सासुरवाशीण मुली आखाजीला पण दिवाळीप्रमाणेच माहेरी येतात. काही कारणाने ज्यांना दिवाळीला माहेरी येता आले नाही त्या मुलींनादेखील आखाजीची आस असते. आखाजी, दिवाळीला गावात आलेल्या पाहुण्याच्या हातात पिशवी दिसली तरी बाया आपापसात एकमेकींना विचारतात, ‘कोणाकडे मु-हाई ऊना वं’. सासुरवाशीण मुलीला घ्यायला येणा-या माणसाला मु्-हाई असे म्हणतात. ज्या मुलींना दिवाळी-आखाजीला, दोन्ही वेळेस मात्र साड्या (पूर्वी लुगडी) मिळतात अशा भाग्यवान मुली कमी. ज्या आईवडिलांना मुलीला दिवाळीला साडी घेणे जमत नसेल तर ती मुलगी तिच्या रडक्या स्वरात बापाला म्हणते, ‘तू दिवाईले कबूल करेल होते’, मंग आते ली दे. नही तर मी मंग सासरी जाणार नाही. पण साडी घेतली नाही तरी सासरचा मु-हाई आल्यावर ती सासरी जातेच. रडतकढत. आई किंवा बाप नसलेल्या मुलींना कोणी त्याची जाणीव ठेवून कोणी घेणारे-देणारे असले तर प्रश्न नाही, पण तसे कोणी नसले तर त्यांच्या कारुण्याला पारावार नाही. काही व्यसनाधीन बाप मुलींना साड्या घेऊ शकत नाहीत. त्या मुलींचे दु:ख काय वर्णन करावे! काही आईबाप धूर्त आणि चलाख असतात. त्यांना माहीत असते की त्यांच्या मुलीचे सासर चांगले आहे. नवरे कमावते आहेत आणि त्यांना सासरी, ‘तू काय आणं?’ असे विचारणारे कोणी नाही. हे पाहून ‘एवढी पाय तू ली ले. पुढला वेळेस देखू. आमनं नाव मोठं करी दे’ असे विनवून वेळ मारून नेतात.
चैत्र पौर्णिमेला गावात घरोघरी मुली गौराईची स्थापना करतात. गौराई एका बोखल्यात बसवतात. गौराईच्या बोखल्यात सुंदरसा नक्षीदार लाकडी पाळणा बसवतात. बोखले स्वच्छ करून त्यांना बाहेरुन छानसे रंगवले जाते. गौराईला रोज वेगवेगळ्या पदार्थांची माळ करून घालतात. त्यात कापूस, बोरे, शेंगा, मुरमुरे इत्यादी; तर आखाजीच्या आदल्या दिवशी सांजो-यांची माळ घालतात.
आखाजीचा सण हा १५ एप्रिल ते १५ मे च्या दरम्यान केव्हातरी येतो. शेतक-यांची शेतीची कामे आटोपलेली असतात. वेळ निवांत आणि मोकळा. त्यावेळी दिवाळीपेक्षा दिवस मोठाले असतात. ऊन तापायला सुरुवात झालेली असते. शाळेत जाणा-या मुलामुलींच्या परीक्षा संपलेल्या असतात. त्यामुळे जिकडेतिक़डे आनंदी वातावरण असते.
मी लहान असताना शाळेत जाणा-या मुलींची संख्या कमीच होती. पण शाळा सोडणा-या मुलींची संख्या जास्त होती. ज्या मुली शाळेत यायच्या त्यांच्यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता बाकीच्या मुलींना शाळेचे टेन्शन नव्हते. त्यामुळे परीक्षा संपल्या हे सांगण्यापुरते असे. अशा मुलींचा गौराई बसवण्यात सहभाग जास्त व प्रेमाचा असे. आमच्याकडे मा्झ्या दोन लहान बहिणींचेही असे होते. त्यांचा गौराई बसवण्याचा उत्साह अपार! त्या मोठ्या भावाकडून किंवा त्यांच्या मित्राकडून गौराईचे बोखले छानसे रंगवून घ्यायच्या. कधी आमच्या मोठ्या बहिणीचे यजमान आले तर मग पाहायलाच नको. ते रेल्वेत ट्रेस होते. त्यांचे फ्री हॅंड ड्राईंग चांगले होते. त्यांनी रंगवलेले बोखले नुसते नसायचे, तर ती आख्खी भिंत असायची. त्यामुळे गावातील बहुतेक बाया-मुली गौराईचे रंगवलेले घर पाहायला म्हणून आमच्या घरी येत.
