Home वैभव गावांच्‍या अंतरंगात वालावल चेंदवण – दक्षिणेचे पंढरपूर

वालावल चेंदवण – दक्षिणेचे पंढरपूर

3
carasole

वालावल हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण आणि वेंगुर्ला तालुक्यांना जोडणारे टोक. गावाच्या उत्तरेला पाट-चेंदवण सीमा जोडल्या गेल्या आहेत. चेंदवण, हुमरमाला, गावधड ही वाडीवजा गावे समृद्ध, हिरव्यागार वालावलची भावंडे शोभतात. पंचक्रोशीत निसर्गसंपदा आणि वन्य प्राणी भरपूर आहेत. वालावलचे वैशिष्ट्य म्हणजे जांभ्या दगडाचे कातळी क्षेत्र. त्या कातळाने गावाची तीस टक्के जमीन व्यापली आहे. गाव डोंगराळ भागात असले तरी नदीकिनाऱ्यावर आहे. त्यामुळे भाजीपाला, शेती, फळे आदी कृषी उत्पन्न गावात पिकवले जाते.

वालावलच्या उत्तरेला कर्ली खाडीकिनारा आहे. जुवा बेटाच्या चारही बाजूंला नदीचे खोल पाणी व आतमध्ये विस्तीर्ण बेट आहे. नारळ-पोफळीच्या मोठ्या बागा, अधुनमधून दिसणारी केळीची झाडे व त्यामध्ये दिसणारी कौलारू घरे असे खेड्याचे रूप आहे.

खाडीचे पाणी फेब्रुवारीमध्ये खारे होते, तोपर्यंत त्याच पाण्याचा वापर शेतीसाठी केला जाऊ शकतो. खाडीमध्ये मासेमारी व वाळू काढण्याचा व्यवसाय चालतो. पूर्वी खाडीतून गलबताद्वारे व्यापार केला जाई. नेरूरपार येथे पूल उंच बांधण्यात आला आहे. ‘चानी’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण त्या परिसरात करण्यात आले होते. तेथे विविध प्रकारचे पक्षी पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते. त्या बेटाला होडीतून फेरफटका मारता येतो.

‘श्रीदेवी माऊली’ हे देवस्थान वालावल-चेंदवण गावाची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. देवी माउलीचे मंदिर भव्य व देखणे आहे. देवीची पाषाणातील आकर्षक मूर्ती चार फूट उंचीची आहे. ती जगदंबा माउली म्हणजे आग ओकणारी दृढ शक्ती आहे. तिचे तेज गावाला सहन होणारे नाही म्हणून ती दोन्ही गावांच्या कड्याकपारीला डोंगरात उभी आहे. देवी दशहाती आहे. तिच्याी दहा हातांत शंख, चक्र, गदा, त्रिशूळ, ढाल, तलवार, अग्नी, कुंठ आदी आयुधे आहेत. देवी ‘मूळ माया’ किंवा मायेची पूर्वज म्हणून ओळखली जाते. मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीदेवी माउलीच्या समोर जी घुमटी आहे, तेथे देवीचा आज्ञांकित मोठा मुलगा घोड्यावर बसून हाती बाण, भाला घेऊन परचक्र आल्यातस संरक्षणार्थ उभा आहे. शिवलिंगाच्या समोर नंदी असतो, त्याप्रमाणे माउलीच्या समोर त्याची मूर्ती आहे.

गावात श्री लक्ष्मीनारायणाचे मंदिर आहे. ते देवालय गावांतील ‘मुड्याचा कोन’ या नावाच्या दरीच्या पायथ्याशी बांध घालून बनवलेल्या सुंदर विस्तीर्ण तलावाच्या काठी बांधलेले आहे. त्या तलावाची खोली चाळीस फुटांपर्यंत आहे. तलावाकडून पाणी जाण्याच्या तीन वाटा आहेत, त्यांपैकी मुख्य दरवाजा भक्कम बांधकाम केलेला आहे. तलावासमोर वालावल ग्रामपंचायतीचे कार्यालय आहे. त्या तलावाचे पाणी सुमारे दोनशे एकर जमिनीसाठी पुरते. रामनवमीनंतर पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात. तलावाच्या पायरीवर शंकराची पिंड व पाषाणमूर्ती आहे. तलावाचे पाणी खराब होत नाही. त्यामुळे पाण्याला तीर्थाप्रमाणे मान आहे.

