शासकिय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शंकर विटणकरांनी आपल्या बालकवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा ध्यास घेतला. मात्र कुणाचीच अपेक्षीत मदत न मिळाल्याने त्यांनी हे पुस्तक स्वतःच प्रकाशित करण्याचा चंग बांधला. तीन वर्षांच्या प्रयत्नांतून त्यांनी आपली चार पुस्तके प्रकाशित केली. सोबत कवितांची भित्तीचित्रे तयार करून वेगवेगळ्या संमेलनांमध्ये त्यांचे प्रदर्शन केले. कवितांचा ध्यास घेतलेल्या विटणकरांच्या या छंदाची कहाणी त्यांच्याच शब्दांत…
– शंकर विटणकर
मी शासकीय सेवेतून ऑगस्ट १९९९मध्ये निवृत्त झालो. त्यावेळी मनात पहिली उत्सुकता होती ती आपल्या बालकवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याची! त्यामागील पंधरा-वीस वर्षांतील माझ्या दोनेकशे बालकविता वहीत संग्रहित झाल्या होत्या व पुस्तकरूपाने प्रकाशित होण्याकरता मला खुणावू लागल्या होत्या. खरे तर, त्यांचे पुस्तक आधीच प्रकाशित व्हायला हवे होते, कारण त्यांपैकी सत्तर-ऐंशी टक्के कविता विदर्भातील निरनिराळ्या नियतकालिकांमधून वेळोवेळी प्रकाशित होऊन, वाचक-बालवाचक व रसिकांकडून त्यांचे बर्यापैकी स्वागतही झाले होते.
मी सेवानिवृत्तीनंतरच्या नव्या आयुष्यात वर्षभरात स्थिरस्थावर झालो आणि लगेच पुस्तक प्रकाशनाकरता प्रकाशक शोधण्याच्या कामाला लागलो. परंतु लवकरच, ही शोधयात्रा म्हणजे परीकथेतील काळ्या गुलाबाच्या शोधाप्रमाणे रहस्यपूर्ण व बिकट असल्याचे माझ्या अनुभवास येऊ लागले.
मी निरनिराळ्या प्रकाशकांना पुस्तकाचे हस्तलिखित दाखवत भेटण्याचा सपाटा सुरू केला. मी नागपुरातील बहुतेक प्रकाशकांना भेटलो. सर्व प्रकाशकांनी कमीअधिक सारखाच सूर आळवला तो विक्री किंवा वितरणाची कोणतीही जबाबदारी न स्वीकारणे! या अटी अर्थातच मला मान्य होणार्या नव्हत्या. त्यामुळे मी पुस्तक प्रकाशनाचे काम स्वत:ला करता येईल का? असा विचार करू लागलो. माझी शासकीय नोकरी तांत्रिक विभागात झाली असल्यामुळे एखाद्या कामाचा खर्च व बाजारभाव मिळवण्याची कला मला अवगत होती. त्या अनुभवाचा उपयोग करून पुस्तकाकरता लागणार्या कागदाची किंमत, मुद्रणाचा खर्च, संगणकीय डिझाइनच्या कामाचा खर्च इत्यादी माहिती मिळवून मी पुस्तक प्रकाशनाचा एकूण खर्च काढला. तो प्रकाशकांनी सांगितलेल्या खर्चापेक्षा बराच कमी असल्याचे दिसून आले. शिवाय प्रकाशकाने निर्माण केलेल्या पुस्तकाचा दर्जा आपल्या मनाप्रमाणे असेल किंवा नाही याबद्दल मन साशंक होतेच. शेवट, एकदाचा पुस्तक स्वत: प्रकाशित करण्याचा निर्णय पक्का झाला!
