Home मंथन लेकीची मैत्रीण होताना…

लेकीची मैत्रीण होताना…

पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीतील पौरोहित्य विभागाच्या प्रमुख आर्या जोशी यांनी व त्यांच्या पतीने त्यांच्या मुलीस वेगळ्या पद्धतीने वाढवण्याचे व शिकवण्याचे ठरवले. त्याची त्यांनी सांगितलेली ही गोष्ट. आमच्या लेकीचा जन्म झाला आणि एक मोठा बदल आमच्या आयुष्यात झाला. तो सर्वांच्याच आयुष्यात होत असतो. आम्ही दोघांनी आधीच ठरवले होते, की किमान चौथीपर्यंत तरी लेकीला उंदरांच्या शर्यतीत पाठवायचे नाही; घरीच शिकवायचे. तिचा खेळगडी व्हायचे, पण प्रसंगी शिस्तही लावायची.

पालकांना इच्छा असूनही त्यांच्या हल्लीच्या व्यस्त दिनक्रमात मुलांना वेळ देता येत नाही. अशा पालकांसाठी माझा अनुभव आवर्जून सांगत आहे. अनेक पालक ते करत असतीलही. पण आम्ही मुलीला शाळेत न पाठवता आणि घरात टीव्ही नसताना तिला कसे रमवायचे हा प्रश्न विचारांती, प्रयोग करत करत सोडवत आहोत. त्याचा प्रवास थोडक्यात –

हे सर्व करताना, मुलीचा बाबा एका परदेशी कंपनीत व्यवस्थापकीय पदावर होता आणि मी पुण्यातील ‘ज्ञान प्रबोधिनी’च्या पौरोहित्य उपक्रमाचे काम व संशोधन करत होते. आम्ही आमच्या बाळाला वेळ त्यातूनही देऊ शकलो. त्यासाठी आम्ही आमच्या वेळेची आखणी केली. नंतर तिच्या बाबाने त्याची शेतीची आवड जोपासण्यासाठी पुण्यातील नोकरी सोडून राजापूर तालुक्यातील गावी येण्याचे ठरवले. आता, आम्ही कोकणातील छोट्या खेड्यात स्थायिक झालो आहोत, तेथे रुजण्याचा प्रयत्न करत आहोत. मुलीचे टेकडीवर जाणे, बागेत खेळणे, पर्वतीवर जाणे हे बाबाबरोबर आणि अर्थात मस्ती-दंगाही; तर अभ्यास, हस्तकला, चित्रकला हे माझ्याबरोबर आणि सापशिडी, पत्ते, हॉटेल, लपाछपी हे खेळ तिघांनी मिळून एकत्र अशी ‘कामा’ची विभागणी आहे.

_lekichi_maitrin_hotana_2.jpgप्रवासाचा तो टप्पा वय महिने सहा ते वय वर्षें पाच असा आहे. ती सहा महिन्यांची झाली तशी उत्सुकता तिच्या डोळ्यांत दिसू लागली. महाग खेळणी आणून ती दोन दिवसांत मुलांसाठी कंटाळवाणी होतात. म्हणून आम्ही ‘उन्नती’ नावाची खेळण्यांची लायब्ररी लावली. मी गंमत खेळ, तिची शारीरिक कौशल्ये वाढतील असे खेळ सुरुवातीला आणले. ती एक वर्षाची झाल्यानंतर, आम्ही तिला खेळ बदलण्यासाठी घेऊन जायचो. त्यात तिला नवे जग ओळखीचे झाले आणि तिची स्वतःची आवड ओळखण्याची संधीही मिळाली. तेथील ‘ताईं’नीही आम्हाला छान मदत केली. पुढील वर्षें जास्त महत्त्वाची होती, तिच्या घडणीसाठी. मग, आम्ही बागेमध्ये मातीत, वाळूत बोटांनी चित्रे काढणे, दगडांचे आकार करणे, पान-फूल शोधणे असे उद्योग सुरू केले. मी तिला फुले आणि पाने निवडण्यास शिकवले. तिचे झाडाचे फूल-पान न तोडता खाली पडलेली पाने-फुले वापरणे, कागदावर तेलखडूने मोठे चित्र काढून त्यात फुले-पाने चिकटवणे, आमच्या देखरेखीखाली कात्रीने कापणे हे उद्योग सुरू झाले. घरातीले चमचे-वाट्या-भांडी मोजणे, रवी-सांडशी-डाव वापरून तिने तिचे तिचे खेळणे हे उद्योगही झाले.

