मुंबईच्या दादरमध्ये ‘शिवभवानी सार्वजनिक नवरात्र महोत्सव’ साजरा करण्याचा निर्णय ‘लोकहितवादी संघा’च्या माध्यमातून 1926 मध्ये घेण्यात आला. तो निर्णय लोकांना इतका आकर्षक वाटला, की कुलाबा ते कल्याण–पालघरपर्यंतची मराठमोळी जनता स्वत:हून त्या नवरात्रौत्सवाच्या तयारीसाठी पुढे आली. तो महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक नवरात्रौत्सव होय. नवरात्रोत्सव छत्रपती शिवरायांच्या काळापासून सबंध महाराष्ट्रात घरोघरी व गडागडांवर थाटामाटात साजरा होत असे. त्या प्रथेमध्ये पेशवाईच्या काळात खंड पडला असे प्रबोधनकार ठाकरे यांचे मत होते. त्यांनी दादरला नवरात्रौत्सव सुरू करण्यास चालना देऊन ती परंपरा पुनरुज्जीवित केली. त्या उत्सवाला आणखीही व्यापक पार्श्वभूमी होती –
सार्वजनिक गणेशोत्सवात दलित समाजातील मंडळींनाही मूर्तिपूजा करता आली पाहिजे यासाठी झालेल्या चळवळीला मुंबईतील दादर विभागात 1926 मध्ये यश आले. त्यावर्षी त्या सार्वजनिक गणेशोत्सवात दलितांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. मात्र त्या घटनेने बिथरलेल्या सनातनी मंडळींनी दादरमधील तो सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचे 1926 नंतर बंदच केले! तो उत्सव पुन्हा पुढे, तीस वर्षांनी समर्थ व्यायाम मंदिराच्या गणेशोत्सवाच्या नावामागे ‘सार्वजनिक’ या शब्दाची भर टाकून दादरमध्ये सुरू झाला. दादरमधील सार्वजनिक गणेशोत्सव सनातन्यांनी कावेबाजपणा करून बंद पडल्याची गोष्ट प्रबोधनकार ठाकरे व अन्य सुजाण नागरिकांनाही पसंत पडली नव्हती. त्या प्रकरणानंतर सनातनी प्रवृत्तींना छेद देण्यासाठी दलितांसह सर्व जाती-जमातीतींल गटांना बंधुभावाने समाविष्ट करून घेणाऱ्या आणखी एका सार्वजनिक उत्सवाची गरज प्रबोधनकारांसह अन्य सुधारणावादी लोकांना वाटू लागली. महाराष्ट्राची मुख्य देवता भवानीमाता. तिच्या दरबारात कोणताही जातिभेद न पाळला जाता सर्वांनाच मुक्तद्वार असे. त्यामुळे प्रबोधनकारांनी प्रेरणा देऊन दादरला नवरात्रौत्सव सुरू झाला.
घटनेचा सविस्तर तपशील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेल्या ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकात 310 ते 313 या पृष्ठांमध्ये देण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने ‘माझी जीवनगाथा’ या पुस्तकाचे पुनर्मुद्रण प्रसिद्ध केले आहे. त्याची प्रथमावृत्ती 1997 मध्ये प्रसिद्ध झाली होती. पश्चिम (बीबी) रेल्वे आणि टिळक पूल यांच्या दरम्यान फक्त धुरू हॉलची इमारत 1926 मध्ये होती. बाकी सगळा विभाग मोकळा. पूर्वी तेथे एक तलाव होता. तो तलाव म्युनसिपालटीने जळालेल्या कोळशाचा कोक आणून बुजवून टाकला. त्या काळ्या मैदानावर ऐंशी फूट लांब व साठ फूट रुंद मंडप घालण्यात आला होता. त्या मंडपातील
दादरच्या सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे अध्यक्षपद रावबहादूर बोले यांनी स्वीकारले होते. त्या नवरात्रौत्सवात आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी मंडपात भगवा ध्वज उभारण्याचा मान दलित समाजातील लोकप्रतिनिधी सोळंकी यांना देण्यात आला. घटस्थापनेचा विधी हाही दलित समाजातील दांपत्याकडून करण्यात आला. ते सारे पूजाविधी दादरचे विख्यात पालयेशास्त्री यांनी यथाशास्त्र मंत्रोच्चारांनी पार पाडले. कविवर्य वसंत बिहार ऊर्फ जोशी यांनी रचलेली जगदंबेची आरती म्हटली गेली. भाविकांनी भवानीमातेच्या मूर्तीला शेवंतीचे प्रचंड हार अर्पण केले. दररोज रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होत. त्यांना काही हजार लोक उपस्थित राहायचे. ब्राह्मणेतर समाजातील वक्ते, गायक, कवी, शाहीर, प्रवचनकार, कीर्तनकार यांचा कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला होता.
भायखळा मार्केटमध्ये भाजी विकणाऱ्या माळी समाजातील यमुनाबाई घोडेकर यांचे झालेले व्याख्यान हा तर त्यावेळी चर्चेचा विषय ठरला होता! कपाळावर कुंकवाची
प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुढाकाराने तो नवरात्रोत्सव 1929 पर्यंत चालला. ते त्यावेळी आजारपणामुळे दादरहून काही काळ कर्जतला गेले. त्यानंतर दादरचा तो सार्वजनिक नवरात्रोत्सव खांडके चाळीतील मंडळी नियमितपणे सालोसाल साजरा करत आली आहेत. सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे लोण मुंबई व महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्रभर पसरले आहे. मात्र त्याचे निर्भेळ सांस्कृतिक स्वरूप नाहीसे झाले आहे व ते दांडिया नृत्यासाठी निमित्त ठरत आहे.
– समीर परांजपे
paranjapesamir@gmail.com
(‘दिव्य मराठी’वरून उद्धृत संपादित-संस्कारित)