मराठी भाषेविषयी कळवळ्याने बोलणारे अनेक आहेत. वृत्तपत्रांत त्यावर जोरदार चर्चा होते. पण कुणाजवळ मराठी भाषा सुद्दढ, संपन्न करण्यासाठीचा खात्रीलायक उपाय नाही. पण डोंबिवली या सारस्वतांच्या नगरीत अनेक वाचनालये आपापल्या परीने मराठी लोकांपर्यंत पुस्तके पोचवण्याचे काम करत असतात.
ज्ञानविकास वाचनालय
त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी (1970) छोट्या जागेत वाचनालय सुरू केले. त्या सुमारास मुंबईहून व इतर ठिकाणांहून बरेचसे सुशिक्षित नोकरदार लोक डोंबिवलीत राहण्यास येत होते. परांजपे सुरूवातीस एक-दोन वर्ष एमएसइबीमध्ये नोकरीला होते, पण त्यांना व्यवसाय करण्याची आवड. त्यांनी नोकरी सोडून वाचनालय सुरू केले. स्टेशनजवळ वाचनालय असले तर चांगले चालेल हा त्यांचा होरा खरा ठरला.
त्यांच्या वाचनालयाचे एक हजारपर्यंत सभासद आहेत. ते मासिक वर्गणी 90 रुपये + डिपॉझिट 150 रूपये घेतात. सभासद 100/200 रुपये वर्गणी सहजपणे देतात असा त्यांचा अनुभव आहे. त्यांचे वाचनालय गेली तेहतीस वर्षे तेथे आहे. जागा फारशी मोठी नसली (20X12) तरी त्यांचे भाडे 12000 रूपये आहे. (ते 15000 रुपये होणार आहे) त्यांच्याकडे दोन-तीन नोकर (पगारी) असूनसुद्धा वाचनालय हा व्यवसाय म्हणून एक कुटुंब चालू शकते असा त्यांचा अनुभव आहे.
त्यांना नवीन प्रकाशित झालेली पुस्तके त्या किंवा दुस-या दिवशी पुण्याचे ललित प्रकाशन (लिमये) लगेच उपलब्ध करून देते. त्यांच्या अनुभवाप्रमाणे कोणतेही पुस्तक लायब्ररीत दोन ते तीन वर्ष चालते. इतर व्यवसायांप्रमाणे, वाचनालयात पहिल्या दोन वर्षांत फायदा होत नाही. पण पुस्तके व मासिके घ्यावीच लागतात. तिथपर्यंत तोटा सहन करावा लागतो. यामध्ये पुस्तके टिकतात पण मासिकांची रद्दी होते. हल्ली व्यापारीकरणामुळे फायद्याचा भाग वाढीव भाड्यामध्ये बराच जातो. या व्यवसायासाठी दोन-तीन सहका-यांची आवश्यकता असते ते जर घरचे असतील तर चांगले.
वाचनालयात सहा भाषांतील- तामिळ, तेलगू, कन्नड, मराठी, गुजराथी, हिंदी, इंग्रजी, मासिके – प्रत्येकी पाच ते दहा प्रती ठेवाव्या लागतात. वाचनालयात सर्वभाषिक सभासद असणे गरजेचे आहे. इतर भाषांमध्ये, विशेषत: कानडी, तेलगू मासिके बरीच स्वस्त असतात, कारण त्यांचा खप पाच-सात लाखापर्यंत आहे. फक्त मल्याऴम या केरळी भाषेतील मासिके वाचनालयांतून कोणी नेत नाही. कारण मुंबईतील बरेच केरळी लोक स्वत: मासिके विकत घेऊन वाचतात. त्यांच्या मासिकाचा खप बारा-चौदा लाखांपर्यंत आहे. त्यापुढे मराठी मासिकांचा खप तीस-चाळीस हजारापर्यंत म्हणजे फारच कमी आहे.
तुमची आवड व व्यवसाय, दोन्ही एकत्र आल्यास वाचनालय हा आवडीचा व्यवसाय होऊ शकतो. त्यातून आपला प्रपंच व्यवस्थित चालू शकतो, पण अपेक्षा मात्र मर्यादित हव्यात असे त्यांनी सांगितले.
पुंडलिक पै यांची ‘फ्रेंड्स लायब्ररी’. पुंडलिक पै हे एक पुस्तकवेडे, जास्त न बोलता आपले काम चोख करणारे तरुण आहेत. त्यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण डोंबिवलीलाच झाले. त्यांचे मराठीवर प्रेम असून त्याला पुणेरी टच आहे. त्यांना लहानपणापासून वाचनाचे वेड आहे. या सवयीला त्यांच्या आईने प्रोत्साहन दिले. त्यांनी नोकरी करायची नाही असे लहानपणी ठरवले; स्वत:चे खूप मोठे ग्रंथालय असावे असे स्वप्न बघितले. वाचनालयाचा विचार हा त्यांचा ध्यास आहे.
