अमीरबाई कर्नाटकी यांचे चरित्र रहिमत तरीकेरी यांनी कन्नड भाषेत लिहिले. त्यांनी चरित्र-लेखनाच्या निमित्ताने केलेल्या संशोधनाचा आणि इतर चरित्रात्मक गोष्टींचा रंजक आढावा एका कन्नड लेखात घेतला होता. त्याचा हा अनुवाद.)
माझ्या कुतूहलाला बळ मिळाले ते धारवाडच्या संगीतप्रेमी राजशेखर जंगमशेट्टी यांच्यामुळे. ते मूळचे बिजापूर जिल्ह्याचे रहिवासी. ते विद्युत विभागातून अभियंता म्हणून निवृत्त झाले होते. त्यांना जुनी हिंदी गाणी आवडायची. एकदा बोलता बोलता अमीरबाई यांचा विषय निघाला. ते म्हणाले, “हे पहा, बिळगीसारख्या खेड्यातून ही बाई मुंबईमध्ये आली. किती मोठी साधना केली! ती दिसायलाही किती रूपवान! तिचे गाणे सुद्धा किती मधुर! तिला कर्नाटकाप्रती अतिशय प्रेम, म्हणून तर तिने कर्नाटकी हे नाव लावले. तिच्याबद्दल खूप लोकांना माहिती नाही. कर्नाटकात फिरत राहा, तिच्यावर संशोधन करा”. त्यांनी मला त्यांच्याकडील तिच्या गाण्यांची एक कॅसेट दिली आणि तिच्याबद्दल खूप प्रेम आणि माहिती असणारे धारवाडचे सुरेश कुलकर्णी यांची भेट घालून दिली. मला ह्या नटीच्या मागे लागायला तेवढे पुरेसे होते.
माझा शोध सुरु झाला. उत्तर कर्नाटकातील अनेक गावांमध्ये तिचे रसिक हजारोने आहेत, धारवाड च्या आकाशवाणी केंद्राने त्यांच्यावर एक कार्यक्रम प्रसारित केला होता. बिजापुर मध्ये तिचे धाकट्या बंधूंची मुले राहत, तिच्या बंधुंसाठी बांधून दिलेले अमीर नावाचे चित्रपटगृह आहे; बिजापुर्च्या दफनभूमीत तिची कबर आहे. बिजापूर मध्ते असलेल्या त्यांच्या बंधूना भेटलो. त्यांच्याकडून अमीरबाई यांचे छायाचित्र मिळाले. एका छायाचित्रात चार व्यक्ती आहेत. गोहाराबाई यांच्या एका बाजूला चंचल कोवळेपण असलेले, अमीरबाई यांच्या चेहेर्यावर गांभीर्य आहे. प्रसन्न मंदस्मित आहे. हे छायाचित्र साधारण ४५ वर्षे जुने आहे. शोधता शोधता मला असे विस्मायाकारारीत्या, माझ्यापुढे अमीरबाई यांचे विश्व उभे होते.
बिजापूरमध्ये शोध
१९३०च्या दशकातील पहिल्या पूर्वार्धात हिंदुस्तानी संगीत, रंगभूमी, चित्रपट सारखे कलाप्रकार होते. मोठेमोठे गायक चित्रपट आणि रंगभूमीमध्ये काम करत होते. चित्रपट आणि रंगभूमी ह्यामध्ये संगीत अतिशय सामर्थ्यशाली होते. त्या वेळच्या नाटक आणि चित्रपट या मध्ये सुद्धा संगीताचा प्राधान्याने होते. ही तीन कलाक्षेत्राव्यतिरिक्त कलाकरांना मोहित नव्हते. बेंगलुरू नागरात्न्नाम्मा, लता मंगेशकर, अशा भोसले, एम. एस. सुब्बलक्ष्मी, कर्नाटकाच्या शांत हुबळीकर, पंढरीबाई, गंगुबाई हनगल ह्याच माळेतील मणी होते. कलेच्या क्षेत्रात कीर्तीवंत झालेले हे कलाकार शेवटी समाजाच्या दृष्टीने मान्य नसलेले जीवन जगात होते. मराठी चित्रपटात मोठे नाव असलेल्या शांता हुबळीकर यांच्या जीवनात हे ठळकपणे दिसते. आता बाळसे धरलेल्या कर्नाटकाच्या वेश्यांकडे पाहिल्यास हे घोरसत्य डोळ्यांना दिसते. त्यांना हीन दृष्टीने पाहणाऱ्या विशिष्ट समाजातील वाकड्या नजरेमुळे हे कलाकार पिडीत झाले होते. ह्या वेदानेमध्ये त्याच्या कुटुंबाची ससेहोलपट झाली. बाकीचे कलाकार मंदिर-मंदिरामध्ये संगीत सेवा करत आपापल्या गावीच राहिल्या. काहीजण ह्या मंदिरातील संगीतसेवेच्या सीमेबाहेर येवून, विशाल अशा रंगभूमीवर शास्त्रीय संगीतामध्ये, चित्रपटामध्ये, जाऊन मोठे नाव मिळवले. ह्यामध्ये गंगुबाई हनगल, शांत हुबळीकर, पांढरीबाई, गोहरबाई प्रमुख आहेत.
मुंबईमध्ये आगमन
उत्तर कर्नाटक भाग हा त्या वेळच्या मुंबई प्रांताशी संलग्न होता. बिजापूर, धारवाड, गदग, हुबळी, बेळगावी ह्या भागातील बहुतेक कलाकारांना कोल्हापूर, पुणे, मुंबईचे आकर्षण होते. ह्या भागातील अनेक नट-नटी तेथे स्थलांतर करत. त्यांमध्ये अन्कुदारीचे शांताराम, शांता हुबळीकर, अशोककुमार बरोबर काम केलेल्या प्रसिद्ध नटी लीला चिटणीस, सुमन कल्याणपूर, लीना चंदावरकर, शान्तेश पाटील हे प्रमुख होत. ह्या मालेत गिरीश कर्नाड हे अलीकडचे. मुंबई कर्नाटकचे कलाकार कोल्हापूर, पुणे, मुंबई इथल्या जगात मिसळण्यासाठी ते राजकीयदृष्ट्या मुंबई प्रांतात शिरले हेच एक कारण नाही. ह्या भागातातील सांस्कृतिक परिसर हे ही एक कारण आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटासाठी हवा असणारा भाषिक परिसर येथे होता. धारवाड हुबळी परिसराला भारतातील प्रमुख हिंदुस्तानी संगीत गायक लाभले होते. मराठी रंगभूमी इथे येवून ताल ठोकत असे. त्याच वेळेस कन्नड भाषेतील मुख्याधारेतील चित्रपट मैसूर कर्नाटकात तयार होत असत. त्याचे मद्रास, कोईम्बतूर हे केंद्र होते. मैसूर रंगभूमीच्या कर्नाटक संगीताचा प्रभाव होता. हिंदुस्तानी संगीतातील कलाकारांना तेथे संधी मिळत नव्हती. गंगुबाई हनगल यांसारख्या कलाकारांनी मराठी चित्रपटामध्ये काम केले, कारण त्यांना कन्नडमध्ये संधी मिळाली नाही. अपवाद म्हणजे, शांता हुबळीकर यांनी गुब्बी वीरांना यांच्या ‘जीवन नाटक’ ह्या कन्नड चित्रपटामध्ये काम केले होते. कन्नड चित्रपटांमध्ये मुख्यत्वेकरून ब्राम्हण जीवनाचे दर्शन असायचे. ते, हिंदू-मुस्लीम संस्कृती मिळून तयार झालेली संगीत रंगभूमी आणि लोकसंगीत यामधून निर्माण झालेल्या त्या भागातील कलाकारांना भावत नव्हते. हिंदी चित्रपट, हिंदुस्तानी संगीत आणि त्या भागातील रंगभूमी यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम होते. संपूर्ण मुंबई नगर भारतातील बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, बहुभार्मिक कलाकारांनी भरले होते.
