‘जन गण मन’ या राष्ट्रगीताचे 2011 हे शतक महोत्सवी वर्ष! या गीताला शंभर वर्षे पूर्ण झाली. घटना समितीच्या निर्णयानुसार 24 जानेवारी 1950पासून ‘जन गण मन’ हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता पावले. जगाच्या कानाकोपर्यातील भारतीय व्यक्ती तिथली भाषा न जाणता केवळ तिरंगा आणि राष्ट्रगीताची धून ऐकून आपल्या देशाच्या ठिकाणी मनाने पोचतो.
ब्रिटिश राजे पंचम जॉर्ज डिसेंबर 1911मध्ये भारतात आले आणि त्याच वेळी त्यांनी बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे महिनाअखेरीस कोलकता येथे आयोजित राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय सभेतर्फे त्यांचे स्वागत करावे, त्यासाठी रविंद्रनाथ ठाकूर यांनी राजप्रशस्ती गीत रचून द्यावे, असा आग्रह रविंद्रनाथांचे मित्र आशुतोष चौधरी यांच्यामार्फत करण्यात आला. राष्ट्रीय सभेच्या पहिल्या दिवशी ‘वन्दे मातरम्’ गायले गेले आणि राजप्रशस्ती गीत म्हणून अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी ‘युग जीवो मेरा पादशा’ हे एका जेष्ठ हिंदी कवीचे गीत गायले गेले. म्हणजेच ‘जन गण मन’ हे गीत जरी त्या अधिवेशनात गायले गेले असले, तरी ते पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी किंवा गौरवासाठी गायले गेले नाही. परंतु ‘जन गण मन’ संदर्भात अनेकांचा गैरसमज हा झाला आहे, की पंचम जॉर्जच्या स्वागतासाठी राजप्रशस्ती म्हणून हे गीत लिहिले व गायले गेले होते. त्यामुळे व्यथित झालेल्या रविंद्रनाथांनी आपली वेदना सुधाराणी देवी यांना 29 मार्च 1939रोजी लिहिलेल्या पत्रात दु:खपूर्वक व्यक्त केली आहे. ते लिहितात, ‘शाश्वत मानव इतिहासातील युगानुयुगे प्रवास करणार्या पथिकांच्या रथयात्रेचा चिरसारथी म्हणून चौथ्या किंवा पाचव्या जॉर्जचे स्तवन माझ्याकडून केले जाईल इतकी अपरिमित मूढता माझ्या ठिकाणी आहे अशी माझ्या संबंधी ज्यांना शंका येत असेल, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे ही माझ्यासाठी आत्मवंचना होय.’ रविंद्रनाथ ठाकूरांच्या या स्पष्टीकरणामुळे त्यांच्या विषयीचा त्या गीता संदर्भातील गैरसमज दूर होण्यास मदत झाली.
राष्ट्रगीत ऑर्केस्ट्रा आणि बँडवर 15 ऑगस्ट 1947नंतर वाजवण्यासाठी धून महत्त्वाची होती, न्यू यॉर्कमध्ये 1947ला संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘जनरल असेम्बली’मध्ये भारतीय राष्ट्रगीताच्या धूनची मागणी झाली. भारतीय अधिकार्यांनी तेव्हा ‘जन गण मन’ची ध्वनिमुद्रिका वाद्यवृंदाकडे दिली. जेव्हा युनोच्या बँडने तिचे सर्वांसमोर सादरीकरण केले तेव्हा ते सर्वांनाच खूप आवडले. अनेक देशांच्या प्रतिनिधींनी नव्या चालीच्या गीताच्या स्वर-लिपीची मागणी केली.
पंडित नेहरूंनी सर्व राज्यांमध्ये राज्यपालांना पत्रे लिहून, ‘जन गण मन’ किंवा अन्य कोणत्या गीताला राष्ट्रगीत म्हणून स्वीकारावे याची मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांची मते मागवली. सर्वांनी ‘जन गण मन’ला मान्यता दिली. त्या संदर्भात 25 ऑगस्ट 1948रोजी पंतप्रधानांनी पार्लमेंटमध्ये आपल्या वक्तव्यात सांगितले, की ‘या विषयावर मंत्रिमंडळाने विचार केला व जोपर्यंत संविधान सभेचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंतच्या मध्यावधी काळात ‘जन गण मन’चा उपयोग राष्ट्रगीत म्हणून करावा.’ आणि तसे निर्देश राज्यपालांना दिले. आणि 24 जानेवारी 1950रोजी 11 वाजता भरलेल्या घटना समितीच्या बैठकीत अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रगीतासंबंधी निवेदन जाहीर केले. ‘जन गण मन’ या शब्दांनी तयार झालेले गीत व संगीत हे भारताचे राष्ट्रगीत आहे. या गीतातील शब्दांत सरकारला वेळ पडेल तेव्हा आवश्यक तो बदल करण्याचा अधिकार राहील.’ तेव्हापासून ‘जन गण मन’ हे देशाचे अधिकृत राष्ट्रगीत बनले आहे.
