळे त्यांचे लहानपण कष्टात गेले. परंतु भावंडांनी त्यांना शिवणकला शिकवून स्वत:च्या पायावर उभे केले. तेही आता इंदूरातच स्थायिक झाले आहेत. या दोन भावांचे जिव्हाळ्याचा संवाद ऐकणे हादेखील उत्कट अनुभव असतो. सुधाकर मिस्किल आहेत व सुभाष त्यांच्या सर्व लकबींनिशी त्यांचे संवाद टिपतात आणि आपल्याला त्यातल्या गंमती सांगतात. तेव्हा सुभाष गोडबोले स्वत:च कलाकार वाटतात.
सुभाष यांच्या पत्नी सुमित्रा या ब्रम्हविद्येच्या साधक आहेत व त्या शास्त्राचा प्रसार करत असतात.

सुभाष गोडबोले यांची कहाणी ही जीवनावर प्रेम केलेल्या जिंदादिल माणसाची कहाणी आहे! पण ते स्व तः मात्र त्यााचे क्रेडिट चांगले संस्कार, नशीबाची साथ व त्यांच्या पत्नींना देतात.

(पूर्वप्रसिद्धी ‘आरोग्यसंस्कार’ मासिक.)

सुभाष गोडबोले
०९४२५९३८२३४

subgod44@gmail.com

– दिनकर गांगल

Last Updated On – 2nd Feb 2017

About Post Author

Previous articleवाद्यवीणेचे संदर्भ
Next articleसौरऊर्जेसाठी प्रयत्‍नशील – दोन चक्रम!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version