किर्तीमान, कर्तृत्ववान व्यक्ती समाजाचे भूषण असतात. मात्र यांसोबत आपल्या छंदातून काही वेगळे निर्माण करू पाहणारी छंदिष्ट माणसेही समाजात असतात. अनेकदा त्यांचे छंद हे केवळ त्यांच्यापुरतेच नव्हे तर इतरांसाठीही आनंद निर्माण करतात. अशा व्यक्तींची अनेक उदाहरणं देता येतील. जुन्या आणि दुर्मिळ गाण्यांच्या शेकडो ध्वनीमुद्रीका जमा करणारे पुण्याचे डॉ. प्रकाश कामत असोत, बासरीच्या सुरावटींनी इतरांच्या आयुष्यात आनंद निर्मिण्याचा प्रयत्न करणारे सुभाष शहा असोत, सेंद्रीय शेती करण्याच्या ध्यासाने शेतीविषयक माहितीचा खजिना निर्माण करणारे मारूती गुरव असोत, वा छंदाच्या मार्गाने वाटचाल करत कलांगणात मुक्त बागडणा-या डॉ. माधवी मेहेंदळे असोत; कदाचित रूढार्थाने या सा-यांची धडपड ‘कर्तृत्वा’च्या व्याख्येत बसणार नाही, मात्र यांनी आपल्या छंदातून निर्माण केलेल्या गोष्टी अथवा त्यातून इतरांना दिलेला आनंद हा निश्चितच मोठा आहे.
वर्षभरापूर्वी पुण्याच्या सतीश गादिया या व्यक्तीने टेरेसवर फुलवलेल्या कमळां च्या बागेसंबंधी आशुतोष महाजन यांनी लिहीलेला लेख ‘थिंक महाराष्ट्र’वर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर ‘www.mypimparichichwad.com ’ या वेबसाइटवर अनिल काकडे यांनी गदिया यांच्या छंदाबद्दल लेख लिहीला. या लेखामध्ये सतीश गदिया यांची गार्डन टेरेसवरून नवीन जागेत जाऊन रूजणं, फुलणं या गोष्टी स्पष्ट होतात. तसेच गदिया यांचे छंद जोपासण्याचे प्रयत्न आणि कसोशी इथे ठळकपणे मांडलेले दिसतात. हा लेख ‘थिंक महाराष्ट्र’च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. सतीश गदिया यांनी थिंक महाराष्ट्रला असे सांगितले, की वर्षभराच्या काळात त्यांचे गार्डन विस्तृत झाले असून तेथे भेटी देणा-यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यांनी आता बागेत धान्य लावण्यास सुरूवात केली आहे.
गदिया यांनी भारतासोबत जगातील वेगवेगळ्या प्रदेशांमधून त्यांनी विविध जातींची कमळे मिळवली आहेत. प्रसंगी त्यांनी आपला जीवही धोक्यात टाकला, मात्र या प्रयत्नांतून त्यांनी आशियातील (कदाचित) एकमेव अशी कमळांची बाग तयार केली. विशेष म्हणजे त्यांनी केरळ-तमिळनाडूमधून एकशे आठ पाकळ्यांचे सर्वात मोठे कमळही मिळवले. काकडे यांनी लिहीलेल्या लेखात डुडूळगाव येथे अर्धा गुंठा जमिनीवर बाग फुलवण्यात आली असल्याचा उल्लेख आहे. गदिया यांनी ही जमिन अर्धा एकर असल्याची माहिती दिली. त्याप्रमाणे लेखात सुधारणा करण्यात आली आहे.
जर कर्तृत्ववान व्यक्ती समाजाचे भूषण असतील, तर अशा छंदिष्ट व्यक्तींचा समाजाला अभिमान असला पाहिजे. समाजातल्या अशा छंदवेड्या माणसांची ओळख करून देण्याचा ‘थिंक महाराष्ट्र’ चा प्रयत्न आहे. याकरीता आपले साह्य अपेक्षीत आहे. आपणही आपल्या परिसरातील अशा छंदिष्ट व्यक्तिंची माहिती ‘थिंक महाराष्ट्र’कडे लिहून अथवा मेलद्वारे पाठवू शकता.
कमळांची बाग!
आठवीपर्यंत शिकलेले सतीश गदिया पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहेत. बोलण्यात व्यंग असूनही त्यांचं आत्मविश्वासानं बोलणं ऐकणार्याला गुंग करतं. चिंचवड येथे छोटीशी लाँड्री चालवणार्या गदिया यांना कमळानं लहानपणी मोहून टाकलं होतं. आजीला देवपूजेसाठी पायपीट करून फुलं आणून देण्याची त्यांची हौस! कमळावरील प्रेमाला शाळेत असतानाच खतपाणी मिळालं. लग्नानंतर चरितार्थासाठी लाँड्री सुरू केली.