१९३० च्या दशकातील पहिल्या पूर्वार्धात नाटक आणि चित्रपटामध्ये अभिनय करणारे आणि गायन करणाऱ्यांची आवश्यकता होती. कन्नड आणि मराठी रंगभूमीवर गायक-नटी म्हणून काम करत असलेल्या अमीरबाई-गोहरबाई भगिनी त्यांच्या भागातील जत्रा, उरुसांमध्ये गात होते. बिजापूरमध्ये तात्पुरत्या वस्तीसाठी आलेल्या मराठी रंगभूमीच्या प्रसिद्ध संगीतकार आणि नाटककार बालगंधर्व यांनी त्या दोन्ही भगिनींची प्रतिभा हेरली आणि त्यांना स्वतःच्या कंपनीमध्ये बोलावले. त्या वेळेला अमीरबाई यांचे कुटुंब बिळगी सोडून बिजापूरमध्ये आले होते. त्यानंतर त्या दोघी मुंबईला निघाल्या. त्या मुंबईला गेल्याचे वर्ष नक्की समजले नाही. त्या काळी चित्रपटासारख्या अद्भूत कलाप्रकाराचा प्रसार होत होता. मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या जीवनाचा नवा अध्याय सुरु झाला. अमीरबाई पंचवीस वर्षांच्या असताना त्यांनी एच. एम. व्ही. कंपनीसाठी एक कव्वाली गायली. त्यामुळे त्यांचा तेथील कलाक्षेत्रात प्रवेश सुलभ झाला. पुढे अमीरबाई गायक-नटी झाल्या आणि गोहरबाई रंगभूमीच्या रंगसंगीतामध्ये सीमित राहिल्या. गोहर पुढे गंधर्व कंपनीमध्ये गेल्या आणि बालगंधर्वांच्या जीवन-संगती झाल्या. बालगंधर्व यांना अर्धांगवायू जडला असता, गोहरबाई यांनी दहा वर्ष त्यांची लहान मुलाची करावी तशी सेवा केली. गंधर्वांची सेवा करता करता त्याच आधी निर्वतल्या. कोलंबिया रेकॉर्डिंगमध्ये गोहर यांनी गायलेल्या बाहत्तर आर. पी. एम. रेकॉर्डिंग आहेत. मराठीमध्ये, बंगालीमध्ये, त्यांनी विभिन्न रागामध्ये गायलेली पट्टी ऐकली की, आश्चर्यचकित व्हायला होते. ‘कित्तूर रुद्रम्मा’ नाटकामध्ये त्यांनी गायलेली गीते सुद्धा प्रसिद्ध आहेत.
चित्रपट क्षेत्रामध्ये प्रवेश
बेलागीच्या भगिनी असूनही अधिक प्रसिद्धी मिळाली ती अमीरबाई यांना. कारण, त्या प्रतिष्ठित आणि प्रभावशाली होत असलेल्या चित्रपट क्षेत्रात काम करू लागल्या होत्या. अमीरबाई यांचा चित्रपट क्षेत्रात प्रवेश झाला तो गोहरबाईंमुळे. अमीरबाई मूक चित्रपटापासून बोलपटापर्यंत सहजपणे काम करू लागल्या. त्या वेळेला कंपनी नाटक आणि हिंदुस्तानी संगीत क्षेत्रातील अनेक नट आणि गायक हे सुद्धा चित्रपटक्षेत्रात प्रवेश करत होते. अमीरबाई यांनी चित्रपटामध्ये पार्श्वगायन सुरु केले तेव्हा, मुबारक बेगम, सुरय्या, जोहरा अम्बालावाली, नूरजहाँ, शमशाद बेगम, उमादेवी यांसारख्या प्रसिद्ध गायिका होत्या. लता मंगेशकर तेव्हा लहान होत्या. त्या सर्वांमध्ये अमीरबाई त्यांच्या अपूर्व आवाजामुळे वैशिष्ट्यपूर्ण होत्या. बहुतेक १९४० चे दशक त्यांचे यशस्वी दशक ठरले. त्या किर्तीशिखारावर पोहचल्या ते ‘किस्मत’ (१९४२) या चित्रपटामुळे. तो चित्रपट ‘बॉम्बे टाकीज’ ने निर्माण केला होता आणि ज्ञान मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. भुरट्या चोऱ्या करणारा प्रेमिक साकारणाऱ्या अशोक कुमार यांचा हा चित्रपट. हा त्या वेळच्या कलकत्त्यात सतत तीन वर्ष चालला. भारतीय चित्रपट इतिहासात त्याने जमवलेला गल्ला (एक कोटी) हा त्यावेळचा विक्रमच होता. तो विक्रम त्यानंतर आठ वर्षांनी आलेला ‘आवरा’ या चित्रपटाने मोडला. ‘किस्मत’ने त्या वेळच्या तरुण-तरुणींना वेड लावले होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे अमीरबाई यांनी त्यात गायलेली गाणी. ‘दूर हटो जी दुनियावालो’, ‘घर घर में दिवाली’, ‘धीरे धीरे आरे बादल’ ही त्या वेळची सुप्रसिद्ध गाणी होती.
