Home मंथन जगातील भाषांवर संस्कृतचा प्रभाव

जगातील भाषांवर संस्कृतचा प्रभाव

1

युरोपात सर्वत्र पसरलेल्या जिप्सींच्या रोमा बोलीभाषा हिंदीच्या प्राथमिक अवस्थेतून निघाली आहेत, याची अनेक उदाहरणे देता येतील. रोमा भाषेत काही मराठी, गुजराती, पंजाबी शब्द आहेत. उदाहरणार्थ- नाक, कान, बाल(केस), यख(आँख, डोळा),  दे,  ले, (घे), जा, खा,  पी,  शोशाय(ससा,  संस्कृत,  शशक),  याग(आग, अग्नी), रशाय (ऋषी),  इत्यादी. राय आणि रानी म्हणजे महाशय आणि बाईसाहेब. साचोरात म्हणजे सच्चा रक्त. रोमानी आकड्यांचे संस्कृत मूळ सहज ओळखता येते. एक,  दुई(दोन), त्रीन(तीन), शतर(चार),  आक्टो(आठ), अनय(नऊ) व देश(दहा). ब्रिटनमधल्या जिप्सींनी इंग्लंडमधल्या शहरांनाही हिंदी नावे दिली आहेत. उदाहरणार्थ लालोगाव (लालगाव) म्हणजे रेडिंग,  बौरीगाव(बडागाव) म्हणजे लंडन,  छुरीएस्ता गाव(छुरी गाव) म्हणजे काटे, चमचे व सु-यांच्या कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले शेफिल्ड!

संस्कृतने बौद्धधर्म भारतातून तिबेटात आणला. त्यामुळे साहजिकच स्वभावत: अत्यंत भाविक वृत्तीच्या तिबेटी माणसांच्या दृष्टीने संस्कृत धार्मिक महत्त्वाची भाषा आहे. तिबेटमधील बौद्ध मंत्र संस्कृतात आहेत. ‘ओम’, ‘पद्म्’ शब्द ते सर्रास वापरतात. बुद्धाला केली जाणारी प्रार्थना संस्कृतमध्ये आहे. ‘नमो बुद्धाय, नमो अवलोकितेश्वर’ प्रार्थनेचा आरंभ ‘हूम’ व शेवट ‘गुरू’ पद्मसिद्धीहूम असा असतो. पद्मसंभव नावाचे पद्मब्यूंग-नास (पद्मपुष्पात जन्मलेला) असे तिबेटीकरण करण्यात आले. अनेक वेळा, संस्कृत नावातला अर्थ साधारणपणे तिबेटात आणला गेला. उदाहरणार्थ-‘बुद्ध’चे संगे झाले. ‘सारीपुत्त’चे सारीबू आणि ‘सिद्धार्थ’चे रोचन झाले. वज्र असेल तेथे ‘दोरजे,  पुल्लिंग दाखवण्यासाठी ‘पा’ व स्त्रीलिंग दाखवण्यासाठी ‘मा’ वापरतात.

संस्कृत नावे व त्याची तिबेटी रूपे पुढीलप्रमाणे आहेत: वैरोचन-नामनांग, अचल-मिक्योपा,  (स्थिर),  रत्नसंभव-रिंचेन जुंगने(रत्नांचे उगमस्थान),  अमिताभ-वोपाकमे(अपरिमित प्रकाश).

