दुष्काळग्रस्त माण. मात्र, त्या तालुक्यातील इंजबाव गाव पिण्याच्या पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले आहे. त्याला कारण म्हणजे ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेले जलसंधारणाचे काम. माण तालुक्याला जानेवारीपासूनच पिण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. इंजबावमध्ये एक तलाव वगळला तर पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नाही. पावसाळा संपताच काही महिन्यांत गावातील विहिरी कोरड्या ठाक होत. परंतु गावाने ओसाड माळरान जमिनीवर बांध टाकून, बंधा-यांच्या बांधकामातून पाण्याची पातळी वाढवण्यात यश मिळवले. त्यामुळे इंजबाव गाव टँकरमुक्त झाले आहे!
सातारा जिल्ह्यातील माण तालुका भौगोलिकदृष्ट्या माळरान व कमी पावसाचा आहे. कमी पावसामुळे त्या भागात वारंवार अवर्षणाची परिस्थिती निर्माण होते. त्यावर उपाययोजना म्हणून माण तालुक्यात गावागावांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. त्यातील एक गाव इंजबाव. इंजबाव गाव डोंगरउतारावर आहे. त्या गावाची लोकसंख्या अठराशे-एकोणीसशे आहे. इंजबावमध्ये १९७२ सालचा तलाव आहे. तो तलाव पाण्याने भरलेला आहे. त्याव्यतिरिक्त गावात पाण्याचा कोणताही स्रोत २०१२ पर्यंत उपलब्ध नव्हता. गावात पंधरा-वीस विहिरी होत्या, पण त्या विहिरींना पाणी नसायचे. डोंगरउतारामुळे पावसाचे पाणी वाहून जायचे. शेती पिकत नसल्यामुळे गावात लोकांच्या हाताला काम नव्हते. इंजबावचे ग्रामसेवक श्री. शिवयोगी मळप्पा वंजारी यांनी ग्रामरोजगारसेवक कबीर बनसोडे यांच्या मदतीने गावात जलसंवर्धनाचे काम करण्याचे ठरवले. कबीर स्पष्ट करतात, “लोकांना पावसाचा पडणारा थेंब न् थेंब वाचवला, तर पाणीपातळीत वाढ होईल हे समजावून सांगितले. खरे तर, पाणी हा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यांना दिवसभर पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. गावातील महिलांनी त्या कामात प्रथम उत्साह दाखवला, श्रमदानाची तयारी केली. काही गावकर्यांच्या मदतीने डोंगरउतारावर छोटे-छोटे बांध टाकून पाणी अडवण्याच्या कामास २०१२ मध्ये सुरुवात झाली.”
कबीर बनसोडे यांचा व्यवसाय इलेक्ट्रिशियनचा आहे. ते स्ट्रीट लाइट्सची देखभाल करतात. त्याशिवाय ते ‘समय फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक कामात सक्रिय आहेत. कबीर यांना गावातील जलसंधारणाच्या कामासाठी ‘कोरो’ संघटनेकडून फेलोशिप मिळाली आहे. त्यांना ‘कोरो’च्या कार्यशाळांमधून जलसंधारणासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. ‘समय’चे संस्थापक बाळासाहेब रणपिसे. ती संस्था निराधार महिलांना मदत, जलसाक्षरता, स्त्री-पुरुष समानता, शिक्षण या क्षेत्रांत काम करते.
इंजबावसह आजुबाजूची सोळा गावे एकत्रितपणे माण तालुक्यात कॅनॉल व्हावा यासाठी लढा देत आहेत. त्यामध्ये वारुगड, थडाळे, मोगराळे, बिजवडी, इंजबाव या गावांचा समावेश आहे. सोळा गावांतील ग्रामस्थांनी कॅनॉल प्रश्नावर २०१३-१४ मध्ये चार दिवसांचे उपोषणदेखील केले होते. रोज वेगवेगळ्या गावातील शंभर ते दीडशे लोक उपोषणस्थळी उपस्थित राहत. त्यावर शासनाने गावांमध्ये सर्व्हे करून कॅनॉलसाठी जागेची मोजणी करण्याचे आश्वासन देऊन गावक-यांचे उपोषण थांबवले. पण त्यानंतर शासनाकडून कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. गावक-यांनी डोंगराळ भागामुळे कॅनॉल शक्य नसेल तर सरकारने पर्यायी पाणीव्यवस्था करावी अशी भूमिका घेतली आहे. नीरा, देवघर, धोम बलकवडी, जिहे-कटापूर व तारळी या पाणी योजनांपैकी ज्या योजनेतून पाणीपुरवठा करता येईल, त्यातून तो करावा, यासाठी गावक-यांचे सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सरकारने गावक-यांना पाठपुराव्या दरम्यान २०२२ पर्यंत पाणीप्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले आहे.
कबीर यांच्या कार्यात त्यांना जाधववाडी गावातून शोभा पाटोळे, भिजवडीमधून युवराज भोसले, तर इंजबावमधून दादा बनसोडे मदत करत आहेत. शिवाय, ‘समय’चे सात सदस्यही त्यांच्या कामात सहभागी आहेत. त्यांना सोळाही गावांतील गावक-यांचा सक्रिय पाठिंबा आहे. कबीर अंगमेहनतीची कामे, कलर व लाइट फिटिंगची कामे करतात. त्यांचे स्वप्न बंजर जमिनीवर नंदनवन फुलवण्याचे आहे.
कबीर बनसोडे – ९५६१५५७२४६
– वृंदा राकेश परब