प्रमुख चित्रपट
अमीरबाईंनी काही चित्रपटामध्ये अभिनयही केला होता. त्यांनी काम केलेला पहिला चित्रपट ‘विष्णुभक्त’ (१९३४). अमीरबाई यांनी काम केली इतर चित्रपट असे आहेत – भारत की बेटी, यास्मिन, प्रेमबंधन, दुखीयारी, सरसीभगत, हमारा देश, सरदार, भक्तीचा मळा, दर्शन, वैठीवाल्लभ, माली, मां-बाप, कुलकलंक, रामायण, नर्गिस, हक़्दार, पिलिंग म्यान, अंगूर बाला, किस्मत का सितारा, हातिमताई, जादुई बांसुरी, रामबाण, रतन मंजिरी, भक्त भिल्मंगल, भक्त गोपाल भय्या, सिपाहीया, रूपबसंत, बिजली, जन्माष्टमी, बेदर्दी, लवकुश, दिवाना, माशुक, आसू, सुबह का तारा, हम पंछी एक डाल के, पवनपुत्र हनुमान, जनम जनम के फेरे, मिस्टर एक्स, खोटा पैसा, बेदर्द जमाना क्या जाने, बॉयफ्रेंड, डॉकेर्स स्ट्रीट, अमृत बंधन.
अमीरबाई यांनी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम केले असावे. १. हिंदू पुराणावर आधारित भक्तिप्रधान चित्रपट. मंदिर संस्कृतीशी परिचय असल्यामुळे त्यांना ते काम करणे जड गेले नाही. २. स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य केंद्र असलेल्या मुंबईच्या प्रभावामुळे स्वतंत्रता संग्रामाचा आशय असलेले चित्रपट. पुढे त्या गांधींना सुद्धा प्रिय झाल्या. ३. प्रेम, सामाजिक समस्या मांडलेले कौटुंबिक चित्रपट. अमीरबाई यांनी अभिनीत केलेले काही चित्रपट त्यांच्या जिल्ह्यामधून आलेले वि. शांताराम यांनी दिग्दर्शित केले होते. त्यामध्ये ‘भारत मिलाप’ हा मुख्य होता. अमीरबाईंनी स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षातच हिंदी चित्रपटामध्ये काम करणे थांबवले. त्या गुजराती आणि मारवाडी चित्रपटांमध्ये गेल्या. अमीरबाई ज्या तीन राज्यामध्ये राहिलेल्या, तेथील भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटली आणि त्या भाषेमधल्या चित्रपटांमध्ये कामही केले. त्यांचे वैयक्तिक जीवनसुद्धा धर्मातीत संबंधावर आधारित होते. ह्याचे कारण त्यांचे व्यक्तिमत्त्व जातपातीच्या पलीकडे कलेवर आधारित होते. तसेच, त्या वेळचे मुंबईचे संस्कृतिक वातावरणसुद्धा कारणीभूत होते. कन्नड भाषिक असलेल्या बेलागीच्या भगिनी, उर्दू, मराठी, गुजराती, हिंदी, मारवाडी, आणि बंगाली भाषेतील चित्रपट आणि गायनक्षेत्रात काम करत होत्या.