मुख्य देवालयाची बांधणी चालुक्य पद्धतीची आहे. बांधकाम जांभेथर दगडाचे आणि आतील खांब व गाभाऱ्याचा दरवाजा काळीथर दगडाचा आहे. त्यावर सुंदर कोरीव काम आहे. मंदिराच्या महाद्वारावरील कोरीव काम व आतील सभामंडपाचे सहा पाषाणी स्तंभ प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. महाद्वाराच्या दोन बाजूंला दोन द्वारपाल असून मध्ये वरच्या बाजूस शेषशायी विष्णूची मूर्ती कोरलेली आहे. द्वारपालांच्या वरच्या बाजूलाही देवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. महाद्वाराला लागून खाली डावीकडे विनम्र गरुडाची तर उजवीकडे मारुतीची मूर्ती कोरलेली आहे. सभामंडपाच्या खांबांची उंची सुमारे साडेसहा फूट असून त्यांचा मध्यवर्ती घेरही जवळपास तेवढा आहे. खांबास वापरलेला पाषाण काळाकभिन्न व गुळगुळीत आहे. प्रत्येक खांबाच्या मध्यावर वीस इंच उंचीच्या देवादिकांच्या सुंदर मूर्ती वर्तुळाकार कोरलेल्या आहेत. प्रत्येक खांबावरच्या मूर्तीच्या वरची व खालची नक्षी वेलबुट्टीसारखी सुंदर व वेगवेगळ्या प्रकारची आहे.

चौकाचे कडीपाटाचे छत पाटावर कोरलेल्या पौराणिक देवदेवतांच्या मूर्तीनी भरलेले आहे. ह्या शिवाय श्री गणेश, महिषासूरमर्दिनी, भस्मासूर मोहिनी, श्रीशंकर यांच्या मूर्तीपण आहेत. गणेश विष्णू पुजारे (मामा पुजारे) यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन मेषाची तोंडे असलेला अग्निदेव, माणसावर बसलेला नैऋत्ती, बदक वाहन असलेला विश्वकर्मा, हरण वाहन असलेला सोम या लाकडी मूर्ती शंभर-दीडशे वर्षांपेक्षा जास्त पुरातन आहेत. चौकापुढील मुखशाळेचे काम काळीथर दगडाचे आहे. मुखशाळेचे छत हे शके १८०६ (इसवी सन १८८४) मध्ये पुन्हा बांधले गेले असावे असे एका दक्षिणोत्तर आडव्या मोठ्या तुळईवर ‘शके १८०६ नारायण मुखशाळा’ अशा कोरलेल्या अक्षरांवरून वाटते. अक्षरे अस्पष्ट आहेत, त्यापुढे कोरलेली अक्षरे तुळईवरील रंगकामामुळे वाचता येत नाहीत.

मुखशाळेपुढे नव्या जुन्या पद्धतीच्या मिश्रणाने बांधलेला अर्वाचीन सभामंडप व सभामंडपाच्या पुढे काळीथर दगडाची पाच खांबी दीपमाळ आहे. दीपमाळेच्या बांधकामाची पद्धत मराठेशाहीतील असल्याचे म्हटले जाते. दीपमाळेच्या चौथऱ्यावर कल्याण पुरुषाची घुमटी आणि वृंदावन आहे. घुमटीत श्रीकडे तोंड करून बद्धांजली वीरासन घालून बसलेली विनम्र श्री कल्याण पुरुषाची व हातांत चवरी घेऊन उभी असलेली अशी त्यांच्या परिचारकाची अशा दोन मूर्ती आहेत. वृंदावनाच्या दर्शनी दासमारुतीची मूर्ती कोरलेली आहे.

कल्याण पुरुषाची घुमटी श्रींचा सभामंडप बांधण्यापूर्वी, सभामंडपाच्या इशान्य कोपऱ्यातील आता असलेल्या मोठ्या खांबाच्या बाजूच्या जागेत होती. ती जागा सभामंडपात घेतल्यामुळे समाधीवरील कल्याण पुरुषाची आणि त्याच्या परिचारकाची मूर्ती दीपमाळेच्या चौथऱ्यावर घुमटी बांधून त्या ठिकाणी ठेवण्यात आल्यामुळे, समाधीच्या जागी कोणी बसू नये म्हणून एक लाकडी खुंट उभा करण्यात आला होता. लाकडी खुंटाबद्दल गुं. फ. आजगावकर यांनी त्यांच्या ‘वालावल दर्शन’ या पुस्तकात “श्री नारायण देवालय बांधण्यापूर्वी हल्लीच्या कोनशिला समारंभाप्रमाणे उभारलेला तो आद्यस्तंभ आहे. अशा प्रकारचा स्तंभ उभारण्याची पद्धत विजयनगर स्थापन होण्यापूर्वीपासून रूढ होती.” असे म्हटले आहे. तो खुंट अस्तित्वात नाही. कल्याण पुरुषाच्या घुमटीवर श्रींच्या पादुका कोरलेल्या आहेत. कल्याण पुरुषाने त्याची नजर समाधी घेताना सतत श्रींच्या चरणाकडे असावी व श्रींच्या पादुकांवरील पाणी त्यांच्या मस्तकावर पडावे असे मागणे केले होते असे म्हणतात.

