‘आदिम ते हायटेक’
आधुनिक जमान्यातील स्त्रीचे शोषण
– गीतांजली राणे
ठाणे जिल्ह्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले जव्हार हे ठिकाण म्हणजे आदिवासी क्षेत्र. याच भागातील एका आदिवासी स्त्रीची गावातील तरुणांनीच ब्लु फिल्म तयार केली. ही ब्लु फिल्म प्रत्येकी शंभर रुपयांना विकण्यात आली. जेव्हा हा प्रकार गावातील लोकांना समजला तेव्हा या स्त्रीवर अन्याय झाला म्हणून गावक-यांनी आंदोलन केले. परंतु याच गावक-यांनी नंतर ‘ही स्त्री गावाला कलंक आहे’ म्हणून तिलाही गावाबाहेर काढले. गेल्या आठ महिन्यांपासून ही स्त्री गावातील पोलिस स्टेशनमध्ये राहते. ज्या मुलांनी तिच्यावर ही वेळ आणली ती मुले मात्र गावात राजरोसपणे राहतात-हिंडतात-फिरतात. त्यातील एका मुलाचे दरम्यानच्या काळात लग्नदेखील झाले. या भागातील भाजपच्या आमदाराने तर ‘ही स्त्री आरोपी आहे आणि तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे’ असे प्रतिपादन केले आहे. गावातील लोक काहीही झाले तरी या पीडित स्त्रीला गावात घ्यायला तयार नाहीत!
लघुपट पाहिल्यानंतर उद्विग्न होऊन हा सारा प्रकार चीड आणणारा आहे असे मत आमदार निलम गो-हे यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, समाजातील इतर चांगल्या बदलांपेक्षा तांत्रिक प्रगती या दुर्गम भागातही त्वरेने पोचत आहे. कदाचित आदिवासी समाजातील स्त्री या बदलांनांच बळी पडू लागल्यात.
सुप्रिया सुळेंनी ‘मी महाराष्ट्रात राहते आणि त्या ठिकाणी असा प्रकार घडतो याची मला अत्यंत लाज वाटते’ असे मत मांडले. त्या स्त्रीला न्याय मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन असे त्या म्हणाल्या.
स्त्रीवरील अत्याचाराच्या कहाण्या नवीन नाहीत. कोणत्या ना कोणत्या प्रकारे समाजातील कोणत्याही स्तरातील स्त्री ही अत्याचारांना बळी पडत असते. मग ती गरीब असो वा श्रीमंत, सवर्ण असो वा दलित. स्त्रीवर अत्याचार हा ठरलेलाच. फक्त काळानुरूप या अत्याचारांच्या पध्दती मात्र बदलल्या. अशीच आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्याचारित झाली एक आदिवासी स्त्री. गेली आठ महिने ही पीडित महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे!
तिच्यावरील अन्यायाला वेगळ्या माध्यमातून वाचा फोडली ती युवराज मोहिते यांनी. त्यांनी या स्त्रीचे दैन्यावस्था दाखवणारा माहितीपट ‘आदिम ते हायटेक’ या शीर्षकाखाली तयार करून, तिची दुरवस्था समाजासमोर आणली आहे.
‘घोटुल’सारखी अनोखी, स्वातंत्र्य जपणारी पध्दत जगणारे आदिवासी या स्त्रीच्या बाबतीत इतके कठोर कसे झाले? हा आधुनिकतेचा परिणाम म्हणायचा का?
युवराज मोहिते यांचे मनोगत
लघुपट निर्मितीचे कारण सांगताना युवराज मोहिते म्हणाले, की मी खूप ‘डेस्परेट’ झालो होतो. त्यामुळे अशा प्रश्नांना भिडण्यासाठी, समाजासमोर त्याचा लेखाजोखा प्रखरपणे, वास्तवादी पद्धतीने मांडावा यासाठी माझा हा प्रयत्न आहे. मी माझे काम केले आहे. आता समाजाने, येथे बसलेल्या पत्रकारांनी प्रेरणा घेऊन पुढील वाटचालीस आरंभ केला तर मला आनंद होईल.
पूर्वीचे गुन्हे(क्राईम) हे इंडियन पिनल कोड (आयपीसी) याआधारे अधोरेखित होत व त्यांना त्याप्रमाणे योग्य ती शिक्षा मिळण्याची तरतूद असे. परंतु जमाना झपाट्याने बदलत गेला. आधुनिक तंत्रज्ञानाने विस्मयकारक गोष्टी निर्माण होऊ लागल्या आहेत आणि अशा या ‘हाय-टेक’च्या जमान्यात गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत आहे. त्याप्रमाणे कायद्यातही काय काय बदल करण्यात आले ते जाणून घेण्यासाठी मी या विषयात ओढला गेलो आणि त्या सुमारासच ही कथित घटना जव्हारमध्ये घडली होती. त्यासाठी मी जव्हारला अभ्यासासाठी गेलो. तिकडचे ते सर्व वातावरण पाहून मी सर्दच झालो. ‘हाय-टेक’च्या गुन्हेगारीने आपल्यापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. याची जाणीव झाली. मोबाईल, तोही कॅमेरावाला आज बहुतेकांच्या हातात खेळत आहे. पुढे तर तो सर्वव्यापी सर्वांच्याच हाती येईल. गंमती-गंमतीत लोक त्याचा वापर करतात पण त्यापुढे असणारे धोके अधिकाधिक वाढणार आहेत. त्याची जाण यावी म्हणून लोकांना सजग करणं, कायदा कसा लागू होतो त्याचं ज्ञान देणं फायद्यांच ठरणार आहे.
बलात्कारित स्त्रीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा पूर्वीच्या काळी विधवा झालेल्या बाईला जसं तिचं सर्वस्व गेल्यावर समाज वागवत होता तसा समाज तिच्याकडे बघत आहे. हा दृष्टिकोन बदलणे जरूरीचे आहे. राममनोहर लोहिया यांचे विचार या कामी महत्त्वाचे कार्य घडवतील असे वाटते. त्यांनी त्यांच्या ‘नर-नारी’ या पुस्तकात समाजाने स्त्रीच्या ‘योनि-शुचिते’ला दिलेले महत्त्व हे कसे तकलादू आहे यावर प्रकाश टाकला आहे.
बलात्कारित स्त्री, त्यातील शारीरिक अत्याचार, लैंगिक अत्याचार, यावर अभ्यास करता-करता मी याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मी त्या शोषित महिलेच्या नातेवाईकांना, गावक-यांना, राजकारण्यांना, पोलिसांना आणि समाजसेवक असलेल्यांना, दस्तुरखुद्द त्या महिलेला सुद्धा भेटलो. त्यामुळे माझ्यासमोर उभ राहिलेले चित्र पाहून मी खूपच हवालदिल झालो. हिटलरचा ‘नरसंहार’ पाहून होते तसे मला झाले होते. दोन दिवस अन्नावरची वासनाच उडाली होती. मी फार कासावीस झालो होतो आणि समाजाचा हा विद्रुप असा चेहरा दाखवण्यासाठी मी ‘समाज आरसा’ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे शोषण म्हणजे हिमनगाचे केवळ वरचे टोक आहे.
– गीतांजली राणे
भ्रमणध्वनी : 8976077747
ईमेल : rane.geet@gmail.com