कार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते! किंवा कुणा आजारी माणसाच्या औषधोपचारासाठी पदरमोड करून धावत असते. घरात असते तेव्हा ती खाण्यावरही गाण्याइतकेच प्रेम करते! नॉनव्हेज प्रेमाने खाते! डोशावर सारस्वती पध्दतीने मध भरपूर ओतून डोसा चवीने खाते. चवीने खातात ते चवीचे जीवन जगतात हेच खरे! पद्मजाचे जीवनच एखाद्या सुग्रास मेजवानीसारखे आहे! खरे तर, तिचे जीवन ही एक मैफल आहे!
परंतु पद्मजा पॅथॉलॉजिस्ट न होता प्रथम श्रेणीची आंतरराष्ट्रीय कीर्तीची गायिका झाली! एका दिवसात किंवा एका रात्रीत कुणीही ‘मोठा’ होत नाही! कौटुंबिक संस्कार, शाळा-महाविद्यालयातील स्नेही-सोबती-गुरू यांच्यामुळे होणारी व्यक्तिमत्त्वाची जडणघडण,
ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजामध्ये हे सारे गुण आहेत! शिल्पकाराला मूर्ती घडवण्यास योग्य ताकदीचा दगड लाभावा लागतो. त्या दगडालाही आपल्यातून सुंदर मूर्ती निर्माण व्हावी, असे वाटावे लागते.
पद्मजाला तिच्या आयुष्यात तिला घडवणारे, प्रोत्साहन देणारे हात लाभले. योग्य वेळी योग्य गुरूची भेट ही योगायोगाचीच बाब! पद्मजा ही तशी नशीबवान!
संगीतप्रेमी वडिलांमुळे, पद्मजा बालपणापासून शास्त्रीय गाण्यांच्या, नामवंत गायकांच्या एलपीज ऐकत होती. गायकासाठी गाणे गाण्याचा रियाझ हा एकच अभ्यास नसतो. अभिजात गाणे सतत बालपणापासून ऐकणे, हाही रियाझ असतो!
पद्मजाला पद्मविभूषण पं. जसराज, पद्मविभूषण पं. रामनारायण आणि पद्मश्री हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारखे दिग्गज गुरू लाभले; स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांकडून प्रोत्साहन लाभले. दुर्गा भागवत आणि ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांचा स्नेह व मार्गदर्शन लाभले. पु. ल. देशपांडे व कवी कुसुमाग्रजांसारख्यांचे आशीर्वाद लाभले. मैत्रिणीसारखी, मार्गदर्शक असलेली बहीण, प्रेमळ भाऊ व सुरेखासारखी भावजय लाभली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रोत्साहक, सच्च्या मित्रासारखा पती सुनील लाभला! आदित्यसारखा बुध्दिमान संगीतप्रेमी पुत्र लाभला!
पद्मजाच्या योजनापूर्वक, अथक व अभ्यासू परिश्रमांमुळे तिला लाभलेल्या यशाचा आलेख सातत्याने चढत चालला आहे. पद्मजाने १९८० साली, एकाच वर्षी गायनाच्या पंचवीस स्पर्धांत भाग घेतला आणि सर्व स्पर्धांत प्रथम क्रमांक मिळवला. संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र, जयदेव आणि एस.एन. त्रिपाठी यांच्यासारख्या परीक्षकांनी पद्मजाला सूरसिंगारचा ‘एस.डी.बर्मन’ पुरस्कार दिला होता, उत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून! आकाशवाणी, केंद्राने तिला लता मंगेशकर, अमजद अली खान, बिस्मिल्ला खाँ, झाकीर हुसेन, पं. भीमसेन जोशी यांच्या मालिकेत बसवणारी ‘टॉप ग्रेड’ दिली. मराठी चित्रपटातील शास्त्रीय संगीतावर आधारित गाण्यांबाबतचा ‘मियाँ तानसेन पुरस्कार’ पद्मजाला १९८८ मध्ये मिळाला. त्याच वर्षी प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘भारत निर्माण’ हा पुरस्कार पद्मजास लाभला होता. तत्पूर्वी, १९८५मध्ये ‘आदर्श नागरिक पुरस्कार’ही तिला दिला गेला होता. नोव्हेंबर २०००मध्ये ‘माणिक वर्मा’ पुरस्काराने पद्मजाला गौरवले गेले होते. या सर्वांवर कळस म्हणजे २००१च्या जानेवारीत भारत सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्काराने पद्मजाला लहान वयातच गौरवले!
