Home लक्षणीय किशोर शितोळे – शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करणारा उद्योजक

किशोर शितोळे – शेतकऱ्यांमध्ये एकजूट निर्माण करणारा उद्योजक

नदीपात्रात पाणी साठवून पाण्याचा प्रश्न कसा सोडवता येऊ शकतो हा विश्वास किशोर शितोळे यांनी शेतकऱ्यांमध्ये निर्माण केला, शेतकऱ्यांची एकजूट केली. ही कहाणी आहे औरंगाबाद व पैठण तालुक्यातील. मराठवाडयाने दुष्काळाच्या प्रखर झळा २०१२ साली सोसल्या. त्या दुष्काळामुळे औरंगाबाद व पैठण तालुक्यांच्या ग्रामीण भागातील नद्या-विहिरीही कोरड्या पडल्या होत्या. अशा प्रतिकूल वेळी किशोर शितोळे यांनी पैठण तालुक्यातील कौडगाव, ताहेरपूर, नांदलगाव आणि धुपखेडा या गावांतून येळगंगा नदी जाते. तेथे नदीचे पात्र आहे ते अवघे तीस फूट. तेसुद्धा झाडाझुडपांनी दिसेनासे झालेले. म्हणायला नदी, पण ती वेड्या बाभळी व गाळ यांनी भरली गेल्यामुळे नदीचा नाला झाला होता. पाऊस झाल्यास पावसामुळे आलेले पाणी तेथे न जिरता वाहून जात होते. गावकऱ्यांना नदीचा उपयोग काही होत नव्हता. तरुण इंजिनीयर किशोर शितोळे त्यांच्या मदतीला धावून आले. ते व्यवसायानिमित्त औरंगाबादेत असत. ते तेथील एका पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामावर स्थापत्य अभियंते म्हणून होते. ग्रामीण भागातील लोक बांधकामाच्या ठिकाणी कामासाठी येत. शितोळे यांचे त्या शेतकरी लोकांशी स्नेहाचे संबंध जुळले. त्यांना त्यांच्यासाठी काही तरी करावे असे वाटले. त्यांनी कमी खर्चात नवीन बंधारे बांधणे, बंधारेदुरुस्ती अशा प्रकारची रचना शेतकऱ्यांसमोर मांडली. शितोळे यांनी जलसंवर्धनाविषयीचा आराखडा तयार केला, त्यानुसार ग्रामस्थांसोबत चर्चा केली – गावकर्‍यांना त्या विषयाचे महत्त्व आणि त्यातून होणारा फायदा सांगितला. त्यांनी सरकारी अनुदानाची वाट पाहण्यापेक्षा स्वत:च स्वावलंबी होऊयात असा निर्धार सुचवला. गावकर्‍यांना त्यांच्या कल्पना पटल्या. गावकरी श्रमदानासाठी तयार झाले आणि लोकवर्गणीतून जेवढी रक्कम जमेल ती रक्कम या कामासाठी द्यायची असे ठरले.

शितोळे उद्योजक असल्यामुळे त्यांचा संपर्क दांडगा आहे. त्यांनी शहरातील मोठमोठे व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, वकील अशा मंडळींना भेटून त्यांच्यासमोर जलसंवर्धनाचा विषय मांडला; त्या सर्वांना पैठण तालुक्यातील धुपखेडा, कौडगाव, नांदलगाव या गावांतील पाण्याची परिस्थिती दाखवली. शितोळे यांच्या शेषराव ढोपे, लक्ष्मण ढोपे, फय्याजभाई, दत्ता फटांगडे, किरण गाढे या मित्रांनी देणगी स्वरूपात मदत केली. बंधाऱ्याच्या कामासाठी लागणारा पैसा हळुहळू जमत गेला. कामाच्या पहिल्या योजनेचे नियोजन ठरले. नांदलगाव ते धुपखेडा हे सहा किलोमीटर लांबीचे नदीपात्र मृतावस्थेत पडलेले होते. त्या पात्रात आठ बंधारे करण्याची योजना ठरली. आठ बंधाऱ्यांत मिळून बत्तीस कोटी लिटर पाणी अडणार होते. शितोळे यांनी नदीचा सर्व्हे केला. नदीत तीन जुने कोल्हापुरी बंधारे जीर्णावस्थेत आढळले. शितोळे यांनी त्यांचा स्थापत्याचा अभ्यास असल्यामुळे त्या बंधाऱ्यांबाबत तांत्रिक स्थिती जाणून घेतली.

पावसाळा सुरू झाल्यानंतर मृतावस्थेत असलेल्या येळगंगा नदीला पुनरुज्जीवित करण्याचे काम घडून आले. शितोळे पहिल्या बंधाऱ्याच्या कामाविषयी सांगतात, ‘औरंगाबाद-पैठण मुख्य रस्त्यावर पूल बांधताना तात्पुरता पर्यायी रस्ता म्हणून त्या नदीपात्रात कच्चा पूल बांधलेला होता. तो वापरात नव्हता. योजनेप्रमाणे तो क्रमांक तीनचा बंधारा होता. परंतु सुरुवात तेथून करण्याचे ठरवले कारण हायवेवरून जाणाऱ्या प्रत्येकाला ते काम दिसू शकले होते. गावकरी एकत्र काम करताना दिसले. गावकर्‍यांच्या एकीचा संदेश सर्व गावांमध्ये पोचला. त्यांनाही तशा कामाची उर्मी निर्माण होऊ शकते हे शितोळे यांनी ध्यानी घेतले ओळखले आणि तसेच झाले. गावकरी एकत्र श्रमदान करताना पाहून रस्त्यावरील मंडळी आवर्जून थांबू लागली चौकशी करू लागली अन् कौतुकाची थाप देऊन तो मंत्र त्यांच्या त्यांच्या गावांसाठी घेऊन जाऊ लागली. कार्यकर्त्यांचा उत्साह त्या कौतुकामुळे दुणावला. पहिल्या तिन्ही बंधाऱ्यांचे दोनशे फूट रुंदीकरण चारशे मीटर लांबी आणि अठरा-वीस फूट खोलीकरण केले गेले. येळगंगा नदीचे पात्र तीस फुटांवरून दोनशे फूट झाले. चार गावांमध्ये आठपैकी तीन बंधाऱ्यांच्या कामामुळेच आठ कोटी लिटर पाणी साठत आहे. पाण्याच्या साठ्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा झाला.

_Kishore_Shitole_2.jpgशितोळे यांनी स्वतःचा व्यवसाय १९९५ साली सुरू केला. त्यांनी ‘रेनबो इंडस्ट्री’ नावाची कंपनी औरंगाबादच्या एमआयडीसी विभागात सुरू केली. शितोळे यांनी पाण्याचे नियोजन करणे, वृक्षारोप करणे, शेतकऱ्यांना तांत्रिक सल्लागारांचे मार्गदर्शन मिळवून देणे, ग्रामस्वच्छता-आरोग्य शिक्षण या विषयांवर काम करणे असा वसा घेतला आहे. ते शहरी भागात इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंगची कामे करतात. त्यांनी एमआयडीसी विभागात शोष खड्ड्यांचे मोठे काम उद्योजकांना सोबत घेऊन केले आहे.

शितोळे यांच्या कामाला महत्त्वपूर्ण साथ मिळाली त्यांच्या पत्नी ज्योती शितोळे यांच्याकडून. त्यांनी ‘आरोग्याच्या गप्पागोष्टी’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्या उपक्रमात शहरातील महिला डॉक्टरांना खेड्यात आणून ग्रामीण महिलांच्या समस्या सांगितल्या जातात. गावातील महिलांची तपासणी, महिलांना मार्गदर्शन अशा गोष्टीही साधल्या जातात. किशोर शितोळे यांनी त्यासाठी ‘जलदूत’ संस्थेची स्थापना २०१४ साली केली आहे. संस्थेत सध्या एकशेपंधरा सदस्य आहेत, संस्थेचे अकरा विश्वस्त आहेत.

किशोर शितोळे यांना जलसंवर्धनाच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाचा ‘जलदूत’, आर्य समाजाकडून ‘युगंधर २०१३’ असे पुरस्कार मिळाले आहेत.

किशोर शितोळे यांच्या ‘जलदूत’ने पैठण तालुक्यातील गिधाडा, बिडकीन या गावांत जलसंवर्धनाचे काम हाती घेतले आहे. किशोर शितोळे ‘देवगिरी नागरी सहकारी बँके’च्या उपाध्यक्षपदी आहेत. त्यांनी देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या बिडकीन शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकऱ्यांसाठी माती आणि पाणी निरीक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी बँकेच्या वतीने असे उपक्रम राबवले जातात. शितोळे ‘ही बँक शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी आहे’ असे सांगतात. काहीही करून आपला शेतकरीदादा सक्षम झाला पाहिजे, अनुदान आणि कर्जमाफी अशा उपायांनी त्याला अपंग न करता स्वाभिमानाने जगण्यासाठी सक्षम बनवण्यास हवे असे मत तळमळीने मांडतात. ग्रामीण भागात शेतकर्‍यांमध्ये आपुलकीने त्यांना ‘किशोरदादा’ म्हणतात.

किशोर शितोळे – ९८२२०९९८८१, shitolekishore@gmail.com

– शैलेश दिनकर पाटील

About Post Author

3 COMMENTS

  1. खुप छान उपक्रम आहे किशोरदादा…
    खुप छान उपक्रम आहे किशोरदादा यांचा

  2. kishoredada,…
    kishoredada,
    nice socialwork,if I COME ALONGWITH MY FARMER FRIEND WILL YOU ENTERTAIN US MIN. 3/4 HOURS PRIOR TO YOUR ADVANCE PERMISSION.
    KIND REGARDS,
    G.m.DAMLE

Comments are closed.

Exit mobile version