Home कला ‘उत्सव कलाम’ – निबंधस्पर्धा

‘उत्सव कलाम’ – निबंधस्पर्धा

माजी राष्ट्रपती ए. पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती 15 ऑक्टोबर या दिवशी असते. त्या दिवशी शाळांमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा केला जातो. आम्ही सात मित्रमैत्रिणी मिळून ‘बाराखडी’ नामक एक समूह कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने सुरू केला आहे. मी, ज्योती जगताप, उज्ज्वला पवार, विकास ठाकरे, परमेश्वर घोडके, धनश्री मराठे, संकेत गावडे असे सातजण समुहात आहोत. ज्योतीने कल्पना सुचवली, की कलाम यांची जयंती आहे. त्यांचा ‘इस्रो’शी संबंध आला आहे, ते शास्त्रज्ञ होते. त्यांनी महत्त्वाचे शोधही लावले आहेत. ‘इस्रो’च्या ‘चांद्रयान-2’ या मोहिमेची गाथाही गावोगावी पोचली आहे. त्या साऱ्या आठवणींना उजाळा म्हणून निबंध स्पर्धा घ्यावी. स्पर्धा घ्यावी हे आम्ही ‘बाराखडी’ गटाला पटलेच, पण वर्ष ‘उत्सव कलाम 2019-20’ म्हणून साजरे करावे असेही ठरले. आम्ही तलासरी तालुक्यातील निवडक जिल्हा परिषद शाळांना भेटी दिल्या. त्यांना स्पर्धेविषयी माहिती सांगितली. स्पर्धा माध्यमिक म्हणजेच इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांची घेतली.

‘मी शास्त्रज्ञ झालो तर’, ‘मानवाने विज्ञान उपयोगी लावलेला महत्त्वपूर्ण शोध’, ‘भारत आणि अवकाश संशोधन’ आणि ‘भारतीय उपग्रह माहिती व उपयोग’ हे चार विषय ठरले होते. ते विषय स्पर्धेच्या तीन दिवस आधी शाळेत दिले. विषय जरा कठीणच होते. चार शाळांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. जिल्हा परिषदेच्या दोन शाळा आणि संस्थांच्या दोन शाळा होत्या. एकूण साठ विद्यार्थ्यांनी निबंध लिहून दिले. निबंध बऱ्याच जणांनी वाचले. मुलांनी निबंधांत चांगल्यापैकी माहिती लिहिली होती. विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण शोध या विषयात वीज, सायकल, गॅस या विषयांवर लिहिले; पण आम्हाला त्यांतील एक विद्यार्थी असा मिळाला, की त्याने ‘स्क्रू’विषयी माहिती लिहिली. त्याचे नाव मनोहर धोडिया. तो बालक मंदिर संस्था, गिरगाव (आरजपाडा, तलासरी) येथे इयत्ता नववीमध्ये शिकतो. त्याने त्याच्या निबंधात मांडले होते, की स्क्रूशिवाय पंखा फिरणे शक्यच नाही हे नववीच्या विद्यार्थ्याला सुचणे आम्हाला आनंददायी वाटले. काहींनी कलाम यांच्याविषयी छानपैकी माहिती लिहिली. ‘इस्रो’चे सध्याचे अध्यक्ष के. सीवन यांचाही वारंवार उल्लेख वाचण्यात आला. विद्यार्थ्यांनी ‘चांद्रयान-2 ही मोहीम कशामुळे अयशस्वी झाली? आणि ती यशस्वी होईलच. आता नाही झाली तर पुढे होईलच आणि भारत एक शक्तिशाली देश बनेल.’ असे सारे भरभरून लिहिले. रामकृष्ण पिंपुटकर विद्यालयातील नववीची विद्यार्थिनी टीना संतोष कोळी हिचा भारत अवकाश संशोधन मंडळ या विषयात प्रथम क्रमांक आला. दुसरा  क्रमांक बालक मंदिर संस्था, गिरगाव (आरजपाडा, तलासरी) या शाळेतील मनोहर धोडिया या विद्यार्थ्याला दिला गेला. त्याने मानवाने विज्ञानोपयोगी लावलेला महत्त्वपूर्ण शोध या विषयावर निबंध लिहिला. तिसरा क्रमांक जिल्हा परिषद शाळा, डोंगरी-विलातपाडामधील प्रमोद यशवंत पासारे या विद्यार्थ्याने पटकावला. शिवाय, रामकृष्ण पिंपुटकर शाळेतील वैभव मेश्राम, स्नेहा धनावडे आणि जिल्हा परिषद शाळा, आरजपाडामधील दशरथ इभाड या तीन विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके दिली गेली.

