पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु व अर्थतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव हे या संमेलनाचे उद्घाटक असल्याने साहजिकच महाविद्यालयांमध्ये फिल्म सोसायटीची चळवळ कशी पोहचवता येईल याचा विचार पुण्यातील संमेलनात झाला. त्यादृष्टीने एक विशेष योजनाही तयार करण्यात आली. आजची महाविद्यालयीन पिढी ज्या काळात लहानाची मोठी झाली त्याच काळात उपग्रहवाहिन्यांचे व त्यापाठोपाठ आलेल्या इंटरनेटचे मोठे अतिक्रमण झाले. पारंपारिक नातेसंबंधांना धक्का देणा-या मालिका, अहोराज चालणारे सिनेमाचे चॅनलस, स्त्री-पुरूष संबंधांचे औगळ दर्शन घडविणा-या साईटस यामुळे मध्यमवर्गीयांच्या अभिरुचीला ओहटी लागली. त्या नव्या संस्कृतीला सरावलेल्या तरुण पिढीला जगभरातील उच्च अभिरुची संपन्न चित्रपटांची ओळख व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे ठरले.
महाविद्यालयांमधील ‘कॅम्पस फिल्म क्लब’ हा त्याच उपक्रमांचा एक भाग.
‘फिल्म अँप्रिसिएशन कोर्स’ अर्थात चित्रपट रसास्वाद अभ्यास-क्रमाचे महाविद्यालयांमध्ये आयोजन हा त्यातलाच एक भाग व्यक्ती अभिरुचीसंपन्न होण्यासाठी नुसते अभिजात चित्रपट पाहणे पुरेसे नसते. चित्रपट माध्यम, चित्रभाषा यांचाही परिचय असावा लागतो. त्याशिवाय चित्रकर्त्याला काय सांगायचय आणि त्याने ते कसे सांगितले आहे याचा उलगडा नीट होत नाही. केवळ एक चांगला चित्रपट पहिल्याचे समाधान मिळते. त्यातही कॅमे-याच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर साकारली जाणारी चित्रभाषा ही जर मातृभाषेतून समजावून होत आली तर एरवी दुर्बोध, कंटाळवाणा वाटणारा चित्रपटाचा रचनाप्रकार जाणून घेण्याची मानसिक तयारी होते.
चित्रपट रसास्वाद शिबिरांमध्ये सहभागी होणा-यांच्या विचारार्थ चित्रपट माध्यमाच्या अभ्यासक श्यामला वनारसे यांनी एक छोटे टिपण तयार केलयं त्यात त्या म्हणतात, एरवी चित्रपट बघायला काही पूर्व शिक्षणाची गरज आपल्याला जाणवलेली नसते. पण चित्रपटकर्ते जेव्हा एखादी भव्य आणि खोल जाणीव देणारी कलाकृती समोर आणतात.. तेव्हा त्याचा अन्व्य लावायला शिकावे लागते. चित्रपटकर्ता काय आणि कसे सांगतो आहे हे समजावून घेण्यासाठी प्रेक्षकांला स्वत:ची संवेदनशीलता विकसित करावी लागते. या टिपणाच्या अखेरीस श्यामला वनारसे म्हणतात, (चित्रपटाचे) मूल्यमापन करण्यापूर्वी आपण आपली आस्वादाची साधने तयार केली तर चित्रपटाच्या रसास्वादातून समीक्षेकडे जाण्याचा मार्ग तयार होतो. रसास्वादाची ही तयारी आपला चित्रपटाचा अनुभव अधिक समुध्द करते आणि एकूण जीवनानुभवातही कलेचा संस्कार दृढ करते.
सर्वसामान्य प्रेक्षकांची अभिरुची संपन्न होण्यास जसा रसास्वाद शिबीराचा हातभार लागतो त्याचप्रमाणे चित्रपट सोसायटीची चळवळ अधिक बळकट करण्यास अशी शिबिरे उपयुक्त ठरत आहेत. फिल्म फेडरेशनच्या पश्चिम विभागाचे सचिव सतीश जकातदार यासंबंधात म्हणतात व्ही.सी.डी चोविस तास चालणा-या चित्रपटवाहिन्या इंटरनेट, दरवर्षी भरवले जाणारे आंतरराष्ट्रीय महोत्सव यामुळे जगभरातील उत्तमोत्तम चित्रपट पाहायला मिळणे ही आता नवलाईची बाब राहिलेली नाही. त्या अर्थाने पाहिले तर चित्रपट सोसायट्यांची उपयुक्तता आता पहिल्या इतकी राहिलेली नाही. म्हणून या सोसायट्यांनी त्यांचा फोकस पॉईंट बदलला पाहिजे. चित्रपटाचा रसास्वाद इंग्रजीपेक्षा मातृभाषेतून घेता येणे हे आता अनिवार्य आहे. चित्रपट सोसायट्यांनी याच दृष्टीने त्यांची उपक्रमशीलता व उपयोगीता वाढवली पाहिजे.
1970 ते 80 या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत समांतर, कलात्मक चित्रपटांची जी लाट उसळली तिला चित्रपट सोसायटीच्या चळवळीचे अधिष्ठान लाभले होते. असे फेडरेशनचे केंद्रीय सचिव सुधीर नांदगावकर यांचे मत आहे. चळवळीच्या सुरुवातीच्या काळात आम्ही ‘बेगर’ होतो आता आम्ही ‘च्युझर’ झालो आहोत आपल्या हवे ते चित्रपट जगभरातून मिळवणे सहज शक्य आहे. देशातील प्रत्येक मोठ्या शहरात स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आता होऊ लागलाय, यातले निवडक चित्रपट प्रेक्षकांपर्यंत नेऊन दिग्दर्शक व प्रेक्षकांमध्ये थेट संवाद घडवून आणणे हे आमचे प्रमुख कार्य आहे..
पुण्यातील रसास्वाद शिबिरात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी अशी टिपणी केली आहे की काही वर्षांपूर्वी सर्वमानसिक आजारीसाठी ‘वेडा’ हा एकच शब्द वापरला जायचा. आता य आजारांचे निदान वेगवेगळ्या वर्गवारीत केले जाते. चित्रपटांचे सुद्धा तसेच आहे. वर्तमानपत्रे बातम्यांमधून मनोरंजन करु लागल्याने त्यांचे लोकशिक्षणाचे काम चित्रपटांना करावे लागत आहे. अशा चित्रपटांना केवळ ‘चांगला’ ‘वाईट’ ठरवून चालणार नाही यावर्गवारीच्या पलिकडे जाऊन चित्रपटाचे विश्लेषण करता आले पाहिजे. फेडरेशनच्या पन्नासपैकी पंचवीस वर्षे व्यापणा-या ‘आशय’चे प्रयत्न त्यात दिशेने चालू आहेत.
– रमेश दिघे..
ramesh_dighe@yahoo.in