देवदानवांमध्ये झालेल्या घनघोर संग्रामात दानवांचा विजय झाला. दानवांचा मुख्य महिषासूर हा जगाचा स्वामी झाला. त्यास इंद्रपद प्राप्त झाले. पराजीत देवांनी ब्रम्हदेवासोबत भगवान विष्णू व शंकर यांकडे जाऊन त्यांस आपली करूण कहाणी कथन केली. हे ऐकून विष्णू व शंकर क्रुद्ध झाले. त्यांच्या मुखातून महान तेज बाहेर पडले. हे तेज ब्रम्हदेव व इंद्र या देवांच्या शरिरातून बाहेर पडणा-या तेजाशी एकरूप झाले आणि त्या दिव्य तेजातून एक स्त्रीदेवता प्रकट झाली. या देवतेने दानवांशी युद्ध करून महिषासूर व त्याच्या सैन्याचा वध केला. या देवतेला महिषासूरमर्दिनी किंवा महालक्ष्मी असे म्हटले गेले. महालक्ष्मीचे रूपध्यान दुर्गासप्तशतीत वर्णिले आहे. सप्तशती ग्रंथाचे मूळ नाव “देवी माहात्म्य’ आहे. यामधील सातशे मंत्र संख्येवरून याला “सप्तशती’ नाव पडले असावे. यात महालक्ष्मीचे केलेले वर्णन असे –
दण्डं शक्तिमसिं च चर्म जलजं घण्टां सुधाभाजनम्
शूलं पाशसुदर्शने च दधती हस्तैः प्रसन्नाननाम्
सेवे सैरिभमर्दिनीमिह महालक्ष्मी सरोजस्थिताम्
अर्थ – हातामध्ये अक्षमाला, परशू, गदा, बाण, वज्र, कमल, धनुष्य, कुंडिका, दंड, शक्ती, खड्ग, चर्म, शंख, घंटा, सुधापात्र, शूल, पाश व सुदर्शनचक्र धारण करणारी प्रसन्नवदना, कमलासना व महिषासूरमर्दिनी अशा महालक्ष्मीचे मी ध्यान करतो.
शाक्त संप्रदायाचे अनुयायी ज्या आदिशक्तींची उपासना करतात ती महालक्ष्मीच होत. ती चर्तुभूर्ज असून तिच्या हातात फळ, गदा, ढाल व कपाल या वस्तू असतात. तिच्या मस्तकावर सर्प, लिंग व योनी असते. चंडिकल्पात शाक्तांच्या उपास्य देवतेचे वर्णन केलेले आढळते. तिला अठरा हात असून त्यात अक्षमाला, परशू इ. अठरा वस्तू असतात. हे वर्णन दुर्गासप्तशतीमधील वर्णनाशी मिळते जुळते आहे.
प्राचीन काळी कोलासूर नावाचा दैत्य स्त्रियांना फार त्रास देऊ लागला. त्यामुळे सर्व स्त्रीयांनी ब्रम्हा – विष्णू – महेश यांची प्रार्थना केली. त्रिमूर्तींनी कोलासूराचा नाश करण्याचे कार्य महालक्ष्मीवर सोपवले. महालक्ष्मीने कोलासुराचा वध करून सर्वांना संकटमुक्त केले. महालक्ष्मीच्या या उपकाराचे स्मरण करून हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे महालक्ष्मी-गौरी या दोघींची पूजा एकत्रच केली जाते. गणपतीच्या उत्सवात गौरीचेही पूजन केले जाते. महालक्ष्मीचा उत्सव भाद्रपद शुद्ध अष्टमीला सुरू होतो. त्या तिथीला दुर्वाष्टमी म्हणतात. या तिथीला दूर्वांची पूजा करण्याची प्रथा आहे. त्यामुळे दूर्वांच्या विस्ताराप्रमाणे वंशविस्तार होतो अशी कल्पना आहे. अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी सुवासिनी हा उत्सव साजरा करतात. कोलासूर म्हणजे रानडुक्कर. तो शेतीची नासधूस करतो. त्याचा नाश करून शेतीचे संरक्षण केले म्हणून महालक्ष्मी ही समृद्धीची व शौर्याची देवता मानली जाते.
संदर्भ – भारतीय संस्कृती कोष, खंड सातवा
किरण क्षीरसागर, मोबाइल – 9029557767,
इमेल – thinkm2010@gmail.com
{jcomments on}