आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाजशास्त्रज्ञ, श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्य व धोरण समितीच्या सदस्य. गेल ऑम्वेट यांचे वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी 25 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे कासेगाव (जिल्हा सांगली) येथे निधन झाले. त्या गेली पाच वर्षे आजारी होत्या. तरी पती भारत पाटणकर यांच्यासोबत परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यक्रमांस हजर राहत होत्या. त्या त्यांना लॉकडाऊन काळात चालता येईनासे झाले, तेव्हा कासेगाव येथे घरीच, पाटणकर यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार घेऊ लागल्या. परंतु त्यांची प्रकृती गेल्या महिनाभरात खूप खालावली. त्यांनी राहत्या घरीच अखेरचा श्वास घेतला.
गेल ऑम्वेट या अमेरिकेत मिनियापोलीस जवळील एका गावात 2 ऑगस्ट 1941 रोजी जन्मल्या. त्या विद्यार्थिदशेपासून अमेरिकेत युद्धखोरीविरूद्ध युवक चळवळीत अग्रस्थानी होत्या. त्याचप्रमाणे त्या व्हिएतनाम वॉरविरोधी चळवळीमध्ये सक्रिय होत्या. त्या महाराष्ट्रात अमेरिकेतील पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर, 1970 च्या दरम्यान त्या पीएच डी अभ्यासासाठी महाराष्ट्रात आल्या. त्यांच्या अभ्यासाचा विषय क्रांतिबा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या चळवळींचे 1918 नंतरचे स्वरूप हा होता. त्यांना त्या संशोधनाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात फिरत असताना क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या क्रांतिकारक चळवळीचा; तसेच, 1930 नंतर निष्क्रिय झालेल्या सत्यशोधक चळवळीतील ब्राह्मणेतर समाजाचा परिचय झाला. गेल यांना इंदुताई पाटणकर आणि त्यांचे पुत्र भारत यांनी त्या संशोधनात मदत केली. त्यांनी ‘वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड आणि पश्चिम भारतातील अब्राह्मणी चळवळ’ (कल्चरल रिव्होल्ट इन कलोनीयल सोसायटी: नॉन ब्राह्मीन मूव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया) हा त्यांचा प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कले विद्यापीठात सादर करून, 1973 साली डॉक्टरेट पदवी संपादन केली. त्यांच्या पूर्वी भारतातील आंबेडकर आणि शाहू महाराज वगळता कोणीही जोतिबा फुले यांच्या चळवळीवर इतका सविस्तर अभ्यास करून, सैद्धांतिक मांडणी केलेली नव्हती. प्रबंधावरील प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या त्या पुस्तकामुळे फुले यांची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली. त्या पुस्तकामुळे प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक दिवंगत नेते काशीराम कासेगाव येथे जाऊन त्यांचे मार्गदर्शन व सल्ला घेत असत. गेल यांनी भारत पाटणकर यांच्याशी विवाह करण्याचे 1976 साली ठरवले. त्यावेळी आणीबाणी चालू होती. पाटणकर मुंबईत एम डी चा अभ्यास करत होते व ‘मागोवा’ या मार्क्सवादी विचारांच्या गटात सामील झाले होते. त्याचबरोबर ते लाल निशाण गटाच्या कापड कामगार चळवळीतही काम करत होते. गेल लाल निशाण पक्षाचे दादर येथील कार्यालय ‘श्रमिक’ येथे राहत असत. भारत पाटणकर आणि गेल यांनी कापड कामगार संघटनेत काम करत असताना त्यांच्या इतर दहा सहकार्यांसोबत श्रमिक मुक्ती दलाची स्थापना केली. त्यांनी कासेगाव येथे राहून चळवळीत भाग घेण्याचे ठरवले. त्यांनी भारतीय नागरिकत्व 1983 साली स्वीकारले. गेल आणि भारत यांनी त्यांच्या निरामय आणि तितक्याच निर्भीड सहजीवनातून सावित्री-जोतिबांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सातत्याने केला. त्या जोडप्याने फुले यांच्याप्रमाणे ‘बोले तैसा चाले’ या सत्यवचनाचा अंगीकार त्यांच्या वर्तनव्यवहारात केला.
