मैत्रेयच्या मित्रांना एकत्र घेऊन, विदुरने त्यांना सतार शिकवायला सुरुवात केली. आमच्या पुण्याच्या कर्वेनगरच्या ‘विरेली’ या घरामध्ये दर बुधवारी विदुरचा क्लास असायचा. त्या क्लासला एका वेळी जवळजवळ पंचवीस-तीस जण जमू लागले. त्यात मैत्रेयचे अऩेक मित्र-मैत्रिणी, नेहाचे मित्र-मैत्रिणी, आमचे स्नेही-मित्र असायचे. प्रत्यक्ष, सतार शिकणारे तेव्हा चार-पाच जणच होते, पण न चुकता, आम्ही सगळे सतार शिकवणे ऎकायचो, सतारीबद्दल, शास्त्रीय संगीताबद्दल ऎकायचो. कला म्हणजे काय? कलेची काम असतात का? कलेतून माणूस मोठा कसा होतो; त्याची मानसिक पातळीवर कशी उन्नती होते आणि कलाकार हा स्वत:साठी का? पासून कलाकार घडवता येतो का? गुरुशिष्य परंपरेतले फायदे-तोटे वगैरे असंख्य विषयांवर चर्चा व्हायची… यामध्ये सहभागी होणा-या सगळ्यांना आम्ही ‘हार्मनी ग्रुप’ असं नाव दिलं. विदुर सगळ्यांचा ‘सिनियर कंपनिअन” झाला. ज्यांना संगीतातला ‘स’ माहीत नाही असेही कितीतरी जण संगीत कळत नसल्याचा ‘न्यूनगंड’ न बाळगता बुधवारची वाट पाहायचे!
या सगळ्यांमध्ये आम्ही दोघे इतके समरस झालो होतो की कुणाही एकाशिवाय तो क्लास पूर्ण वाटायचा नाही. सतार शिकणारे, संगीताबद्दल शंका विचारणारे, कुणी शांतपणे नुसत ऎकणारे, कुणी हिरीरीनं वाद घालणारे, कुणी चहा-वडापाव किवा तत्सम खाण द्यायला मदत करणारे अशा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणा-या विदुरच्या मनात
सुरुवातीला, क्लासमधल्या सगळ्यांशी बोलले. सगऴ्यांना ही कल्पना आवडली… विदुरच्या वाढदिवशी, 3 फेब्रुवारीला अशी कार्यशाळा त्याला serprize म्हणून द्यायची असं ठरवलं, पण लक्षात आलं, की कलाकारांसाठी, themeसाठी विदुरशीं चर्चा करण्याशिवाय पर्याय नाही. माझ्या डोक्यात एक ढोबळ कल्पना अशी होती, की इतर काही ललितकला घेऊन त्यांच्याबद्द्लची ओळख करून घ्यायची आणि संगीत व इतर कलांचा तुलनात्मक विचार करायचा. संगीतामध्ये सुद्धा कंठसंगीत, वाद्यसंगीत यावर कुणीतरी बोलावं, तालाची-लयीची मूलतत्त्व कळावीत, इतके दिवस जे शब्द नुसते माहीत होते त्याबद्दल तपशील अर्थान्वय कळावेत आणि हे सारं करताना, मला कार्यशाळेतल्या सहभागी विद्यार्थ्यांनी नि:संकोचपणे कुणी आपल्याला हसणार नाही या भावनेनं मोकळं होऊन ‘रिसोर्स पर्सन’ म्हणून बोलावलेल्या ज्येष्ठ लोकांबरोबरची ———– हे उद्दिष्ट प्रथम प्राधान्याचं होतं.
