नारकर हे मूळ राजापूर तालुक्यातील पडवे गावचे. ते अमेरिकेत स्थायिक असले तरी गावी मुलाबाळांसह अधूनमधून येत-जात असतात. त्यांच्या मुलीचे नाव संजना तर मुलाचे नाव श्री. संजना व श्री एका उन्हाळ्याच्या सुटीत गावी आले असता, एक गोष्ट संजनाच्या लक्षात आली, ती म्हणजे गावात केवळ त्यांच्याच घरच्या विहिरीला पाणी आहे व त्यामुळे गावकऱ्यांची तेथून पाणी नेण्यासाठी अखंड गर्दी असते. नारकरही त्यांना कधी अडवायचे नाहीत.
अमेरिकेत जन्मलेल्या, वाढलेल्या नारकरांच्या मुलांना त्यामागचे पाणीटंचाईचे, दुष्काळाचे वास्तव माहीत असण्याचे कारण नव्हते. स्थानिकांची पाण्यासाठी वणवण असे. त्यांनी त्यांच्या वडिलांना त्याबाबत विचारले असता नारकरांनी त्यांना पाणीटंचाईविषयी सांगितले. तेव्हा त्यांच्या मुलांनी त्यांना प्रश्न केला, की तुम्ही त्या लोकांना विहिरी बांधून देऊ शकत नाही का? तेव्हा नारकरांनी सांगितले, की त्यासाठी खूप पैसे हवेत ! त्यावर मुलांनी त्यांना विचारले, की ‘समजा, आम्ही तुम्हाला पैसे जमवून दिले तर तुम्ही कराल का विहिरींचे काम?’ त्यावर नारकरांनीही त्यांना सहजपणे होकार दिला.
ते कुटुंब गावाहून अमेरिकेला परत गेले, पण मुलांच्या डोक्यातून तो विषय गेला नाही. त्यांनी ‘डेव्हलपमेंट ऑफ रुरल महाराष्ट्र’ (www.dormindia.org) या नावाने एका एनजीओची स्थापना केली. त्यांनी स्वतः गाड्या धुणे, आइस्क्रीम विकणे अशी कामे करून निधी उभारलाच. शिवाय, त्यांची मित्रमंडळी, फेसबुकवरील फ्रेंड्स यांच्याकडूनही निधी जमा केला. एका व्यक्तीकडून एक डॉलर ते पाच डॉलर अशा पद्धतीने त्यांनी जवळ जवळ दोन लाख रुपयांचा निधी जमवला. त्यांनी राजापूर तालुक्यातील सोगमवाडीत एक विहीर २००८मध्ये खोदून दिली आणि पडवे- टुकरुलवाडी या टंचाईग्रस्त गावात एक विहीर एप्रिल २०१३मध्ये बांधून दिली. त्यांच्या वडिलांनी त्यांना त्या कामी पूर्ण प्रोत्साहन दिले आणि स्थानिक पातळीवर आवश्यक त्या मंजुरींची पूर्तता करवून घेण्यासाठी प्रयत्न केले.
त्या प्रकल्पाच्या यशामुळे आनंदित झालेल्या नारकर भावंडांनी आता तीव्र दुष्काळग्रस्त विदर्भ-मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विहिरी खोदून देण्यासाठी निधी उपलब्ध करण्याचा निर्धार केला आहे.