गौराईच्या झोक्यावरच्या गाण्यांना ऊत येई. इंदू-विमल ह्या लहान बहिणी तर सकाळी उठल्यापासून झोके खेळायला सुरुवात करत. त्यांना खाण्याजेवणाची शुद्ध नसे. दिवसभर तीच ती गाणी ऐकून ऐकणा-याचे कान किटून जायचे पण तरीही त्या बहिणींचे काही सामाधान होत नसे. त्यांचे आपले कर्कश्श आवाजात, ‘धव्व्या घोडा सटांग सोडा गवराई सासरी जाय वो, किंवा ‘खडक फोडू झिलप्या काढू पाणी झुईझुई’ व्हाय वो’ चालूच असायचे, ब-याच वेळा आई किंवा भाऊ-बापू झोके उबगून-बांधून ठेवायचे, पण त्यांचे दुर्लक्ष झाले म्हणजे मग त्या पुन्हा झोके सोडून खेळायला सुरुवात करायच्या एरवी, दोन्ही बहिणी वर्षभर भांडत राहायच्या पण झोक्यांच्या वेळी एक व्हायच्या. झोक्यावर एकीपेक्षा दोनजण असले तर अधिक बरे असते. झोक्याचे दोन पंधे असायचे. दोघीजणी दोन पंध्यावर बसायच्या. एकजण दुस-या पंध्याला पाय लावून असायची तर दुसरी पाय हलवून झोके घ्यायची. सुरुवातीला झोका द्यायला कोणाची तरी मदत घ्यायची. एकदा झोका सुरू झाला की मग तो पाय हलवून अखंड हलता ठेवता यायचा. एकीने गाणे सुरु केले की दुसरीने तीच ओळ पुन्हा म्हणून तिला साथ द्यायची.
एकदा गंमतच झाली. वडील (दादा) दुपारी झोपलेले होते. त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून आई आम्हा सर्व भावंडांना धाक दाखवून गप्प बसवी. दादांची घरात जरब होती. इंदू ही बहीण आमच्या घरातील शेंडेफळ. त्यावेळी ती पहिली-दुसरीत जात असावी. ती सर्वात लहान आणि गोंडस असल्यामुळे सर्वजण तिचे लाड करत. आईची तर ती जास्तच लाडकी होती. त्यामुळे ती कोणाला भित नसे. तिला दुपारी झोक्यावर बसायची हुक्की आली. आम्ही सर्व भावंडे आणि आईसुद्धा नाही म्हणत असताना तिने बांधलेला झोका सोडला आणि ‘धव्व्या घोडा सरांग सोडा’ सुरू केले. अगोदर ती हळू आवाजात म्हणत होती, पण रंगात आल्यावर आवाज वाढला. तशी वडिलांची झोप चाळवली. रात्री दादा गावाहून उशिरा परत आलेले होते. त्यामुळे त्यांना जागरण झालेले होते. ते रागारागात उठले. त्यांचा तो रौद्रावतार पाहून इंदूला कुठे पळावे ते समजेना.
आई नेमकी घरात. इंदूच्या आईकडे पळण्याच्या मार्गावर दादा. त्यामुळे इंदू तडक अंगणात पळाली. तरीही दादा तिच्यामागे. ती दादांच्य़ा हातात सापडेल आणि दादा तिला चांगले बदडून काढतील याची आम्हाला खात्री पटली. आई घरातले काम सोडून ओट्यावर आली. आईला वडिलांचा पाठलाग करणे शक्य नव्हते. आई ओट्यावरून, ‘जाऊ द्या ना, पोरगी भेमकाई जाई ना,’ म्हणून वडिलांना विनवत होती. इंदू कुठपर्यंत पळणार? कुठे जाणार? ती घराचा ओटा उतरून सहसा बाहेर कुठे गेली नव्हती. तेवढ्यात तिला ओट्यावर भरगड्यावर काहीतरी भरडणारी सायतर मोठमाय दिसली. सावित्री मोठमायचा मुलगा रामभाऊ आणि आमचा मोठा भाऊ अण्णा एकाच वर्गात शिकत होते. त्यामुळे त्या घराशी आमचा घरोबा होता. इंदू त्या मोठमायच्या पाठीमागे लपली. तरीही दादा इंदूमागे मोठमायचा ओटा चढले. सावित्री मोठमायच्या मागे लपलेल्या इंदूला त्यांनी ओढून घेतले. तशी सावित्री मोठमायने दुर्गावतार धारण केला आणि त्या वडिलांच्यावर खेकसल्या. ‘एवढीशी पोरगी तिने काय तुमचे घोडे मारले? काय नुकसान केले? पोरगी भेमवून जाईन की काय? काही नाही. सांगा, तिने तुमचे काय नुकसान केले ते, मी भरून देते.’ सायतर मोठमायला वाटले, की इंदूने कपबशी किंवा बरणी वगैरे काहीतरी फोडले असेल म्हणून. तोपर्यंत आईही सावित्री मोठमायच्या अंगणात जाऊन पोचली. आम्ही मात्र तो सारा प्रकार ओट्यावरून पाहत होतो. ‘झोपमोड झायी म्हणून एवढं मागे लागावं का?’
