अहिराणी बोलीच्या संमेलनातले डॉ. सुधीर देवरे यांचे अध्यक्षीय भाषणामधे मांडलेले मुद्दे मला पटले नाहीत.
१. देवरे यांचे प्रास्ताविक न वाचतादेखील मी त्यांचे अहिराणीमधील भाषण पूर्णपणे व्यवस्थित समजू शकलो. समजण्याकरता मला त्यांच्या प्रास्ताविकाची गरज भासली नाही.
२. भाषणावर चालू घडीच्या मराठीची छाप आहे. त्यातले काही प्राचीन दिसत नाही.
३. विशेषत्वाने खटकलेली गोष्ट अशी की Historical Linguistics या शास्त्रामधे एखाद्या भाषेला प्राचीन का म्हणावे आणि त्यातही आदिम का म्हणावे याचे जे निकष मानले जातात, ते देवरे यांच्या भाषणाला लागू पडत नाहीत.
४. बहुतेक सर्व शब्द चालू घडीच्या मराठी भाषेतल्या शब्दांचे variant म्हणावे असे आहेत. एवंच, सर्व शब्द प्रचलित मराठी शब्दांचे अपभ्रंश दिसतात.
५. ज्या भाषा किंवा बोली आदिम मानल्या जातात त्यांचा प्रमुख गुणधर्म असा असतो, की
५.त्यांमधील अनेक शब्दांची उत्पत्ती भाषाशास्त्राच्या कुठल्याही नियमानुसार लावता येत नाही. अतिप्राचीन काळातला आदिम मानव निसर्गाच्या अगदी निकट होता, म्हणून असे शब्द आदिम मानवाच्या नैसर्गिक अनुभवातून आलेले असतात. पण कित्येकदा तर त्यांचा असा नैसर्गिक स्रोतदेखील दाखवता येत नाही. उदाहरणार्थ, संस्कृतमधला ‘विष्णु’ हा शब्द घ्या. त्यावरून मराठीत ‘विष्णू’ असा शब्द आला खरा, पण मुळात या संस्कृत शब्दाला उत्पत्ती नाही. ज्याप्रकारे शंकर या शब्दाची ‘शम् करोति इति शंकरः’ अशी उत्पत्ती दाखवता येते तसे ‘विष्णू’ या शब्दाच्या बाबतीत नाही. काही वर्षांपूर्वी अग्रगण्य भाषापंडित डॉ.अशोक अकलुजकर यांच्याशी या बाबतीत माझी चर्चा झाली होती. तेव्हा ‘विष्णू’ या शब्दाला कोणत्याही प्रकारे उत्पत्ती नसल्याने तो आदिम मानायला हरकत नाही असे आमचे दोघांचे मत पडले. तरीदेखील तो शब्द वेदांत, पुराणात व इतर धर्मग्रंथांमध्ये असंख्य वेळा येतो.
६. अहिराणीतल्या सर्व वाक्यांचे व्याकरण चक्क मराठी आहे. त्यातही प्राचीनतेचा मागमूस दिसत नाही. सर्व शब्दांचे विभक्ती प्रत्ययदेखील मराठी व्याकरणातलेच आहेत. त्यातही प्राचीनतेचा मागमूस नाही.
७. प्राचीन म्हटल्या जाणार्या कुठल्याही भाषेचे व्याकरण प्रचलित भाषेसारखे नाही. प्राचीन भाषांचे व्याकरण अलिकडच्या व्याकरणापेक्षा पूर्णपणे वेगळे असते. त्यातही ज्या भाषा आदिम म्हणून गणल्या जातात, त्यांना तर व्यवस्थित मांडता येईल असे व्याकरणच नसते. व्याकरण नसल्याकारणाने अशा भाषांचे अर्थ न केवळ त्यांतल्या शब्दांनी दर्शवलेल्या संकेतांच्या अनुसार करावे लागते.
८. बोली भाषेपासून पुढे प्रमाणित भाषा आल्या हे तत्त्व फक्त प्राचीन भाषांना लागू पडते. उदाहरणार्थ, वैदिक संस्कृत भाषेपासून व त्यानंतर पुढे पाणिनीच्या व्याकरणामधे बसणारी अशी पाणिनीय संस्कृत भाषा आली. वैदिक संस्कृतातले अनेक शब्द व त्यातले व्याकरणही पाणिनीव्या व्याकरणात बसत नाही म्हणून त्याला आर्ष म्हणतात.
