लेखकाने प्रास्ताविकाच्या पहिल्या प्रकरणात शरीराची भूक आणि विवाहसंस्थेचे नाते यांचा ऊहापोह केलेला आहे. वैषयिक सुख हा विवाहसंस्थेचा पाया असून त्याच्या अभावी वैवाहिक संबंध टिकू शकत नाहीत अशी भूमिका लेखकाने मांडली आहे. ते पुढे विवाह आणि स्त्री-पुरुष सहवासाच्या इतर पद्धती यांची तुलना करतात.
लेखकाने त्या नंतर देवदासी या प्रथेचा आढावा घेतला आहे. देवदासी प्रथा प्रथम दक्षिण भारतात सुरू झाली आणि ती जवळ जवळ विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकापर्यंत चालू होती. गंमत म्हणजे त्या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी वैधानिक पावलेही दक्षिणेतच उचलली गेली! मात्र देवदासी आणि वेश्यावृत्ती यातील फरक स्पष्ट करताना लेखक सांगतात, पैसे मिळवण्याचा हेतू मनात ठेवून स्वशरीराचा उपभोग एकाहून अनेक पुरुषांना देणारी स्त्री हिलाच वेश्या म्हणता येईल. देवदासी प्रथेला मात्र धार्मिक आधार होता. पुजारी हा देवाचा मध्यस्थ या समजुतीने तो सांगेल ते देवदासी करत असत आणि देवदासींच्या जिवावर पुजा-यांचा अनैतिक व्यवहार चालत असे. त्यानंतर पुस्तकात देवदासी प्रथेत गेंस विधी म्हणजे काय व तो कसा केला जात असे याची माहिती येते.
देवदासी जातीत स्त्रीसत्ता असते आणि पुरुषांना अत्यंत खालच्या दर्ज्याचे लेखले जाते असे सांगून लेखक ‘मराठा गायक मित्र’ या मासिकाच्या १९२८ सालच्या एका अंकातून पुढील दंडक उद्धृत करतात –
१. पुरुष स्त्रियांचे ताबेदार अगर सहाय्यक असतात.
२. कुटुंबातील स्त्री-पुरुष नेहमी अविवाहित असतात.
३. कुटुंबपोषणाचा भार स्त्रियांवर असतो.
४. इतर जातींतील पुरुष, गायक समाजातील स्त्रिया उपभोग्य वस्तू समजतात. खुद्द गायक जातीतील पुरुषांचीही मनोवृत्ती काही भिन्न नसते.
लेखक त्या जातीच्या लोकांसंबंधी आणखी माहिती १९४३ च्या ‘समाज सुधारक’ मासिकाच्या अंकात सौ. इंदिराबाई नार्वेकर यांनी लिहिलेल्या लेखातून देतात. पुरुषांपैकी कित्येकांचा विवाह त्यांच्या आया-बहिणी हलक्या कुळातील मुलगी विकत घेऊन त्यांच्याशी लावून देतात. त्यांचा उद्देश परंपरागत व्यवसाय पुढे चालवणे, प्रजोत्पादन करवणे आणि सा-या कुटुंबासाठी विनामूल्य गुलाम पुरवणे हा असतो.
देवदासी प्रथा बंद करण्याचा पहिला प्रयत्न प्रथम दक्षिणेत म्हणजे म्हैसूर संस्थानात १८९३ साली झाला आणि देवदासींवर नाच व गाणे करण्याची सक्ती नाही असे जाहीर करण्यात आले. मात्र ती प्रथा पूर्णपणे बंद करण्यासंबंधीचा ठराव पास होण्यास १९२२ साल उजाडावे लागले. संयुक्त प्रांतात तशी पावले १९२९ मध्ये उचलली गेली. ‘प्रगतीशील’ महाराष्ट्रात (त्यावेळच्या मुंबई राज्यात) त्यासाठी १९३२ व १९३४ साली कायदेमंडळ झाले. शेस नावाचा विधी देवदासी जमातीत मुलींना व्यवसायाला लावण्याच्या वेळी करण्यात येत असे. तो धार्मिक आहे असा दावा विधी संयोजक करत असत. परंतु तो दावा गोवा प्रांतात १९३१ साली झालेल्या एका खटल्यात फेटाळून लावला गेला आणि दोषी व्यक्तींना रोज दोन रुपये प्रमाणे चार व तीन महिन्यांचा दंड ठोठावण्यात आला. १९३१ सालचे जीवनमान लक्षात घेता दोनशेचाळीस रुपये आणि एकशेऐंशी रुपये ही रक्कम मोठीच होती! त्याचबरोबर दंडाची रक्कम ही अपराधाची तीव्रता न्यायाधिशांना मान्य असल्याची द्योतक म्हणता येईल. (विद्यमान न्यायदान पद्धतीत अल्प रकमेचे जामीन आणि अल्प रकमेचे दंड या वस्तुस्थितींशी तुलना करता त्या रकमा फार कठोर वाटतात).