पद्मजाचे भारतीय शास्त्रीय गायनाचे गझल-भजने आणि भावगीतांचे कार्यक्रम भारतभर व परदेशांतही होतात. तिचे कार्यक्रम इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, सिंगापूर आणि आखाती देशांत झालेले आहेत. भारतात दूरदर्शनच्या अनेक वाहिन्यांवर व भारतातील अनेक संगीत सभांत ती गायली आहे. पद्मजाने मराठी, बंगाली, हिंदी, गुजराथी, पंजाबी, उर्दू, कन्नड आणि कोकणी यांसारख्या विविध भारतीय भाषांतून गीत गायन केलेले आहे.
नाशिकचे भालचंद्र दातार निर्मित ‘ही शुभ्र फुलांची ज्वाला’, ‘रंग बावरा श्रावण’ आणि ‘घर नाचले नाचले’ या तीन आल्बममध्ये पद्मजाने कुसुमाग्रज, इंदिरा संत, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, शंकर रामाणी, सुरेश भट, ग्रेस आणि शांता शेळके यांच्या श्रेष्ठ दर्जाच्या कवितांचे गायन अविस्मरणीय स्वरांत केले आहे.
अटलबिहारी वाजपेयी जेव्हा फक्त खासदार होते तेव्हा त्यांच्या कविता पद्मजा आणि महेश चंदर यांनी स्वरबध्द केल्या होत्या. ते भारताचे पंतप्रधान झाले तेव्हा एच.एम.व्ही. कंपनीने ‘गीत नया गाता हूँ’ या शीर्षकाने पद्मजाने गायलेल्या त्या कवितांचा आल्बम प्रसिध्द केला. २००६मध्ये ‘जिंदगीकी जुबान’ नामक गझलगायनाचा पद्मजाचा आल्बम प्रकाशित झालेला आहे. त्याचप्रमाणे दाग, जिगर, अहमद फराज आणि डॉ. बशीर बद्र या नामवंत कवींच्या गझलांच्या गायनाचा एक आल्बम पद्मजाने सादर केलेला आहे. तसेच पद्मजाने अनुप जलोटांच्या संगीत दिग्दर्शनाने प्रसिध्द झालेल्या ‘मंगलदीप’ या सीडीद्वारे भजन-गायनही सादर केलेले आहे. पद्मजाने २०१० मध्ये ‘मेघा रे’, ‘एका उन्हाची कैफियत’ आणि हिंदी सुफी भजनांची ‘रंग’… अशा तीन नवीन सीडीज सादर केल्या आहेत.
‘भक्तिरंग’ म्हणून सादर होणा-या पद्मजाच्या जाहीर कार्यक्रमात मीरा, कबीर, तुलसी, नानक आणि रहीम इत्यादींच्या रचना ती सादर करते. ‘मंगलदीप’ या कार्यक्रमातून मराठी भावगीते, कविता आणि पार्श्वगायिका म्हणून तिने गायलेली व तिची गाजलेली गाणी ती गाते. ‘मेहफील ए गझल’ या कार्यक्रमातून नामवंत कवींच्या गझला आणि काही अन्य लोकप्रिय गझलाही ती सादर करते.
पद्मजा झोपेव्यतिरिक्तच्या वेळात सतत गाण्यात रमलेली असते. गाण्यात चिंब भिजत असते. चोवीस तास गाण्याचा विचार करत असते. कार्यक्रमांतून गात नसते तेव्हा आल्बमच्या ध्वनिमुद्रणात व्यग्र असते किंवा ती महाराष्ट्रातून कुठून कुठून येणा-या वेगवेगळ्या वयांच्या विद्यार्थ्यांची गाण्याची शिकवणीही एखाद्या अस्सल पंतोजीसारखी घेत असते! किंवा कुणा आजारी माणसाच्या औषधोपचारासाठी पदरमोड करून धावत असते. घरात असते तेव्हा ती खाण्यावरही गाण्याइतकेच प्रेम करते! नॉनव्हेज प्रेमाने खाते! डोशावर सारस्वती पध्दतीने मध भरपूर ओतून डोसा चवीने खाते. चवीने खातात ते चवीचे जीवन जगतात हेच खरे! पद्मजाचे जीवनच एखाद्या सुग्रास मेजवानीसारखे आहे! खरे तर, तिचे जीवन ही एक मैफल आहे!
पद्मजाच्या जीवनमैफलीत तिचे पती सुनील व पुत्र आदित्य यांनी गहिरे रंग भरलेले आहेत. गिटार व सिंथेसायझर सफाईने वाजवत आईला साथ देणा-या आदित्यला मी पद्मजाच्या जाहीर मैफलीत आईच्या मांडीवर पडून मैफल ऐकतानाही पाहिले होते.