बालकविता सचित्र असणे आवश्यक असते. रात्रीच्या आकाशाला जशी चंद्राशिवाय तशी बालकवितेला चित्रांशिवाय शोभा नसते. परंतु तिचे चित्र निव्वळ शोभेकरता नसून ते कवितेचा अर्थसुद्धा सांगणारे असणे आवश्यक असते. तसे झाल्यास वाचक आपोआप कविता वाचण्यास प्रेरित होऊ शकतो. मी माझ्या कवितांना अर्थवाही चित्रे काढू शकणार्या चित्रकाराचा शोध घेणे सुरू केले. परंतु हा शोधसुद्धा ‘अरेबियन नाईट्स’च्या कथांमधील सत्याच्या शोधात निघालेल्या हातिमताईच्या शोधयात्रेप्रमाणे अतर्क्य व जादुई होता. जादुई व अतर्क्य अशासाठी की अशा तर्हेचा चित्रकार माझ्यासारख्या, या क्षेत्रातील नवशिक्याला मिळणे म्हणजे करिष्माच होता! दुसर्या शब्दांत सांगायचे तर ती नशिबाची गोष्ट, पूर्वपुण्याई किंवा परमेश्वरी कृपेचाच भाग होता. शेवटी ‘इच्छा तेथे मार्ग’ या नियमाने माझ्या प्रयत्नांना यश आले आणि संजय मोरे नावाचा मला हवा तसा तरुण चित्रकार मिळाला. त्यामुळे पुस्तक प्रकाशनाच्या आपल्या कामाला परमेश्वराचा आशीर्वाद असून, आपले काम यशस्वी होईल असा विश्वास मनात दुणावू लागला. संजय मोरेने स्वत:ची कामे सांभाळून वर्षभरात हळुहळू पुस्तकातील सर्व कवितांना उत्कृष्ट चित्रे काढून दिली. त्याने चित्रांचा दरसुद्धा वाजवी व माफक असाच घेऊन मला आपल्या ऋणात ठेवले. आता माझ्या बालकवितांचे आभाळ चित्रांच्या चंद्रतार्यांनी सुशोभित व दीप्तिमान झाले होते. तसेच माझे मनही त्या प्रकाशात उजळून निघाले होते!
माझ्या बालकविता प्रकाशनापूर्वीचा पंधरा-वीस वर्षांचा प्रदीर्घ कालावधी घेऊन लिहिण्यात आल्या होत्या. त्यांपैकी काही तर तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्यादेखील होत्या. कविता लिहीत असतानाच मी मराठीचे थोर कवी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, कुसुमाग्रज, इंदिरा संत इत्यादींच्या बालकवितांचे सातत्याने अभ्यासपूर्ण पारायण करत असे. तसेच हिंदी व इंग्रजीमधील बालकवितांची पुस्तके आणून त्यांचाही अभ्यास करत असे. कोणताही कवी-कलांवत आपल्या कवितेची व्याप्ती वाढवण्याकरता इतर कवींच्या कवितांचा अभ्यास करतच असतो. तसेच, तो आवडीच्या कवीचा आपल्या लेखनावरील प्रभाव असल्यास अभिमानाने मान्य करत असतो. मीदेखील मोठमोठ्या कवींच्या बालकविता वाचून आपल्या बालकवितेची व्याप्ती व दिशा ठरवली, परंतु त्यावर इतरांचा प्रभाव किंवा अनुकरण यांचा परिणाम होणार नाही असा प्रयत्न केला. तथापि तशा प्रभावाचा किंवा अनुकरणाचा संदुर्भाव इतका सूक्ष्म असतो की तो आपल्या अंतर्मनावर केव्हा व कसा उमटून गेला हे आपले आपल्यालाच कळत नाही.