९. बोली भाषेपासून प्रमाणित भाषा आली हे तत्त्व अलिकडच्या बोली भाषांच्या बाबतीत खरे नव्हेच. उलट, अलिकडच्या बोली या प्रमाणित भाषांचा अपभ्रंश होऊन त्यापासून तयार झालेल्या असतात. उदाहरणार्थ, इंग्लंडमधल्या प्रमाणित इंग्रजी भाषेपासून अपभ्रंश होऊन ‘कॉकनी’ नावाची बोली भाषा तयार झाली. बोलीपासून प्रमाणित भाषा आली असे जर सार्वकालिक विधान करायचे असेल तर कॉकनीपासून प्रमाणित इंग्रजी आली असे म्हणावे लागेल व ते चुकीचे ठरेल. इंग्रजी भाषेच्या जडणघडणीमध्ये लॅटिन, कॅल्टिक या प्राचीन भाषांचा व त्याबरोबर इतर काही बोली भाषांचा समावेश आहे. त्यामधे कॉकनीचा अंतर्भाव होत नाही.
१०. मराठी भाषेच्या जडणघडणीमधे अनेकविध बोली भाषांचा समावेश झाला हे तर खरेच, पण त्या प्राचीन बोली भाषांमधे अहिराणीचा समावेश असू शकेल असे देवरे यांच्या अहिराणी भाषणावरून दिसत नाही. जेव्हा एखाद्या बोलीचा समावेश दुसर्या भाषेमधे होतो, तेव्हा कशापासून काय आले याला इनहेरिटन्स म्हणतात. पण मला तर असा इनहेरिटन्स अहिराणीकडून मराठीकडे झाला असायच्या ऐवजी मराठीकडून अहिराणीकडे झालेला दिसतो. यावरून बोली सुधारल्या तर मराठी सुधारेल हे देवरे यांचे प्रमेयदेखील बरोबर ठरत नाही. या प्रमेयाला भाषाशास्त्रीय आधार नाही.
११. अहिर लोकांची बोली म्हणून अहिराणी हे खरेच, पण अहिर हे भिल्ल नव्हेत असे जर म्हणायचे असेल, तर हे अहिर लोक कोण? ते कुठून आले? त्याबद्दलचा पुरातत्त्वीय पुरावा कोणता?
१२. देवरे यांनी त्यांच्या प्रास्ताविकामधे ‘लोकदेव’ असा उल्लेख केला आहे, पण लोकदेव कोणते ते स्पष्ट केलेले नाही. भारतातल्या आदिवासींपासून चालत आलेल्या अनेक लोकदेवांचा निकटचा संबंध अतिप्राचीन मेसोपोटेमियामधील देवदेवतांशी आहे. त्यावरून अहिर लोक अतिप्राचीन मेसोपोटेमियामधून इराणमार्गे भारतात आले असावेत की काय? इराणातल्या प्राचीन लोकांच्या व आजमितीच्या पारशी लोकांच्या ‘झेन्द अवेस्ता’मधील देव अहुर मझ्द आहे. त्यावरून अहुर आणि अहिर यांच्यामधे काही परस्पर संबंध असू शकेल का? असे प्रश्न माझ्या मनात येतात. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याकरता अर्वाचीन अहिराणीच्या अगोदरची, म्हणजे प्रोटो-अहिराणी बोली काय होती याचा शोध घ्यावा लागेल. देवरे यांच्या भाषणातली अहिराणी अर्वाचीन अहिराणी दिसते. प्रोटो-अहिराणी नव्हे. मला बोलींसंबंधातला सर्व प्रकार उलट्या दिशेने चाललेला व म्हणून प्रतिगामी वाटतो. आपण सर्वांनी पुरोगामी व्हायला हवे आणि बोलीकडून प्रमाणित भाषेकडे जायला हवे. प्रमाणित भाषेकडून बोलीकडे नव्हे!
डॉ. अनिलकुमार भाटे
निवृत्त प्राध्यापक, विद्युत अभियांत्रिकी,
संगणक विज्ञान, आय-टी आणि मॅनेजमेण्ट
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका