शांतिलाल पुरवार यांचा आगळा संग्रह
औरंगाबादचा पुरवार कुटुंबियांचा वंशपरंपरागत वाडा हा घर कमी आणि संग्रहालय जास्त भासतो. दहा पिढ्या नांदलेल्या त्या घरामध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा आणि त्याहूनही मोठ्या पातळीवर सतरा हजार वस्तूंचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यात आला आहे. त्या वारशाचा संबंध काही दशकां-शतकांपूर्वीच्या वस्तूंसोबत आहेच, पण काही संदर्भ थेट हजारो वर्षांपूर्वीच्या आदिमानवापर्यंतदेखील जाऊन भिडतात- औरंगजेबाने लिहिलेल्या ‘कुराण-ए-शरीफ’पासून अश्मयुगीन मानवाच्या अंगठ्याचा ठसा असलेल्या दिव्यापर्यंत… ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ गावागावांत दडलेला असा सांस्कृतिक वारसा नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे.
औरंगाबाद येथील छंदवेडे व ध्येयवेडे डॉ. शांतिलाल पुरवार यांनी दुर्मीळ वस्तूंच्या संग्रहासाठी आयुष्य वेचले. त्यांनी स्वखर्चाने एकेक ऐतिहासिक वस्तूचा संग्रह केला. त्यांचे देहावसान काही वर्षांपूर्वी झाले, परंतु त्यांचे चिरंजीव श्रीप्रकाश पुरवार आणि त्यांचे दोन भाऊ हे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून वडिलांचा वारसा समर्पित भावनेने जपत आहेत.
शांतिलाल पुरवार यांच्या संग्रहात सतरा हजार पुराणवस्तू आहेत. त्यांनी त्या संग्रहाला ‘मातोश्री कौशल्या पुरवार म्युझियम’ असे नाव दिले आहे. त्यांचा तो संग्रह पुरवार कुटुंबियांच्या वंशपरंपरागत वाड्यात जपून ठेवलेला आहे. संग्रहालयात अश्मयुग ते ब्रिटिश कालावधीपर्यंतच्या दुर्मीळ वस्तू आहेत. तो संग्रह अनमोल तर आहेच, परंतु त्यातील काही वस्तूंचा ठेवा हा अतिप्राचीन, वैशिष्ट्यपूर्ण व विविधता जपणारा आहे. संग्रहात सोळा दालने विषयवार आहेत.
दुसरे दालन हे पाषाणयुगी वस्तूंचे आहे. त्यात औरंगाबाद परिसरातील पुराणमानव वापरत असलेली दगडाची (जॅस्पर) हत्यारे, मातीचे (टेरा कोटा) दिवे टेरा कोटा हे सातवाहनकालीन पेण्टल तेथे पाहण्यास मिळते. अश्मयुगीन मानवाच्या अंगठ्याचा ठसा असलेला दिवाही तेथे आहे.
तिसरे दालन आहे निसर्गाचे! त्यात प्रामुख्याने संस्कृतीच्या उदयाचे अवशेष-जीवाश्म वनस्पती फॉसिल स्वरूपात मांडल्या आहेत. त्यात हडप्पापूर्व व हडप्पानंतरच्या कालखंडाची माहिती मिळते. त्यात भारतीय संस्कृतीचा उदय, प्रगती, राज्य संकल्पना, संस्कृतिविकास दाखवला आहे. सातवाहन, गुप्त, कुशाण, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट या राजवटींची माहिती मिळते व तत्कालीन वस्तूही पाहण्यास मिळतात. चौथे दालन शिल्पांचे असून त्यात मृण्मूर्ती, पाषाणशिल्पे, धातू-ब्राँझ-काष्ठशिल्पे आहेत. त्यात स्फटिक, रतन, चांदी, तांबे यांच्याही मूर्ती आहेत. त्या दालनात तेवीसशे वर्षांपूर्वीची यक्षिणीची ब्राँझची मूर्ती आहे. फक्त बेल्जियमच्या ब्रुसेल्स संग्रहालयात आढळणारी, हयग्रीवाची मूर्तीही तेथे आहे. तसेच, नालंदा विद्यापीठात तयार झालेली टेराकोटाची बुद्धमूर्ती, यादवकालीन मूर्ती, सम्राट कृष्णदेवराय यांच्या काळातील नागदेवतेची मूर्ती, स्फटिकाचा नृसिंह, सायफनचा (जलवहनाचे तंत्र) हत्ती आदी तर आहेच; त्याचबरोबर, जहर मोहरा (द्रव्य पदार्थात विष असेल तर जहर मोहरा ताबडतोब रंग बदलतो) आदी वस्तू आहेत. पाचवे दालन चित्रांचे असून, त्यात कागद, हस्तिदंत, काच यांवरील मुघल व राजपूत शैलीतील चित्रे आहेत. तसेच, अजिंठा लेण्यांतील चित्रांच्या प्रतिकृती, नक्कल, लघुचित्रेही आहेत. सहावे दालन हस्तलिखित पोथ्यांचे आहे. सात विविध धर्म व भाषांतील सचित्र पोथ्या, ग्रंथ आदी तेथे आहेत. त्यात प्राकृत, फारशी, अरबी, उर्दू ग्रंथ आहेत.