पितळेचा मोठा कासव देवासमोर मुखशाळेत बसवलेला आहे. मुखशाळेसहित तलावादी रचना श्रीमंत पेशवे यांच्या मदतीने झाली आणि कै. वे. शा. सं. नारायण भटजी इनामदार पित्रे यांनी ते काम करून घेतले. त्यासाठी इसवी सन १७६० च्या सुमारास श्रीमंत पेशवे यांनी सात हजार रुपये वाडी दरबाराकडे पाठवून ते काम करून घेतले. श्रीमंत पेशवे यांनी केलेल्या बांधकामानंतर काही वर्षांनी एका जहाजावरील मोठी घंटा कोणीतरी मुखशाळेत आणून लावली. त्या घंटेवर ती कोणी, कधी व कोणत्या जहाजासाठी बनवली याबद्दल फ्रेंच भाषेत लिहिलेल्या दोन ओळी होत्या. त्या अशा – “La Frigate le Franklin Fait Par Jean Bazin Anantis ,1778”. शिवाय त्या, घंटेवर येशू ख्रिस्ताचे कृसीफिकेशन व तीन बॅजीस होते. त्या घंटेबद्दल किंवा ती ज्या जहाजावर होती त्याबद्दलचा अधिक इतिहास उपलब्ध नाही. घंटेला तडा नोव्हेंबर २००२ मध्ये गेला व ती निकामी झाली. तिचे साहित्य वापरून तेवढीच नवीन घंटा करून बसवण्यात आली आहे.

देवालयाच्या सभोवार तट आहे. तटाच्या आतील देवस्थानाच्या पवित्र जागेला ‘जगत्’ असे म्हणतात. जगताला तीन दरवाजे असून वर नगारखाने बनवलेले आहेत. तटाच्या आतील बाजूस भक्तजनांना राहण्यासाठी ‘पडशाळा’ किंवा धर्मशाळा बांधलेल्या आहेत.

देवालयाचे बांधकाम एकाच वेळेस झालेले नसून, क्षेत्र महात्म्य वाढीबरोबर निरनिराळ्या शतकांत भक्तजनांकडून एक-एक सुधारणा होत जाऊन त्याला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मंदिराच्या स्थापत्यकलेचा अभ्यास करण्यासाठी स्थापत्यशास्त्र महाविद्यालयांचे विद्यार्थी देवस्थानास भेट देतात.

हे स्थान श्री विष्णूचे असले तरी श्रींच्या मुकुटात शिवलिंग कोरलेले आहे. तेथे लघुरुद्र, महारुद्र यांसाठी नवस करण्यात येतो व रुद्राची आवर्तने होतात. श्रींची पालखी सोमवारी निघते. त्रिपुरी (टिपाराची) पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो. जर स्मार्त (शैव) व भागवत अशा दोन एकादशी आल्या तरी या देवालयात स्मार्त एकादशीच मानली जाते. श्री विष्णू स्वतः तर शिवाची (स्मार्त) एकादशीच करतो, परंतु वालावलीतील भागवतही शैव एकादशीचा उपवास करतात व देवळांतील भजन-किर्तनाचे कार्यक्रम त्याच दिवशी होतात.

श्री देव नारायणाच्या समकालीन व शिल्पाशी बरेचसे साम्य असलेली दुसरी मूर्ती म्हणजे पंढरपूरच्या विठोबाची. त्या मूर्तीचा दगडही काळा वालुकामय आहे. त्या दोन्ही देवस्थानांत एक नाते आहे. श्री देव नारायणाच्या अंगावरील तुलसीमाला घेऊन चैत्र, आषाढी, कार्तिकी किंवा माघ महिन्यांतील एकादशीला पंढरपुरास जाऊन ती विठोबास वाहण्याचा प्रघात आहे. त्‍यानुसार विठ्ठलाला माळ वाहून, नैवेद्य दाखवून ब्राम्हणभोजन घातले जाते. विठोबाचा जुना पोषाख काढून तो माळ वाहणाऱ्याला दिला जातो. ज्यावेळी श्री नारायणाकडून आलेली माळ विठोबाच्या गळ्यात असते तेव्हा नेहमीप्रमाणे सर्वांना विठोबाला शिवता येत नाही. प्रथा तशीच असल्याचे सांगितले जाते. मात्र वालावलच्या ग्रामस्थांनी पंढरपुरास जाऊ नये असा दंडक आहे; कारण नारायण हे विठ्ठलरूप आहे. म्हणून जणू काही विसावा स्थानावरून श्रींची पालखी पुढे निघतानाही ‘पुंडलिक वरदा हरि विठ्ठल’ असा जयघोष होतो. गावाला ‘दक्षिण पंढरपूर’ म्हणून ओळखले जाते. तेथील सर्व ग्रामस्थ नारायणाला विठ्ठल समजून त्याची भक्तिभावाने पूजा करतात. ते गाव म्हणजे संतांची मायभूमी. गावातील ग्रामस्थ कित्येक वर्षांपासून कधीही पंढरपूरला गेलेले नाहीत. एवढेच नव्हे तर इतर गावांतील कुठल्याही यात्रेला न जाणारे ग्रामस्थ त्या गावात मोठ्या संख्येने येतात. पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी गेले की शिक्षा मिळते, गाडी बंद पडते, नाही तर गाडीला अपघात होतो असा ग्रामस्थांचा समज आहे. त्यामुळे ते पंढरपूला विठ्ठल दर्शनासाठी जात नाहीत!

