घातवाफ

_Ghatvaf_carasole

‘घातवाफ’ हा आशयगर्भ शब्द संत वाङ्मयात आढळतो. ‘घातवाफ’ हा घात आणि वाफ या दोन शब्दांपासून बनला आहे. अर्थात त्यातील घात हा शब्द आघात, हत्या, वध या अर्थाने आलेला नाही. तसेच, घात म्हणजे गुणाकार असाही त्याचा अर्थ नाही. घात शब्दाचे ते सर्व संस्कृतमधील अर्थ आहेत. ‘घातवाफ’ हा अस्सल मराठी शब्द आहे. त्यातील ‘घात’ याचा अर्थ शेतीमधील पेरणी, लावणी इत्यादिकांच्या कामाची किंवा ऋतुपरत्वे येणाऱ्या, पिकणाऱ्या धान्याची योग्य वेळ किंवा मौसम अथवा हंगाम असा आहे. उदाहरणार्थ, पेरण्याची घात, कापण्याची घात इत्यादी. घात हा शब्द स्त्रीलिंगी आहे. ‘त्या दिवसांत उत्तरा व हस्त या पावसाने पेरणीस घात थोडी उशिरा आली आहे’ म्हणजे ‘यंदा पेरणीची योग्य वेळ उशिरा आली’ असा अर्थ आहे.
‘घातवाफ’ हाही स्त्रीलिंगी शब्द आहे. मे महिन्याच्या अखेरीस वळिवाचा जोरदार पाऊस होतो. त्यानंतर पुन्हा कडक ऊन पडते. त्यामुळे जमिनीतून पाण्याच्या वाफा वर वर येतात. असा, एकदा पर्जन्यवृष्टी होऊन जमिनीतून वाफा निघत असलेला काळ हा पेरणीला अत्यंत उपयुक्त असा काळ असतो. बीज अंकुरण्यासाठी लागणारा ओलावा आणि उबदारपणा त्या वेळी राहत असतो. तो काळ म्हणजेच ‘घातवाफ’ होय.

घातवाफचा क्रियापद म्हणून वापर केल्यास त्याचा अर्थ सांभाळणे, जपणे, साधने असा होतो. जसे,

‘क्षेत्र गुणे बीज अंकुरे l
ते अनंत धा वृत्वी विकारे l
घातवाफ ते आदरे l
साधूनि घेतली ll’

घातीचे दिवस म्हणजे सुगीचे दिवस किंवा सत्तेचा, सुबत्तेचा, भरभराटीचा काळ.  मराठी भाषेला ‘घातीचे दिवस’ यावेत असे वाटत असेल, तर त्यासाठी संस्था वाङ्मयाचा अभ्यास करणे अगत्याचे ठरते.

–  उमेश करंबेळकर

(‘राजहंस ग्रंथवेध’ फेब्रुवारी 2018 वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleकदंबमुकुल न्याय
Next articleअभिनव भगूर दर्शन आणि अभ्यास मोहीम
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version