अरुण साधू स्वत:मध्ये हरवलेला असतो याबद्दल आम्हा मित्रमंडळींत कुतूहल असे. त्याविषयी गप्पागोष्टी होत- कधी गंमतदेखील केली जाई. मग त्यातून किस्से घडत. साधू ते सारे निर्लेप भावनेने, पुन्हा स्वमग्न राहातच, बहुधा ‘एंजॉय’ करी. आम्हाला ती आमची मैत्रीतील गोष्ट वाटे. पण ती जगजाहीर आहे असे जेव्हा दोन आठवड्यांपूर्वी ध्यानी आले तेव्हा मला आश्चर्यच वाटले, कारण साधू स्वत:चे गुणविशेष लपवण्यातही तरबेज आहे. झाले असे, की त्याला जनस्थान पुरस्कार जाहीर झाला तेव्हा आमच्या चेंबुरातील त्याच्या चाहत्या वाचक स्त्रीने माझ्या समोर त्याला फोन लावला आणि सांगितले, की तुमच्यासारखे स्वमग्न जे दोन-तीन मराठी लेखक आहेत, त्यांना एकत्र एका दालनात बसवायचे आणि आम्ही साहित्यप्रेमींनी वर गच्चीत बसून, तुमच्या गप्पा काय चालतात (किंवा तुम्ही सारे मौनातच तेथे कसे नांदता) ते पाहायचे, असा कार्यक्रम मला करायचा आहे. तशी जागा माझ्याकडे आहे. केव्हा येता ते बोला!
मीच धास्तावलो. म्हणजे तो टीव्हीवरील ‘बिग बॉस’सारखा खेळ झाला, की! पण साधूचे व्यक्तिमत्त्व असे जबरदस्त आहे, की तो त्याला रुचले नाही तरी आला प्रसंग पूर्ण क्षमतेने निभावून नेतो. तशी वेळ ओढवली तेव्हा त्याने कित्येक वर्षांपूर्वी आमच्या नेहरुनगरच्या गणेशोत्सवाच्या नाटकात काम केले होते व तेवढ्याच सहजतेने, वेळ आली तेव्हा त्याने काही वर्षांपूर्वी ‘फ्री प्रेस जर्नल’ची एडिटरशिप पूर्ण आव्हानाने पेलली. तेवढेच कशाला, तो पत्रकार म्हणून मोठमोठ्या राजकारण्यांना, उच्चपदस्थ व्यक्तींना भेटतो, गटात चर्चा करत असतो, समुदायात वावरत असतो तेव्हा मी निरखून ठेवले आहे, की ते प्रसंग व्यवस्थित पार पडतात, परंतु तो तेथे ‘असतोच’ असे नाही, मात्र समोरच्या व्यक्तीतील, गटातील, समुदायातील उत्तम गुण त्याने पारखलेले असतात आणि बाकी लौकिकाचे सारे सोडून देऊन तो स्वत:च्या विचारविश्वात हरवून गेलेला असतो; त्याच्याबरोबर कुटुंबीय असोत वा आमच्यासारखे मित्र असोत तो सद्गृहस्थाप्रमाणे औपचारिकता जपतो आणि त्याच वेळी स्वत:च्या विश्वात गुंग असतो.
त्याचा अर्थ, प्रतिभावान कवी-लेखक जसे त्यांच्या स्वत:च्या कल्पनाविश्वाची मिजास मारतात व त्यांचे ते जग सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या पलीकडचे आहे असे सुचवतात; तशी धारणा साधूची आहे का? तर मुळीच नाही! तो सर्वसामान्यांना अधिक धार्जिणा आहे. तेच त्याचे बलस्थान आहे. तो माणूस म्हणून सर्वसामान्य राहू पाहतो; तशी त्याची अतोनात इच्छा असते, पण तो लेखक म्हणून असाधारण ताकदीचा आहे; किंबहुना त्याच्या तोडीची वैश्विक जाणीव मराठीतील कोणा लेखकात मला आढळलेली नाही आणि त्याची स्थानिक सभोवतालाची जाणीव परिपक्व होत गेलेली आहे.
साधू या जगण्याचा, या विश्वाचा शोध घेत निघाला आहे आणि त्या ओघात, त्याने त्याच्या कथा-कादंबऱ्यांमधून जीवनाचे जसे तुकडे पकडले तसे तत्त्वज्ञानपर सखोल भाष्यही केले आहे. मनुष्यासहित प्राणिमात्राची जगण्याची जी लालसा आहे ती त्याला लेखक म्हणून मोह घालते आणि ती विविध पैलूंसह पकडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. ते त्याच्या ‘मुंबई दिनांक’ या पहिल्या कादंबरीपासून जाणवते. वरकरणी, ती मुंबईच्या जीवनाचा काहीशा थ्रिलर पद्धतीने वेध घेते व त्यामुळे ती वाचनवेधक बनते, पण खोलवर, ती मनुष्याला, त्याच्या सभोवतालाला – त्यामधील प्रतिकुलतेला व तरीही जगत राहण्याच्या त्याच्या धडपडीला भिडते. त्याच्या विचारचिंतनाचा तोच धागा सतत घट्ट होत गेला आहे. त्याच्या त्या विचारविश्वाची सखोलता ‘फोकस्ड’ पद्धतीने त्याच्या अलिकडच्या, दोन वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या ‘नैनम् छिंदन्ति शस्त्राणि’ या कथेत मार्मिक रीत्या व्यक्त झाली आहे.