वालावलला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या आसपास असलेली मंदिरे, नयनमनोहर तलाव, निसर्गाच्या कुशीतील श्री देवी माउली मंदिर, श्री देव रामेश्वर मंदिर; त्याचप्रमाणे, वालावल येथून जवळच नेरूर येथे असलेले श्री कलेश्वर मंदिर अशा देवदेवतांच्या वास्तूंनी गावाचा परिसर पुनित झालेला आहे. तेथील भूमीने अनेक नररत्ने दिली आहेत. ‘टोपीवाले’ हे नाव महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर भारतात पोचवणारे दानशूर रा. ब. अनंत शिवाजी देसाई टोपीवाले तेथीलच! त्यांनी मिळवलेल्या संपत्तीचा उपयोग समाजबांधवांसाठी केला. अनेक वास्तू त्याची साक्ष देत आहेत. रा. शिवाजी अनंत देसाई टोपीवाले, मोतीराम शेठ टोपीवाले, दी ग्रेट रायल सर्कसचे मालक सीताराम गं. वालावलकर, लेखक कै. अनंत सी. देसाई, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानसशास्रज्ञ डॉ. पंढरीनाथ ह. प्रभू, कोकण रेल्वेचे आद्यपुरस्कर्ते अ. ब. वालावलकर, किर्लोस्कर कंपनीतील प्रसिद्ध तबलजी आणि नटश्रेष्ठ दादा लाडू वालावलकर, गंधर्व नाटक मंडळीतील प्रमुख नट, संगीत दिग्दर्शक पुरुषोत्तम म. वालावलकर अशी काही नावे सांगता येतील.

वालावल गावाच्या पश्चिमेस पंचक्रोशीचा ‘कुपीचा डोंगर’ आहे. तो डोंगर बोलका पत्थर, सिद्धाचा खडक, पाण्याचे रान, वाघाची गुहा यांमुळे प्रसिद्ध आहे. गावाचे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यापासून संरक्षण डोंगरामुळे होते. डोंगरावरून स्वच्छ समुद्रकिनारे, मजबूत तटबंदी असलेले किल्ले, शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला, धामापूरचा तलाव, कर्ली खाडी व कर्ली खाडीवरील पूल दृष्टिपथात येतात. निवती भोगवे समुद्रातील मच्छिमार कुपीच्या डोंगर-दगडाचा उपयोग निशाण म्हणून करतात. दगडाकडे जाण्यास माउली मंदिराकडूनही रस्ता आहे. शेजारी धनगर वस्ती असल्यामुळे त्याश परिसरात माणसांची वर्दळ असते. ‘कुपीचा डोंगर बचाओ आंदोलना’मुळे निसर्गसौंदर्य टिकून आहे.

माहिती आधार – ‘सोलापूर पुणे’ आणि ‘श्री लक्ष्मीनारायण मंदिर’ ही संकेतस्‍थळे

About Post Author

3 COMMENTS

  1. खरोखर अभ्यासपुर्व लिखाण केलय।
    खरोखर अभ्यासपूर्व लिखाण केलेय. शंकाच नाही. आपल्या महाराष्‍ट्राचे वैभव.
    उपक्रम स्तुत्य आहे.

  2. लेखात वर्णन केलेला सगळा परिसर
    लेखात वर्णन केलेला सगळा परिसर मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिला आहे. हुबेहूब रेखाटन आहे. त्या सगळ्या परिसरावर हरिहर आठलेकरांची लेखणी चालली आहे. लेखाबद्दल लेखकाला धन्यवाद! कोकणचे एक रेखीव ,रसरशीत व पाणीदार चित्रण!

  3. माहीती खुप उपयुक्त आहे.
    माहिती खुप उपयुक्त आहे. चेंदवण गाव आणि तेथील घरांची छायाचित्रे शेअर करावीत.

Comments are closed.

Exit mobile version