रविंद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले मूळ ‘जन गण मन’ हे ‘भारतविधाता’ या नावाने बंगाली भाषेतील पाच कडव्यांचे गीत आहे. त्या गीतातील फक्त पहिले कडवे (दोन चरण) राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केले गेले आहे. गीतामध्ये देशाच्या विविध प्रांतांची नावे, विविध धर्मांचे उल्लेख आले आहेत. गीतामध्ये ज्या भारत भाग्यविधात्याचा जयजयकार केला आहे तो भारतभूमीपेक्षाही श्रेष्ठ आहे. अशा संपूर्ण विश्वाच्या नियंत्यालाच चिरसारथ्याचे आवाहन केले गेले आहे.
‘जन गण मन’ हे एक भक्तिरस स्तोत्र आहे. निद्रिस्त आणि परतंत्र भारताबद्दलची व्याकुळता त्यामध्ये दर्शवली आहे. दाही दिशांचे धर्म-समाज एकत्र येऊन भारत भाग्यविधात्याच्या सिंहासनापाशी प्रेमहार गुंफतील आणि हा भाग्यविधाता स्नेहमयी मातेप्रमाणे, दु:खाने आणि भीतीने ग्रासलेल्या देशाला आपल्याजवळ घेऊन दु:खाचे निवारण करील अशी भावना आहे. गीताच्या शेवटी निद्रिस्त भारत जागा होतो. रात्र संपून पहाट होत आहे. पूर्वेकडील उदयगिरीचा माथा रवितेजाने उजळत आहे. अशा प्रकारची आशादायी परिस्थिती गीतामध्ये वर्णन केली आहे.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता येथील अधिवेशनात 24 डिसेंबर 1911रोजी हे गीत प्रथम गायले गेले होते. राष्ट्रगीत गाण्यासाठी एकूण बावन्न सेकंद अपेक्षित आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते एका मिनिटापेक्षा अधिक गायले जाऊ नये असा संकेत आहे. काही प्रसंगी फक्त पहिल्या व शेवटच्या ओळींची एकत्रित धून वीस सेकंदांच्या कालावधीत वाजवली जाते. राष्ट्रगीत हे दरवर्षी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) व स्वातंत्र्यदिनी (15 ऑगस्ट) राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना गायले जाते. त्याचप्रमाणे भारतीय संघराज्याच्या अध्यक्षांना (राष्ट्रपतींना) मानवंदना देण्याच्या वेळी, राज्यपालांना मानवंदना देताना, परदेशी राष्ट्रप्रमुखांच्या सन्मानार्थ, तसेच क्रीडा, सांस्कृतिक व शैक्षणिक समारंभाच्या वेळी राष्ट्रगीत वाजवले जाते. काही प्रसंगी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळवर देखील राष्ट्रीगीताची धून वाजवली जाते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारताच्या मोठ्या शहरांमधील चित्रपटगृहांमध्येही प्रत्येक शो-समाप्ती नंतर राष्ट्रगीत वाजवले जात असे. आता ते शो-आरंभी वाजवले जाते. आज शाळा-महाविद्यालयांतून सकाळी किंवा सायंकाळी राष्ट्रगीत गायले किंवा वाजवले जाते. जेव्हा-जेव्हा राष्ट्रगीताची धून किंवा स्वर भारतीयांच्या कानी पडतात, तेव्हा-तेव्हा प्रत्येक भारतीय या गीताच्या सन्मानार्थ स्तब्ध उभा राहून या गीताला मानवंदना देतो!
सुनिल महादेव चव्हाण : हिंदी विभागप्रमुख, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लांजा
भ्रमणध्वनी : 9403145100