कायदेशीर उपायांबरोबरच, सुधारणेचे काही प्रयत्न समाजसेवी लोकांकडून केले जात होते. त्या जातीतील लोकांची पहिली परिषद श्री. गोविंद पुंडलिक हेगडे-देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २६ डिसेंबर १९१७ रोजी भरली. ‘गोमंतक मराठा समाज’ १९२७ साली स्थापन झाला. समाजसुधारणेच्या मतांचा प्रसार करण्यासाठी ‘समाज सुधारक’ मासिक १९२९ साली सुरू झाले. डॉ. श्यामराव मुळगावकर हे त्या समाजाचे प्रमुख कार्यकर्ते होते.
वेशाव्यवसाय हा समाजातील काही लोकांसाठी तरी अपरिहार्य आहे असे प्रतिपादन करणा-या लेखकाचा सवाल आहे, की ‘तर मग या अपरिहार्य व्यवसायातील महिलांना प्रतिष्ठा व मान्यता देण्यास तुम्ही तयार का नाही?’ त्यावर उपाय म्हणून लेखक सुचवतात की हिंदू समाजाने कोणत्याही जातीला नीच न ठरवता सर्वच जातींच्या आर्थिक प्रगतीचा विचार करायला हवा!
पुढील प्रकरणांतून अनीतीच्या धंद्याचे वेगवेगळे पैलू वाचकांसमोर येतात. त्यात दलाल किंवा मध्यस्थ हा सर्वांत महत्त्वाचा. ते वेश्यांना गुलामांपेक्षा गुलाम बनवतात. वेश्यांच्या ‘यारां’संबंधी लेखक अगदी नेमक्या शब्दांत लिहितात. ‘वेश्या व यार यांचे संबंध म्हणजे अवघड कोडे आहे. ते त्यांचे कायदेशीर नवरे नसले तरी यार वेश्यांना नव-याच्या जागी असतात. यारांच्या आज्ञेत त्या नव-यापेक्षाही जास्त असतात. त्यांना जगात जर कोणाबद्दल प्रेम वाटत असेल किंवा कोणी त्यांचा हक्काचा पुरुष वाटत असेल तर तो तो पुरुष!’.
वेश्यांची सांपत्तिक स्थिती आणि त्यांचे अनारोग्य यांचा थोडक्यात उल्लेख करून पुढील प्रकरणांत कुंटणखाने आणि त्यांचे सर्व घटक याबद्दल थोडक्यात ऊहापोह केला आहे. लेखक त्या संस्थेचे स्वरूपही नीटपणे मांडतात – ‘कुंटणखाना’ हा भांडवलशाही तत्त्वावर चाललेला धंदा आहे. त्यात मालकिणीचे लक्ष तिला जास्तीत जास्त फायदा कसा मिळेल एवढ्याच गोष्टीकडे असते. त्या कुंटणखान्यातील मुलींची त्यांच्याकडून कशी पिळवणूक व छळ होतात यांची पर्वा करत नाहीत. कुंटणखान्यातील अघोरी प्रकारांची कल्पना यावी म्हणून मुंबईत मिर्झा अली खान यांच्या कुंटणखान्यात १९१७ साली झालेल्या खुनाची आणि पुणे येथे १९४१ साली उघडकीस आलेल्या मार्गोचा अड्डा या कुंटणखान्यातील प्रकरणाची हकिगत दिली आहे.
