अक्षयने २०११ साली ऑस्ट्रेलियात भरलेल्या ‘साल्सा ओपन’ या राष्ट्रीय नृत्य स्पर्धेत भाग घेऊन जिद्द आणि महत्त्वाकांक्षा यांच्या जोरावर स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला. अक्षय म्हणाला, “स्पर्धेत भाग घेतल्यानंतर मला खूपच टेन्शन आले होते. मात्र स्पर्धा जिंकायचीच या एका विचाराने मी भारावलो गेलो होतो. त्यामुळेच अंतिम स्पर्धेत मी अपेक्षित यश मिळवू शकलो.” त्यानंतर अक्षयने बंगळुरू येथील ‘लॅटिनो ह्रिदम्स डान्स अकादमी’ने आयोजित केलेल्या गोवा आंतरराष्ट्रीय लॅटिन फेस्टिवलमध्येही भाग घेतला होता.
साल्सा हा क्युबा देशातून उगम पावलेला नृत्यप्रकार. युरोपीय व आफ्रिकी संस्कृतींमधील संगीत व तालपरंपरांच्या प्रभावातून साल्सा नृत्यप्रकार अस्तित्वात आल्याचे मानले जाते. तो काळ १९२०च्या आसपासचा असावा. त्या नृत्यप्रकारावर क्युबीयन पौराणिक नृत्यांचा प्रभाव जाणवतो. साल्सा ही प्रामुख्याने जोडीने नृत्य करण्याची नृत्यशैली आहे. वर्तमानातील साल्सा हा लॅटिन अमेरिका आणि पाश्चिमात्य देश यांमधील प्रभावांचे मिश्रण आहे. त्या क्युबा शैली (कॅसिनो), न्यू यॉर्क शैली (मम्बोल ऑन टू), लॉस एन्जेमलिस शैली (ऑन वन), कोलंबिया साल्सा आणि मियामी साल्सा इत्यादी शैली आहेत. साल्सा हा लॅटिन अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया या प्रदेशात मुख्यत:, पण एकूण जगभर लोकप्रिय असलेला नृत्यप्रकार आशिया खंडातही वेगाने रसिकप्रिय होत आहे.
साल्साकडे आकर्षित होण्यापूर्वी अक्षयला विविध कलाप्रकारांमध्ये रस होता. तो सांगतो, “मी चांगली चित्रे काढत असे. तायक्वानदोचे प्रशिक्षण घेत असे. बास्केटबॉल खेळत असे. मला घोडेस्वारी आणि संगीत यांचीही आवड होती. मला या सर्व गोष्टी साल्सामध्ये उपयोगी ठरल्या. संगीतामुळे मला ह्रिदमचे ज्ञान झाले. चित्रकलेमुळे मला लक्ष एकाग्र करण्यास मदत झाली. तायक्वानदो-बास्केटबॉलमुळे माझ्या शरिरात चपळता आणि लवचीकता निर्माण झाली.”
अक्षयच्या कुटुंबात त्याच्या वडिलांसोबत त्यांची आई कमल, त्याचा भाऊ राकेश आणि बहीण रिंकू आहे. भाऊ राकेश वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदत करतो. मात्र वडिलांनी त्याच्यावर साल्सा सोडून व्यवसायात सामिल होण्याची अपेक्षा कधीच व्यक्त केली नसल्याचे अक्षय सांगतो. कुटुंबातील सर्व व्यक्तींचा पाठिंबा त्याला महत्त्वाचा वाटतो.
अक्षयच्या ऑस्ट्रेलियातील यशाबद्दल पुण्यातील ‘पुण्यभूषण फाउंडेशन’ या संस्थेने एका खास कार्यक्रमात त्याचे कौतुक केले. पुण्याच्या महापौरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. अक्षय म्हणतो, की साल्सा नृत्याप्रकाराच्या अभ्यासक्रमात सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे त्याला पुढील काही वर्षे साल्सामधील विविध गोष्टी शिकायच्या आहेत. जगभरातील स्पर्धांमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्यानंतर भारतात परतून येथे साल्सा नृत्यप्रकार रूजवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचा त्याचा मानस आहे. त्याची त्याने साल्साबद्दल मिळवलेले ज्ञान इतरांपर्यंत पोचवण्याची इच्छा आहे. भारतातील साल्साचा अभ्यासक्रम जुना असून जगातील विविध प्रदेशांतून साल्सामध्ये होणारे बदल वेचून भारतातील अभ्यासक्रम अधिक अद्यावत करण्याचाही त्याचा प्रयत्न असेल, असे अक्षय सांगतो.
अक्षय उणेचा,
८३८०८४९३४३
akshayunecha@hotmail.com
– श्रीकांत ना. कुलकर्णी