नेरळ येथील शेखर भडसावळे यांच्या बागेत कमळं आहेत अशी माहिती मिळताच त्यांनी तडक नेरळ गाठलं. भडसावळेंनी त्यांची कमळाविषयीची तळमळ पाहिली आणि त्यांना कमळाचा हौद दाखवून कमळाविषयीची माहितीही दिली. त्यामुळे भडसावळे हे या विषयातले त्यांचे गुरू झाले. त्यांनीच त्यांना कमळाचं पहिलं रोप दिलं.
घरच्यांना कळू न देता घराच्या पत्र्यांच्या छतावर लोखंडी हौद तयार करून कमळाची बाग फुलवली. त्या हौदात पहिलं कमळ आल्याची बातमी सर्वत्र पसरली तेव्हा गदिया यांच्या या छंदाचा घरच्यांना पत्ता लागला! गदिया यांनी एकशेआठ पाकळ्यांचं सर्वात मोठं कमळ केरळ व तामिळनाडू येथून मिळवलं. मखाना जातीचं कमळ त्यांनी बिहारमधील दरभंगा येथून मिळवलं, तर राजकमळ (व्हिक्टोरिया) कोलकात्यातील बोटॅनिकल गार्डन मधून मिळवलं. ओरिसाच्या तळ्यात कमळ काढताना त्यांच्या मागे मगर लागली तर बिहारमध्ये तळ्यात रुतून पडण्याचा अनुभव आला. परंतु, कमळाचा कंद मिळवल्याच्या आनंदात त्यांना काही वाटलं नाही. तसंच कुमोदिनीमध्ये (वॉटरलीली ) लंडनमधून पांढर्या व गुलाबी रंगाची, तर केकवी रंगाची लीली त्यांना येथूनच त्यांच्या मामाच्या मुलानं आणून दिली. बँकॉकमधून केकवी रंगाचं कुमोदिनी कमळ त्यांना त्यांच्या मित्रानं दिलं. न्युझीलंडमधील पिवळ्या व गुलाबी रंगांची कुमोदिनी त्यांनी कोलकात्यातून मिळवली. त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जंगलंही पिंजून काढली.
त्यांची ‘ओम कमळ बाग’ प्रेक्षकांना पाहण्यासाठी सदैव खुली असते. तिथं महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यातील कमळप्रेमींनी भेटी दिल्या आहेत. ते कमळाचे गुणधर्म उत्तम जाणतात. कमळाच्या बियांची खीर बनवणं, कंद काढून त्यांची भाजी बनवणं, पानांवर भात बनवणं अशा काही रेसीपी स्वत: तयार करून आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना खायला घालतात. त्यांनी आळंदी, गजानन महाराज संस्थान अशा अनेक धार्मिक ठिकाणी तसेच औरंगाबाद, अहमदनगर येथील महापालिकांच्या उद्यानातही कमळांची लागवड केली.
ते म्हणतात, की मला आपल्या जवळच्या माणसांचं प्रेम बालपणापासूनच लाभलं नाही, म्हणून आपलेपणाची मला ओढ लागली असताना मी फुलांवर प्रेम करायला लागलो. त्यांना आपलं समजायला लागलो. फुलांमध्ये कमळाचं आकर्षण जास्त होतं. कमळ दुर्मीळ असल्यानं ते मिळवण्याचा छंद जडला. परंतु माझ्या या छंदामुळे अनेकांनी मला वेड्यात काढलं. ते शक्य नाही असं म्हणणारेही काहीजण भेटले. पण तेच मला आधार देत आहेत. या कमळामुळे महाराष्ट्रातील कानाकोपर्यात व इतर राज्यांतही माझ्या शोधमोहिमेत माझा संपर्क आलेल्या अनेक व्यक्तींचं प्रेम मला मिळालं. त्यापलीकडे जाऊन जीवनात अजून काही मिळण्याची अपेक्षा राहिलेली नाही. माझं संपूर्ण जीवन कमळाच्या शोधासाठी दवडलं, शेवटही त्याच्याच सान्निध्यात व्हावा अशी इच्छा आहे.
www.Pimprichichwad.com वरून साभार
सतीश गदिया
9890969994
सर वाचुन खरोखर खूप आनंद झाला…
सर वाचुन खरोखर खूप आनंद झाला मला पण कमळ बाग बनवण्यासाठी माहिती v मदत कराल का
Comments are closed.