आता कुठे झाला प्रकार सावित्रीबाईच्या लक्षात आला आणि मग त्या भडकल्याच! ‘कुंभकर्ण एवढी झोप प्यारी आहे तुम्हाला, पोरीपेक्षा झोप जास्त झाली तुम्हाला?’ मोठमाय ‘राहू द्या त्या पोरीला माझ्या घरी. मी नाही देत ती पोरगी’ असे काहीबाही खूप वेळपर्यंत बोलत होत्या.
दादा खाली मान घालून घरी परत आले. ते चांगले जागे झाले होते. त्यानंतर सावित्री मोठमायने इंदूचे कान फुंकले, तिला छातीपोटाशी धरले. त्यानंतर तिला काहीतरी खायला दिले. पण इंदू इतकी भेदरलेली होती, की खूप वेळपर्यंत तिच्याने तिचा हुंदका आवरेना, ती घरी यायला तयार होईना. आईही घरातले सगळे काम सोडून सायतर मोठमायच्या ओट्यावर बसून राहिली. दादा संध्याकाळी घराबाहेर पडल्यावरच इंदू घरी आली. त्यानंतर दोन-तीन दिवस तिने आईला अजिबात सोडले नाही.
आई झोक्यावरही कधी बसली नाही. जसजशी आखाजी जवळ येत जायची तसतशी झोक्यावर बसणा-या मुलींची संख्या वाढत जायची. सुरुवातीच्या लहान मुलींनतर हळुहळू माहेरी आलेल्या माहेरवाशीण मुली मग झोक्यावर आपला गळा मोकळा करायच्या. ज्यांना माहेरी जायला मिळाले नाही अशा सासुरवाशीणी मुलीही मग रात्री आपला कामधंदा आटोपून झोक्यावर बसत. प्रौढ आणि म्हाता-या बायांचा उत्साहही ओसंडून जाई. त्या झोक्यावर बसत नसल्या तरी झोक्यांवरच्या मुलींना झोके द्यायला, गाणे आठवण करून द्यायला त्यांचा उपयोग होई.
मी चार-पाच वर्षांचा असताना जी मौज घरी पाहिली, अनुभवली आहे ती माझ्या डोळ्यासमोर चित्रासारखी उभी राहते. कमलाताई, जिजामावशी, राजसमामी, सायतर मोठमायची गंगुताई, मावस-बहिणी कलाताई, लीलाताई, सुमनताई, आतेबहीण यशोदा अशा कितीतरी गल्लीतील आणि गावातील मुली आखाजीला झोके खेळायला आणि गाणी म्हणायला आमच्या घरी जमत. आज त्यांपैकी काहीजणी हयात नाहीत. जिजामावशींकडे तर आखाजीच्या गाण्यांचा खजिना होता. तिचा आवाजही ब-यापैकी होता. कमलाताईंचा आवाज मंजूळ होता. ताईच्या आवाजातले ‘धाडू नको वनी राम’ कैकेयी, धाडू नको वनी राम किंवा ‘जाय रे पेंद्या चंद्रावळच्या दुकाने. चंद्रावळला सांग मज पाठवलं देवानी’ ह्या ओळी आजही मी नकळत कधीकधी गुणगुणतो.
आम्ही चौघे भाऊ लहान, वडील ब-याचवेळा घराबाहेर असत किंवा घरी असलेच तर ते उन्हाळ्याचे दिवस असल्याने गादी टाकून धाब्यावर जाऊन पडत. कारण आपण घरी असल्याचे दडपण मुली-बायांवर येऊ नये आणि त्यांच्या आनंदात विरजण पडू नये म्हणून ते काळजी घेत. झोक्यावर बसून गाणे म्हणणा-या मुली-बायांच्या आवाजातील चढ-उतारावरून सासर-माहेर हा भेद स्पष्टपणे जाणवे. गाणे गाताना माहेरच्या मुलींचा आवाज मोकळा वाटे तर सासरी असलेल्या बाया भितभित, दबकत गाणे म्हणत.
