स्वस्तिक हे भारतीय परंपरेत चतुर्विध पुरुषार्थाचेही सूचक मानले आहे. चारही युगांत स्वस्तिक चिन्ह अक्षुण्ण राहते अशी भारतीयांची श्रद्धा आहे.
स्वस्तिकाचा प्रचार भारतातच नव्हे, तर जगभरच्या बहुतेक देशांत आढळतो. सर्वांत प्राचीन अशा पाषाणयुगापासून स्वस्तिकाचा प्रयोग दृष्टीस पडतो. विदेशांत उत्खननांतून बाहेर काढलेल्या कित्येक वस्तूंवर स्वस्तिक चिन्ह आढळते. मोहेंजोदडोच्या उत्खननातही ते सापडले आहे.
स्वस्तिक हे मानवाने निर्माण केलेले सर्वांत पहिले धर्मप्रतीक मानतात. पाऊस पाडणारा इंद्र, मेघांचे संचालन करणारा वायू, प्रकाश आणि उष्णता देणारा सूर्य, मानवाच्या भल्याबु-या वर्तनावर आणि शुभाशुभ कर्मांवर नजर ठेवणारा वरुण अथवा तत्सम दुसरा कोणी तरी देव, ही भूतदात्री वसुंधरा, अशा अनेक देवतांचा स्वस्तिकात एकत्र समावेश झालेला आहे. ते प्रतीक देवतांची शक्ती आणि मानवाची शुभकामना या दोहोंच्या एकत्र सामर्थ्याचे आहे.
एक उभी रेषा आणि तिच्यावर तेवढ्याच लांबीची दुसरी आडवी रेषा, अशी याची मुळातली आकृती आहे. उभी रेषा ही ज्योतिर्लिंगाची प्रतिनिधी आहे. ज्योतिर्लिंग हे विश्वोत्पत्तीचे मूळ कारण होय. आडवी रेषा ही सृष्टीचा विस्तार दर्शवते.
स्वस्तिकाचे डावे आणि उजवे असे दोन प्रकार आहेत. ज्यांच्या भुजांची अग्रे डावीकडे वळवली जातात ते डावे आणि उजवीकडे वळवली जातात ते उजवे. डावे स्वस्तिक कालीचे द्योतक असून, उजवे स्वस्तिक गणेशाचे चिन्ह आहे. महाराष्ट्रात डावे स्वस्तिक रूढ असून, ते प्रदक्षिणा मार्गाला धरून आहे. स्वस्तिकाचे तत्त्वज्ञान ‘सिद्धांत-सार’ नावाच्या ग्रंथात सांगितले आहे. स्वस्तिकाचा मध्यबिंदू हा विश्वाचा गर्भाशय आहे. त्याचेच नाव सत्. हा मध्यबिंदू जेव्हा रेषांत विस्तार पावतो आणि त्याचा जो व्यास बनतो, ते लिंगरूप तत्त्व होय. ते महायोनीत उत्क्षोभ निर्माण करते आणि उत्पत्तीला प्रेरणा देते. जेव्हा त्यातील रेषा शूलाचा आकार घेतात, तेव्हा जड आणि चेतन अशा अगदी भिन्न तत्त्वांचे अद्भुत मिश्रण होते आणि त्यातून नामरूपात्मक विश्व उदय पावते.
बौद्ध आणि जैन यांनीसुद्धा स्वस्तिक हे पूज्य मानलेले आहे. बौद्धांनी स्वस्तिकापासून पाने आणि फुले यांची उत्पत्ती कल्पिली आहे. बौद्धांच्या उपासनेत स्वस्तिकाची अनेक रूपे आढळून येतात. ते मलाया, जावा, चीन इथपर्यंत जाऊन पोचले आहे. चीनमधील मंदिरे, धवळारे आणि धर्मग्रंथ यांवर स्वस्तिकाच्या आकृती काढलेल्या असतात. बौद्ध मंदिरांतून प्रकाशाची पखरण करणार्या दिव्यावरही ते आरूढ होऊन बसले आहे.
जैन लोक जेव्हा एखाद्या देवाचे दर्शन घेतात तेव्हा देवापुढे स्वस्तिक काढून त्यावर दक्षिणा ठेवतात. जैन स्त्रियांना तर स्वस्तिक चिन्ह इतके प्रिय आहे, की देवदर्शनासाठी जाताना त्या ज्या पिशवीतून तांदूळ वगैरे नेतात, तिच्यावरही कशिद्याने स्वस्तिकाची आकृती काढलेली असते.
इरावती कर्वे लिहितात-
महाराष्ट्राच्या दक्षिणेस गेल्या काही वर्षांच्या उत्खननात द्रविडांची विशिष्ट तर्हेची थडगी सापडली आहेत. मोठमोठे शिलापट्ट स्वस्तिकावर एकमेकांशी जोडून, एक पेटी तयार करून त्यात मृतांचे अवशेष ठेवलेले आढळतात.
स्वस्तिकाचा अशा प्रकारे प्राचीन काळापासून सार्वभौम अधिकार आहे. मानवाने निर्माण केलेले ते आशयगर्भ असे मंगल प्रतीक आहे. म्हणूनच ते विवाहप्रसंगी अंतरपाटावर कुंकवाने रेखाटतात. काही ठिकाणी, जन्मलेल्या अर्भकाला सठीच्या दिवशी स्वस्तिक रेखलेल्या वस्त्रावर निजवतात. वियोग झालेल्या प्रियजनांचा पुनश्च संयोग व्हावा म्हणूनही स्वस्तिकाची पूजा करण्याची चाल आहे. स्वस्तिक हे शांती, समृद्धी आणि मांगल्य यांचे प्रतीक असल्यामुळे कित्येक सुवासिनी चातुर्मासात स्वस्तिकव्रत करतात. त्यात रोज स्वस्तिक काढून त्याची पूजा करायची असते. चातुर्मासात देवघरात देवापुढे स्वस्तिक आणि अष्टदळ यांची रांगोळी काढणा-या स्त्रीला वैधव्याचे भय उरत नाही, असे पद्मपुराणात सांगितले आहे.
(संकलन : राजेंद्र शिंदे)
फार चांगली व स
फार चांगली व स
अतिशय सुंदर माहिती
अतिशय सुंदर माहिती
Comments are closed.