यशस्वी गायिका
गाण्यातील विविधता
अमीरबाई यांचे गायन वैशिष्ट्यपूर्ण होते. त्यांमागे मजरूह सुलतानपुरी यांसारख्याच्या रचना गाऊन प्राप्त केलेली साहित्यिक जाणीव, शास्त्रीय संगीताचे ज्ञान आणि तार स्वरामध्ये गाण्याचा रंगभूमी वरील सराव अशी अनेक कारणे होती. अमीरबाई यांनी मुख्यत्वे उल्हासपूर्ण गाणी गायली आहेत. लता बरोबर त्यांनी गायलेली गाणी (‘समाधी’) लोकप्रिय झाली होती. ‘गोरे गोरे ओ बांके छोरे, अभी मेरी गली न आया करो’ असे लताने गायले, मागे मागे अमीरबाई ‘गोरी गोरी ओ बांकी छोरी, चाहे रोज बुलाया करो’ असे गायले आहे. ह्या गाण्यामधील लताचा शीतमधुर आवाज कानाला सुखद वाटतो, तसाच अमीरबाई यांचा मादक आवाज अंगावर रोमांच आणतो. ‘शहनाई’ चित्रपटामध्ये असलेले ‘मारी कटारी मर जावा, के अखियाँ किसीसे मिलाना ना, खाके जहर मरजना के मनमे किसीको बुलाना ना’ हे गाणे तर अहंकारयुक्त विरहगीत. ‘धीरे धीरे आरे बादल’ गाण्याच्या पूर्वार्धात अरुणकुमार मुखर्जी खुल्या गळ्याने गायले, उत्तरार्धात, तार स्वरात अमीरबाई यांचा गळा ‘कौन गात है रुबाई रे?’ असे गातात. ‘फिर वो किसकी याद आईरे?’ किसने पहनादी मुझको प्रेमकी माला? किसने मेरी जिंन्दागिका रंग बदल डाला?’ असे हलकेपणाने विचारतात. ‘आम्रपाली’ च्या ‘उद् जा मोरे तारो कि दुनिया में में उड जाउ रे’ असे गाणे म्हणणारी गायिका पंख पसरून गगनात विहार करते आहे अशी अनुभूती देते. ‘इस दुनियाके पगदंडी पर. तुम्ही हो मेरे साथी'(‘आम्रपाली’), ‘पिया मेरे साथ रहेंगे आज कि रात’ ह्या सारखी मनाला संतोष देणारी गाणी त्यांनी गायली आहेत. खरोखरच अमीरबाई यांची गानप्रतिभा व्यक्त होते ती ह्या दर्दभऱ्या गाण्यामधून असे वाटते. ‘ये दुनिया भला बिगाड देगी क्या तेरा’?’ असे प्रश्न विचारताना ‘घर घर में दिवाली है मेरे घर में अंधेरा’ (किस्मत) गाणे हृदय पिळवटून टाकते. ‘हमे क्या पता था, दिल कि कली को मसल देंगे वो?’ हमे क्या पता था, राहत गम बदल देंगे वो’ असे सुरु होणारे गाणे, मनात उमटणाऱ्या वेदनाना वाट करून देते. ‘दुनिया ने हमे दो दिन रहने ना दिया मिलके’ (शिकारी), ‘आ चल ये जिंदगी’ (ऐलान), ‘आंसू थी मेरी जिंदगी’ (बिखरे मोती) ही त्यांची इतर मुख्य दर्दभरी गाणी.
विरह भावनेने युक्त दुःखप्रद गाणी एका वेगळ्याच प्रकारे त्यांनी एके ठिकाणी व्यक्त केले आहे. ‘मिलके बिछड गये अखियाँ, हाय राम’ (भ्रतुहारी) सारखे गाणे ह्याचे द्योतक आहे. ह्या मध्ये ‘रोते है नयना जिया तळमळ करे जावो कोई उनको लावो’ ह्या गाण्यातील आर्तता काळीज चिरून जाते. “हो जानेवाले बलाम्वा, लौटकर आ, लौटकर आ” (रतन) हे गाणे शामकुमार बरोबर गायलेले गाणे. खूप वेगात जाणारे गाणे, खूप लवकर संपते. ‘बसंत’ चित्रपटातील ‘हुवा क्या कुसूर, जो हमसे हुवे दूर’ हे गाणे सुद्धा विर्हाचेच गाणे. आर्ततापूर्ण भक्तीगीतांमुळे अमीरबाई यांना लोकप्रियता मिळाली. ‘किस्मत’ मधील ‘अब तेरे सिवा मेरा कौन कृष्ण कन्हय्या’ हे इतके प्रसिद्ध झाले होते की, मुंबईमधील लोकाल गाड्यांमधून हे गाणे भिकारी म्हणायचे. ‘सिंदूर’ मधील ‘तुमको कैसे मनवू ओ रोतेहुवे भगवान’, ‘ओ दुनिया बनानेवाले क्या यही है तेरी दुनिया’ ह्या सारखी गाणी सुद्धा असेच दैवाला सवाल करणाऱ्या रचना होत.