त्याच्या कादंबरीलेखनाइतक्याच उत्कटतेने त्याचे कथालेखन सुरू होते. ‘झिपऱ्या’, ‘विप्लवा’ या प्रथम कथा म्हणून अवतरल्या. परंतु ‘झिपऱ्या’ने कथामालिका स्वरूपात कादंबरीचा आकार घेतला. मला आठवते, आम्ही ‘ग्रंथाली’तर्फे त्या बेताला डॉ. यशवंत केवळे या, बुटपॉलिश करून शिकलेल्या व अकाली अपघाती मृत्यू पावलेल्या तरुणाची कहाणी (लेखिका – मंगला केवळे) प्रसिद्ध केली होती. तिचा बराच बोलबाला झाला तो केवळे यांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रेरकतेमुळे. साधू तेव्हा स्वतंत्रपणे कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म सात-आठ-नऊवरील भटक्या मुलांचे जीवन टिपत होता. त्या मालिकेतील कथा अंतराअंतराने प्रसिद्ध होत गेल्या. गंमत अशी वाटते, की ‘त्रिशंकू’मधील महत्त्वाकांक्षा जागृत झालेली दलित नायिका एका बाजूला आणि दयनीय जिणे खेळकरपणे जगणारी आणि जगण्याची जिद्द न हरवलेली रेल्वे स्टेशनातील ती अनाथ, बेवारस मुले दुसऱ्या बाजूला… साधू जग किती जाणत होता! बाप रे बाप! त्यामुळेच त्याच्या साऱ्या लेखनात मानवी करुणा ओतप्रोत भरलेली भासते. मदर टेरेसा यांचे व्यक्तिरूप मनी साकारल्याने जो भाव जागा होतो, तोच भाव! संतांची परमेश्वरचरणी एकरूपता आणि येशूची मानवाप्रती सहृदयता या दोन्हीचा अपूर्व संगम साधूच्या लेखनात दिसतो आणि महत्त्वाचे म्हणजे ते सारे अस्सल मानवी भावभावनांचे सामाजिक जग असते.
अरुण साधू याचा लेखक म्हणून विकास परिपूर्णतेच्या दिशेने आहे. त्याची ‘चे गव्हेरा’, ‘…आणि ड्रॅगन जागा झाला’ यांसारखी आरंभीची पुस्तके तरुणांमध्ये नवचैतन्य जागवणारी ठरली. त्याने हंसा वाडकरच्या व्यक्तिमत्त्वातील जिव्हाळा व संवेदना कायम ठेवत तिचे आत्मकथन ‘सांगत्ये ऐका’ या शीर्षकाने ज्या तटस्थतेने नोंदले त्यामुळे त्याच्यातील ललित लेखनकौशल्याचे गुण प्रकट झाले आणि त्यापुढे त्याचे कादंबऱ्यांचे, कथांचे, चरित्रलेखनाचे, अनुवादाचे, वैचारिक (निश्चिततेच्या अंधारयुगाचा अंत व चीन-रशिया संबंधीची पुस्तके), नाट्य (पडघम) असे वेगवेगळ्या फॉर्ममधील लेखन प्रसिद्ध होत गेले. येथे त्याच्या लेखनशैलीचा मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. त्याची शब्दयोजना समर्पक असते हे तर स्वाभाविक आहे, पण त्याच्या भाषेत संस्कृतप्रचुरतेपासून आजच्या सरमिसळ मराठीपर्यंतचे विविध आविष्कार गरजेनुसार योजले गेलेले दिसतात. विशेषत: तो पल्लेदार, अनेक वाक्यांशांची गुंतागुंत असलेली लांबलचक वाक्ये लेखनात लीलया उपयोजतो तेव्हा अचंबाच वाटतो! ती भाषाशैली तो शिकला कोठे? आणि त्याने ती कमावली केव्हा? त्याने ‘सुटेबल बॉय’चे भाषांतर करताना सहजपणे पद्यरचना केली आहे!
