पण आपली समजूत अशी, की हे वैभव असते ते परदेशांत; म्हणजे असे की ‘फुलपाखरांची बाग’ आपण ऐकून असतो, पण एकाच ठिकाणी भिरभिरणारी असंख्य व नानाविध रंगांची फुलपाखरे पाहण्यासाठी आपल्याला थेट सिंगापूर, मलेशिया किंवा मादागास्कर येथे जावे लागेल असा आपला समज असतो. इतका लांब व खर्चिक प्रवास कसा काय करता येईल असेही मनात येते. मग चला तर ठाण्याला! अहो, ठाण्याला म्हणजे त्या प्रसिद्ध इस्पितळात नाही हो, खरोखरच्या फुलपाखरांच्या बागेत! तेथे बागेत नानाविध रंगांची, त-हेत-हेची असंख्य फुलपाखरे फुलांवर, झाडांभोवती सतत भिरभिरत असतात. ही बाग आहे ओवळेकरांची.
पेशाने शिक्षक असलेल्या राजेंद्र ओवळेकरांचा पारंपरिक व्यवसाय हा भात-शेतीचा. ते शेतीचा व्यवसाय आठ-दहा वर्षांपूर्वीपर्यंत करत होते. त्यांनी काहीतरी नविन म्हणून शेतबांधावर नारळ, आंबा, चिकू अशी फळझाडे लावली. वाडीतील शेतावर येता-जाता त्यांची नजर जायची ती तेथे भिरभिरणा-या फुलपाखरांवर. ओवळेकरांना निसर्गाची आवड होतीच; त्यांनी ‘बॉबे नॅचरल हिस्टरी सोसायटी’ने योजलेल्या ‘फुलपाखरांशी ओळख’ या कार्यक्रमाला भेट दिली. फुलपाखरांचे प्रकार, रंगरूप, त्यांची नानाविध नावे या सर्व माहितीमुळे त्यांचे फुलपाखरांविषयीचे आकर्षण वाढले. त्याच कार्यक्रमात एका व्यक्तीने, ‘ही सर्व फुलपाखरे ठाण्याला ओवळा गावात दिसतात व ती पाहायला आम्ही मुंबईहून मुद्दाम तिथे जात असतो’ असे सांगताच त्यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. त्यांनी आपल्या गावातील या नैसर्गिक देणगीशी आपली पक्की ओळख करून घ्यायचा निश्चय केला आणि मग त्यांनी रीतसर अभ्यास आरंभला.
त्यांनी फुलपाखरांचे प्रकार किती? ती कोणत्या फुलांवर येतात, का येतात, कोणत्या झाडांखाली दिसतात? ती सतत दिसावीत म्हणून काय करावे लागते याचा पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. ते अनेक ठिकाणांहून, व्यक्तींकडून माहिती घेऊ लागले. त्यांना त्या वाटचालीत फुलपाखरांच्या दुनियेतील एका अग्रगण्य व्यक्तीने सखोल सहकार्य दिले. ती व्यक्ती म्हणजे आयझॅक किहीमकर. त्यांनी भारतात आढळणा-या पंधराशेएक जातींच्या फुलपाखरांचा अभ्यास करून सर्वांगसुंदर पुस्तक लिहिले आहे. त्या ऋषितुल्य व्यक्तीने ओवळेकरांना वेळोवेळी माहिती दिली, मदत केली. त्या आधारे सहा वर्षांच्या अहर्निश प्रयत्नांनंतर साकारली त्यांची फुलपाखरांची बाग! या घडीला भारतातील नैसर्गिक स्थितीतील फुलपाखरांची एकमेव बाग!
त्यांनी फुलपाखरांना आवडणा-या झाडांचा, वेलींचा अभ्यास सुरू केला. अनाकर्षक दिसणारी या वृक्षवल्ली रोपवाटिकांत मिळत नाहीत. मग सुरू झाला शोध! ते रेल्वे ट्रॅकच्या कडेला उगवलेली, जंगलातील भटकंतीत दिसणारी, नाले-गटारे यांच्या कडेला असणारी झाडे वेचून वेचून आणू लागले व त्यांच्या जागेत वाढवू लागले. त्यांनी काही फुलझाडे, वेली पुणे, मुंबई, केरळ अशा ठिकाणांहून आणली. त्यांनी फुलझाडे व वनस्पती हजारोंच्या संख्येने वाढवल्या. फळांतील रस पिणा-या फुलपाखरांसाठी जास्त झालेली पेरू, अननस अशी फळे बागेत प्लेटमध्ये, बाऊलमध्ये नियमितपणे ठेवायला सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ लागले व हळुहळू फुलपाखरांची त्यांच्या बागेत ये-जा सुरू झाली.
त्यांनी सूर्यप्रकाशाची दिशा, वारा यांचा अभ्यास करून विशिष्ट झाडे मोठ्या प्रमाणात एकत्र रीत्या लावण्याचा सपाटा सुरू केला. त्यांनी माळीकामाचा, बागकामाचा अभ्यासक्रम शिकून घेतला. निरनिराळी कलमे करायला सुरुवात केली. त्यांनी स्वत:ला या कामात बुडवून घेतले. त्यांनी वर्षातील सर्वकाळ एकही दिवस सुट्टी न घेता, अन्यत्र कुठेही न जाता फुलपाखरांच्या बागेतच व्यतीत केला. त्यांच्या कुटुंबाने मनापासून साथ दिली.
