क्रिकेट, बॅटमिंटन, टेनिस, स्केटिंग अशा खेळांसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील विविध क्लब आपल्याला माहिती आहेत. पण आपल्या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देणारे क्लब विरळच! असाच एक वेगळ्या वाटेवरुन यशोदायी प्रवास करणारा महाराष्ट्रातील एक क्लब म्हणजे ‘शेवगाव स्पोर्ट्स क्लब’. या क्लबने शालेय पातळीवर असणारा खो-खो हा खेळ राष्ट्रीय पातळीवर पोहचवला…
शेवगावला खो-खो खेळाची परंपरा आहे. तेथे खो-खो हा खेळ शालेय शिक्षकांच्या प्रोत्साहनाने 1990 पर्यंत खेळला जात होता. त्या शिक्षकांची नावे किती सांगावी? शेवगाव इंग्लिश स्कूलचे (भारदे विद्यालय) शिक्षक एकनाथ शिरसाठ, रेसिडेन्शियल विद्यालयाचे साठे, बबन धावणे; काकडे विद्यालयाचे शेटे, शित्रे हे शिक्षक त्यांच्या त्यांच्या विद्यालयांचे संघ घडवत होते. परंतु खो-खो चा खेळ शेवगावमध्ये शालेय क्रीडा स्पर्धेपुरता मर्यादित होता. त्यांच्यापैकी ठरावीक खेळाडू हे राज्य स्पर्धेत सहभाग घेण्यापर्यंत मजल मारू शकले होते.
अरुण वावरे यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांचा खेळ सुधारावा, त्यांना खेळ व खेळाच्या नियमांची माहिती व्हावी या उद्देशाने ‘शेवगाव स्पोर्ट्स क्लब’ची स्थापना 1991 साली करण्यात आली. त्यानंतर शालेय संघासह खो-खो संघटनेचाही सहभाग विविध स्पर्धांमध्ये वाढू लागला. खेळाडूंना नवीन संधी उपलब्ध झाल्या आणि निलेश झिरपे याच्या रूपाने शेवगावला खो-खो चा पहिला राष्ट्रीय खेळाडू 1993 मध्ये लाभला. पाठोपाठ, माझीही वर्णी महाराष्ट्र खो-खो संघात 1994 मध्ये लागली. त्यानंतर विनोद लवांडे, नंदेश तोटे यांना महाराष्ट्र संघात खेळण्याची संधी मिळाली. त्या सर्व खेळाडूंचा संघ राज्य स्पर्धेमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा संघ ठरला. त्यानंतर क्लबचे खेळाडू ‘चौदा वर्षांखालील’, ‘अठरा वर्षांखालील’ आणि ‘महिला व पुरुष’ गटात खो-खो स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यातूनच विशाल गर्जे महाराष्ट्र संघात खेळला. त्याचा संघ सहकारी सचिन सातपुते ‘एकलव्य’ पुरस्काराचा मानकरी ठरला. त्या सर्वांकडून प्रेरणा घेऊन चार-पाच वर्षांनंतर मुलांच्या संघातून विकास गवळी, अमजद पठाण, नरेंद्र बैरागी, सुरेंद्र बैरागी, गणेश सोनटक्के, रामकृष्ण सागडे, गणेश ढोले, सचिन सोनवणे; तर मुलींच्या संघातून विद्या झिरपे, मोनिका पायघन, शीतल खोले, सारिका खोले, आरती देशमाने, आरती दहिफळे, सारिका मुरदारे यांसारख्या अनेक खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. तो क्लबचा सुवर्णकाळ होता!
