Home कला चित्रपट देऊळ, लवासा आणि विकास

देऊळ, लवासा आणि विकास

गरीब खेड्याच्या जवळ, उजाड माळरानावर, एकाकीपणे उभ्या असलेल्या उंबराच्या झाडाखाली जमिनीवर झोपलेल्या गुराख्याला अचानक दत्त दिसल्याचा भास होतो. बातमी खेड्यात पसरते. दत्ताचे देऊळ बांधायचा निर्णय होतो आणि बघता बघता गाव झपाट्याने बदलते. ग्रामस्थांच्या सहभागाने, सहकार्याने आणि कोणतेही विवाद उभे न करता देऊळ बांधले जाते. खेड्याकडे भाविकांचा ओघ सुरू होतो. जत्रा सुरू होते. देवस्थानच्या पैशांच्या रूपाने मिळकत होऊ लागते. देवळाच्या भोवतालच्या इतर दुकानांचा लिलाव करून व्यापार्‍यांना पाचारण केले जाते. खेड्यातील बायाबापड्यांना प्रसाद, फुले, माळ, हार ह्यांच्या छोट्या दुकानांच्या रूपाने विक्रीचा उद्योग मिळतो. लोकांच्या हातात पैसा खेळायला लागतो. देवळाच्या निमित्ताने पाण्याचे नळ येतात. वीजपुरवठा अखंड होतो. स्थानिक पुढार्‍यांचेही राजकीय वजन वाढते. त्यांच्या सत्तेचे वर्तुळ विस्तारते. सिनेमा इथेच थांबतो; परंतु नंतर काय होते ह्याची कल्पना करता येते.

देवस्थानाची भरभराट अशीच होत राहिली तर कालांतराने मोठे भांडवल साचते. अभिषेक आणि प्रसाद ह्यांच्या माध्यमातून जमा झालेले भांडवल भोजनसेवा, शाळा आणि शिक्षणसंस्था, दवाखाने आणि आरोग्यसेवा, पर्यटकांसाठी निवासस्थाने, तारांकित हॉटेल्स, स्पेशल बससेवा यांत गुंतवले जाते. शहरी श्रीमंत भाविकांसाठी हेलिकॉप्टरसेवा, प्रसिद्धिसेवा आणि कधी पर्यावरणसेवा सुरू होते. धार्मिक चित्रपट निघतात. मग भावभक्तीला तर नुसता पूर येतो. देशविदेशातून भक्तांचा आणि परदेशी चलनाचा धबधबा सुरू होतो. गावाचा नावलौकिक वाढतो.

गावाचे स्वरूप बदलते. ते एक शहर बनते. तीर्थस्थान बनते. धर्म हे शहराची आर्थिक पायाभरणी करण्याचे निमित्त ठरते. त्याला अध्यात्म, करमणूक, आर्थिक आणि सामाजिक कामांच्या वैविध्य यांची जोड मिळाली तर गावपरिसराचा सातत्याने विकास होत राहतो. भारतामधील अनेक शहरांच्या विकासाचे धर्म हेच पारंपरिक निमित्त असलेले दिसते. इतिहासातील राज्यकर्ते ह्या मार्गानेच व्यापाराला चालना देत. जगाच्या अनेक प्रदेशांत हे आढळते. देवाचा साक्षात्कार हे आर्थिक विकास घडवून आणण्याचे भरवशाचे जुने निमित्त असे.

‘लवासा’ हासुद्धा साक्षात्काराचाच प्रकार! आकाशातून हेलिकॉप्टरने जाताना एका राजकीय पुढार्‍याला खाली बोडके डोंगर, उजाड माळरान आणि दरीतील चमकणारे निळे पाणी बघून तेथे आधुनिक, भव्य नगर वसवण्याचा साक्षात्कार झाला. साक्षात्कारी कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. मोठ्या भांडवलदाराला गाठून नगराच्या विकासाचे आराखडे बनतात. नव्या शहरात हॉटेल्स, विश्रामघरे आणि आधुनिक सेवा असलेली घरांची संकुले, दुकाने, इंटरनॅशनल शाळा, रुग्णालये बांधली जातात. रस्ते, पाणी, वीज येते. एकेकाळी एकाकी असलेल्या खेड्यापाड्यांची नाळ पुण्या-मुंबईशी जोडली जाते. लोकांचे, पैशांचे प्रवाह खेड्याकडे सुरू होतात.