दांडपट्ट्यासहित सोळा प्रकारच्या तलवारी त्या ठिकाणी आहेत. ग्रीक-अरबांच्या इसवी सनापूर्वीच्या शुद्ध पोलादाच्या भारी तलवारी त्यात आहेत. हलक्या आणि वजनदार धातूंची शस्त्रे तेथे पाहण्यास मिळतात. आठवे दालन – नाणी, मुद्रा, शौर्यपदके यांनी भरलेले आहे. इसवी सनपूर्व सहाशे वर्षांपासून आजपर्यंतची नाणी तेथे दिसतात. नववे दालन काष्ठशिल्प व काष्ठ कामाचे असून, त्यात जुन्या शैलीनुसार वास्तुशिल्पातील लाकडी खांब, कोपरे, कमानी, लाकडी मूर्ती अशी कलाशिल्पे आहेत. दहावे दालन विविध प्रकारच्या मण्यांचे आहे. तेथे इसवी सनपूर्व तीनशेपासून ते विविध कालखंडातील आभूषणांत वापरले गेलेले मणी आहेत. अकरावे दालन वस्त्र-प्रावरणांचे आहे. त्यामध्ये मराठे, राजपूत, मोघल यांच्या काळातील पोषाखांपासून ते पेशवाईपर्यंतची वस्त्रे आहेत. त्यात मुख्य आकर्षण अर्थातच सातवाहन काळातील पैठण ते रोम, ग्रीस, इजिप्तपर्यंत गेलेली पैठणी हे आहेच. त्यावर सुवर्णकाम आहे. बारावे दालन महिलावर्गाचे आकर्षण ठरावे असे आहे. त्यामध्ये रत्नांचा, आभूषणांचा संग्रह आहे.
आदिवासींच्या वस्तूंचा संग्रह तेराव्या दालनात आहे. चौदावे सौंदर्य कलादालन असून त्यात विविध काळातील दिवे, गृहोपयोगी वस्तू आहेत. काचेच्या वस्तू, गंजिफा, दौती ही आकर्षणे ठरतात. पंधरावे संगीत दालन आहे. त्यात वेगवेगळ्या वाद्यांचा संग्रह आहे. सोळावे आयुर्वेद दालन असून, त्यात प्राचीन काळापासून वापरात असलेला वनस्पती; तसेच, त्या संबंधीचे प्राचीन ग्रंथ यांचा संग्रह आहे. त्याशिवाय युवादालन, आशिया दालनात परदेशातील वस्तूंचा संग्रह आहे. परदेशातील नाणी व चलन यांचाही संग्रह आहे. बिद्री कलावस्तूंचेही वेगळे दालन आहे.
संग्रहाचे निर्माते शांतिलाल पुरवार हे पेशाने डॉक्टर होते. ते हौसेने शिल्पकला करत. मात्र त्यांना डोळ्यांचा आजार होण्याचे निमित्त झाले आणि त्यांच्या छंदाला वेगळे वळण मिळाले. शांतिलाल यांना भारतीय संस्कृतीच्या कलात्मक वारशाचा शोध घ्यावासा वाटू लागला. त्या इच्छेपायी त्यांनी औरंगाबाद जिल्हा, मराठवाडा आणि इतर परिसरात भटकंती सुरू केली व पुराण वस्तूंचा खजिना जमा केला. त्यांनी प्रसंगी वस्तू विकत घेतल्या. त्यांचा शोध जिज्ञासेतून शिल्पकला-चित्रकला यांच्या पलिकडे जाऊन विविध गोष्टींपर्यंत पोचला.
औरंगाबादला महापालिकेचे शिवाजी संग्रहालय 1997 च्या आसपास उभे राहिले, मात्र त्यात ठेवण्यासाठी वस्तूच नव्हत्या. शांतिलाल पुरवार यांनी स्वत:हून त्या संग्रहालयाला आकार देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी त्यांच्याकडील तीन हजार वस्तू त्या संग्रहालयाला दिल्या. संग्रहालयाने पुरवार यांना मानद संचालक पद दिले. सध्या श्रीप्रकाश त्या पदावर आहेत.
श्रीप्रकाश पुरवार हे बिद्री कलावंत. सध्या ते पंचधातूच्या मूर्ती घडवण्याचे काम करतात. ते वडिलांच्या संग्रहाची निगा राखतात. त्यांना वडिलांनी जमा केलेल्या सर्व वस्तूंचा अभिमान वाटतो. त्यातून पुढील पिढ्यांना भारताच्या ऐतिहासिक वारशाची ओळख होईल अशी त्यांची भावना आहे. शांतिलाल पुरवार यांनी जमा केलेला तो वारसा लोकांपुढे यावा करता श्रीप्रकाश आणि त्यांचे दोन भाऊ, जयप्रकाश आणि ओमप्रकाश यांनी धडपड आरंभली आहे. त्या तिघांनी पैसे उभे करून त्या संग्रहाला ‘संग्रहालया’चे रूप देण्याचा प्रयत्न चालवला आहे. लवकरच ते संग्रहालय लोकांकरता खुले होईल.
श्रीप्रकाश पुरवार – 9423450096
(पूर्वप्रसिद्धी – दैनिक दिव्य मराठी, रसिक पुरवणी, फेब्रुवारी 2018)
– साईप्रसाद कुंभकर्ण