सुरुवातीला दिसणा-या फुलपाखरांच्या तीस-चाळीस प्रकारांत वाढ होऊन त्यांच्याकडे एकशेपाच प्रकारची फुलपाखरे आढळतात. त्यासाठी त्यांनी खुळखुळा, घागेरी, कॉसमॉस, चित्रक, झेंडू, सदाफुली, लिंबू, सिताफळ, बांबू, रुई, एरंड, कृष्णकमळाची वेल, बदकवेल, एकदांडी लिली अशा नानाविध झाडांची जोपासना केली आहे. हे काम एकदाच करून भागत नाही, कारण त्यांपैकी अनेक झाडे फुलपाखरांच्या अळ्या खाऊन टाकतात. त्यामुळे ती झाडे सतत वाढवावी लागतात. ओवळेकर वर्षभर कराव्या लागणा-या बागकामात मनापासून रस घेतात, त्यांच्या वात्सल्यस्पर्शाने झाडेसुद्धा तरारून येतात, अन त्यांच्यापाठोपाठ फुलपाखरेसुद्धा बागेमध्ये बागडू लागतात.
फळे व मासे यांवर येणा-या फुलपाखरांच्या जेवणासाठी न चुकता आठवड्यातून दोनदा नवनवीन फळांनी ते फळपेट्या भरतातच. त्यात मधुनमधून मेलेले खेकडे, कोलंबी यांचीही भर असते. त्यामुळे केवळ जंगलात आढळणारी काही विशिष्ट फुलपाखरे त्यांच्या बागेत नियमितपणे दिसतात. ओवळेकरसरांच्या या अनोख्या बागेत ब्ल्यू टायगर, स्ट्राईप टायगर, प्लेन टायगर, कॉमन क्रो, किंग क्रो, इमिग्रट, जॅझेंबेल, ग्रेट एग प्लॉय, डनाईड एग प्लाय, कॉमन मॉटमॉन, कॉमन रोझ, क्रिमसन रोज, लाईम ब्ल्यू, ग्रेट ऑरेंज टिप, यलो ऑरेंज टिप, व्हाईट ऑरेंज टिप, रेड ऑरेंज टिप, टॉनी कॉस्टर ही मोठ्या व मध्यम आकारांची फुलपाखरे नियमितपणे दिसतात.
अनेक प्रकारची किटकांची जीवसृष्टी, बिटल्स कोली यांची विविधता येथे आहे. ह्या सर्वांचा फराळ करणारे मँटिससारखे किटक, सरडे व पक्षिसंपदा ह्यांचा वावर इथे मुक्तपणे दिसतो. ‘जीवो जीवस्य जीवनम’ या उक्तीप्रमाणे चालणारे निसर्गचक्र येथे सहजपणे दिसतेच दिसते.
निसर्गप्रेमी, अभ्यासक, हौशी व व्यावसायिक छायाचित्रकार यांचबरोबर आबालवृद्धांची या आगळ्या-वेगळ्या फुलपाखरांच्या बागेत दर रविवारी गर्दी होत असते. मुंबईकरच नव्हे तर गोवा, कोलकाता, बंगळुरू अशा दूरच्या ठिकाणांहून फुलपाखरे अभ्यासक व निसर्गप्रेमी इथे येतात. काही परदेशी व्यक्तींनीसुद्धा येथे आवर्जून भेट दिली आहे. आपणही त्या बागेत जायलाच हवे. भेट देण्याचा योग्य कालावधी ऑक्टोबर ते डिसेंबर असा आहे.
राजेंद्र ओवळेकर
982077929, 9869256054
मकरंद कुळकर्णी
9664580106
सर्व छायाचित्रे – मकरंद कुळकर्णी
अतीसुंदर .नामशेष होत चाललेली
अतीसुंदर. नामशेष होत चाललेली फुलपाखरे कुठे ना कुठे अत्यल्प प्रमाणातच पहायला मिळतात. मला देखील ही बाग बघायला आवडेल.
नातवाला घेऊन ही बाग नक्की
नातवाला घेऊन ही बाग नक्की बघेन.
Fantastic , khup mast, chan
Fantastic! Khup mast. Chan upkram. All the best! Ewadhi Butterfly asata. Surprise!
फुलपाखरा चि माहीति सागा
फुलपाखरांची माहिती सांगा.
ही बाग बघायलाच हवी
ही बाग बघायलाच हवी
खूपच छान माहिती
खूपच छान माहिती
खूपच छान माहिती
खूपच छान माहिती
खूपच छान माहिती
खूपच छान माहिती
सुंदर !! आता मुंबईला गेलो की
सुंदर !! आता मुंबईला गेलो की नक्कीच जाणार .
खूपच सुंदर…मलाही हि बाग
खूपच सुंदर…मलाही हि बाग पहायला नक्की आवडेल….
Comments are closed.