मुली, बाया जशा गौराई, झोके यांत गुंग असायच्या त्याचप्रमाणे, किंबहुना त्यापेक्षा जास्त नशा ही गावातील सर्व लहानथोर मुलामाणसांना जुगाराची असायची. त्याचा कालावधी साधारणत: आखाजीच्या पंधरा दिवस अगोदरपासून ते आखाजी संपल्यानंतर पंधरा दिवसपर्यंत कमीअधिक प्रमाणात चालायचा. काही अपवाद सोडल्यास त्यात सर्व जातीतील, सर्व वयोगटांतील, सर्व थरांतील लोक असायचे.
जुगाराचेही बालवाडीपासून ते महाविद्यालयापर्यंतचे वेगवेगळे स्तर होते. शाळेत न जाणा-या लहान गटातील मुलांकडे पत्त्यांचा लहान कॅट किंवा मोठ्यांनी वापरून काढून टाकलेले, काही पत्ते, हरवलेले जोड असत. गरिबांच्या मुलांकडे पत्ते नसले तरी खेळायला चिंचोक्या मुबलक प्रमाणात असत. चिंचोक्यांची वरची पायरी म्हणजे कवड्या. किराणा दुकानावर त्या गंड्याच्या (चार कवड्या एक गंड्ग) हिशोबाने मिळत. दुकानावर मिळणा-या कवड्यांच्या तुलनेत कवड्या जिंकलेल्या मुलांकडे त्या तुलनेने कमी भावात विकत मिळत. कवड्या खेळताना कवड्या दोन्ही हातात खुळखुळून कवड्या जमिनीवर फेकणारा मुलगा प्रत्येक वेळी ‘चित्ताडाना देऊ. कवडी फुटी-फाटी भरीना देऊ’ असे म्हणून डावाला सुरुवात करी. बधी-भोक हाही जुगाराचा लहान मुलांचा प्रकार होता. त्यात जमिनीवर खड्डा करून ठरावीक अंतरावरून त्यात चिंचोक्या, पेन्सिली किंवा पैसे फेकून तो जुगार खेळला जाई. मामा आम्हाला आखाजीच्या दोन-चार दिवस अगोदरपासून शेराच्या मापातून कवड्या खेळायला म्हणून घेऊन द्यायचा. आईने त्याला या बाबतीत टोकले तेव्हा मामा म्हणाला, ‘ही मुलं उन्हातान्हात रिकामं खेळतील ऊन लागून आजारी पडतील. म्हणून मी त्यांना कवड्या घेऊन देतो. त्यामुळे ते कमीत कमी सावलीत तरी खेळतील. कवड्या खेळणे हा काही जुगार नाही असे त्याचे म्हणणे होते.
पत्त्यांचे हे डाव मारुती मंदिर, ढोरांच्या दवाखान्याचा ओटा, कोंडवाडा, पीरवाडा, जुना मारूती मंदिर, सुट्या लागल्या असल्यास शाळांचे ओटे, गावातील रिकाम्या घरांचे ओटे, गावखेर असलेल्या डेरेदार आंब्यांच्या झाडाखाली रंगत त्यातही वेगवेगळ्या गटांचे लोक वेगवेगळ्या प्रकारचे पत्ते खेळायचे. ढोरांच्या दवाखान्याच्या ओट्यावर किंवा त्याच्या मागे, जो डाव बसायचा तो म्हाता-यांचा डाव होता. तेथे पाच पैशांची मांडणी व्हायची. एखाद्याजवळ पंचवीस, पन्नास पैशांचं नाणं असले तर मग ‘तुला भान मांडीले’ वगैरे समजुतीने सुट्या पैशाअभावी होणा-या अडचणींवर मात केली जायची हा पाच पत्त्त्यांचा जोडा जुळवण्याचा प्रकार असल्याने दिवसभर पत्ते कुटूनही त्यात कोणी फार जिंकत अगर हारत नसे. पत्ते ओढणे, पत्ता आपल्याला लागतो किंवा काय याचा विचार करणे, फेकलेले पत्ते घेणे, यात त्यांना कितीही वेळ लागला तरी त्यांना घाई नसे. म्हाता-यांना करमणुकीचे दुसरे काही साधन नसल्याने म्हणा किंवा इतर गोष्टींत त्यांना फारशी आवड नसल्यामुळे म्हणा ते सकाळपासून अंधार पडेपर्यंत पत्तेच खेळत राहायचे. तो अड्डा पावसाळा येईपर्यंत चालायचा.
साहेबराव महाजन
मु. पो. कोळगाव, तालुका भडगाव,
जिल्हा जळगाव, पिन कोड – ४२५१०५
९७६३७७९७०९