Home अवांतर टिपण आम्‍ही धारावीला पोहोचलो!

आम्‍ही धारावीला पोहोचलो!

वसुमती धुरू

     महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल ही त्‍या काळात आमची दैवते होती. त्यांतल्या त्यात एक पुढारी आम्हाला अगदी आपले व जास्त जवळचे वाटत. ते म्हणजे साने गुरुजी. त्यांचे भाषण मुंबईत कुठेही असेल (ते व्याख्यान म्हणत ) की आम्ही आवर्जून जात असू. आम्ही म्हणजे, मी, माझी बहीण शरयू आणि आमच्या मैत्रिणी ..

साने गुरुजींच्या आठवणी

– वसुमती धुरू

     आम्ही शाळा-कॉलेजमध्ये शिकत होतो, तो काळ देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळचा. बहुतेक सर्व विद्यार्थी देशप्रेमाने भारलेले होते. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल ही आमची दैवते होती. त्यांतल्या त्यात एक पुढारी आम्हाला अगदी आपले व जास्त जवळचे वाटत. ते म्हणजे साने गुरुजी. त्यांचे भाषण मुंबईत कुठेही असेल (ते व्याख्यान म्हणत ) की आम्ही आवर्जून जात असू. आम्ही म्हणजे, मी, माझी बहीण शरयू आणि आमच्या मैत्रिणी कुमुद व सुधा. पण आमचा गुरुजींशी प्रत्यक्ष परिचय नव्हता. तेव्हा एकदा आम्ही आमची मैत्रीण, कुमुद कुलकर्णी (शाहीर लिलाधर हेगडे यांची बहीण व कामगारनेता राजाभाऊ कुलकर्णी यांची पत्नी) हिला गळ घालून गुरुजींना प्रत्यक्ष भेटायला गेलो. ते कुठूनतरी कुठेतरी जाताना दादर स्टेशनवर दोन तास थांबणार होते. आम्ही गेलो. पण गुरुजी फार संकोची. आम्ही म्हणालो, “गुरुजी आम्हाला देशासाठी व आपल्या समाजासाठी काही भरीव काम करण्याची इच्छा आहे,” तरी आम्हांला काम द्या. ते म्हणाले, “तुम्ही सध्या काय करता?” आम्ही म्हणालो, “आमची कॉलेजची फर्स्ट इयरची परीक्षा नुकतीच पार पडली. आम्ही भाऊसाहेब नेवाळकरांकडे, ‘Bureau of Political Information’चे काम करतो. संस्थेचे नाव मोठे असले तरी आमचे काम अगदीच सोपे होते. तेथे मुंबईतील सर्व भाषांमधली रोजची वर्तमानपत्रे येत- इंग्रजी, मराठी, हिंदी व गुजराथी. आम्हांला पुष्कळ फाइल्स दिल्या गेल्या होत्या. आम्ही त्यांना वेगवेगळ्या विषयांनुसार नावे दिली होती. आम्ही वर्तमानपत्रांतून त्या त्या विषयाची कात्रणे काढायची आणि सर्व भाषांप्रमाणे फाइल्समध्ये व्यवस्थित लावून ठेवायची असे आमचे काम होते. म्हणजे पुढारी मंडळींना कोणताही संदर्भ पटकन दिसेल अशी ती व्यवस्था होती.

     साने गुरुजी म्हणाले, “ठीक आहे, शिक्षण सांभाळून काही तरी उपयुक्त काम करत आहात तुम्ही!”

     आम्ही म्हणालो, “पण गुरुजी, आम्हांला काहीतरी भरीव काम, जनतेत जाऊन करायचे आहे.”

     यावर गुरुजी काही बोलले नाहीत. हसले मात्र. मग काही दिवसांनी घैसास नावाचे एक गृहस्थ आमच्याकडे आले. त्यांनी शरयू आणि कुमुदला दादरच्या हरिजन वस्तीत (तेव्हाचा शब्द) व मला आणि सुलभाला धारावीच्या झोपडपट्टीत प्रत्यक्ष काम करण्यास पाढवले. तेथे आम्ही दोन वर्षे काम केले. आमची त्या मंडळींशी मैत्री झाली.

वसुमती धुरू – (022) 24222124. 

About Post Author

Exit mobile version