अरविंदभार्इंचे सर्वोत्तम महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे पाच पोटजातींचे एकीकरण. त्यांनी १९४९ साली ‘क्षात्रैक्य परिषद’ स्थापून नवविचाराची मुहूर्तमेढ रोवली. ‘क्षात्रैक्य परिषद’ अमृत महोत्सवी वर्षाच्या वाटेवर आहे. त्यांनी ‘सोमवंशी क्षत्रिय समाजा’तील चौकळशी-पाचकळशी या दोन पोटजातींचे एकीकरण व्हावे व ठाणे, रायगड, मुंबईतील समाजबांधव संघटित व्हावे यासाठी विशेष परिश्रम घेतले. परिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत दादर येथे ठेवले. समाज एकच असूनही रोटीबेटीचे व्यवहार होत नव्हते, अरविंदभार्इंनी ते सुरू केले. त्यांनी समाजातील जाचक रुढी, परंपरा, कर्मठ धर्मांधता, बुवाबाजी, हुंडाबाजी, लग्नसमारंभाच्या दिवशी पैशांची अनावश्यक उधळण, मृत्युसमयी अनावश्यक विधी, विधवा स्त्रियांवर होणारे अन्याय ह्या गोष्टींना विरोध दर्शवला.
त्यांना समाजसविता डॉ. म.ब. राऊत, कर्मयोगी ज.पां. राऊत, लक्ष्मण गोविंद राऊत व पांडुरंग रामचंद्र राऊत या पुण्यशील पुरुषांचा सहयोग लाभला.
त्यांनी एकीकरणाचा पुरस्कार करणारे वाङ्मय प्रकाशित केले. त्यामध्ये १. ‘पाठारे क्षत्रिय समाज दर्शिका’ ही पुस्तिका डॉ. हेरवाडकर यांच्या हस्ते १९६८ साली प्रकाशित केली. त्या पुस्तिकेमध्ये समाजाचा इतिहास, गावे, आडनावे, नकाशा आदि माहिती दिलेली आहे. २. पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता व शक्यता – लेखक अरविंद हरी राऊत हे पुस्तक १९५३ साली प्रकाशित केले. ३. पाठारे ज्ञातीचा इतिहास – खंड १ व २, ४. चालना मासिक (१९५०). ‘चालना’कारांनी चालना मासिकांतून एकीकरण व परिषदेचे कार्य यांचा पुरस्कार केला व ते विचार विशाल समाजातील सर्व लोकांपर्यंत पोचवले.
त्यांनी १९५० मध्ये ‘चालना’ मासिक सुरू करून नव्या विचारांना चालना दिली. त्यांचे उद्दिष्ट जातिभेदातीत नवसमाज निर्माण व्हावा हे होते. त्यांनी ‘प्रबोधन व प्रहार’, ‘जीवन-गुंजी’, तसेच ‘खजुरी’ काव्यसंगह अशी पुस्तके लिहून समाजप्रबोधनाचे कार्य केले. ते बुद्धिप्रामाण्यवादी व विज्ञाननिष्ठ नवसमाज निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिले.
अरविंद राऊत यांनी ‘क्षात्रैक्य परिषदे’ची चळवळ अखंड चालू राहवी व उद्देश साध्य व्हावा म्हणून ‘क्षात्रैक्य परिषदे’चे प्रवर्तक म्हणून अनेक उपक्रम सुरू केले. त्यांपैकी एक महत्त्वाचा म्हणजे ‘क्षात्रैक्य परिषदे’चा वर्धापनदिन दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरा केला जाई. त्यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील अनेक मान्यवर समाजसेवकांना ‘क्षात्रैक्य परिषदे’च्या व्यासपीठावर आणून त्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांचे विचार ‘चालना’ मासिकातून प्रसृत केले.
दुसरा उपक्रम म्हणजे दरवर्षी युवक संमेलने भरवली व युवकांना त्या कार्यात ओढले. त्याप्रमाणे भगिनी संमेलने आयोजित करून त्या प्रसंगी निरनिराळ्या विचारवंतांना मार्गदर्शनासाठी बोलावून प्रबोधन केले. निरनिराळ्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांत प्राविण्य मिळवणाऱ्या व विशेष कार्य करणाऱ्या गुणवंतांना शोधून त्या समाजबांधवांचा सत्कार केला. त्यांनी सामाजिक संस्थांशी विचारविनिमय करण्यासाठी खास सभा घेतल्या. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, पारितोषिके दिली आणि गौरवसमारंभ घडवून आणले. त्यांनी अशा अनेक उपक्रमांतून समाजसंपर्क साधला व विशाल समाज एकत्र आणला.