प्राचीन काळी अफगाणिस्तानचा प्रदेश केवळ धार्मिक नव्हे तर भौगोलिक दृष्ट्याही भारतातील वैदिक मायभूमीच्या निकट होता,  हे वैदिक ऋचांवरून दिसून येते. सिंधू नदीच्या पलीकडे कुभा(काबूल),  सुवास्तु(सुंदर सदनांची नदी),  आता कर्रम अफगाणिस्तानातील नद्यांपर्यंत पसरलेल्या भूभागातही वेदकालीन समाजाची वस्ती होती. मत्स्यपुराणात गांधारदेशाबरोबर कुहूंचा उल्लेख आहे. पूर्वीचे कुहूस्थान हे आत्ताचे कोहिस्थान होय. सहाहजार पाचशे वर्षांपूर्वी झालेल्या ऋग्वेदात वर्णन केलेले  ‘दासराज्ज्ञ’ युद्ध पुरुष्णी नदीच्या किना-यावर हरियूपीय(हराप्रा)शहराच्या जवळ झाले होते. यात अफगाणिस्तानातील पख्त, भलान, अलिन, विशानीन व शीव या पाच जमातींनी भाग घेतला होता. या जमाती वैदिक देवता इंद्राची पूजा करत. दाशराज्ज्ञ युद्धात हरलेल्या राजांपैकी द्रुह्यु जमातीचा मंदार राजा होता. यानंतरचा राजा गंधार हा देशांतर करून अफगाणिस्तानात गेला व तेथे त्याने आपले राज्य स्थापन केले. त्याच्या नावावरून या राज्याचे नाव गांधार झाले. ‘कंदहार’हे त्या नावाचे भ्रष्ट रूप आहे.

अफगाण बोलीची संस्कृतशी जवळीक होती हे पुढील उदाहरणांवरून दिसून येते. अंगुर(अंगुली, बोट),असीह (असि आहेत), आस्त(अस्ति, आहे),बसन(वसन, वस्त्र), चित्त(चिंत,  विचार करणे), दुस्त(दश,  दहा),  इस्त्री(स्त्री), नोना(नव नऊ), पा (पाद, पाय), सुच(शुच, शुद्ध असणे), तोता(तात, पिता) याखेरीज काही ढोबळ शब्द पुढीलप्रमाणे आहेत. अली(अहि, साप), अंगलर(अंगार, अग्नी), अंजील(अंजली,  जोडलेले हात) छीर(क्षीर, दूध) दह (दास, माणूस), गोम(गोधूम, गहू)गोर (घोर, राक्षस), पंच(पंच, पाच), रेसू(वृषभ, बैल), सिन(सिंधू नदी).

अरबी भाषेत संस्कृत शब्द स्पष्टपणे दिसतात. फक्त त्याचे अरबीकरण झाले आहे,  एवढेच. उम्मा, आंबा (माता), स्वल्ली: सप्त(सात),  इसा: ईश(स्वामी), वादी: वेदी(उंच जागा), आदम: आदिम(पहिला माणूस), हरम: हम्र्य(पवित्र स्थान), लहू: लोहित(रक्त),  मा (नकारार्थी), मसजिद: महत् मोठा, वरह: वर्ग(भाग), शम्स: शस(सूर्य), शब्बेरात(शिवरात्र) ब्रम्ही भाषेत शिशाचे सोने करणा-या किमयेला अग्गीरतन(अग्निरत्न) म्हणतात. युद्धशास्त्राला इतिहास, लोककथांना जातक, व्याकरणाला सद्द (शब्द),  इतिहासाला कायद्याला धम्मसात (धर्मशास्त्र) तर सदाचाराच्या नियमाला नीती म्हणतात.

थायलंडचे प्राचीन नाव ‘सयाम’ हे संस्कृत श्यामचे भ्रष्ट रूप आहे. तेथली राजधानी अयुथिया(अयोध्या) होती. थाय भाषेत शुखोताई(सुखोदय), द्वारावती, पिश्नुलोक, (विष्णुलोक) असे अनेक संस्कृत शब्द म्हणजे आचार्य, कर्म, स्वस्ति (उच्चार सवदुदी),  जल,  देवालय,  विद्यालय,  माला,  धम्म, (धर्म) व संघ, थाय लोकांची व तेथील ठिकाणांची संस्कृत नावे आहेत. उदाहरणार्थ प्रेम, सागर, सिद्धी, लक्ष्मी, रुक्मिणी, सुनंदा कुमारी, रत्ना (एका राणीचे नाव), सूर्य (स्टुडिओ), चित्रलेखा (स्टोअर), नवरत्न(हॉल) इत्यादी.