अशा विकास प्रकल्पांना राजकीय नेत्यांचा वरदहस्त मिळत असला तरी लोकचळवळींचा शापही मिळतो. प्रथम लवासासारखा मोठा प्रकल्प घडवला जातो तो खेड्याबाहेरील लोकांच्या, उपर्‍यांच्या संकल्पनेतून; खासगी भांडवलदारांच्या किंवा सरकारी भांडवलातून तसेच कधी कधी परकीयांच्या नियोजनातून आणि आधुनिक तंत्रज्ञानातून. त्यामुळेच ते एक राजकीय-सामाजिक विरोधाचे कारणही बनते. प्रकल्पातील गुंतवणूक मोठी असते. अपेक्षित फायद्याचे प्रमाण मोठे असते; पण धोकेही लहान नसतात. इतक्या मोठ्या प्रकल्पाबाबत काही स्थानिक विरोधक असतात. ज्याप्रमाणे भांडवल मोठ्या शहरातून येते, त्याचप्रमाणे स्थानिक विरोधकांना चळवळीचे पाठबळ देण्यासाठी प्रसिद्ध सामाजिक नेतेही मोठ्या शहरातूनच मागवले जातात. मुळात कायदे जुने आहेत, विकासाला अडथळे ठरणारे आहेत आणि त्यामागची गृहितके चुकीची आहेत ह्यांचा विचार सामाजिक चळवळी करत नाहीत. शिवाय बडे राजकीय नेते गुंतलेले असल्याने व्यक्तिगत आरोप आणि राजकारण सोपे बनते. दोन्ही बाजूंनी कोर्टकचेर्‍या सुरू होतात. शेवटी इतक्या मोठ्या गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करणे सरकारलाही परवडणारे नसते. कोर्टाला मध्यस्थ नेमले जाते. सामाजिक चळवळींच्या शापावर न्यायालयांचा उ:शाप मिळतो. कालांतराने लवासा भरभराटीला येते. जर काही वर्षांनी लवासावर सिनेमा काढला तर तो असाच बनेल…

‘लवासा आणि देऊळ’ ह्या दोन्ही घटना खेड्यांच्या मर्यादित शेतीप्रधान, दुर्बळ आर्थिक व्यवस्थांना चालना देणार्‍या आहेत. एक घडते ती स्थानिक लोकांच्या पारंपरिक भूमिकेतून, अंधश्रद्धेतून आणि मानसिक भीतीमधून. अशा पारंपरिक समाजात देवळाला विरोध करायला फारसे कोणी धजावत नाही. मात्र लवासा आधुनिक काळाला, आधुनिक अर्थव्यवस्थेला, तंत्रज्ञानाला, सेक्युलर सामाजिक व्यवस्थेला अनुरूप असूनही त्याला विरोध होतो. हा विरोधही गाजत आहे; परंतु असा विरोध कालांतराने समाजाच्या स्मृतीमधून विस्मृतीतही जातो. सिनेमाच्या शेवटी देऊळ जसे वहिवाटीचे आणि अर्थव्यवहाराचे साधन बनते तसेच ‘लवासा’ही बनेल.

खेड्यांच्या आर्थिक विकासाला धक्का देणारी काही निमित्ते असतात. कधीकधी स्थानिक माणसाला कल्पना स्फुरतात, गावकर्‍यांचा पाठिंबा मिळाला तर रुजतात, वाढतात आणि गावाला बरकत येते. त्यांचा उगम स्थानिक मातीत असतो. ‘देऊळ’ सिनेमाप्रमाणे. वारणानगर किंवा प्रवरानगरप्रमाणे; परंतु खेड्याबाहेरील उपर्‍यांनाही विकासाच्या कल्पना सुचू शकतात. ती काही स्थानिकांचीच मक्तेदारी नसते. शेवटी स्थानिक परिसर किती मोठा मानायचा ह्यालाही नियम नसतो. खेडे स्थानिक असते तसाच तालुका, जिल्हा, राज्य आणि देश हेही स्थानिकतेचेच परीघ असू शकतात. ते वर्तुळ अधिक व्यापक असते इतकेच. कालानुरूप समाजातील विविध घटक अशी विकासाला चालना देणारी निमित्ते पुरवत असतात. कधी असे निमित्त सरकार पुरवते, कधी व्यापारी तर कधी कारखानदार, उद्योजक, कधी शिक्षणसंस्था तर कधी निसर्गातील साधने. पुण्यातील मगरपट्टा, चंदिगड, बोकारो, नवी मुंबई, नवीन एसईझेड, औद्योगिक शहरे, ही सर्व खेड्यांच्या विकासाला चालना मिळून वाढलेली भारतामधील नवीन शहरे आहेत.