त्यानंतर पाच-सहा वर्षांत बरेच वरिष्ठ खेळाडू नोकरी-व्यवसायासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रुजू झाले. त्यावेळी खेळ थोडा कमी झाल्यासारखा वाटला. त्या दरम्यानच्या काळात किरण डोईफोडे व तेजस मगर हे दोघे महाराष्ट्रात स्पर्धा गाजवत होते. तेजसने ‘वीर अभिमन्यू’ पुरस्कार 2016 साली पटकावला. पण एकूण संघ कमी पडत होता. खेळाडूंची साथ हरपल्यागत झाली होती. वेदांत शेंडगे, ओंकार वावरे, अझर पठाण यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. त्या सर्वांचा खेळ पाहत पाहत लहान खेळाडू अरुंधती वांडेकर, सायली ढोले, प्रतीक हरदास, आशय ढोले, कुणाल, संचित गरड यांनी त्यांच्या संघाला राज्य स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवून देऊन महाराष्ट्र संघातून खेळण्याचा मान पटकावला. आकाश ढोले याने अठरा वर्षांखालील गटात सुवर्णपदकाची कमाई मणिपूर येथे 2017 साली केली. कुणाल होडसील याला सतरा वर्षांखालील गटात ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सुवर्णपदक 2019 साली प्राप्त झाले. आकाश ढोले, कार्तिक मोरे, सारंग लबडे यांनी त्यांच्या कामगिरीने क्लबची मान उंचावली आहे. ते मैदानावर नियमित सराव करत असतात. त्यांच्या संघातून खेळणारा नरेंद्र कातकडे हा आक्रमक खेळाडू सर्वोत्कृष्ट ठरला आहे. त्याने सहा राष्ट्रीय सुवर्णपदके मिळवून, त्याच्या गटासाठी भारतीय संघाचे दार ठोठावले आहे. त्याने ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतही सुवर्णपदकाची कमाई केली आहे. चौदा वर्षांखालील राष्ट्रीय खो-खो स्पर्धेमध्ये ईशांत वाघ याला हिमाचल प्रदेशमध्ये सुवर्णपदक 2021 साली मिळाले. सारंग लब्दे याला अठरा वर्षांखालील ओडिशातील भुवनेश्वर येथे आयोजित स्पर्धेत सुवर्णपदक 2021 ला मिळाले, तर वेदांत शेंडगे याला सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक राष्ट्रीय पातळीवरील खेळात मिळाले. शेवगाव स्पोर्ट्स क्लबकडून कडक शिस्तीत खेळाडूंकडून नियमित सराव करून घेतला जातो. क्लबने खो-खो हा सांघिक खेळ असल्यामुळे खेळाडूंमधील समन्वय, खेळातील नियमांची माहिती करून देणे व खिलाडू वृत्ती जोपासण्यावर भर दिला आहे.
क्लबच्या माध्यमातून साधारणत: शंभर राष्ट्रीय स्तरावर, तर हजारपर्यंत राज्य स्तरावरील खेळाडू खेळले आहेत आणि खेळतही आहेत. क्लबतर्फे सुरुवातीला छोट्या ‘जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा’ घेण्यात आल्या आणि त्या यशस्वीही केल्या. बावीस लाख रुपयांची राज्य अजिंक्यपद स्पर्धा 2016 साली घेण्यात आली. त्यासाठी राजेंद्र विखे पाटील आणि युवराज पाटील नरवडे यांचे सहकार्य लाभले होते. त्या स्पर्धेची उत्कृष्ट स्पर्धा म्हणून नोंद क्लबच्या वार्षिक अहवालात करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे खेळ कोरोना महामारीत बंद असताना, क्लबने सर्व नियम पाळून प्रेक्षकांविना राज्य स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. क्लबचा आर्थिक भार आजी-माजी खेळाडू मिळून उचलतात.
क्लबने घडवलेले काही खेळाडू शासकीय पदांवर, काही यशस्वी उद्योजक, काही वैद्यकीय व्यवसायात, तर काही समाजसेवक म्हणून कार्यरत आहेत. क्लबच्या स्थापनेपासून अरुण वावरे अध्यक्ष आहेत. निलेश झिरपे हे सचिव म्हणून काम पाहतात, तर किरण वाघ कार्याध्यक्ष आहेत. अरुण वावरे हे खो-खो चे राज्य पंच असून त्यांचे खेळाडूंना मार्गदर्शन 1992 ते 2005 या काळात लाभले होते. माजी खेळाडूंमधून रमेश लव्हाट, सचिन तळकीब, सचिन सोनवणे व किरण वाघ हे राष्ट्रीय पंच, तर सचिन वाल्हेकर, सचिन सातपुते, मंगेश खामकर, गणेश ढोले, विकास गवळी, निलेश झिरपे, अनिल वावरे, सोपान आघाट हे राज्य पंच म्हणून खो-खो स्पर्धांत काम पाहतात. शेवगाव स्पोर्ट्स क्लबचा खेळ ‘न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, शेवगाव’पासून सुरू झाला; तो आता ‘आबासाहेब काकडे विद्यालय’, ‘पीएमटीएस’, ‘रेसिडेन्शिअल हायस्कूल’, ‘बाळासाहेब विखे पाटील सीबीएसई स्कूल’ अशा शेवगाव तालुक्याच्या वेगवेगळ्या शाळांतील मैदानांवर पोचला आहे. त्याला सरकारी अधिकारी अनिल चोरमले व भारतीय खो-खो महासंघाचे चंद्रजीत जाधव यांचे सहकार्य लाभते. क्लबतर्फे दरवर्षी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात येतो. तसेच, ‘राजीव गांधी सद्भावना दौड’चे (22 मे) व क्रीडा दिनानिमित्त (29 ऑगस्ट) विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. शेवगाव स्पोर्ट्स क्लबचे सदस्य शेवगावमधील संघटना व सामाजिक संस्थांच्या उपक्रमांत सहभागी असतात.
– किरण वाघ 9822875678 dr.kwagh@gmail.com
————————————————————————————————————————————–