कार्यशाळेला सुरुवात 8 फेब्रुवारीला सकाळी 8.30 वाजता झाली. हार्मनी ग्रूपव्यतिरिक्त लोक उशिरापर्यंत येत होते, हे नमूद करताना, हार्मनी ग्रूपच्या वेळा पाळण्याच्या, छोट्या वाटणा-या पण महत्त्वाच्या वर्तनवृत्तीचा मला अभिमान वाटतो. सुरुवातीला अतिशय सुंदर आल्हाददायक सकाळी, सगळे एकत्र आलो. मी आणि विदुरनी प्रास्ताविक केलं. आणि कार्यशाळेला वेळेवर सुरुवात झाली. नेहा आणि मंदार यांनी प. शंकरांनी संगीत दिलेली यमन रागातील ‘ हे नाथ, हमपर कृपा किजीए’ ही प्रार्थना म्हटली आणि वातावरण पावित्र्य, शुद्धता आणि सुचितेनं भरून गेलं. प्रास्ताविकानंतर हार्मनी ग्रूपनं विदुरसाठी व तो सतार वाजवायला बसतो, त्यासाठी एक सत्यविजय ने (ज्याच्या सतार शिकण्याशी काही संबंध नाही) छोटा गालिचा प्रेझेंट दिला. सगळ्या विद्यार्थ्यांसाठी सोनेरी धाग्यात गुंफलेले लाल रेशमी रंगाचे गोंडे, खास बनवून आणले होते, ते दिले. सगळ्यांनी ते आपापल्या वाद्यांना बांधले. मयुरेश देशपांडे, बी.ई.झाल्यावर घरचा व्यवसाय सांभाळतो. त्याची वायर्स तयार करण्याची फॅक्टरी आहे. त्यानं सगळ्यांना सतारीच्या तारा, विशेषत: तरफेच्या तारा लावण्यासाठी एक छोटंसं उपकरण भेट म्हणून दिलं. या सगळ्यातला आपलेपणा सांगण्यासाठी मला शब्द आठवत नाहीत.
मग सुरू झालं अनुराधाचा ‘रवींद्र संगीत- एक ओळख’ हे सेशन. रवींद्र संगीत हे दोनच शब्द या संगीताबद्दल माहित असलेल्या माझ्यासारख्या इतर काही जणांना रवींद्रनाथ टागोरांनी सुरू केलेल्या, evolve केलेल्या या साध्यासुध्या वाटणा-या गोड आणि मधुर संगीताबद्दल, भाषेबद्दल, गीतांबद्दल कितीतरी माहिती मिळाली! आम्ही काही तालांवांची नावेसुदंधा आम्ही पहिल्यांदाच ऎकली. तिचे Session संपेपर्यंत डागरसाहेब आले आणि आमच्यासारखे विद्यार्थी होऊन स्टेजच्या समोर आमच्यात बसले! ही घटना, हे वागणं कार्यशाळेतल्या आम्हा सर्वांसाठी अव्यक्त संस्कार होता.
विदुरन तेही डागरसाहेबांची ओळख करून दिली. ध्रुपद गायकीतले दिग्गज कलाकार म्हणून त्यांनी प्रश्नोत्तरांनीच Session ला सुरुवात केली. नुपूर नावाच्या सतारीच्या ज्युनिअर विद्यार्थिनीनं धृपद गायकी म्हणजे काय? असा पहिलाच, सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकवणारा प्रश्न विचारला! त्यावर डागरसाहेबांनी दिलेल्या उत्तरामुळे उपस्थितांपैकी प्रत्येकाला या गायनपद्दतीची शास्त्रशुद्ध माहिती झाली. त्यांनी मोकळ्या वातावरणात व्हॉइस कल्चरबद्दल सांगितलं. स्वरांच्या सौंदर्याबद्दल, त्यातल्या बारकाव्यांबद्दल सांगितलं! गाऊन दाखवलं हे सेशन ज्यांनी ज्यांनी अनुभवलं त्यांना, मंत्रमुग्ध होणं म्हणजे काय याची अनुभूती आली. लंचब्रेकमध्ये सगळे भारावलेल्या मनस्थितीत होते. तिसरं सेशन ‘कथक नृत्य आणि तालाची ओळख’ असं होत. पुण्यामध्ये शिकवणा-या बेबीताईंची ज्येष्ठ शिष्य निलिमा आध्ये या विषयाच्या तज्ञ म्हणून आल्या होत्या. त्यांनी शुद्ध नृत्यप्रकार, तालातल्या सौंदर्यामुळे प्रकट होणारे कायिक भाव, अर्थपूर्णता, विविध मुद्रा, नृत्यासाठी असणारं शरीर हेच माध्यम या सगळ्यातले बारकावे, स्वत: नृत्य करून दाखवले, विषद केले. त्यांच्या दोन विद्यार्थिनी, नीलिमा सांगेल तसा नृत्याविष्कार करून दाखवत होत्या आणि त्यातलं aesthetics आम्ही अनुभवत होतो…
शेवटचं सेशन होतं जलरंगातील प्रसिद्ध चित्रकार मिलिंद मुळीक यांचं. मिलिंद आणि विदुर, दोघांचा एकत्र कार्यक्रम होता. विदुर सतार वाजवत असताना, ज्या रागाची तो स्वरमाध्यमातून मांडणी करत होता ते ऎकताना मिलिंद त्या रागाचं, त्याला जाणवणा-या संवेदनांचं चित्र काढत होता. एकाच वेळी व्यासपीठावर दोन कलाकारांची कला पाहणं, ऎकणं, अनुभवणं या सा-यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतेचा कळस गाठला.
