महाराष्ट्र व कर्नाटक ह्या दोन राज्यांत प्रचलित असलेला एक वैष्णव संप्रदाय. पंढरपूरचा विठोबा हे त्यांचे उपास्य दैवत. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतश्रेष्ठ त्या पंथात होऊन गेले.
वारी करणारा तो वारकरी. प्रतिवर्षी किंवा प्रत्येक महिन्यात नियमितपणे एखाद्या पवित्र स्थळाच्या यात्रेला जाण्याची प्रथा असा ‘वारी’ या शब्दाचा रूढार्थ आहे. वारकरी आषाढी, कार्तिकी, माघी व चैत्री अशा पंढरपूरच्या मुख्य वार्या करतात. ह्या चार महिन्यांपैकी एका महिन्याच्या शुध्द एकादशीस जो पंढरपुरास जातो, त्यास पंढरपूरचा वारकरी म्हणतात.
‘राम कृष्ण हरी’ हा संप्रदायाचा मंत्र आहे. राम म्हणजे हृदयात रमवणारा, कृष्ण म्हणजे आकर्षण करणारा व हरी म्हणजे ऐक्यरूप असणारा विठ्ठल परमात्मा होय. ह्या मंत्राला सोवळे-ओवळे, स्थळ-काळ, जाती-वित्त-कुळ ह्यांचा प्रतिबंध नाही. गळ्यात तुळशिमाळ, कपाळी गोपिचंदनाच्या मुद्रा व बुक्का, खांद्यावर पताका ही वारक-यांची बोधचिन्हे होत. ह्यांपैकी तुळशिमाळ एखाद्या ज्येष्ठ वारक-याकडून साध्या विधीने देतात. माळ देताना गुरू संप्रदायाचे नियम पाळण्याची शपथ घ्यायला सांगतो.
1. चैतन्य संप्रदाय: ह्याचे दोन भेद, एकाचा ‘राम कृष्ण हरी’ हा षडाक्षरी मंत्र असून, दुसर्यांचा ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ हा द्वादशाक्षरी मंत्र आहे.
2. स्वरूप संप्रदाय: ह्याचा ‘श्री राम जय राम जय जय राम’ हा त्रयोदशाक्षरी मंत्र आहे.
3. आनंद संप्रदाय: ह्याचा ‘राम’ किंवा ‘श्री राम’ हा मंत्र आहे.
4. प्रकाश संप्रदाय: ह्याचा ‘ॐ नमो नारायणाय’ हा मंत्र आहे.
वारकरीप्रमुख व त्याची शिष्यमंडळी ह्यांच्या समुदायास फड म्हणतात. वारक-याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली तो त्याचा गुरू होय.
संदर्भ : भारतीय संस्कृतिकोश, खंड आठवा, पृ. 602-608
सुरेश वाघे – फोन नंबर (022)28752675