इंग्रजांनी ब्राह्मण वर्ग कर्मकांडामध्ये रुळलेला, तात्त्विक विवेचन करणारा व केवळ बौद्धिक गोष्टी करणारा असतो, असा गैरसमज पसरवला. पण वास्तवात स्वतः अग्रेसरत्व करणारा असा माणूस ब्राह्मण म्हणून ओळखला जातो. तो सर्व क्षेत्रांमध्ये आहे. प्रत्यक्ष त्या त्या जीवनाच्या अंगाचे धुरीणत्व करणे, त्या क्षेत्राला दिशा देणे, प्रत्यक्ष ते आचरून इतरांना मार्गदर्शन करणे ही ब्राह्मण वर्गाची वैशिष्ट्ये होती…
भंडारा या जिल्ह्याला भंडारा हे नाव कशावरून पडले? ते अन्नधान्याचे, उसाचे, गुळाचे भांडार होते. कोल्हापूर हे गुळाचे भांडार नंतर झाले. परंपरेने, भंडारा जिल्हा हे गुळाच्या व्यापाराचे मुख्य केंद्र होते. दक्षिणोत्तर व्यापार तेथून होत असे. वैनगंगेच्या खोऱ्यात अवर्षण पडत नाही. त्या ठिकाणी हजार ते बाराशे मिलिमीटर पाऊस दरवर्षी पडतो. भंडारा जिल्ह्यात मानवी उपयोगामध्ये असलेले आठ हजार तलाव आहेत. ते सद्यस्थितीतही वापरात आहेत. ते तलाव निर्माण करणारा जो वर्ग आहे, त्या वर्गाला कोहली समाज असे म्हणतात. कोहली समाजाने तलावांच्या आधुनिक अभियांत्रिकीच्या आधारे केलेल्या बांधणीत काही बाबतींत आश्चर्याने थक्क केले. पण कोहली समाजाची इंग्रजांनी काय दैना केली? त्यांनी पाहिले की तो कर्तबगार समाज आहे. त्यांनी एका जिल्ह्यामध्ये हजारो तलाव बांधले आहेत, त्यांचे व्यवस्थापन करताहेत आणि त्यामुळे जिल्हा समृद्ध आहे. इंग्रजांनी जेव्हा 1861 साली जनगणना केली, तेव्हा कोहली समाजाची नोंदणी ‘शेड्युल्ड ट्राईब’ म्हणून करून टाकली! म्हणजे अभियांत्रिकीमध्ये जो अत्यंत प्रगत समाज, ज्यांनी प्रगत वारसा जपला, त्या समाजाला ‘शेड्युल्ड ट्राईब’ ठरवले गेले !
तसाच एक गैरसमज ब्राह्मण वर्गाविषयी निर्माण केला गेला आणि इंग्रजांनी त्याला विशेष चालना दिली. तो असा- ब्राह्मण वर्ग हा पूजाअर्चा करणारा, तात्त्विक विवेचन करणारा, केवळ बौद्धिक गोष्टी करणारा असतो. पण वास्तव तसे नाही. ब्राह्मणाचे कोठलेही वर्णन पाहिले तर त्याला कर्मकांडामध्ये रुळलेला, कर्मकांडाचा पुरस्कार करणारा व स्वतः अग्रेसरत्व करणारा असा माणूस ब्राह्मण म्हणून ओळखला जातो असे आढळून येईल. तो सर्व क्षेत्रांमध्ये आहे. मग, तो धनुष्यशास्त्रामध्ये अग्रेसरत्व करणारा द्रोणाचार्य असेल किंवा राज्यशास्त्रामध्ये अग्रेसर कार्य करणारा कौटिल्य असेल. प्रत्यक्ष त्या त्या जीवनाच्या अंगाचे धुरीणत्व करणे, त्या क्षेत्राला दिशा देणे, प्रत्यक्ष ते आचरून दाखवणे आणि तसे करून दाखवण्यासाठी इतरांना मार्गदर्शन करणे ही ब्राह्मण वर्गाची वैशिष्ट्ये होती. ब्राह्मण वर्गाची ही वैशिष्ट्ये वेगवेगळ्या ब्राह्मण समाजघटकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी लक्षात येतात.
पालीवाल हा सुद्धा बांधांची निर्मिती करणारा ब्राह्मणांमधीलच एक वर्ग. तो आग्रा, मथुरेच्या बाजूला आहे. या सगळ्यांचा सामाजिक अभ्यास अलिकडे झाला.
ब्राह्मणांत चित्पावन आणि देवरुखे यांच्यामध्ये वितुष्ट आहे. त्या वितुष्टाला प्रारंभ कोठून झाला? ब्राह्मणांमध्ये एकदा मोठा वाद झाला. एका ब्राह्मण गटाने त्यावेळी असा आग्रह धरला की पूजापाठ, धार्मिक चिंतन हेच ब्राह्मण वर्गाचे प्रमुख काम आहे, तसे न केले तर देव त्यांच्यावर रागावतील, त्यांना देवरुखे म्हटले गेले आणि बाकीचे चित्पावन राहिले. वासुदेव चितळे नावाचे सत्पुरुष चिपळूणला होते. ते पाणी, पाणी व्यवस्थापन, तलाव बांधणे, तलाव निर्माण करणे यांचा आग्रहाने पुरस्कार करत असत. पुष्करण ब्राह्मणांमध्ये शंकराच्या पिंडीची किंवा शाळुंकीची पूजा करतात, तशी एखाद्या शिळेवर खोदाई करण्याची आयुधे चित्रित केलेली असत, त्या शिळेची देवतेप्रमाणे पूजा करण्याची ती परंपरा. खोदाई केल्याशिवाय तलाव बांधणी शक्य नसल्यामुळे तो सगळा ब्राह्मण वर्ग ती खोदाई करण्यास लागणारी जी आयुधे आहेत, त्यांचीही पूजा देवघरांत करतो. वासुदेव चितळे हे त्या परंपरेतील होते. त्यांचा असा आग्रह होता, की ब्राह्मण हा क्रियाशील असला पाहिजे. म्हणजे ब्राह्मण हे नुसते लेखक किंवा बोलघेवडे विचारवंत नव्हते, तर क्रियाशील होते. ब्राह्मणांनी असे क्रियाशील राहिले पाहिजे. वासुदेव चितळे कोकणामधील तलावांची व्यवस्था ब्राह्मणवर्गाने सांभाळली पाहिजे याचा आग्रहपूर्वक पुरस्कार करत असत. ते नेमके कोणत्या शतकात झाले याचा पुरावा नाही, पण ती व्यक्ती आठदहा शतकांपूर्वीची असावी. इतिहासात आणखी मागे मागे गेलो, तर महाभारत काळामध्येसुद्धा तलावांना असलेले महत्त्वाचे स्थान लक्षात येते. नारदमुनी त्या परंपरेची युधिष्ठिराला आठवण करून देतात.
– माधव चितळे 9823161909
( ‘जलसंवाद’, डिसेंबर 2017 वरून उद्धृत. मूळ शीर्षक – भारताची जलसंस्कृती)
———————————————————————————————————————————————