संध्याकाळचे 6 वाजले. श्रीरंग कलानिकेतनच्या दालनात सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 6.30 पर्यंत जे घडलं त्याचं चित्र काढायचं म्हटलं तर कोलरिजच्या सारखं चित्र साकार होईल असं मी म्हणाले तर ते अतिशयोक्तीपूर्ण मुळीच होणार नाही.
विदुरला अशी भेट द्यायच्या माझ्या कल्पनेमध्ये माझी मुलगी नेहा आणि ‘हार्मनी’ ग्रपची माझी सगळी मुलं होती. आम्ही अशी कार्यशाळा दरवर्षी घेणार आहोत. हा विचार मोठा व्हावा, सशक्त व्हावा आणि विदुरच्या व आमच्या मनातले music academy चं स्वप्न साकार व्हावं अशी मनोमन इच्छा.
त्या दिवसाबद्दल विचार करताना, माझ्या डोळ्यांसमोर येतो तो डागरजींनी तोडीबद्दल काहीतरी सांगता सांगता लावलेला थरथरता कापरा, रिषभ. इतका स्पष्ट, अभंग ठसा उमटला आहे त्या रिषभचा मनावर! डागरजींचं हळुवार, प्रेमळ असं बोलणं, तसं दिसणं आणि सुरांबद्दल मायेनं बोलणं हे उठवून खूप वेगळं वाटतं, ते अऩुभवत असताना अंगावर आलेले शहारे आठवतात.
त्यांनी आम्हाला धृपदबद्दल सांगताना प्रत्येक सुराचा आपला कसा एक भाव असतो, जो राग मांडायला मदत करत असतो हे समजावलं होतं. त्याकरता उगाचंच, तंत्र वापरून, एका श्वासात भलीमोठी पण भावपूर्ण नसलेली तान म्हणून दाखवून लगेचच एक सुंदर, रडू येईल अशी तान म्हणून दाखवली होती. त्यांची त्यांच्या गाण्यावर आणि त्यांच्या परंपरेवर असलेली निष्ठा, मला खूप प्रेरित करते.
आम्ही जमलेले सगळे विद्यार्थी होतो. खूप रियाज करणं हे आमच कर्तव्य आहे. पण डागरजींनी सांगितलेली रियाजातली शिस्त, श्रद्धा व निग्रह हे सगळं खूप शिकण्यासारखं होतं. त्यांचे गुरुजी त्यांना एकच तान, कधी-कधी एक सूर असं एक हजार वेळा म्हणायला लावत. मग ते त्यांच्या माळेतले मणी ते मोजण्याकरता वापरत. एकदा म्हणून झाली तान, की एक मणी बाजूला. त्याग, साधना आणि आराधना- अशा तीन टप्प्यांचं त्यांनी वर्णन केलं.
त्यामुळे, विद्यार्थी म्हणून, मी किंवा आम्ही संगीताकडे कसं पाहायला हवं, सूराचं किती महत्त्व आहे आणि त्याहीपेक्षा रियाज हा किती मौल्यवान आहे हयाचं त्यांनी आमच्या समोर दृश्य स्वरूप ठेवलं. बोलताना ते आयुष्याच्या ह्या टप्प्यावर सुद्धा असं म्हणाले, की “तब बहोत रियाज होता था… गुरूजी बिठाते थे.. हमको आज लगता है कि थोडा ओर करते तो मजा आता” आम्ही भारावून गेलोच, पण प्रेरितही झालो. तंत्राचा खूप सराव झाला पाहिजेच, पण भाव-निर्मिती ही सर्वात महत्त्वाची हे पुन्हा एकदा निष्ठेनं सांगणारे डागरसाहेब..
अपर्णा महाजन — नेहा महाजन