खेड्यातील स्थानिक संकल्पनेतून झालेला विकास जास्त सुयोग्य अशी समजूत प्रचलित असली तरी तिला वास्तवात आधार दिसत नाही. सरकारपेक्षा कारखानदार बरे की वाईट हेही ठरवणे अवघड आहे. एका राळेगणसिद्धी गावाचा विकास अण्णा हजारे करू शकले; परंतु महाराष्ट्रातील हजारो खेड्यांना स्वत:च्या विकासाचा खात्रीचा मार्ग अजूनही सापडलेला नाही. याउलट गेल्या पन्नास वर्षांत सरकारी आणि खासगी भांडवल गुंतवणुकीतून उभ्या राहिलेल्या शेकडो शहरांच्या माध्यमातून हजारो खेड्यांना नागरी विकासाच्या संधी मिळाल्या. ‘देऊळ’सारख्या धार्मिक विकासाच्या मॉडेलमधून मोठ्या प्रमाणावर विकास होईल की नवी मुंबई, चंदिगड, लवासा ह्यांसारख्या मोठ्या प्रकल्पांतून आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान, भांडवल, संकल्पना ह्यांमधून नियोजनपूर्वक अधिक चांगला विकास होईल ह्याचा विचार करायला पाहिजे. मोठ्या गुंतवणुकीतून काही थोडे लोक जास्त श्रीमंत होतात हे खरेच आहे; परंतु बहुसंख्यांची गरिबी वेगाने दूर करण्याचे सामर्थ्यही त्यात आहे.

सुलक्षणा महाजन
————————————————————————————————————

संबंधित लेख –
‘देऊळ’ – आहे ‘अद्भुत’ तरी…
‘देऊळ’ अन् लवासा
‘देऊळ’ची चर्चा लवासाच्या दारी

 

About Post Author

Previous articleअवकाश निर्मिती – समाजहिताची तळमळ
Next articleभारतीय लोकशाहीचे भवितव्य
सुलक्षणा महाजन या आर्किटेक्ट आहेत. त्या शहरी आणि ग्रामीण भागातील महिलांच्या समस्यांचे संशोधन करतात. त्यांनी जे जे कॉलेज, येथून 'बॅचलर ऑफ आर्किटेक्चरची' पदवी 1972 साली मिळवली. त्यांनी आय.आय.टी. पवई येथून इन्डरस्ट्रियल डिझाईनची पदवी मिळवली. त्यांनी अॅन ऑर्बर, मिशिगन, यूएसए येथे नगर नियोजन शास्त्राचे अध्ययन 2000 साली केले. त्या मुंबईच्या ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट’च्या मुंबई ट्रान्‍सफॉर्मेशन सपोर्ट युनियनमध्ये सल्लागार आहेत. तसेच घेरझी इस्टर्न लिमिटेड, मुंबई आणि एपिकॉन्स् कन्सल्टंट, ठाणे या खासगी क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये‍ आर्किटेक्ट म्हणून नोकरी करतात. त्यांनी 'हॉबिटाट' या जागतिक संस्थेाच्या सस्टे‍नेबल सिटीज प्रकल्पातर्फे महाराष्ट्रातील आठ शहरांचा अभ्यास केला आहे. त्यांची 'जग बदललं', 'अर्थसृष्टी : भाव आणि स्वभाव', 'लंडननामा' ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या 'महानगर', 'लोकसत्ता','सकाळ','आजचा सुधारक', 'साधना', 'दिव्य् मराठी' या दैनिकांत लेखन करतात.

1 COMMENT

  1. खूपच छान आणि सत्य लिहिले आहे
    खूपच छान आणि सत्य लिहिले आहे

Comments are closed.

Exit mobile version