जुनी हिंदी चित्रपट गाणी ऐकणा-यांना अमीरबाई यांचे नाव परिचित आहे. पुणे, दिल्ली, अहमदाबाद येथे अमीरबाई यांचे फॅन क्लब असत. वहाब पिक्टुरेसच्या ‘शहनाझ’ (१९४२) चित्रपटासाठी स्वतः अमीरबाई यांनी संगीत दिले. नौशाद आणि अमीरबाई यांचे संबंध सौहार्दपूर्ण होते असे अमीरबाई याचे कुटुंबीय ताजुद्दीन यांनी सांगितले. अमीरबाई मराठी, मारवाडी, गुजराती चित्रपटामध्ये गायल्या. लता मंगेशकर ह्याच्या पार्श्वगायानाक्षेत्रातील प्रवेशानंतर अमीरबाई यांचे युग संपले.
अमिरबाई यांचे व्यक्तिमत्त्व
अमीरबाई यांच्या जीवनाबद्दल अधिक माहिती मिळत नाही. त्यांचे जन्मसाल १९०८ आहे असे समजले जाते. त्या मुंबईमध्ये माहीम येथे राहत होत्या. अमीरबाईंकडे येणारे त्यांचे भाचे ताजुद्दीन यांच्या आठवणीनुसार, अमीरबाई जीवन सुकर व्हावे यासाठी कायम प्रयत्नशील राहायच्या. अमीरबाई यांनी विजापूर १९४५ मध्ये एक चित्रपटगृह बांधले. त्या काळी त्याला पंच्याहत्तर हजार खर्च झाला. पन्नास वर्षापासून असलेले अमीर चित्रपटगृह आता सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. अमीरबाई यांचे दुसरे भाचे शौकत यांनी त्यांच्या आत्याने गायलेली गाणी जपून ठेवली आहेत.
अमीरबाई स्वतःच्या प्रिय असलेल्या छोट्याशा काळ्या मोटारीमधून मुंबईहून बिजापुरला जायच्या असे सांगितले जाते. जर त्या रेल्वेने आल्या तर सगळ्या गावातले लोक त्यांना भेटायला येत. बिजापूर स्टेशनवरून मोठ्या घोडागाडीमधून त्या घरी जात असत. इतर टांगेवाल्यांची निराशा टाळण्यासाठी त्या त्यांनाही भाडे द्यायच्या आणि सारे टांगेवाले त्यांच्या घोडागाडीच्या मागे त्यांच्या घरी येत असत.
शोकपूर्ण गाणी गाणाऱ्या अमीरबाई यांचे वैयक्तिक जीवन सुद्धा त्या गाण्यांना साजेसे होते. त्यांनी १९४० च्या दशकात खलनायक म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिमालयवाला यांच्याबरोबर संसार केला. गर्भश्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या हिमालयवाला याचे अमीरबाईंवर प्रेम जडले. अमीरबाई यांचे हिमालयवालासोबतचे वैवाहिक संंध सुखकारक न्हवते. त्यांनी घटस्फोटानंतर गुजराती पत्रकार आणि संकलक असलेल्या बद्री कान्चावाला यांच्या बरोबर संसार थाटला.
