Home वैभव इतिहास दुर्गवीर प्रतिष्ठानची श्रमदान मोहीम

दुर्गवीर प्रतिष्ठानची श्रमदान मोहीम

0
_Durgaveer_Pratishathan_1.jpg

दुर्गवीर ही मुंबईस्थित संस्था. ती गडकिल्ले, मंदिर, जुन्या वास्तू संवर्धन आणि त्यांच्या परिसरातील जनतेचा विकास यासाठी कार्य करत आहे. पण तिला मुंबईची संस्था तरी का म्हणायचे? दुर्गवीर गावोगावी आहेत. त्यांचा मूळ विचार महत्त्वाचा आहे. शिवाजी महाराजांची मुद्रा तयार करताना लोककल्याण, स्वराज्याचा विस्तार या गोष्टींचा विचार केला गेला. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’तर्फे मुंबई, पुणे, नाशिक, सातारा, बीड, कोल्हापूर, बेळगाव, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, लातूर येथील तरुण-तरुणी गडकोटांच्या संवर्धनासाठी 2008 पासून झटत आहेत. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’चे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत, संतोष हासुरकर. त्यांचे मूळ गाव बेळगाव. त्यांचे वास्तव्य मुंबईमधील सांताक्रुझ येथे असते.

ठिकठिकाणचे दुर्गवीर दर शनिवार-रविवारी व सुट्ट्यांच्या इतर दिवशी किंवा आठवडाभराच्या काम-कॉलेजच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाला, की एकत्र येतात आणि गडांच्या मोहिमेवर निघतात. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ची श्रमदान मोहीम असते, तशी दुर्गभ्रमंती मोहीमही असते. दुर्गवीर नुसते दुर्गांच्या संवर्धनाचे काम करतात असे नव्हे तर शिवाजी महाराजांच्या शौर्यशील संस्कृतीचे स्मरण करण्यासाठी विविध उपक्रमही राबवतात.

‘दुर्गवीर’ शिवजयंती असो वा शिवराज्याभिषेक, गुढीपाडवा असो वा दसरा प्रत्येक सण तितक्याच उत्साहाने व मराठमोळ्या पद्धतीने शक्य तर गड परिसरात साजरा करतात. संस्थेने दुर्ग शहरीकरणाच्या रेट्यात विस्मृतीत जाऊ नयेत म्हणून काही गडांच्या जवळच्या मार्गांवर गडांची माहिती देणारे स्थान दर्शवणारे दिशादर्शक फलक लावले आहेत.

_Durgaveer_Pratishathan_2_0.jpgमहाराष्ट्रातील मानगड, सुरगड, मृगगड (जिल्हा रायगड), साल्हेर, मुल्हेर (जिल्हा नाशिक), सामानगड (कोल्हापूर), कालानंदीगड, महिपालगड (जिल्हा बेळगाव), वल्लभगड (जिल्हा संकेश्वर) या किल्ल्यांजवळ अशा प्रकारचे फलक लावले गेले आहेत. ते महाराष्ट्रातील प्रत्येक गडावर, त्या परिसरातील रस्त्यांवर असावेत असा ‘दुर्गवीर’चा मानस आहे. संस्था गडांवर स्वच्छता करणे; त्यासोबत, पाण्याच्या टाकीची सफाई करणे हे कामही करते. सुरगड, मानगड, मृगगड, भिवगड, वल्लभगड, वर्धनगड, साल्हेर येथील पायवाटा, मुख्य दरवाजा, पाण्याची टाकी, इतर ऐतिहासिक वास्तू यांची साफसफाई व संगोपन नित्य केले जाते. गडांवर दरवर्षी दसरा, गुढीपाडवा, महाराष्ट्र दिन असे आणि विविध पारंपरिक सण साजरे करण्यात येतात.

संस्था गडांच्या संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी म्हणून गडाशेजारील पंचक्रोशीमध्ये, शहरांमध्ये गडाच्या संदर्भातील चित्रफिती दाखवणे, फोटो प्रदर्शन यांसारखे कार्यक्रमही करते. दुर्गम भागातील मुलांना स्कूल कीट व इतर शालोपयोगी वस्तूंचे वाटप दरवर्षी जून-जुलै महिन्यात करण्यात येते. दिवाळीला सोलर दिवे, पाणी शुद्धिकरण यंत्रे, ताटांचे संच यांचे वाटप केले जाते. दुर्गम भागात शिक्षण आणि आरोग्य या मुख्य समस्या असतात. ‘दुर्गवीर’ ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी आदिवासी बांधवांशी संपर्क करणे, संवाद साधणे आणि त्यांना सर्व बाबतींत मार्गदर्शन, मदत करणे हे सुरू असते. गडावरील पुरातन मंदिरांची डागडुजी, बांधणी मूळ स्वरूप कायम राखून करण्यात येते. ‘दुर्गवीर’चा संकल्प गडांवरील भग्न मंदिरे उभारून त्यांचे जुने वैभव परत मिळवून देण्याचाही आहे.