_ujvala_उत्सव कलाम’ वर्षभर साजरा करायचा आहे. आम्ही तलासरी येथील गिरगाव-आरजपाडा जिल्हा परिषदेच्या प्रयोगशील शाळेत 16 नोव्हेंबरला बक्षीस समारंभ आयोजित केला. तो कार्यक्रम साधेपणाने केला. शाळेने ‘बाराखडी’ टीमचे आणि उपस्थित ‘पिंपुटकर विद्यालया’च्या मुख्याध्यापक आरती करंबळेकर आणि सहशिक्षिका यांचे स्वागत केले. कलाम यांच्याविषयी माहिती तर विद्यार्थ्यांनी चांगल्यापैकी लिहिली होती. म्हणून त्यांच्याबद्दल फारसे न बोलता तो कार्यक्रम घेण्याचा उद्देश काय हे सांगितले. उपस्थित सगळ्यांनी उभे राहून कलाम यांना मानवंदना दिली. त्यांनतर, त्यांना अब्दुल कलाम यांच्या जीवनपटाविषयी डॉक्युमेंटरी दाखवली. उज्ज्वला हिने डॉक्युमेंटरीचे सादरीकरण केले. तेथील विद्यार्थ्यांची नेमकी परिस्थिती कशी आहे? ते जगतात कसे? ते शिक्षणाकडे कोणत्या चष्म्यातून पाहतात? शिक्षण त्यांच्यासाठी किती महत्त्वाचे? सगळ्यांचे निरीक्षण करून विकास ठाकरे याने त्यांच्यासाठी पुढील कविता सादर केली. 

रानातील मुलं 

आरं शिक्षण-शिक्षण ! आम्हाला काय घेणं-देणं!
घेऊन गुलेल हातात, जायाचं पक्ष्याला मारणं!

शेती आमुची माय, रान आमुचा बाप,
दिसभर हुंदडू, कया शिक्षणाचा ताप…

कोठं शिकून-सवरून, मला काय करायाचं,
सुट्टीमध्ये बापासंगे, भात झोडयाचं…

जरी शिकलो मी बुकं, कामा कंपनीत जायाचं,
कमावून दोन पैका, मंग घरा राहायचं…

पण मना आला इचार, सर सांगतात खरं,
जर घेतलं शिक्षण, तर होईल बरं…

कला माझ्याही अंगाची, आहे शहरासारखी,
तिला बनवेन शक्ती, सर असता पारखी…

मी बी शिकीन-शिकीन, अन मोठाला होईन,
चांगला शिकून-सावरून, मोठा सायेब होईन…

आरं शिक्षण-शिक्षण! आम्हाला त्येच्याशी घेणं-देणं!
आता संगे दप्तर घेऊन, रोज शाळेला जायाचं…!

ज्या विद्यार्थ्यांचे क्रमांक आले, त्या विद्यार्थ्यांना पुस्तक, पेन आणि प्रमाणपत्र देण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. स्पर्धेत सहभागी झालेल्या शाळांना ‘अग्निपंख’, ‘अदम्य जिद्द’, ‘माझी जीवनयात्रा’, ‘स्पेस शटल’, ‘शालेय खगोलशास्त्र’, ‘अणुबॉम्बची कहाणी’, ‘कणाद ते कलाम’, ‘कृष्णविवर’ ही पुस्तके भेट देण्यात आली. प्रयत्न हा आहे, की हे सगळे करत असताना, विद्यार्थ्यांमधून एखादा विद्यार्थी घडला पाहिजे; किमान त्याने त्याचा मार्ग तरी शोधला पाहिजे. उपक्रमाला नेहा जाधव, पुष्कर पुराणिक, वीरेंद्र सोनवणे या मित्रांची बरीच मदत मिळाली. ‘उत्सव कलाम 2019-20’  हा पहिलाच उपक्रम तीन महिने चालला.

– शैलेश दिनकर पाटील 9673573148
patilshailesh1992@gmail.com

About Post Author

Exit mobile version