जातीभेदापलिकडली कलाकार
संगीत रंगभूमीची दुनिया संकुचितपणाविरुद्ध आहे. कलेची शक्तीच अशी आहे की, ती संप्रदाय ओलांडून जाते. त्यातही इस्लाम धर्मामध्ये संगीतावर बंदी असूनही संगीत आणि रंगभूमी क्षेत्रामध्ये अपार संख्येने कष्ट करून साधना करतायेत. कन्नड रंगभूमीचा मोठा नट पीर मोहम्मद, अप्पालाल नदाफ यांसारखे लोक अमीरबाईचे समकालीन होत. अप्पालाल नदाफ हे तर अमीरबाईचे अतिशय जवळचे. ‘किस्मत’ चित्रपटातील ‘अब तेरे सिवा’ गाण्याच्या चालीवर ते कृष्ण-पारिजात कार्यक्रमात ते गात असत.
गायक महम्मद रफी यांचे निधन झाल्यावर, शम्मी कपूर यांना कोणीतरी सांगितले की, ‘कपूर साहेब, तुम्हारी आवाज चाली गयी!’ रफी यांच्या आवाजावर गाणे अभिनीत करणारे शम्मी कपूर अतिशय शोकाकुल झाले. हेच चित्रपटश्रुतीचे अद्भूत तत्व आहे. कोणाचेतरी साहित्य, कोणाचेतरी संगीत संयोजन, अजून कोणीतरी गाणे गाणारे, त्यावर कोणीतरी ओठांची हालचाल करून अभिनय करणारे अभिनेते दुसरेच. कवी-संगीतकार-गायक-अभिनेता या सर्वांना एकत्र आणणारे चित्रपटासारखे माध्यम. ते चित्रपट पाहणारे सुद्धा समस्त जातीधर्माचे.
संगीत आणि रंगभूमी ही क्षेत्रे सुद्धा, चित्रपटासारखी जातीभेदापलिकडील आहे. भीमसेन जोशी यांचे गुरु सवाई गंधर्व यांचे गुरु उस्ताद अब्दुल करीम खान मिरजकर हे होते. सुरेश माने/हिराबाई बडोदेकर, शांता हुबळीकर यांचा गुरु करीमखान यांचे पुत्र सुरेश माने होते. ही गोष्ट शांता हुबळीकर त्यांच्या आत्मचरित्रात आदराने नमूद करतात. कट्टर ब्राम्हण असलेले शिष्य मुस्लीम असलेल्या गुरुंची सेवा करत. अल्लारखॉं, मजरूह सुलतानपुरी, गुलजार, अब्बास, नौशाद, महबूब रहमान ह्यांना विसरून चित्रपट जग कल्पिता येत नाही. मुंबईच्या या बहु-भाषिक/बहु-सांस्कृतिक जगात बिळगी भगिनींची कर्मभूमी झाली ह्यात आश्चर्य काहिच नाही.
कर्नाटक संबंध
उत्तर कर्नाटकाने हिंदी चित्रपट, हिंदुस्तानी संगीत, आणि मराठी रंगभूमीला अनेक कलाकार दिले आहेत. त्यात मुख्यत्वे ओनाकुदारीचे व्ही. शांताराम, शांता हुबळीकर, अमीरबाई आणि गोहाराबाई. ‘माणूस’ चित्रपटामुळे व्ही. शांताराम आणि शांता हुबळीकर प्रसिद्ध झाले. हा चित्रपट त्या वेळचा अत्यंत यशस्वी चित्रपट होता. शांता हुबाळीकारांच्या समकालीन असलेल्या अमीरबाई यांचे रंगभूमीवरील पदार्पण गदग येथे झाले. शांता हुबळीकर या गुब्बी कंपनीमध्ये होत्या. अमीरबाई कोठल्या कंपनीत होत्या ते मात्र अजून कळत नाही. पुणे-मुंबई मध्ये राहून सुद्धा शांता हुबळीकर आणि अमीरबाई कन्नड भाषेला विसरल्या नाहीत. त्यांनी कर्नाटकाबरोबरचे संबंध कायम ठेवले. अमीरबाई बिजापूर आणि बेळागीला येत जात असत. प्रत्येक वर्षी मोहरम साजरा करण्याकरता बेळागीला जात असत. त्या बेळागीच्या मध्वराम उमरजी नावाच्या अभिनेत्याबरोबर तेथील लक्ष्मी मंदिरात गात असत, असे स्थानिक लोक