लेखक वेश्याव्यवसायाचे अनिष्ट परिणाम विषद करताना प्रथम गुप्त रोगांची प्राथमिक माहिती देऊन काही केस स्टडीज उद्धृत करतात. त्यांनी रोगांची माहिती देण्यासाठी श्री. के.भा. लेले या डॉक्टरांच्या एका लेखाचा (बाहेरख्यालीचे दुष्परिणाम) उपयोग केला आहे. ते त्या रोगांच्या दुष्परिणामात सर्वांत महत्त्वाचा मानतात तो हा – हा रोग असणा-या माणसाची संतती दुर्बळ मनाची उपजते. तशा दुर्बळ मनाच्या माणसांत प्रजोत्पत्ती करण्याची शक्ती इतर सामान्य माणसांपेक्षा फारच अधिक असते. मनाच्या दुर्बलपणाचा रोग अनुवंशिक असतो आणि त्यामुळे दुर्बळ मनाची प्रजा पिढ्यान् पिढ्या निर्माण होत राहते. दुर्बळ मनाच्या स्त्रियांचा कल तशाच दुर्बळ मनाच्या पुरुषांकडे असतो ही आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे वेडसर माणसांचा तांडा अप्रतिहत वाढत राहतो आणि समाजाच्या सांपत्तिक स्थितीवर कायमचे ओझे पडते. अनुवंशिक दोष सहजगत्या जात नाहीत आणि गेले तरी दोन पिढ्यांनंतर पुन्हा येऊ शकतात. दुर्बळ मनाच्या माणसांचा गुन्हेगारीशीही निकटचा संबंध असतो. लेखकाच्या अंदाजानुसार १९४५-४६ मध्ये मुंबईत शेकडा दहा माणसांना त्या रोगाची बाधा होती (त्याच सुमारास एका धर्मोपदेशकाचा आकडा अंदाजे शेकडा चाळीस एवढा मोठा होता!).
वैद्यकीय पाहणी कशी विनार्थक ठरते ते सांगून लेखक एका फ्रेंच डॉक्टरांचे मत सांगतात, की गुप्त रोगांचा प्रसार टाळण्याचा एकच मार्ग – तारुण्यावस्था आली, की विवाह करावा व नंतर पती-पत्नी यांनी निष्ठेने राहवे. (त्या उपायांची टिंगलच होईल, तरीही त्यात सत्याचा अंश नाही असे म्हणता येईल का?).
वेश्याव्यवसायाची कारणे शोधताना लेखक प्रथम त्या बाबतीत समाजात फक्त स्त्रियांना जबाबदार धरण्याच्या वृत्तीचा निषेध करतात. त्या व्यवसायाचे मूळ कारण पुरुषांची कामुक भूक हेच आहे असे सांगून ते म्हणतात, जो जो जगाची सुधारणा होत आहे असे आपण म्हणतो तो तो कामवासना उद्दिपित करणारी साधने उत्पन्न होत आहेत. असे म्हणतात, की रानटी जनावरांपेक्षा पाळीव जनावरांत कामवासना अधिक असते. पुढे अर्थात ते मुंबईत एकटे राहवे लागणा-या लोकांची अपरिहार्यता या गोष्टीचाही उल्लेख करतात.
वेश्यांचा उद्धार करण्यासाठी काही संस्था निर्माण होणे स्वाभाविक होते. तशी पहिली संस्था ‘साल्वेशन आर्मी’ या संघटनेने १९०८ साली सुरू केली. ‘श्रद्धानंद महिला आश्रम’ मुख्यत: हिंदू महिलांना मदत करण्यासाठी १९२६ साली सुरू झाला. अशा आश्रमांचे कार्य कोणत्या पाय-यांनी केले जाते व त्यात कोणत्या अडचणी येतात याचा धावता आढावा घेऊन शेवटच्या दोन प्रकरणांमध्ये लेखकाने वेश्याव्यवसाय थांबवण्याचे कायदेशीर आणि इतर उपाय यांची चर्चा केली आहे.