अरविंद राऊत यांच्या समोरच्या माणसाला समजून घेणे आणि त्यांचे विचार त्याला समजावून सांगणे ह्या स्वभावाने त्यांचे स्वत:चे विचारविश्वही विस्तारले आणि अनुभवविश्व दृढ झाले. त्यांना त्यांच्या आचरणातील साधेपणामुळे मोठेपण प्राप्त झाले. सदाबहार, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या त्या माणसाने ११ जून १९९५ रोजी वयाच्या ऐंशीव्या वर्षी ठाणे जिल्ह्यातील नरपड या त्यांच्या गावी आयुष्याच्या रंगमंचावरून प्रयाण केले.
त्यांनी ‘ठाणे जिल्हा परिषद’ व नंतर ‘मुंबई महानगरपालिके’च्या प्राथमिक मराठी शाळेत निवृत्त होईपर्यंत शिक्षकी सेवा केली.
त्यांनी ‘पोटजातीच्या एकीकरणाची आवश्यकता व शक्यता’, ‘यंत्रकार दादोबा ठाकूर’, ‘क्षात्रैक्य परिषदेची पंचवीस वर्षांची वाटचाल’, ‘मुंबईतील झोपडपट्टीच्या समस्या’, ‘चंदनाचे खोड – प्रकाशभाई मोहाडीकर’, ‘उद्योगवीर रामचंद्र हिराजी सावे’ इत्यादी ग्रंथांचे लेखन व संपादन हे कार्य केले.
अरविंद राऊत त्यांच्या स्नेह्यांवर, विद्यार्थ्यांवर कुटुंबवत्सल मायेने प्रेम करत. त्यांचे एक सहकारी आर.एम. पाटील यांनी कृतज्ञतेने अरविंदभाईसंबंधातील एक प्रसंग लिहिला आहे, तो येथे नमूद करावासा वाटतो.
आर. एम्. पाटील (केळवे) यांनी त्यांचे वर्णन पितृतुल्य छायेचा कल्पवृक्ष असे केले आहे. ते म्हणतात, माझी मोठी बहीण नीरा (नानी) त्यांची विद्यार्थिनी होती. त्यांना मी काहीतरी लिहितोय हे समजल्यावरून त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. ते म्हणतात, त्यांनी मला मुंबईसारख्या बहुरंगी-बहुढंगी नगरीत सामाजिक कार्य करण्याची संधी मिळवून दिली. बुद्धिप्रामाण्यवादी, अंधश्रद्धेवर प्रहार करून प्रबोधन साधणारे नवविचारवंत माझ्यासारख्या खेडवळ नवयुवकाच्या सहवासात आले आणि त्यांनी माझ्या जीवनाला वेगळीच कलाटणी दिली. त्यांचा ममतेचा वात्सल्यपूर्ण आशीर्वाद मला नवविचार देऊन गेला. त्यांनी मला पाठीवर मारलेल्या आशीर्वादपर थापेने माझ्या मनावर साचलेला बुरसटलेला धुराळा पार उडून गेला.
मी मधु मंगेश कर्णिक यांच्या पुढाकाराने केळवे येथे ‘मौजे’चे साक्षेपी संपादक श्री. पु. भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’च्या दुसर्याो साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष होतो. ‘माझा रघुनाथ एवढ्या मोठ्या साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष होतो. त्या संमेलनाला मला उपस्थित राहिलंच पाहिजे!’ या भावनेने त्या संमेलनाला अरविंदभाई तीन दिवस उपस्थित होते. त्यांच्या आवडत्या केळवे गावात महाराष्ट्रातील दिग्गज दोनशे साहित्यिकांसोबत पु.ल. व मधुभाई यांच्या समवेत मला त्या व्यासपीठावर आसनस्थ पाहून अरविंदभार्इंच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले! अरविंदभार्इंनीच मला जवळ बोलावून, पित्याच्या भावनेने माझ्या पाठीवर थोपटून आशीर्वाद दिला. ते म्हणाले, “मी धन्य झालो!”
आईची माया आणि पित्याची छाया यापेक्षा काही वेगळे असते असे नाही.
– चंद्रकांत पाटील / बाळकृष्ण न. राऊत
पाठारे क्षत्रिय समाज दर्शिका…
पाठारे क्षत्रिय समाज दर्शिका
पोटजातींच्या एकीकरणाची आवश्यकता व शक्यता
ही दोन्ही पुस्तकं मला कुठे मिळतील.