आम्ही दोघेही चित्रकार सुमार आहोत, तरीही चौकोनी कागद कापून त्यावर सोपी चित्रे काढून त्याच्या जोड्या लावण्याचा खेळ तयार केला. तिला आता मित्रमैत्रिणींना देण्यासाठी छोटी शुभेच्छापत्रे तयार करणे, छोट्या फुलदाणीत फुले सजवणे हे आवडू लागले. आम्ही तिची हौस म्हणून तिला जवळच्या Orchids play school ला पाठवले. तेथे शाळेची गंमत समजली, तरीही आमचे छोटे छोटे उपक्रम घरी सुरूच राहिले.

मी दरम्यान, कोकणात येण्यासाठी नोकरी थांबवली, तरीही माझी घरून लेखन आणि संशोधन ही कामे सुरू राहिली. ती सुरू आहेतच. आमचा प्रयत्न उपलब्ध वेळातील वेळ आवर्जून तिच्याशी खेळण्यासाठी, संवाद साधण्यासाठी राखून ठेवण्याचा असतो. आम्ही घरात अभ्यास हा खेळ म्हणूनच करत असताना मुळाक्षरे रंगीत खडूंनी रंगवणे, सोपी सोपी चित्रे काढून एक ते दहा अंकांचा कागद तिच्याकडून तयार करून घेणे, अ ते अः ची फुलपाखरे तयार करणे, ससूचे गाणे तयार करून सशाच्या चेहर्‍याच्या आकाराचे पुस्तक करून त्यात लिहिणे, शेवरीच्या फुटलेल्या शेंगेची होडी तयार करणे, दिवाळीत मातीच्या पणत्या आणून त्या रंगवून सर्वांना भेट देणे असे अनेक उद्योग करतो.

आम्ही कोकणातील शेतात आमच्या दारात पडलेली पाने, तांदळाची कणसे रंगवणे, घरकामातील उरलेले बांबू रंगवणे, दगड रंगवून त्यांनीच आकडे मोजण्यास शिकणे असे प्रयोग करत असतो. एकत्र बसून गोष्टींची पुस्तके वाचणे, मीही तिच्याबरोबर मोबाईलवर रोज एक गाणे किंवा गोष्ट पाहणे, तिला वेगवेगळ्या संकल्पना दाखवण्यास मोबाईल वापरणे उदाहरणार्थ, जिम्नॅस्टिक्स, पोहणे, आगीचा बंब, कुत्र्यांचे रुग्णालय.

अनेक पालक यांतील गोष्टी करण्यास उत्सुक नक्की असतात, पण वेळ आणि संकल्पना यांचा मेळ बसवता येत नाही. मलाही सुचले तरी कसे करावे यासाठी यू ट्यूबचा उपयोग होत असतो. मला पणत्या भेट देण्यासाठी वर्तमानपत्राच्या पिशव्या तयार करायच्या होत्या. मी यू ट्यूबचाच त्यासाठी वापर केला. तिचा संध्याकाळचा खास वेळ पुण्यात आणि कोकणातही आजुबाजूच्या मित्र-मैत्रिणींशी खेळणे यासाठीही आहेच. मी मला शक्य आहे आणि हौस आहे म्हणून तिच्यासाठी बालकथा, बालगीते लिहिते आणि ती तिच्या मित्रपरिवारातही पाठवते. आई म्हणून या सर्वातून माझेही घडणे होते. तिचा बाबाबरोबरचा प्रवास हा बाबानेच मांडावा या भूमिकेतून मी येथे तिचे आणि माझे नातेच अधोरेखित केले आहे. अनेक पालकांचे THINKING त्यातून सुरू होईल. पालकत्वाचा मूल आणि आई-बाबा असा प्रवास आनंददायी व्हावा अशा सदिच्छा आहे.

– डॉ. आर्या जोशी  jaaryaa@gmail.com

About Post Author

Previous articleदुर्वा
Next articleदुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा! (Durshet)
डॉ. आर्या आशुतोष जोशी यांनी 'श्राद्धविधीची दान संकल्पना' या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून संस्कृत विषयात एम ए केले आहे. आर्या यांनी विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधे हिंदू धर्म, तत्वज्ञान, संस्कृती, धर्मशास्र अशा विषयांवर सतरा शोधनिबंधांचे सादरीकरण केले आहे. त्यांना धर्मशास्त्र या विषयातील अभ्यासासाठी आणि ज्ञान प्रबोधिनीतील संशोधनासाठी 2010 मध्ये पूर्णकन्या प्रतिष्ठानचा 'कन्यारत्न पुरस्कार' आणि 2011 मध्ये सुलोचना नातू ट्रस्टचा 'स्री शक्ती पुरस्कार' प्राप्त झाला. त्या मराठी विकिपीडियावर दीड वर्षे संपादक म्हणून कार्यरत आहेत. लेखकाचा दूरध्वनी - 9422059795

1 COMMENT

Comments are closed.

Exit mobile version