प्रत्येक चांगल्या लेखकात असते तसे उत्तम संपादन कौशल्य त्याच्या अंगी आहे. त्यात तो पत्रकार असल्याने त्याच्या हातात व डोक्यात सतत कात्री असते. तो स्वत:ची पुस्तके संपादित करतोच, परंतु त्याने इतर अनेक लेखकांना त्या कामी मदत केलेली आहे; भले मोठमोठे मराठी-इंग्रजी ग्रंथ रात्र रात्र जागून संपादित केले आहेत. अशा वेळी त्याचा कामाचा उरक व झपाटा पाहून घ्यावा असाच असतो.
अरुण साधू आहे विदर्भाकडचा – अमरावती जिल्ह्यातील परतवाड्याचा. तिकडील सर्व मंडळींप्रमाणे त्याचा कुटुंबकबिला मोठा. त्यामुळे यांचे तिकडे जाणे आणि तिकडील मंडळींचे इकडे येणे असे सारखे चालू असते. साधू तो गृहस्थधर्म उत्तमरीत्या निभावतो ते त्याची पत्नी अरुणा हिच्या पुढाकाराने. मला विशेष वाटते, ते असे की त्याच्या दोन्ही मुली – सुवर्णा व शेफाली या कर्तबगार निघाल्याच. दोघींच्या अंगी साधूचे लेखनगुण आल्याचे जाणवते. शेफाली टेलिव्हिजन शोच्या व्यवसायात आल्याने तिला लिहावे लागतेही आणि सुवर्णाची दिल्लीत वाढणारी मुलगी तन्वी दहावी-बारावीत असतानाच अलौकिक दर्ज्याच्या इंग्रजी कविता लिहिते. तर दुसरा नातू वेद शालेय पातळीवर टेनिसच्या मॅचेस मारतो. त्यांना हे ‘जिन्स’ साधूकडून प्राप्त झाले असेच म्हणायचे.
साधू जनस्थान पुरस्काराने प्रकाशझोतात आला याचा आम्हा मित्रमंडळींना खूप आनंद वाटला. यापूर्वी तो नागपूरच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाला तेव्हाही आम्ही असेच हरखून गेलो होतो व झुंडीने नागपूरला पोचलो होतो. हर्षोत्साह यासाठी की मुख्य प्रवाहातील अस्सल मराठी साहित्याचा हा सन्मान आहे. अशा सर्व मानसन्मानांवर मात वाटेल अशी श्रेयाची गोष्ट साधूच्या बाबतीत अलिकडेच घडून आली व तीदेखील नाशिकलाच – जेथे त्यास जनस्थान पुरस्कार दिला जाणार आहे. प्रसिद्ध मराठी समीक्षक मीना गोखले यांनी अरुण साधू याच्या निवडक कथा संपादित केल्या आहेत. पुस्तकाचे शीर्षक अत्यंत समर्पक आहे – ‘कथा युगभानाची’. त्या पुस्तकाचे प्रकाशन गेल्या महिन्यांत नाशिकला झाले. त्याच्या प्रस्तावनेत मीना गोखले सूचित करतात, की अरुण साधू यांच्या कथेतून द्रष्टेपणाची अपूर्व रंगरूपे गवसू शकतात! डॉ. श्रीराम लागू विजय तेंडुलकर यांच्याबाबत म्हणाले होते, की त्यांच्या नाट्यकृतींनी आमच्या पिढीच्या जीवनास अर्थ दिला. त्यांच्या नंतरच्या दोन-अडीच पिढ्यांना अरुण साधूबद्दल तेच म्हणता येईल! त्याचे लेखन म्हटले तर या काळाचा दस्तऐवज आहे, पण त्याचबरोबर ते एकूण मानवी जीवनाच्या संदर्भातही मोलाचे दिशादर्शन करते. म्हणून तो या युगाचा लेखक ठरतो. त्याने त्याच्या साहित्यातून आपला गेल्या पन्नास वर्षांचा काळ मानवी जीवनेतिहासाशी जोडला आहे.
– दिनकर गांगल
(पूर्वप्रसिद्धी ‘महाराष्ट्र टाईम्स’ 22 फेब्रुवारी 2015)
उत्तम . श्री . दिनकर गांगल
उत्तम. श्री . दिनकर गांगल यांच्यामुळे श्री. अरुण साधू यांचा थोडाफार सहवास लाभला . १९६८-६९ च्या काळात पुण्यात ते माझ्या घरी जेवावयास आले होते. त्या दिवशी माझी पहिली कथा छापून आली होती. एवढ्या मोठ्या लेखकाला हे सांगू नये असे मला वाटले. पण माझ्या सौ. ने कथा त्यांना दाखविली. कथा वाचून ते म्हणाले “कथा कशी असावी हे सर्व गुण इथे दिसतात. तेव्हा कथा लिहिल्यावर कोणालाही दाखवू नकोस, पाठवून देत जा. त्यामुळे मी ४०-५० कथा लिहू शकलो. साधू हे तुमच्या मुळे घडले.
Comments are closed.