मी आपल्या बालकवितेची रचना करत असताना काही विचार व गोष्टी माझ्या मनात नेहमीच घर करुन राहत. त्यांपैकी पहिली गोष्ट म्हणजे बालकांचे मनोविश्व कोवळे व वेगळे असते. लहानपणी त्यांच्या मनावर ज्या गोष्टी बिंबतात त्या पुढे चालून दीर्घ काळ त्यांचे विचार व व्यक्तिमत्त्व व्यापून टाकतात व त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व घडत जाते. त्या दृष्टीने सुसंस्कार व सद्विचार या गोष्टी सर्वांत महत्त्वाच्या ठरतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्ञान. ज्ञान त्यांना आई, वडील, शिक्षक व सोबतचे मित्र; तसेच दररोजच्या पाहण्यातील वस्तू व झाड, पशुपक्षी. चंद्र-सूर्य, तारे, वारे इत्यादी निसर्गघटकांतून घडत असते. निसर्गाचे हे घटक असे आहेत, की ते आपल्यासमोर उभे राहूनच आम्हाला चांगल्या गोष्टींचे संदेश व ज्ञान प्रत्यक्ष देत असतात. परंतु आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. आम्ही मुलांना बालकवितेतून हे संदेश व ज्ञान चांगल्या तर्हेने शिकवू शकतो. तसेच, ज्यांचे जीवन-चरित्र देशाला व सर्व जगाला प्रेरणादायी ठरले आहे, अशांवर बेतलेल्या बालकविता लहान मुलांत दडलेला उद्याचा सुजाण नागरिक घडवत असतात. बर्याचदा त्यातूनच उद्याचा शिवाजीदेखील जन्म घेत असतो. जिजाईने शिवाजीला रामायण-महाभारतातील प्रेरणादायी गोष्टी सांगून घडवला हा इतिहास आमच्यासमोर आहे.
मी माझ्या सर्व कवितांची रचना, बालकवितेसंबंधीचे माझे विचार मनात ठेवून करत राहिलो आहे. तथापि विषय सुचेल तेव्हाच, मनोमन त्यावर नीट चिंतन करून हळुहळू अनुभव व अनुभूतीच्या कलाने त्यांची निर्मिती केली आहे. काही कविता तर फिरून फिरून तीन-चार वेळा अगदी नव्याने लिहिल्याप्रमाणे लिहिल्या आहेत. एक गोष्ट मात्र येथे निक्षून सांगावीशी वाटते की मराठी बालवाड्मयाचे आद्य प्रवर्तक व दीपस्तंभ असलेले सानेगुरुजी यांचा बालसाहित्याविषयीचा निखळ संदेश मी आदर्श म्हणून मनाशी घट्ट बांधून ठेवला आहे :
“जडेल नाते प्रभूशी तयाचे
करील मनोरंजन जो मुलांचे!”
मी स्वत: आपल्या बालकवितांची पुस्तके प्रकाशित करण्याच्या कामात येऊ लागलेल्या अनुकूल अनुभवांमुळे चांगलाच सुखावलो होतो. कारण त्यामुळे माझ्या मनातील दुसरी प्रखर इच्छा आपोआप पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली. ती म्हणजे सर्व कवितांची भित्तिचित्रे तयार करून त्यांचे प्रदर्शन भरवणे, त्यामुळे माझ्या मनाची स्थिती ‘आधिच राधा फुललेली त्यात उधळतो हरी फुले’ अशी बनली. मी बालकविता पुस्तकांची निर्मिती व त्यातील कवितांची भित्तिचित्रे तयार करणे या दोन कामांस लागलो.
प्रथम मी वहीतील दोनशेपैकी निवडक एकशेबत्तीस कविता वेचून तेहतीस कवितांचे एक अशी चार पुस्तके – १.वनाची शाळा, २.मौजच मौज, ३.लाडके आजोबा, ४.खारुताईचे लग्न तयार केली. त्यांची चित्रे काढताना त्यांचीच पुढे भित्तिचित्रे तयार करायची आहेत या दृष्टिकोनातून त्यांची मांडणी करवून घेतली. पुस्तकाच्या एका पानावर एकच कविता संपू्र्ण चित्रासह बसेल असा तो लेआऊट होता. त्यामुळे पुस्तक तयार झाल्यानंतर त्या पानांची विस्तारित झेरॉक्स प्रत काढली की त्यांचीच भित्तिचित्रे तयार झाली. पुस्तके मुद्रित करण्यासाठी संगणकाद्वारे सर्व कवितांचे त्यांच्या चित्रांसह डिझायनिंग करून त्यांचे ट्रेसिंग काढण्याचे काम माझ्यासमोर होते. त्यासाठी ईश्वर(!) नावाच्या एका गरीब मुलाने आपल्या लहानशा दुकानात माझे काम माफक दरात करून दिले.