सुनील नारकर यांनी त्यांचा व्याप सांभाळत मुलांच्या सामाजिक जाणिवेला ज्या पद्धतीने जपले आहे, ती रीत स्पृहणीय अशीच आहे. भारतात विहीर खोदण्यासाठी केवळ पैसे असून भागत नाही, तर अन्य शासकीय सोपस्कारही पार पाडावे लागतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर कोणी पुढे आले तर त्यांना मदत करू, असे नारकर यांनी त्या मुलाखतीत सांगितले. विदर्भ-मराठवाड्यातून अशा प्रकारे विहिरी खोदण्यासाठी निधीची मागणी करणारी सात ते आठ प्रपोजल त्यांच्याकडे आल्याचेही त्यांनी सांगितले आणि त्या सर्वांना एकदम शक्य झाले नाही, तरी टप्प्याटप्प्याने का असेना, न्याय देण्याची, मदत करण्याची त्यांची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरी गोष्ट म्हणजे १९७२चा दुष्काळ पडला, तेव्हा आम्ही या भूतलावर अवतीर्ण झालेलो नव्हतो, पण वाडवडिलांच्या सांगण्यानुसार त्यावेळी राजा आणि रंक एकमेकांमधील सामाजिक दरी विसरून एकाचवेळी दुष्काळी कामांवर जात राहिले आणि त्यावेळी झालेल्या या एकीमुळे आणि लोकशक्तीच्या संघटनामुळेच खऱ्या अर्थाने त्या दुष्काळावर मात करता आली. पण आता तशी परिस्थिती राहिली आहे का? कितीही दुष्काळ पडला तरी दुष्काळी कामे निघत नाहीत, निघाली तरी तिथे कोणी जात नाही. असे का होऊ लागले आहे? कोणतीही आपत्ती, संकट कोसळले तरी प्रत्येक गोष्टीसाठी सरसकट सरकारला जबाबदार धरण्यात येऊ लागले आहे. ‘सरकारने पाहून घ्यावे,’ किंवा ‘ती सरकारची जबाबदारी आहे’, येथपासून ते ‘सरकार काय झोपा काढते आहे का?’ एवढे म्हणत रस्त्यावर उतरले, की तिथे लोकांची सामाजिक जबाबदारी संपते. पुढचे सरकारने पाहून घ्यावे अशी भावना जनमानसात खोलवर रुजली आहे किंवा रुजवण्यात येते आहे. सरकारकडे पाहण्याचा ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ असा लोकांचा दृष्टीकोन बनला आहे. तो मुळातच चुकीचा आहे. मुळात सरकार म्हणजे दुसरे-तिसरे कोणी नसून आपणच आहोत, ही गोष्टच नागरिक विसरून चालले आहेत की काय असे वाटू लागले आहे. सरकारवर सारी जबाबदारी ढकलण्याच्या नादात लोकांना त्यांच्या क्रयशक्तीचाच विसर पडू लागला आहे, की काय असाही दुसरा प्रश्न पडला आहे.
आज लोक विहिरीला निधी मिळावा म्हणून नारकरांकडे हात पसरत आहेत. नारकरांनीही दिलदारपणाने हातचे राखून न ठेवता मदतीची तयारी ठेवली आहे, प्रत्यक्ष कृतीतही उतरवले आहे. पण असे वाटते, समजा गावपातळीवर ग्रामस्थांनीच एकत्र येऊन श्रमदानातून विहीर खोदायची ठरवली, तर अशक्य आहे काय? नक्कीच नाही. पण अलीकडच्या काळात तसे क्वचितच घडताना दिसत आहे. रोजगार हमी योजनांमध्ये बनावट लाभार्थी दाखवून भ्रष्टाचार होत असल्याचे कॅगच्या अहवालात म्हटले आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या कामांची टक्केवारी एक तृतियांशाहून (३०%) खाली आली आहे. त्याचे कारण काय? त्या दोन्ही गोष्टींना कारणीभूत लोकच आहेत. कारण हल्लीच्या काळात श्रमप्रतिष्ठेच्या मूल्याची घसरण होऊ लागली आहे. गावाकडेही उपलब्ध साधनसामग्रीमध्ये सोफिस्टिकेटेड म्हणजे थोडक्यात अंगाला काही लावून न घेता राहण्याची चैनीखोरी बळावू लागली आहे. राजकीय लाभापोटी त्यांच्या त्या सवयीला खतपाणी घालण्याचे कामही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होऊ लागले आहे. त्यामुळे लोक मात्र त्यांच्या शक्तीची जाणीव विसरून जात आहेत. हे भविष्याच्या दृष्टीने घातक असणारे चित्र आहे. सध्याचे ग्लोबल वार्मिंग पाहता गंभीर दुष्काळ येतच राहणार आहेत, पण त्यांना सामोरे जाण्याची, त्यांचा मुकाबला करण्याची लोकांची उपजत, नैसर्गिक प्रवृत्ती मात्र ते हरवून बसणार आहेत. त्यातून ती तीव्रता अधिक भासत राहणार आहे. त्यामुळे लोकांनी वेळीच त्यांच्या क्षमतेची जाणीव ठेवून जनसहभागातून अशा नैसर्गिक वा कृत्रिम संकटांचा सामर्थ्याने मुकाबला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यातून नारकरांसारख्या उदात्त भावनेने मदत करणाऱ्यांनाही हुरूप येईल आणि अशा हजारो नारकरांचे हात मदतीसाठी पुढे सरसावतील. तेव्हाच सुनील नारकर आणि त्यांच्या मुलांच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज केल्यासारखे होईल.
(सुनील नारकर यांचे हे काम पुढे स्थगित झाले असे त्यांनी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’सोबतच्या इमेल पत्रव्यवहारात कळवले आहे. – संपादक)
– आलोक जत्राटकर
देणार्याने देत जावे घेणार्
देणार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे घेताघेता एक दिवस देणार्याचे हात घ्यावे
अतिशय छान कल्पना
अतिशय छान कल्पना
Nice
Nice
Great work
Great work
Comments are closed.