Home वैभव चले जाव : भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा लढा (Quit India – Last Phase...

चले जाव : भारतीय स्वातंत्र्याचा अखेरचा लढा (Quit India – Last Phase of the Struggle)

चले जावची घोषणा 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या वतीने केली गेली. ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावेअसा निर्वाणीचा इशारा त्या वेळी देण्यात आला. तो इशारा देण्याचा निर्णय 14 जुलै 1942 रोजी, वर्धा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर मुंबईत झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत तसा ठराव 7 व 8 ऑगस्ट 1942 रोजी मंजूर करण्यात आला आणि त्यावर अखेरचे शिक्कामोर्तब 8 ऑगस्टच्या संध्याकाळी गवालिया टँक मैदानावरील जाहीर सभेत झाले. त्यावेळी मैदानावरील मंडपात काँग्रेसचे दहा हजार प्रतिनिधी उपस्थित होते. मंडपाच्या बाहेरही लाखभर जनसमुदाय होता.
ब्रिटिशांना अखेरचा इशारा देणारे आंदोलन व त्यासाठीचे नेमके शब्द काय असावेत, त्याबाबत गांधीजींनी अनेकांशी चर्चा केली होती. त्यांपैकी काहींनी गेट आऊटहा शब्दप्रयोग सुचवला होता, पण गांधीजींनी तो उद्धट आहे (पोलाईट नाही) या कारणामुळे नाकारला होता. वल्लभभाई पटेल यांनी रिट्रीट इंडियाकिंवा विथड्रॉ इंडियाअसे दोन पर्याय पुढे केले होते, परंतु गांधीजींनी ते शब्दप्रयोगही आशय सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यास तितकेसे सुलभ नाहीत, म्हणून नाकारले होते. त्याच दरम्यान, युसुफ मेहेरअली यांनी क्विट इंडियाहा शब्दप्रयोग सुचवला आणि गांधीजींनी तो तत्काळ मान्य केला. कारण त्या शब्दप्रयोगात कणखरपणा आहे, उद्धटपणा नाही. शिवाय भारत छोडो‘, ‘चले जावही त्याची रूपांतरे जनमानसाची पकड घेणारी आहेत.
तसे समर्पक शब्द सुचण्यात केवळ योगायोग नसतो, त्यामागेही काही पूर्वतयारी किंवा कार्यकारणभाव असतो.युसुफ मेहेरअली यांना ती घोषणा सुचली, त्यामागील कार्यकारणभाव दाखवता येतो. त्याआधी चौदा वर्षे, म्हणजे 1928 मध्ये जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली एक कमिशन ब्रिटिश सरकारकडून भारतात पाठवण्यात आले होते. त्यामध्ये भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे त्या कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय झाला होता. जेव्हा ते कमिशन मुंबईच्या बंदरात उतरले (3 फेब्रुवारी 1928) तेव्हा बॉम्बे यूथ लीगया संघटनेच्या वतीने भल्या पहाटे बंदरावर जाऊन निदर्शने केली गेली होती. त्या तरुणाईच्या संघटनेचे नेते युसुफ मेहेरअली हे होते. तेव्हा त्यांनी सायमन, गो बॅक‘ (सायमन, परत जा) अशी घोषणा दिली होती. तो शब्दप्रयोग इतका क्लिक झाला, की ते कमिशन भारतात जेथे-जेथे गेले तेथे-तेथे सायमन, परत जाअसे फलक झळकावून त्यांचे स्वागत (!) केले गेले होते. युसुफ मेहेरअली हेचले जावचे आंदोलन पुकारले गेले तेव्हा मुंबई शहराचे महापौर होते; त्यांचा समावेश काँग्रेसमधील समाजवादी विचारांच्या प्रमुख नेत्यांमध्ये होतो.
चौघांची भाषणे त्या 8 ऑगस्ट 1942 च्या ऐतिहासिक सभेत झाली. काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते, त्यामुळे त्यांचे भाषण सर्वप्रथम झाले. नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव सभेपुढे वाचून दाखवला आणि ठरावाचे समर्थन करणारे भाषण केले. वल्लभभाई पटेल यांनी त्या ठरावाला अनुमोदन देणारे भाषण केले आणि मग महात्मा गांधी यांनी, ‘हा ठराव सभेने मंजूर करावाअसे आवाहन करणारे प्रास्ताविक भाषण केले. तो ठराव उपस्थित प्रतिनिधींनी हात उंचावून मंजूर केला. ठरावाच्या विरूद्ध तेरा कम्युनिस्ट प्रतिनिधींनी मत नोंदवले. ते सर्वजण काँग्रेसचेही सभासद होते. गांधीजींनी लढ्यामागील कारणमीमांसा आणि पुढील दिशा यांवर हिंदीतून मुख्य भाषण केले. त्यांनीच समारोपाचे भाषण इंग्रजीतून केले. गांधीजी ती तिन्ही भाषणे मिळून जवळपास सव्वादोन तास त्या सभेत बोलले. सभा सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. ती रात्री दहापर्यंत चालली होती. गांधी, नेहरू, पटेल, आझाद यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांना पकडून दुसऱ्या दिवशी, म्हणजे 9 ऑगस्टच्या पहाटे, तुरुंगात टाकण्यात आले. त्या चौघांच्या भाषणांचे त्रोटक वृत्तांत वृत्तपत्रांतून आले. परंतु सरकारने त्या भाषणांच्या प्रकाशनावर बंदी आणली. परिणामी, ती भाषणे देशभरातील मोठ्या जनसमुहांपर्यंत त्यावेळी पोचलीच नाहीत. पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार1946 मध्ये अस्तित्वात आले, तेव्हा त्या भाषणांवरील बंदी उठवण्यात आली. त्यावेळी, पुणे येथील स्वतंत्र हिंदुस्थान प्रकाशनाच्या वतीने, त्या चौघांच्या भाषणांची मराठी व इंग्रजी आवृत्ती तयार करून दोन स्वतंत्र पुस्तिका प्रकाशित करण्यात आल्या. माधव काशिनाथ दामले हे गृहस्थ स्वतंत्र हिंदुस्तान प्रकाशनचालवत होते. तेच त्या पुस्तिकांचे संपादकही होते. मराठी पुस्तिका त्यांनी नोव्हेंबर 1946 मध्ये प्रकाशित केली. तिचे शीर्षक जगाला आव्हानअसे दिले गेले होते.
दरम्यानच्या काळात, त्या चौघांची ती संपूर्ण भाषणे मराठीत अन्यत्र कोठेही प्रसिद्ध झालेली नसावीत. गांधीजींचे भाषण त्यांच्या संकलित वाङ्मयात व इंटरनेटवरही (इंग्रजीत) उपलब्ध आहे, परंतु त्याचा मराठी अनुवाद अन्य कोणीही प्रसिद्ध केल्याचे आढळले नाही. माधव काशिनाथ दामले यांनी त्या पुस्तिकेला छोटेसे प्रास्ताविक लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, ‘या भाषणांचा अनुवादकर्ता इतका प्रसिद्धीपराङमुख आहे, की तो अनुवादक म्हणून स्वत:चे नावही पुस्तिकेवर लावू इच्छित नाही.त्या अनामिक अनुवादकाने केलेला मराठी अनुवाद अप्रतिमया संज्ञेस पात्र ठरणारा आहे. आशयातील अचूकता आणि भाषेचा प्रवाहीपणा तर त्यात आहेच, पण मुख्य म्हणजे अनुवादक त्या भाषणातील तेज व आवेश यांचेही रूपांतर नेमकेपणाने करण्यात यशस्वी ठरला आहे. मूळ भाषणे मराठीतूनच केली गेली असे वाटण्याइतपत अनुवाद प्रभावी झाला आहे. त्या पुस्तिकेचे शीर्षक जगाला आव्हानअसे देण्यात माधव काशिनाथ दामले यांनी जरा अतिशयोक्ती केली असे आज वाटू शकते. परंतु त्या वेळची एकूण परिस्थिती लक्षात घेतली तर त्याला अयोग्य म्हणता येणार नाही.
         ‘चले जावआंदोलनाबाबत (1942) त्याच्या बाजूने व विरूद्ध अशी बरीच चर्चा झाली आहे. त्याच्या यशापयशाचे मोजमापही सर्वसामान्यांनी, समाजधुरीणांनी व अभ्यासकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेले आहे. अर्थातच, त्यात ज्याचा-त्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. त्याचे कारण, 1939 ते 1945 अशी सहा वर्षें दुसरे जागतिक महायुद्ध चालू होते आणि त्या महायुद्धाच्या ऐन मध्याला चले जावचा लढा पुकारला गेला होता. ब्रिटन युद्धात गुंतलेले असताना, दोस्त राष्ट्रांची पिछेहाट होत असताना आणि जर्मनी व जपान सर्वत्र आगेकूच करत असताना, गांधीजींनी तो लढा पुकारण्याचे ठरवले होते. तेव्हा काँग्रेसमधूनच त्याला पहिल्यांदा विरोध झाला होता. नेहरू व आझाद सुरुवातीला, त्यास फारसे अनुकूल नव्हते, परंतु त्यांचे मन वळवण्यात गांधीजींना यश आले. सी. राजगोपालाचारी यांचा विरोध मात्र कायम राहिला आणि म्हणून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला (काही वर्षांनी ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले). पटेल व समाजवादी विचारांचे बहुतेक सर्व नेते मात्र गांधीजींच्या त्या निर्णयामागे ठामपणे उभे होते, (त्या आंदोलनात समाजवाद्यांचा सहभाग, हे रोमहर्षक प्रकरण आहे).
          त्यावेळच्या अखंड भारतात मुस्लिम लीग ही काँग्रेसनंतरची सर्वांत मोठी संघटना होय. लीग व तिचे नेते जीना यांचा 1942 च्या चले जावआंदोलनाला पूर्ण विरोध होता. त्यांनी ब्रिटिशांना सहकार्य कराअशी जाहीर भूमिका घेतली होती. हिंदू महासभेचे नेते सावरकर व श्यामाप्रसाद मुखर्जी यांनीही चले जावला पूर्ण विरोध केला होता आणि ते आंदोलन फसले पाहिजे,’ यासाठी सक्रिय भूमिका बजावली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यास विरोध केला होता. कम्युनिस्टांचा त्या आंदोलनाला विरोध सभेतच प्रकट झाला होता, त्याचे कारण रशिया फॅसिझमविरूद्ध लढत आहे आणि म्हणून दोस्त राष्ट्रांना युद्धात मदत करणे आवश्यक आहे!असे सांगितले गेले होते. भारतात त्यावेळी लहान-मोठी अशी सहाशे संस्थाने होती, त्यांतील बहुतांश संस्थानिकांचा चले जावआंदोलनाला विरोध होता, कारण ते सर्व ब्रिटिशांचे मांडलिक होते. क्रांतिकारकांचे विविध गट विखुरलेले होते. त्यांचा चले जावला विरोध नव्हता; ते सहभागी झाले, परंतु त्यांच्या त्यांच्या विचार व कार्यपद्धतीनुसार. त्याच दरम्यान, सुभाषबाबूंचे देश स्वतंत्र करण्याचे प्रयत्न आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून चालू होते. पण गांधी व काँग्रेस यांना ते प्रयत्न मान्य नव्हते. जगभरातून त्या आंदोलनास पाठिंबा फारसा नव्हता. काही अंशी अमेरिका वगळता अन्य सर्व प्रमुख देशांना, भारताने तो लढा पुकारण्याची ती वेळ योग्य नाही असेच वाटत होते. हे सर्व लक्षात घेता चले जावहे जगाला आव्हान होते असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरत नाही. वस्तुत: जागतिक महायुद्ध ऐन भरात असताना ब्रिटन व दोस्त राष्ट्रे यांची पिछेहाट होत होती. ब्रिटनने भारताला युद्धात ओढले होते. भारताचा युद्धातील आणखी सहभाग आवश्यक बनत चालला होता. तेव्हा गांधी व काँग्रेस यांनी भारतीय स्वातंत्र्याची मागणी मान्य करा, आम्ही युद्धात सर्व प्रकारची मदत करूअशी भूमिका घेतली होती, तर आधी युद्धात मदत करा, युद्ध संपल्यावर भारताच्या स्वातंत्र्याचे ठरवूअशी भूमिका ब्रिटनची होती.
 विनोद शिरसाठ vinod.shirsath@gmail.com
(‘8 ऑगस्ट 1942 च्या ठरावावरील भाषणेया पुस्तिकेचे (साधना प्रकाशन) प्रास्ताविक )
विनोद शिरसाठ हे चौदा वर्षांपासून साधना साप्ताहिकात कार्यरत आहेत. ते सात वर्षे युवा संपादक व नंतरची सात वर्षे संपादक होते. त्यासोबत ते दहा वर्षांपासून साधना प्रकाशनाचे आणि वर्षभरापासून कर्तव्य साधना या डिजिटल पोर्टलचेही संपादक आहेत. त्यांनी साधना साप्ताहिकात लिहिलेल्या निवडक संपादकीय लेखांचे पुस्तक ‘सम्यक सकारात्मक’ आणि तरुणाईसाठी लिहिलेल्या ‘लाटा लहरी’ व ‘थर्ड अँगल’ या दोन सदरांची दोन छोटी पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
——————————————————————————————————————————————-
———————————————————————————————————————————————————-
 

 

About Post Author

1 COMMENT

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version