आपल्याकडे एकूण चित्रकलेची आणि व्यंगचित्रांची जाण कमी आहे. शंभर वर्षे होऊन गेली तरीही वाचक-प्रेक्षक चित्र जसेच्यातसे अपेक्षित करतात किंवा व्यंगचित्र ढोबळ असले तरी आनंद मानतात. जीवन गुंतागुंतीचे होत जाते तेव्हा कला अधिकाधिक सूक्ष्म होत जाते, हा साधा विचार त्यांना स्पर्श करतो असे वाटत नाही. त्यामुळे चित्रकला व त्याचा एक विभाग व्यंगचित्रकला याबद्दलची साक्षरता वाढली पाहिजे असे वाटते.
‘व्यंगचित्रे’ या विषयावरील तीन वेगवेगळ्या दृष्टीकोनातील लेखन ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध करत आहोत. व्यंगचित्र कलेचा प्रवास, त्या कलेशी संबंधित असलेल्या व्यक्ती असे स्वरूप मांडत असताना नुकत्याच झालेल्या व्यंगचित्र वादावरील एक टिपण येथे उद्धृत करत आहोत.
‘व्यंगचित्रांची शंभर वर्षे’ या लेखात व्यंगचित्रांच्या भारतातील प्रसारापासून गेल्या शंभर वर्षांतील महत्त्वाचे व्यंगचित्रकार, मराठीतील व्यंगचित्रकला, वर्तमानातील व्यंगचित्रकार आणि त्यांची अभिव्यक्ती अशा विविध गोष्टींची माहिती दिनकर गांगल यांच्या लेखात समाविष्ट करण्याचा आली आहे. व्यंगचित्र जमवण्याचा छंद जोपासणारे नांदेडमधील मधुकर धर्मापुरीकर यांची माहिती देणारा ‘व्यंगचित्रांचा साक्षेपी संग्राहक’ हा लेख विशेष वाटतो. धर्मापुरीकरांनी त्या छंदापोटी देशोदेशींची सुमारे लाखभर चित्रे जमवली असून ती वर्गवारी करून जतन केली आहेत. ते आपल्या लेखनातून आणि ‘व्यंगचित्रांची दुनिया’ या कार्यक्रमातून समाजाचे व्यंगचित्रे वाचण्याचे भान जागृत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानंतरचा लेख आहे तो सुरेश सावंत यांचा! ‘व्यंगचित्र आणि जाणत्यातील व्यंग’ या मथळ्याखाली लिहिलेल्या या लेखात शंकर पिल्लई यांनी काढलेल्या व्यंगचित्रांवरून वर्तमानात वाद निर्माण होण्याची कारणे आणि विशिष्ट सामाजिक मनःस्थिती स्पष्ट करण्याचा प्रयत्न सावंत यांनी केला आहे.
या तीन लेखांमध्ये विविध व्यंगचित्रकारांचा, त्यांच्या कार्याचा उल्लेख आलेला आहे. त्यांपैकी उपलब्ध माहितीची जोड या लेखांना देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. मात्र अनेक व्यंगचित्रकारांबद्दल महाजालावर लेखन उपलब्ध नसल्याचे आढळले. त्या व्यंगचित्रकारांची, तसेच महाराष्ट्रातल्या विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींची माहिती संकलित करून, तपासून ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर सादर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या प्रयत्नांना तुम्हा वाचकांच्या सहकार्याची गरज आहे. याकरता विनंती अशी, की तुम्हाला शक्य त्या व्यक्तींची, त्यांच्या कार्याची माहिती लिहून ‘थिंक महाराष्ट्र’कडे पाठवावी. याकरता खाली नमूद केलेल्या ईमेल किंवा दूरभाष क्रमांकांवर संपर्क साधावा.
– किरण क्षीरसागर
मोबाईल – ९०२९५५७७६७
दूरध्वनी – ०२२-२४१८४७१०
ईमेल – thinkm2010@gmail.com