जातीय वास्तवाचे भान आणणाऱ्या फुले यांचा स्पष्टवक्तेपणाचा वारसा एकविसाव्या शतकात पुढे चालवण्याचा वसाच जणू गेल आणि भारत यांनी घेतलेला दिसला. त्यांची मांडणी अशी होती: ‘भारतातील जातींची उतरंड ही वर्गीय उतरंडीपेक्षाही खोलवर रुजलेली आहे, त्यामुळे जातिअंतासाठी चळवळ करण्याची असेल, तर ‘केवळ मी जातिव्यवस्था मानत नाही’ असे म्हणून चालणार नाही तर जातींचे अस्तित्व नाकारण्याच्या भूमिकेतून बाहेर यावे लागेल. त्याच्याही पुढे जाऊन जातीय आणि वर्गीय हितसंबंधांचे जाळे नीट समजून घेऊन ते बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
गेल यांना भारतातील जात आणि वर्ग या दोन्ही व्यवस्थांचे जे आकलन होते ते त्यांनी त्यांच्या लिखाणातून व्यक्त केले आहे. जाती अंत झाला पाहिजे अशी वरवरची भाषा करणार्या सर्व परिवर्तनवादी आणि डावे यांना गेल आणि भारत पाटणकर यांनी खडसावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच विचारातून विद्रोही सांस्कृतिक चळवळीची स्थापना 2000 साली झाली. त्यातून महाराष्ट्रभर साहित्य संमेलने घेतली गेली. गेल त्यांची तीच मांडणी सोप्या पद्धतीने त्या प्रत्येक संमेलनात करत असत. म्हणूनच त्यांचे सर्व लिखाण 2000 सालानंतर मुख्यत: फुले-शाहू-आंबेडकरवाद याभोवती केंद्रित झालेले दिसते. आकलन मार्क्सवादी असो की सबाल्टन, दोन्ही जात वास्तव आणि वंशवाद समजून घेण्यातील त्रुटी, दलित बहुजनांची चळवळ आणि मुख्यत: बुद्धिझम अशा विषयांभोवती केंद्रित झाले आहे.
भारतीय सामाजिक व्यवस्थेमध्ये परिवर्तन करत असताना जातीचा मुद्दा महत्त्वाचा की वर्गाचा मुद्दा महत्त्वाचा, हा विषय नेहमी चर्चेचा राहिला आहे. जात हाच एकमेव शोषणाचा मुद्दा आहे. भारतात वर्ग जाणिवांचा नव्हे तर जातीय उतरंडीचा प्रभाव जास्त आहे असे मानून फुले-आंबेडकरी चळवळीतील अनेकांचा डाव्या विचारांना पूर्ण नकार आहे, तर डाव्यांपैकी अनेकांनी अजूनही जातीचा मुद्दा नीटपणे समजून घेतलेला नाही आणि ते वर्गाला प्राधान्य देत आहेत. गेल यांनी जातीचा मुद्दा प्रखरपणे मांडून डावा विचार आणि फुले-आंबेडकरवादी विचार यांची योग्य अशी सांगड घातली. ती मांडणी परिवर्तनवादी चळवळ पुढे नेत असताना महत्त्वाची आहे.
गेल यांचे स्त्रियांच्या चळवळीतील योगदानही दलित बहुजन स्त्रीवादी चळवळीला प्रेरणादायी राहिले आहे. त्या सांगली जिल्ह्यातील ‘स्त्री मुक्ती संघर्ष’ चळवळीतील अनेक आंदोलनांत रस्त्यावर येऊन स्त्रियांचे प्रश्न धसाला लावण्याचा प्रयत्न कळकळीने करत. गेल ग्रामीण कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न इंग्रजी जाणणाऱ्या शहरी मध्यमवर्गीय बुद्धिवादी, परिवर्तनवादी चळवळीतील लोकांपर्यंत पत्रांतून पोचवत, त्यांना मदतीचे आवाहन करत. त्यांची ही कळकळ त्यांनी त्या सर्वांना लिहिलेल्या पत्रांतील प्रत्येक शब्दातून व्यक्त होते. जनआंदोलने ‘लोकवर्गणी’वर जास्त काळ टिकतात असे श्रमिक मुक्ती दलाचे ब्रीद होते. त्यांनी सांगली जिल्ह्यातील कामासाठी लोकवर्गणीवरच लढे उभारावे हे ब्रीद प्राणपणाने जपले. त्या स्वत:च्या, पाटणकर यांच्या व त्यांची मुलगी हिच्या जीवननिर्वाहाचा खर्च विद्यापीठात व्याख्याने देऊन, लेखन करून, प्रसंगी तेथे नोकरी करून भागवत असत.