मुद्रणालयात ट्रेसिंग दिल्यानंतर महिन्याभरात सर्व पुस्तके हातात आली. तेव्हा २००३ हे साल संपत आले होते. त्या कामाला एकंदर तीन वर्षे लागली होती. एखाद्या चांगल्या प्रकाशकाने हेच काम फक्त तीन महिन्यांत करून दिले असते.
पुस्तके सुंदर झाली. ती पाहून मन आनंदाने भरून आले. प्रत्येक पुस्तकाच्या एक हजार प्रती अशा चार पुस्तकांच्या चार हजार प्रती घरी आणल्या तेव्हा आनंदासोबत मनात चिंताही निर्माण झाली. चार हजार पुस्तकांचा तो भलामोठा ढीग पाहून मी डोक्यावर हात ठेवून तासभर त्या ढिगाकडे नुसता पाहत बसलो! डोळ्यांत चार अश्रूही येऊन गेले. कारण पुस्तकांच्या वितरणाचा मोठा प्रश्न समोर होता! पुस्तके रद्दीत तर विकावी लागणार नाहीत ना? या भीतीने मन उद्दिग्न झाले. परंतु मी निरनिराळ्या ठिकाणी पारितोषिकांसाठी पुस्तके पाठवली. त्यांना बर्यापैकी प्रतिसाद मिळाले व पुढील काही पुरस्कार माझ्या पदरात पडले. १. महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट बालवाङमय निर्मितीचा (२००३) राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, २. विदर्भ साहित्य संघ-नागपूरचा राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार, ३. बुलढाणा येथील कै. शशिकलाताई आगाशे स्मृती (२००४) ४. कै. बापुसाहेब ठाकरे स्मृ्ती (२००५), ५. प्रबुद्ध चेतना मंडळ-नागपूर (२००४). सोबतच ही पुस्तके नागपुरातील पाच प्राथमिक शाळांनी पहिल्या वर्गाकरता व ज्युनियर के.जी.च्या अभ्यासक्रमाकरता लावून घेतली. महाराष्ट्र शासनाने बालभारतीच्या सातव्या वर्गाच्या पाठ्यक्रमाच्या मराठी सुगम भारती या पुस्तकात पुस्तकांमधील एक कविता-‘ये रे ये रे पावसा’-समाविष्ट केली. परंतु एकीकडे हे यश मिळत असतानाच पुस्तकविक्रीच्या मोर्च्यावर मात्र मी सपशेल अयशस्वी राहिलो. कारण एकूण फक्त दहा-पंधरा टक्के पुस्तकांची विक्री रीतसर झाली व उर्वरित पुस्तके मित्रपरिवारात वाटण्यात खर्ची पडली.
दरम्यानच्या काळात मी पुस्तकांमधील कवितांची भित्तिचित्रे तयार करण्याचे काम हाती घेतले. ते काम फारसे अवघड नव्हते. नियोजनाप्रमाणे सर्व पुस्तकांमधील कवितांच्या एकशेबत्तीस पानांच्या मोठ्या आकारात विस्तारित झेरॉक्सच्या एकशेबत्तीस प्रती काढून आणल्या, संजय मोरे यांनी त्या प्रती रंगवून दिल्या. नंतर एकशेबत्तीस कविताचित्रांना खर्ड्यावर चिकटवून व त्यांना लॅमिनेशन करून भिंतीला लटकावण्याकरता वरून रेशमी रिबिनच्या दोर्या बांधल्या. अशा तर्हेने वर्तमानपत्राच्या आकाराची माझी बालकवितांची एकशेबत्तीस भित्तिचित्रे तयार झाली. त्यात वर्ष-दीड वर्ष गेले.
माझी भित्तिचित्रे तयार झाली, नेमकी त्याचवेळी, जानेवारी २००७मध्ये नागपुरात जागतिक मराठी संमेलनाची तयारी सुरू होती. नागपुरातील सांस्कृतिक क्षेत्राचे व कार्यक्रमांचे ‘मसीहा’ गिरीश गांधी यांच्या सहकार्याने संमेलनात भित्तिचित्रांचे पहिले प्रदर्शन भरवले. कार्यक्रमपत्रिकेतही प्रदर्शनाचा अंतर्भाव झाला. मी सभामंडपाच्या आवारात जेव्हा तोरणाप्रमाणे एका ओळीत ही भित्तिचित्रे लावली तेव्हा त्यांची लांबी अंदाजे पाचशे फूट इतकी झाली होती. नागपुरातील प्रथितयश चित्रकार डिखोलेसर यांच्या हस्ते, तसेच राजे श्री तेजसिंगराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाला नागपुरातील वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे दुसर्या दिवशी सर्व वर्तमानपत्रांतून प्रदर्शनाची स्तुती मुक्तकंठाने करण्यात आली. तसेच नागपूर दूरदर्शनने देखील प्रदर्शनाचे चित्रिकरण करून दूरदर्शनवर प्रसारित केले.
त्यानंतर विदर्भ साहित्य संघाचे अकोट येथील संमेलन, सावनेर येथील अखिल भारतीय पद्मगंधा साहित्य संमेलन, नागपुरातील रतन टाटा ट्रस्टतर्फे झालेले बालविविधा संमेलन, बालकांनी बालकांसाठी नागपुरात भरवलेले बालसाहित्य संमेलन, बुलढाणा येथील विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन इत्यादी ठिकाणी मी या भित्तिचित्रांचे प्रदर्शन वेळोवेळी मांडले. भित्तिचित्रांचे वजन व आकार जास्त असल्यामुळे ते प्रदर्शनाच्या ठिकाणी वाहून नेणे श्रमाचे व खर्चाचे काम होते. तेव्हा चित्रे फ्लेक्सवर बॅनरप्रमाणे तयार करून घेतली. त्यासाठी गिरीश गांधी यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने नऊ हजार रुपये हे अंशत: अनुदान दिले.
परंतु प्रदर्शनाच्या या कामात हुरूप वाढण्याऐवजी खिन्नता व उदासीनता मनात घर करू लागली. कारण प्रदर्शनाच्या कामाचा कोणताही खर्च आयोजकांकडून मिळत नसे. साध्या प्रोत्साहनालाही मला पोरके व्हावे लागत होते. स्वत:च्या प्रदर्शनासाठी आयोजकांना विनंती करणे, नंतर स्वखर्चाने भित्तिचित्रे नेणे-आणणे. एकट्यानेच प्रदर्शन लावणे हा सर्व खेळ मी एकटा गारुड्याप्रमाणे करत होतो. परंतु गारुड्याप्रमाणे तो माझा पोटापाण्याचा धंदा नाही. उलट, पुस्तक प्रकाशन व या सर्व भित्तिचित्रांची निर्मिती ही कामे मी माझ्या सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पेन्शनच्या पैशांतून करत होतो. त्याकरता कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची मला अपेक्षा नव्हती व नाही. परंतु या कामात मी खूपच एकटा पडत असल्यामुळे मनात अनेकदा नैराश्य येते. लवकरच, ते निघूनही जाते. कारण हे काम माझ्या आवडीचे असून आयुष्यभर या कामाची स्वप्ने मी उराशी बाळगली आहेत. त्यामुळे कामातील समाधानाचा भागही मोठा आहे. किंबहुना हे समाधान म्हणजेच कामाचा मोबदला होय असे मी मानतो. खरे तर, या निमित्ताने माय मराठीची अल्पशी सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. वाचनसंस्कृती वाढण्यास हातभार लागणे, प्रत्यक्ष परमेश्वराशी जवळीक ज्यामुळे साधता येते असे आपल्या कवितेद्वारे लहान मुलांचे मनोरंजन करणे, अशा कामाची संधी म्हणजे राष्ट्रनिर्मितीच्या मोठ्या कामाला अल्पसा हातभार लावण्याची संधीच वाटते. शेवटी, माझ्या कामासंबंधी भावना व निष्ठा मी माझ्याच काव्यपंक्तीद्वारे व्यक्त करून थांबतो!
कशास जळते ज्योत दिव्याची कळले जेव्हा
दिवा होऊनी कवितेचा मी जळुन पाहिले!
शंकर विटणकर – १७३, शुभम अपार्टमेंट, दुसरा माळा, सुर्वेनगर, जयताळा रोड, नागपूर – ४४००२२.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.