वेश्या व्यवसाय कायद्याने थांबवणे म्हणजे वेश्या व्यवसायास परवानगी देणारे कायदे रद्द करणे, वैद्यकीय तपासणीतील भेदभाव दूर करणे असे स्पष्ट करून लेखक पुढे सांगतात, की वेश्यांची गुलामगिरी नष्ट करायची असेल तर वेश्यांना गुलाम करणारे आणि गुलामगिरीला उत्तेजन देणारे यांनाच प्रथम शासन झाले पाहिजे. विदेशातील अनुभव असा आहे, की नियंत्रण केल्याचा प्रयत्न केल्यावर अनीतीचा फैलाव अधिक झाला. लेखकाचा असा आरोप आहे, की जेवढे कायदे झाले, त्यात गुन्ह्याला कारणीभूत होणा-या व्यक्तीला गुन्हेगारापेक्षा अधिक शासन झाले पाहिजे. या कायद्याच्या मूलभूत तत्त्वाचे जाणुनबुजून उल्लंघन केले गेले. (थोडक्यात वेश्येच्या गि-हाईकालाही शासन व्हायला हवे व ते वेश्येपेक्षा अधिक असायला पाहिजे). ते असा निष्कर्ष काढतात, की धंद्याच्या बाहेर अनैतिक वर्तन करणा-या स्त्रियांची वाढ थांबू शकेल असे वाटत नाही. (पुढील काळात ‘अनीती’ची व्याख्याच व्यक्तिसापेक्ष आणि अधिक प्रवाही झाल्याने ते अधिकच कठिण वाटते). सत्तर वर्षांपूर्वी (हे लेखन प्रथम त्याहूनही अधिक काळापूर्वी झाले.) या ‘समस्ये’वर संयत प्रकारे आणि सांगोपांग लिहिलेले पुस्तक म्हणून या लेखनाचे मोल आहे. त्यात व्यक्त केलेले विचार तसे अपरिचित नाहीत – गुन्हेगार माणूस नसतो. परिस्थिती त्याला तसे बनवते – हे तत्त्वज्ञान हिंदी चित्रपटांनीदेखील उगाळले आहे. मात्र त्यात सत्याचा अंश आहे हे कबूल करावेच लागते. भूषण कोरगावकर जेव्हा संगीत बारी लिहितो तेव्हा तो याच समस्येचा/विचारधारेचा पुनरुच्चार करत असतो.
म्हणजे शंभर वर्षांत महाराष्ट्रात बदलले ते काय? असा प्रश्न तुम्हालाही पडेल.
वेश्या आणि वेश्याव्यवसाय
लेखक – पुरुषोत्तम गोविंद नाईक
प्रथम आवृत्ती – १९२४. सुधारित दुसरी आवृत्ती १९४८
प्रकाशक – समाज सेवा संघ
मूल्य तीन रुपये
– मुकुंद वझे
तळटीप : लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहात हे पुस्तक उपलब्ध आहे. सप्टेंबर १९९६ ते जुलै २०१५ या एकोणीस वर्षांत ते फक्त सतरा वाचकांनी वाचल्याची नोंद दिसते.
मला हे पुस्तक हवे आहे
मला हे पुस्तक हवे आहे
स्वातंञ्याअगोदर अशा बेमालूम !
स्वातंञ्याअगोदर अशा बेमालूम ! आणि अन्यायकारक प्रथेविरूध्द आवाज ऊठविणे खरोखर धारिष्य्टाचे होते . यात अनेक महत्वपूण नोंदी आहेत. ही प्रथा कायमची बंद झाली पाहिजे.वेश्यांचे पुर्नवसन शासनाने आणि समाजाने केले पाहिजे…….चला तर मग आपणही समाजाला सुधारण्यासाठी थोडासा हातभार लावू या…….
मला हे पुस्तक विकत मिळेल का?…
मला हे पुस्तक विकत मिळेल का? किंवा त्याची झेरॉक्स मिळेल का?
सर मला हे पुस्तक फार…
सर मला हे पुस्तक फार महत्वाचे आहे जर मिळाले तर मी त्याची किंमत अदा करेन.. प्रा. विजय वानखेडे.. वाशीम, महाराष्ट्र
Comments are closed.