त्यांनी एक हजार पुस्तके विकत घेऊन फ्रेंड्स लायब्ररी टिळकनगरात 1986 साली सुरू केली. नंतर इतर ठिकाणांहून पुस्तके गोळा केली. नुकतीच त्यांनी विकास वाचनालयाची सर्व पुस्तके, श्रीकांत टोळ यांच्या निधनानंतर विकत घेतली. आज, त्यांच्या लायब्ररीमध्ये पासष्ट हजार एवढी इंग्रजी व मराठी पुस्तके आहेत. त्यामध्ये कथासग्रंह, कादंब-या, प्रवासवर्णने, आत्मचरित्रे, धर्मग्रंथ, कवितासंग्रह अशी सर्व पुस्तके आहेत. ते मराठी, इंग्रजी, कानडी, मल्याऴम, गुजराथी अशी सर्व मासिके दर महिन्याला घेतात. त्यांच्याकडे रोज नवीन (प्रकाशित होणारी) पुस्तके येतच असतात. त्याकरता, त्यांनी वेगवेगळ्या पुस्तक विक्रेत्यांबरोबर व्यवस्था केली आहे.
पुडंलिक पै यशस्वी व्यवसायाची तीन प्रमुख पथ्ये पाळतात; 1. सभासद त्याला हवे असलेले पुस्तक घेऊन समाधानाने गेला पाहिजे, 2. पुस्तक उपलब्ध नसल्यास ते त्वरित आणून दिले पाहिजे, 3. वाचनालय दिवसभर उघडे पाहिजे.
शांत, मनमिळाऊ स्वभाव; ते कापड दुकानदाराप्रमाणे गोडवा ठॆवून पुस्तकांसबंधीची माहिती न कंटाळता देतात. वाचण्यासाठी पुस्तके सुचवली जातात. व्यवसायांतील अशा गुणामुळे त्यांच्याकडे सभासद भरपूर आहेत. त्यांनी वाचनालयाच्या चार शाखा विविध भागांत सुरू केल्या आहेत. पाचवीचे उद्घाटन अलिकडेच झाले. विद्यार्थी वर्गासाठी शैक्षणिक लायब्ररी वेगळी आहे. त्यामध्ये इंजिनीयरिंग, संगणक, मेडिकल, कला, वाणिज्य, विज्ञान शाखेची भरपूर पुस्तके आहेत. मेडिकलच्या काही पुस्तकांच्या किमती पाच ते आठ हजार रुपयांपर्यंत आहेत. सर्व शाखांची मिळून तीन हजारापर्यंत सभासद संख्या आहे. ते म्हणतात, वाचनालय हा व्यवसाय छोट्या प्रमाणात केल्यास यशस्वी ठरू शकत नाही.
त्यांनी ‘Online Book’ ही नवीन संकल्पना राबवली आहे. कल्याण ते घाटकोपर या दरम्यान ती सुरू आहे. त्यांनी आपल्याकडील पुस्तकांपैकी पंचावन्न हजार पुस्तकें संगणकावर online टाकली आहेत. त्यामध्ये पुस्तकांचे नाव, प्रकाशकाचे नाव, लेखक व मागील पानावरील पुस्तकासंबधीचे निवेदन दिले आहे. दीडशे रुपये भरून सभासद झाले की टेलिफोनने पुस्तक बुक करायचे. दुस-या दिवशी कुरियरद्वारा सभासदास पुस्तक मिळते. या योजनेचे साडेतीनशे सभासद झाले आहेत.
इंग्रजीची नवीन व लोकांना हवी असलेली पुस्तके ते भरपूर प्रती घेतात. त्यांनी चेतन भगतच्या कादंबरीच्या दोनशे प्रती घेतल्या आहेत. कारण ते पुस्तक एकाच वेळी शंभर सभासदांना हवे असते. ते लोकप्रिय मराठी पुस्तकांच्या दहा-पंधरा प्रती घेतात, सभासदांना हवे असलेले पुस्तक वेळी दिले तर त्यांचे समाधान होते हा त्या पाठीमागचा विचार.
आता त्यांचे स्वप्न आहे, वाचनकक्ष सुरू करण्याचे. त्याकरता ते पाच हजार चौरस फूट जागेच्या शोधात आहेत. तेथे येऊन वाचकांनी निवांत बसून पुस्तके वाचावी. ब्रिटिश कौन्सीलच्या संदर्भ लायब्ररीसारखी ही कल्पना आहे. त्यामध्ये स्वतंत्र बाल-वाचनालय असणार आहे.
पुंडलिक पै म्हणतात, फायद्याचा फार विचार न करता सतत मेहनत व कार्यावरील निष्ठा असली की यश आपोआप चालत येते. अर्थात नवीन जमान्याप्रमाणे राहणे गरजेचे आहे.
– प्रभाकर भिडे