तिला आवाजाची दैवी देणगी लाभली असली तरी कलाकाराची कलेशी अविचल निष्ठा व बांधिलकी असलीच पाहिजे असे पद्मजा मानते. ती ‘परफेक्शनिस्ट’ आहे. यमन, भैरवी, शुध्द सारंग, हंसध्वनी आणि रागेश्री यांसारख्या रागांवर तिचे विशेष प्रेम आहे. नामवंत कवींच्या उत्तम कविता निवडून त्या मोहक संगीतात माळून, अभ्यासपूर्ण व आकर्षक निवेदनासह तीन तास श्रोत्यांना खिळवून ठेवणारी मैफल पद्मजा सादर करते. आपल्या अमृतडंखी स्वरांनी रसिकांना घायाळ करते. कधी रसिकांनाही स्वत:सोबत गाण्याचे आवाहन करते. गाताना तिच्या चेह-यावर विलक्षण दुर्मीळ प्रसन्नता असते. संगीत व शब्द चांगले असतील तरच ती ते गाणे निवडते. ती संगीताकडे पोटापाण्याचे माध्यम म्हणून पाहत नाही. आनंद देण्या-घेण्यासाठी ती मंत्रमुग्ध करणारी गाणी गाते. संगीताला ती परमेश्वरच मानते. गायनकला तिला पूजनीय वाटते. तिची स्पर्धा ही तिच्याशीच असते. तिची पहारेकरीही तीच असते; तडजोड तिला मान्यच नसते.
कवी शंकर वैद्य यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘पद्मजास स्वच्छ पाण्यासारखा नितळ-प्रवाही आणि स्फटिकासारखा पारदर्शक’ स्वर लाभलेला आहे.
‘बहरलेल्या सावल्या’ ही शंकर रामाणींची कविता पद्मजाने गायल्यानंतर कवी ग्रेस तिला म्हणाले होते, “निर्झरी पैंजणांचा आनंद तुम्ही आम्हाला दिलात! मला असे शब्द का सुचले नाहीत? तुम्ही गायलेली ही कविता कुणाची आहे हे तुम्ही मला मुळीच सांगू नका! अगदी ती शंकर रामाणींची असली तरी!”
दादरच्या बालमोहन शाळेत गेली कित्येक वर्षे माजी प्रचार्य बापुसाहेब रेगे यांच्यामुळे, पद्मजाने संगीत देऊन गायलेल्या सी.डी.मधील श्लोक आणि भक्तिगीते प्रार्थना म्हणून हजारो विद्यार्थी शाळा भरताना ऐकतात. नुसती ऐकतच नाहीत तर स्वत:ही पद्मजाच्या आवाजाबरोबर आपला आवाज लावतात! पद्मजाला ही गोष्ट अतीव आनंदाची वाटते. ‘निवडुंग’ चित्रपटातील ‘केंव्हा तरी पहाटे’ आणि ‘लव लव करी पात’ ही गाणी पं. हृदयनाथ मंगेशकरांनी पद्मजाला तिच्या ऐन तारूण्यात गायला देऊन तिच्यावरचा विश्वास प्रगट केला होता. आजही ती गाणी पुन्हा पुन्हा पद्मजाकडून ऐकावीशी वाटतात! पद्मजाच्या यशाचा आलेख तिच्या भन्नाट वेगवान ड्रायव्हिंगसारखाच वेगवान आहे! पोहण्याची व खाण्याची आवड असलेल्या, स्वयंपाकाची नावड असलेल्या आनंदी, खेळकर पद्मजाच्या संगतीत गद्य मैफलही संगीतमय होऊन जाते.
– अशोक चिटणीस 9870312828
Khupach chhan
Khupach chhan
अतिशय सुंदर शब्दांकनाने
अतिशय सुंदर शब्दांकनाने पद्मजाचं काैतुक हे एक छान ईन्स्पीरेशन आहे,महत्वाचं म्हणजे एक जगप्रसिद्ध दिग्गज कलाकार असुन सुद्धा,माणुसकी,साधेपणा नी प्रेमळ बाेलणं ह्याचे प्रतिक म्हणजे पद्मजा,
खुप छान
खूप सुंदर ओळख एका उत्कृष्ट…
खूप सुंदर ओळख एका उत्कृष्ट गायिकेची ! पद्मजाताईंना शुभेच्छा !
Comments are closed.