बँकॉकमधील राष्ट्रीय संग्रहालयाच्या दालनाला उत्तर,  दक्षिण अशी नावे आहेत. जावा बेटाचे मूळ नाव यव(द्वीप) आहे तर सिंगापूरचे सिंहपूर असे होते. सिंगापूरच्या बंदरात प्रवेश करताच समोर एक भव्य सिंहाचा पुतळा दिसतो.

अझरबैजानची राजधानी बाकू येथे देवालय आहे. त्याच्या भिंतीवर संस्कृत श्लोक आहेत. ताश्कंद व समरकंद या नावातील कंद मूळ संस्कृत खंड आहे. खंडाचा अर्थ देश किंवा प्रदेश असा होतो.

चीनमध्ये उत्खननशास्त्रज्ञांना हुनान प्रांतात दीड हजार वर्षांपूर्वीचा एक शिलालेख सापडला. त्यावर चिनी व संस्कृत अक्षरे आहेत. त्यांचा अर्थ स्वस्ती असा आहे.

रशियात संस्कृतमधील स्थापत्यशास्त्रावरचे ग्रंथ रशियन भाषेत भाषांतरित करण्यात आले व त्याप्रमाणे बांधकाम करण्यात आले. रशियन संग्रहालयात सुमारे सहाशे प्राचीन भारतीय हस्तलिखिते आहेत. संस्कृत पंडित डॉ. रघुवीर यांना सैबेरियात अनेक संस्कृत हस्तलिखिते आढळली. सैबेरिया हे नाव शिबिर या संस्कृत शब्दामधून निघाले आहे. हा प्रदेश इतका थंड आहे की तेथे मानवी वस्ती वर्षातून फार थोडा काळ व तेही ‘छावणी’ त म्हणजे ‘शिबिरात’ शक्य होती.

एशियाटिक सोसायटीचे संस्थापक सर विल्यम यांना संस्कृत शब्दांचे अर्थ व उच्चार यांचे इंग्रजी शब्दाशी साम्य आढळले. तीनशे शब्दांचे मूळ संस्कृतात आहे. शिवाय संस्कृतजन्य उपसर्ग असलेले सुमारे एकहजार शब्द दिसले.

इराणमधील अवेस्ता भाषेत साठ टक्के शब्द संस्कृत आहेत. बरेचसे शब्द जसेच्या तसेच राहिले आहेत. उदाहरणार्थ- पशु, युवा, बैध, रथ, गाथा,  इत्यादी. काही शब्द संस्कृतोद्भव आहेत. दु:शाशिष्ट आहेत-(असत्य बोलणारा), सावंश्यत-(रक्षक), निद (निद्रा), स्तौ(स्तुती), मन(विचार), अमेरातत(अमरत्व), जस्त(हस्त), माथिर(माथा), यश्न(यज्ञ)  पहिल्या दहा आकड्यांची नावेही संस्कृत पर्शियनमध्ये सारखी आहेत. एक=याक, द्वी-दू, त्री=सीह, चतुर=चहर, पंच=पंच, षट् =शश, सप्त=हप्त, अष्ट=हष्ट, नव=नूह, दश=दह.

असीरियात संस्कृतचा प्रभाव तेथील राजांच्या नावात स्पष्ट दिसतो. उदाहरणार्थ – ख्रिस्त पूर्व नवव्या शतकात असुरनसिरपाल नावाचा राजा होता. भाषाशास्त्रज्ञ व-हाड पांडे लिहितात, ‘हा थेट संस्कृत शब्द आहे. त्याचा अर्थ ‘असुरांच्या आघाडीचा रक्षक’ असा होतो.’ आणखी संस्कृत नावे म्हणजे असुर त्रिगर्तपाल, सेनाचेरिब व नेबुचाडनेझर (नव ईश्वर).

अशा प्रकारे अनेक भाषांवर संस्कृतचा प्रभाव दिसून येतो.

(विवेक, २९ जानेवारी २०१२ च्या अंकावरुन)

भावना प्रधान, 9869655776

Last Updated On 9th Nov 2017

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version