संतोष त्यांच्या ‘दुर्गवीर’ सहकाऱ्यांबाबत सांगताना म्हणतात, “‘दुर्गवीर’ त्यांचे शिक्षण, नोकरी सांभाळून आठवड्यातील एक दिवस या कार्यासाठी देतात. आजवर कित्येक तरुण-तरुणी ‘दुर्गवीर’मध्ये सामील झाले आहेत आणि त्यांनी आधुनिक स्वरूपाच्या या ‘शिवकार्या’त मानसिक समाधान मिळवले आहे.”

संतोष यांना गडकिल्ले आणि इतिहास यांच्याविषयी आवड बालपणापासून होती. त्यांची शालेय सहलींच्या दरम्यान गडकिल्ल्यांबाबत निर्माण झालेली आवड पुढे जात गडसंवर्धनाच्या कर्तव्यात बदलली गेली. संतोष यांना समाजसेवेचे बाळकडू त्यांचे वडील गुंडू संतू हासुरकर यांच्याकडून मिळाले. त्यांचे वडील बेळगाव सीमाभागातील समाजसेवक होते. गोरगरिबांना प्रत्येक गोष्टीत मदत करून त्यांच्याशी आपुलकीचे नाते निर्माण करणे हा त्यांचा समाजकार्याचा वारसा. संतोष हासुरकर गेली सोळा वर्षे गडकिल्ले भटकंती करत आहेत व अकरा वर्षांपूर्वी संस्था स्थापन करून गडसंवर्धन हा विषय घेऊन त्यासाठी ते वेड्यासारखे सतत धावपळ करतात. ते ‘इरॉस इंटरनॅशनल मीडिया’ या कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. घरी त्यांची पत्नी (संस्कृती) व पाच वर्षांचा मुलगा (शौर्य) आहे. त्यांना वडील नाहीत (मोठा भाऊ, लहान भाऊ, त्यांची कुटुंबे व आई असा त्यांचा संपूर्ण परिवार आहे).

संतोष यांना अजित राणे, नितीन पाटोळे यांची मुख्य साथ आहे. त्या ‘दुर्गवीरां’नी त्यांच्या स्वखर्चाने बेभान होऊन रायगड जिल्ह्यातील ‘मानगडा’पासून श्रमदान कार्याचा प्रवास सुरू केला. गडांची स्वच्छता करण्याचे त्याचे प्रयोजन काय? यापासून ते, तरूणांनी समाजबिमाजाचा ध्यास घेऊन इतिहास जपणे शक्य तरी आहे का? असे प्रश्न ‘दुर्गवीरां’ना विचारले गेले. उलट, ‘दुर्गवीर’ संस्थेने प्रत्येक प्रश्नाला, समस्येला समन्वयाने उत्तर देत, सहकार्याची भावना ठेवत कार्य कायम चालू ठेवले आहे. ‘दुर्गवीर’ संस्थेचे गडसंवर्धन स्थानिकांच्या सहकार्याने एकाच वेळी सात-आठ गडांवर सुरू आहे. ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ला दुर्गसंवर्धन व सामाजिक उपक्रमांसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गौरवण्यात आले आहे. दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांनाही विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांचा ‘सह्याद्री मित्र स्नेहसंमेलना’त दुर्गसंवर्धन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव झाला आहे. ‘बघतोस काय मुजरा कर’ या दुर्गसंवर्धन विषयावरील बहुचर्चित मराठी सिनेमात ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’च्या मोहिमांचा छायचित्रांद्वारे विशेष उल्लेख आहे. तसेच जनजागृती अभियान, वैद्यकीय शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, गडकिल्ले छायाचित्रे प्रदर्शन, व्याख्याने, दिवाळीनिमित्त गृहपयोगी वस्तू वाटप, संस्कृती जतन करणारे सण-उत्सव असे विविध उपक्रम वर्षभर आयोजित केले जातात. संस्थेचे निधी संकलन दुर्गवीर सभासद मासिक वर्गणी, मोहीम स्वखर्च, सोशल मीडिया माध्यमातून आव्हान करून निधी जमा करणे, गडकिल्ले फोटो प्रदर्शन विनामूल्य आयोजित करून मदतनिधी बॉक्सच्या निधीतून.

महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभाग येथे अंदाजे दोन हजार स्वयंसेवक आहेत.

भविष्यात निवडक किल्ले शास्त्रशुद्ध पद्धतीने उभे करण्याचा प्रयत्न, गडकिल्यांच्या घेऱ्यातील ग्रामीण भागातील गडांचे व इतर वास्तूंचे ऐतिहासिक महत्त्व पटवून देणे, शैक्षणिक पातळी सुधारणे, ऐतिहासिक संग्रहालये उभी करणे असा त्यांचा मानस आहे.

दुर्गवीर प्रतिष्ठान www.durgveeer.com
संतोष हासुरकर, 9833458151, संदीप गावडे, 9870101231,
sandeepgawade89@gmail.com

– योगिता साळवी, yogita_swayam@rediffmail.com

(‘मुंबई तरुण भारत’च्या 21 नोव्हेंबर 2018 वरून उद्धृत)

About Post Author

Exit mobile version