मुंबईतील जे कामगार त्यांच्या त्यांच्या गावी गिरणी संप झाल्यानंतर (1982) गेले, त्यांतील सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त कामगारांच्या चळवळीचे संघटन भारत पाटणकर करू लागले. त्या कामात गेल ऑम्वेट आणि इंदुताई पाटणकर हिरिरीने पुढाकार घेऊ लागल्या. मीही मुंबईवरून दर आठवडा-दोन आठवड्यांनी त्या कामात सहभागी होत असे. आम्ही तेथे ‘स्त्री मुक्ती संघर्ष समिती’ची स्थापना केली. कासेगावाहून गेल, इंदुताई, मुंबईहून मी (कुंदा), डोंबिवलीहून नीशा साळगावकर, शैला सावंत अशा आम्ही काही जणी विटा, खानापूर तालुक्यांत गावोगावी फिरून बायकांच्या बैठका घ्यायचो. एसटी उपलब्ध नसली, तर साताठ किलोमीटर पायी चालत जायचो. पण त्या काळात आम्हाला कधीच जाणवले नाही की आमच्यासोबत उन्हातान्हात चालत येणारी ही स्त्री ‘अमेरिकन’ आहे; इतके तिने ग्रामीण भागातील जीवनशैलीशी जुळवून घेतले होते! आम्ही स्त्री मुक्ती संघर्ष चळवळीत खानापूर तालुक्यातील स्त्रियांची परिषद 1984 साली विटा शहरात घेतली होती. त्यात दुष्काळग्रस्त भागातील स्त्रियांचे प्रश्न समोर आले होते. परिषदेनंतर पुढे काही आंदोलने केली. शहरात ठिकठिकाणी मोर्चे काढले. त्या सगळ्या गदारोळात, प्रसंगी रस्त्यावर चूल पेटवून भाकरी खावी लागली तरी गेल आणि इंदुताई या दोघी कधी मागे हटल्या नाहीत. त्या आमच्यासोबत कडक ऊन, थंडी, वारा, पाऊस या सगळ्यांची तमा न बाळगता रात्रंदिवस असत.
कोणताही अभ्यास आणि संशोधन हे केवळ विद्यापीठीय परिक्षेत्रात सीमित न राहता सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी जी चळवळ संघटित करावी लागते, त्यासाठी पायाला भिंगरी बांधून गेल भारतभर फिरत राहिल्या. शेतकरी, कष्टकरी स्त्रिया, पुरुष कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत राहिल्या. वेगवेगळ्या चळवळींत अग्रभागी राहिल्या. त्यांनी विशेषत: ऐंशीच्या दशकात पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांच्या, कष्टकरी-शेतकरी-परित्यक्ता स्त्रियांच्या चालवलेल्या चळवळीत इंदुताई पाटणकर यांच्यासोबत स्त्री मुक्ती संघर्ष चळवळीचे नेतृत्व केले. आम्ही त्यांच्याकडे श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली राज्यभर चाललेल्या विविध चळवळींच्या ‘वैचारिक आधारस्तंभ’ म्हणून पाहतो. त्या चांदवड येथील शेतकरी महिला परिषदेत शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेच्या निमंत्रणावरून सामील झाल्या. त्यांनी त्या परिषदेतदेखील ‘लक्ष्मी मुक्ती’ आंदोलन, जमीन न नांगरता केलेली बागायती, ‘सीता शेती’ अशा अभिनव उपक्रमांत सहभाग घेतला. त्या शरद जोशी यांच्यासोबत आंदोलनात सामील झाल्याने; तसेच, दलित – बहुजनांच्या मुक्तीचा मार्ग म्हणजे जागतिकीकरण अशी भूमिका घेतल्याने काही काळ वादाच्या भोवऱ्यात सापडल्या. त्यांच्यावर खूप टीका पुरोगामी वर्तुळात झाली, पण त्यांनी त्यावरील वैचारिक आणि सैद्धांतिक मांडणी करत विरोधाची धार बोथट केली.
संबंधित लेख : गेल ऑम्वेट – सहावार साडी, सँडो ब्लाऊझ !
धर्मानंद कोसंबी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणेच गेल आणि भारत पाटणकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार 1996 साली केला. त्यांनी गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार कोठल्याही भावनेच्या आहारी न जाता, डोळस, वैचारिक, बौद्धिक, विवेकवादी ज्ञानाधारित, विज्ञानवादी भूमिकेतून केला. एकीकडे वारकरी संप्रदायाची दलित – बहुजनांना मुक्तीचा मार्ग दाखवणारी तुकोबारायांची भक्तिपरंपरा आणि दुसरीकडे गौतम बुद्धाची संपूर्णपणे निरीश्वरवादी धर्मपरंपरा… हे आम्हा सर्वांना सकृतदर्शनी विसंगत आणि परस्परविरोधी वाटे. त्यांचा ज्या कम्युनिस्ट पक्षाशी जवळचा संबंध आहे, त्यांनाही ते तसेच वाटते, परंतु गेल यांनी त्यांची भूमिका एका मनोगतातून मांडली.