सांगतात. (नाटकामध्ये काम केलेल्या उमरजी यांनी नंतर विषप्राशन करून आत्महत्या केली). अमीरबाई यांनी मुंबईमध्ये राहून सुद्धा स्वतःच्या आहार-विहार आणि संस्कृतीमध्ये बदल केला नाही. ताजुद्दीन यांच्यानुसार, त्या ज्वारीची भाकरी प्रेमाने खात असत. अमीरबाई यांनी साकारलेले भिकारणीचे पात्र आणि त्यांनी गायलेले गाणे असलेला ‘चिरंजीवी मार्कंडेय’ (धारवाडच्या कर्नाटक टाकीजची निर्मिती) हा चित्रपट पाहायला मिळत नाही. सुरेश कुलकर्णी सांगतात की, त्या चित्रपटाची रिळे आकस्मिकरीत्या जळाली. अमीरबाई यांचा अभिनय असलेल्या बसवण्णा यांचा चित्रपट अर्ध्यावरच थांबला. आता तीची रिळे नष्ट झाली आहेत. अमीरबाईंनी कन्नडमध्ये गायलेले अनेक गाणी आहेत. अमीरबाई यांना ‘कर्नाटक कोकीळ’ असे म्हटले जायचे. अतिशय महत्वाची बाब अशी की, कर्नाटकाचे एकीकरण होण्याच्या आधीच त्यांनी कर्नाटकी असे नाव बदलून घेतले. गंगुबाई हनगल यांचे उदाहरण येथे नमूद करायला हवे. मुंबईला येणारे लोक स्वतःच्या नावापुढे स्वतःच्या गावाचे/प्रदेशाचे नाव लावत.
अखेरचे दिवस
अमीरबाई यांच्या समाधी जवळच आदिलशाही बादशाह इब्राहिमची ‘इब्राहीम रोजा’ ही समाधी आहे. ‘जगद्गुरू’ असे बिरूद मिरवणाऱ्या इब्राहीमला संगीताचे वेड होते. त्याने सरस्वती आणि गणेश प्रार्थनेपासून सुरु झालेले संगीत-ग्रंथ ‘किताब-ई-नवरस’ लिहिले. अनेक संगीतकारांना बोलावून संगीतावर प्रयोग करण्यारे नवरसपूर हे गावच त्याने निर्माण केले; कलेसाठी जगलेल्या आणि प्रवाहाविरुद्ध गेलेल्या बिजापूरच्या सीमेवर हे दोन जीव चिरनिद्रा घेत आहेत हे अपूर्वच आहे.
(ह्या लेखनासाठी अमीरबाई यांचे भाचे ताजुद्दीन आणि शौकत, धारवाड चे सुरेश कुलकर्णी, आणि राजशेखर जंगमशेट्टी यांच्याकडील मोलाची महिती मिळाली. मुंबईचे प्रकाश सी. बुरडे, गदगचे रविंद्रनाथ दोड्डमत्ती, घोळसंगीचे का. हुं. बिजापूर, होन्नावरचे बसवराजस्वामी मेलउप्पारगीमठ, चित्रपट दिग्दर्शक श्री. टी. एस. कणवी, बिजापुरचे संगीत शिक्षक थोरात मास्तर, रंजन गर्ग आणि पत्रकार ड. रा. पुरोहित यांच्या बरोबरच्या चर्चा उपयोगी पडल्या. त्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.)
मूळ लेखक – रहिमत तरीकेरी
अनुवाद – प्रशांत कुलकर्णी
या संपूर्ण लेखनासाठी प्रशान्त
या संपूर्ण लेखनासाठी प्रशान्त कुळकर्णी यांचे करावे तेवढे कौतुक अपुरे आहे. मनापासून आभार. भक्तीचा मळा या चित्रपटात अमीबाईनी गाणे गायिले आहे हे समजल्यावर शोध घेत असताना येथे पोहोचलो … आणि सार्थक झाले. हे किंवा अशा प्रकारचे लेखन करताना अनेक संदर्भ,, गोळा करावे लागतात.. ते कष्ट प्रशान्तजीनी घेतले. त सेच अमीरबाईंच्या जीवनाचा अाढावा घेणारी चित्रफितही उत्तम. सर्वाप्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आभार मानण्यासाठी पुरेसे शब्द नाहीत… तरीही आभार…
Comments are closed.