Home मंथन गुरूमहात्म्य

गुरूमहात्म्य

गुरूचे महत्त्व भारतीय परंपरेत अनन्यसाधारण आहे. गुरू मध्ये ब्रह्मा-विष्णू-महेश हे तिघेही सामावले आहेत. आणि ही त्रिमूर्ती म्हणजे भारतीय जीवनाचा आधारच होय. त्यांच्यामधूनच सृष्टीची उत्पत्ती – स्थिती व लय घडत असते असा समज भारतीय लोकांचा आहे. त्यामुळे गुरूचे स्थान खूपच मोठे, जवळजवळ सर्वव्यापी होते. गुरू-शिष्य संबंधांच्या अगणित कथा भारतात प्रसृत आहेत. गुरुची थोरवी अशी भारतीय अंगागांत भिनली आहे. गुरु ही जाणकार, ज्ञानी व अनुभवी व्यक्ती असे मानले जाते. त्या प्रकारचे मिथ त्या शब्दाभोवती तयार झाले आहे. हे खरेच आहे, की कोणी जाणकार माणसाने दीक्षा दिली तर ती मनात ‘फिट’ बसते. गुरुपदेशाचे तसेच महत्त्व आहे. जणू गुरू शिष्याला रहस्यमय असे काही सांगत असतो असा भाव त्या रचनेमध्ये व नातेसंबंधांमध्ये आहे. आधुनिक काळात शिक्षकांना गुरुची जागा दिली गेली. त्यामुळे शिक्षकांना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या जीवनात अनन्य स्थान असते. गुरूला व शिक्षकालाही सर्व काही कळते असेच विद्यार्थ्याला वाटत असते. गुरु अथवा शिक्षक विद्यार्थ्याला घडवतो अशी पक्की धारणाही भारतीय समाजात आहे. संगीत आणि कुस्ती, मल्लखांब यांसारखे काही क्रीडाप्रकार यांमध्ये गुरु-शिष्य परंपरा अजूनदेखील निष्ठेने जपली जाते. योग-अध्यात्म या क्षेत्रांतदेखील गुरुविना अन्य कोणी नाही अशीच शिष्याची भावना असते. गुरूविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ पौर्णिमेचा दिवस जरी राखून ठेवला गेला आहे तरी शिष्य गुरुबद्दल सदैव ऋणी असतो.

आधुनिक काळात मात्र मला गुरू-शिष्य नातेसंबंध कोड्यात टाकतो. गुरूकडे देण्यासारखे बरेच असते, ही गोष्ट केव्हाची तर ज्ञानाच्या विषयशाखा मर्यादित व सरळ रेषेत होत्या. ज्ञानसूत्रांचा अर्थान्वय लावणारी मंडळी मोजकी होती. ते सारे समजून घेऊन त्या त्या विषयांतील गुरु त्यांच्या त्यांच्या विषयांतील उत्सुकांना व इच्छुकांना त्यांच्याजवळ असलेली संपदा बहाल करू शकत असत. ज्ञानसंपादनाचे अन्य मार्ग जवळजवळ नव्हतेच. साधने तुटपुंजी होती. त्यामुळे गुरूला तसे अनन्यस्थान लाभत गेले.

आधुनिक काळात ज्ञानशाखा खूप वाढल्या. त्या त्या शाखेतील ज्ञानाचा विस्तारदेखील प्रचंड झाला. दळणवळणाची साधने वाढली. एकेकाळी ‘गुरुवाणी’ एवढेच श्रवण माध्यम उपलब्ध होते. तेथे छापील ग्रंथ आले. वाचनालयात ‘ग्रंथ हेच गुरु’ असे फलक लागले. तोपर्यंत आकाशवाणी आली. तिने तर खरोखरीच ‘ज्ञानाचे आकाश’ खुले केले. 1950 नंतर तर विविध माध्यमांचा सुकाळ झाला. त्यांपैकी गेल्या शतकाअखेर उपलब्ध झालेले ‘इंटरनेट’ हे माध्यम तर व्यक्तीच्या हातात जगातील सर्व ज्ञान आणून पोचवत आहे. ‘गुगल’चा त्यावरील कब्जा भयचकित करणारा आहे. काहीही अडले तरी ‘‘गुगल’ला विचारा’ हा वाक्प्रचार खेड्यापाड्यांतसुद्धा रूढ झाला आहे. कित्येक ठिकाणी शाळांतील शिक्षकदेखील ‘गुगल’ला विचारून विद्यार्थ्यांचे शंकासमाधान करत असतात. अशा वेळी वाटते, की ‘गुगल’ हाच गुरूंचा गुरू होय. मग गुरुमहात्म्य कोणाचे सांगायचे? महर्षी व्यास यांचे स्थान ‘गुगल’ने केव्हाच पटकावले आहे. पुन्हा हे सर्वांना ठाऊक आहे, की ‘गुगल’ ही फक्त एजन्सी आहे. त्यांच्याकडे स्वत:ची माहिती वा स्वत:चे ज्ञान काहीच नाही. ते इकडील ज्ञान तिकडे पोचवण्याचे म्हणजे वितरण-विनिमयाचे फक्त साधन आहे.

‘गुगल’कडे आणखी एक अधिकची मात्रा आहे. ती म्हणजे ‘गुगल’ माणसाची जिज्ञासा चाळवत असते. माणूस ‘गुगल’वर एक संदर्भ शोधू लागला, की त्याच्यापुढे शंभर पर्याय ठेवले जातात. त्यामधून माणसाची बुद्धी अधिक जागी व शोधक होते. त्यामधून माणूस ज्ञानासाठी अधिक भुकेला होतो आणि जिज्ञासा हे माणसाच्या मनुष्यत्वाचे मूळ लक्षण होय. ती जिज्ञासाच ज्याच्यामुळे चाळवली जाते तो ‘गुगल गुरु’ महत्तमच होय.

तरी एक प्रश्न राहतोच, की ‘गुगल’च्या माध्यमातून पुरवली जाणारी माहिती बिनचूक असतेच असे नाही; काही वेळा तर दिशाभूल होऊ शकते. ते खरेच आहे, परंतु त्यामधून नव्या ज्ञानमार्गाच्या शोधाचा आरंभ होतो ना! मात्र आताच घाबरू नका. ‘गुगल’सारखे ‘इंटरनेट गुरु’ मानवी जीवनाचा पूर्ण ताबा घेईपर्यंत गुरू-शिष्य नातेसंबंध अबाधित राहणार आहे, त्यातील मानवी जिव्हाळा माणसाला मोहून टाकणार आहे.

– दिनकर गांगल

About Post Author

Previous articleशिक्षकांचे व्यासपीठ – नव्या योजना नव्या कल्पना
Next articleसचिन जोशींची Espalier – फास्टर फेणेची खरीखुरी शाळा
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

Exit mobile version