गेल म्हणतात, ‘बौद्ध होणे म्हणजे एक धर्म स्वीकारणे आणि धर्म हा नेहमीच रुढी-परंपरा, अंधश्रद्धा यांमध्ये लोकांना अडकावून ठेवतो, शोषणाच्या प्रक्रियेत नेतो असे माझ्या आणि भारत यांच्या काही मित्रांचे, सहकाऱ्यांचे म्हणणे होते आणि आजही आहे, पण आम्हा दोघांनाही ते पटत नाही. आमचे म्हणणे बौद्ध धम्म हा मुक्तिवादी आहे. ‘स्वत:च स्वत:चा दीप हो’ हे शिकवणारा आहे. तो तर्काला, अनुभवाला पटेल तेवढेच स्वीकारा असे म्हणतो. हे जग क्षणाक्षणाला बदलत असते, त्यासाठी कार्यकारणभाव आहे असे मांडतो. त्यामुळे तो इतर सर्व धर्मांपेक्षा वेगळा असा मुक्तिदायी धर्म आहे. बाबासाहेबांनी जातिव्यवस्थेचा अंत करण्याच्या प्रक्रियेत बौद्ध धम्म स्वीकारण्याचे पाऊल उचलले. ते अत्यावश्यक होते. बौद्ध जनतेमध्ये जरी चुकीच्या काही गोष्टी होत असल्या, तरीही तीच जनता सर्वात जास्त जागृत आहे. सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहे. जातिअंताच्या लढाईत आग्रही आणि अग्रेसर आहे, याचे कारण ती जनता बौद्ध आहे हेच आहे.’ गेल ऑम्वेट यांनी हे त्यांच्या ‘सिकिंग बेगमपुरा’ या ब्लॉगवजा लेखनावरील पुस्तकातून जास्त स्पष्ट केले आहे. ‘बेगमपुरा’ हे खरे तर, संत रविदास यांच्या संकल्पनेतील भेदाभेदविरहित एक शहर. ते शहर प्रत्यक्षात येऊ शकते. त्यांनी जात आणि वर्ग विहीन, शोषणमुक्त समाज प्रत्यक्षात येऊ शकतो असा सकारात्मक दृष्टिकोन मांडला.
गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठांत प्राध्यापक म्हणून काम केले आहे. गेल यांची पंचवीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ‘कल्चरल रिवोल्ट इन कोलोनियल सोसायटी – द नॉन ब्राह्मन मुव्हमेण्ट इन वेस्टर्न इंडिया’, ‘बुद्धिझम इन इंडिया’, ‘दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्होलुशन’ यांचा समावेश आहे. गेल यांनी देशात आणि परदेशांत संशोधन पेपर सादर केले असून, शेकडो व्याख्याने दिली आहेत. त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांची मुलगी प्राची, जावई तेजस्वी व नात निया हे अमेरिकेमध्ये वास्तव्यास आहेत. मुलगी प्राची पाटणकर अमेरिकेतील ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ या चळवळीत संघटक म्हणून काम करते.
(‘युगांतर’, 2 ते 8 सप्टेंबर अंकावरून पुन:प्रसिद्ध, संस्कारित-संपादित)
– कुंदा प्रमिला नीळकंठ kundapn@gmail.com
कुंदा प्रमिला निळकंठ या स्त्रीवादी कार्यकर्त्या, माध्यम समीक्षक, लेखिका व फिल्ममेकर आहेत. त्यांचा सामाजिक चळवळीत सहभाग असतो. त्यांनी फिल्म डिरेक्शन आणि सिनेमॅटोग्राफी यात पदविका मिळवली आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठातून माहितीपट या विषयावर पीएच डी मिळवली आहे. त्यांनी माध्यम विषयावर महाविद्यालयात अध्यापनही केले आहे. त्यांनी माहितीपट, चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिका यांचे कथालेखन व दिग्दर्शनही केले आहे. त्यांची सहा पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच, त्यांनी चार माध्यम विषयक पुस्तकांचे संपादनही केले आहे.
—————————————————————————————————————————————————————————