Home शिक्षकांचे व्यासपीठ तीन पिढ्यांचे शिल्पकार (The teacher who shaped three generations)

तीन पिढ्यांचे शिल्पकार (The teacher who shaped three generations)

चांगले शिक्षक आणि त्यांनी दिलेली शिकवण यांना मनातून कधी हद्दपार करता येत नाही. ते व्यक्तीच्या असण्याबरोबर, विचारांबरोबर असतातच. तीन पिढ्यांना शिकवणाऱ्या इनामदार सरांचे विद्यार्थी- आज तरुण ते वृद्ध वयातील त्यांच्या शिष्यांच्या मनात, घर करून आहेत. मंजूषा इनामदार-जाधव या त्यांच्या कन्या. त्यांच्या वडिलांना, वडील आणि गुरू या दोन भूमिकांमधून वावरताना त्यांच्या मनामध्ये उभे राहिलेले चित्र या लेखात आहे. व्यक्तीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय-काय करावे लागते त्याचा धडाच वाचकाला या लेखातून मिळतो.

– अपर्णा महाजन

———————————————————————————————-

तीन पिढ्यांचे शिल्पकार

विद्यार्थिप्रिय शिक्षक रामचंद्र इनामदार हे उपजत कलावंत होते. निःसीम देशभक्त, हाडाचे शिक्षक. विद्यार्थी हे त्यांचे बळ. शिकवणे हा त्यांचा सेवाधर्म.

सरांचा जन्म 1931 सालचा. पुण्यातील नूतन मराठी शाळा आणि स.प. महाविद्यालय येथे शिकत असतानाच, राष्ट्र सेवा दलातून समाजसेवेचे बीज त्यांच्या मनात रुजले. महात्मा गांधी, सानेगुरुजी, सेनापती बापट असे त्यांचे आदर्श. त्यांना पु.ग. सहस्रबुद्धे, श्री.म. माटे यांसारखे गुरुवर्य लाभले. त्यामुळे इतिहास आणि साहित्यशास्त्र यांची सबळ पार्श्वभूमी तयार झाली. त्यांनी पुण्यात रस्त्याच्या कडेला गणपतीच्या मूर्ती, चित्रे विकून त्या कलेतून अर्थार्जन सुरुवातीला केले; मग शिक्षकी पेशाला सुरुवात केली. त्यांच्या शिक्षकी पेशाचा सरस्वती हायस्कूल (पुणे), आर.एम. भट शाळा (परळ-मुंबई) येथे श्रीगणेशा झाला. ते दादरच्या ‘बालमोहन विद्यामंदिर’ येथे शिक्षक म्हणून 1960 मध्ये रुजू झाले. ते पत्नी कविता यांच्यासह डोंबिवलीत स्थायिक झाले. त्यांचे शिकवणे कलात्मक, आनंदाचे आणि प्रभावी असे. त्यांचा बाल-कुमारांसाठी गद्य-पद्य लेखन करत राहणे हा छंदच होता. त्या छंदातून बालमनांत सुसंस्कार रुजवले जात. त्यांना हीन-दीन, पददलित हे आपलेसे असत. सरांच्या नजरेतून ती आपुलकी सदैव जाणवत राही. ते माझे आई-वडीलच असल्याने माझे हे बोल अनुभवाचे आहेत.

‘सानेगुरुजी कथामाले’ची शाखा डोंबिवलीत 1967 मध्ये उघडली. ते बालकांसाठी छंदवर्ग, वाचनालय, अभ्यासिका, सांस्कृतिक कार्यक्रम, कथाकथन, चित्रकला-हस्तकला वर्ग मोफत घेऊन तरुण ‘कलाशिक्षक’ तयार करत असत. त्या कलाकारांचा दर दिवाळीला आकर्षक भेटकार्डे तयार करणे हा ठरलेला उपक्रम असे.

सरांनी समाजकार्य निळजे गावात जमीन विकत घेऊन 1969 मध्ये सुरू केले. शिक्षणाच्या प्रसारासाठी गावात घरोघर फिरून ‘खडू-फळा मोहीम’ सुरू केली. त्यामुळे मुलांना शिकण्याबद्दल आकर्षण वाटे. खेडेगावात मुलींची लग्ने लवकर करून देतात; त्या कारणाने त्यांचे शिक्षण अर्धवट राहते. सर पालकांचे मन:परिवर्तन करून त्यांच्या मुलींना शिक्षणासाठी वसतिगृहांत प्रवेश मिळवून देत. त्यांपैकी काही मुली चांगल्या शिकून कमावत्या, उच्च ध्येयवादी झाल्या आहेत. सरांनी स्वतःच्या निळजेतील घराचे ‘मैत्री शाळे’त रूपांतर 1989 मधील त्यांच्या निवृत्तीनंतर केले. सर तेथे अभ्यासवर्ग चालवत असत. ते गावातील मुलींच्या गटाला उत्तेजन देऊन त्यांच्यातर्फे ‘आम्ही ग्रामीण बायका-मुली’ या नावाने लेखनसत्र चालवत असत. त्याचे लेखन व संपादन मुलीच करत; ज्यामधून मुलींच्या पुढील शिक्षणाला सकारात्मक गती मिळत असे.

सर ‘मैत्री शाळे’त दर दिवाळीला ‘दिवाळी पहाट’हा गीत-संगीत कार्यक्रम आयोजित करून गावातील मुलांच्या संगीतकलेला प्रोत्साहन देत. ‘बालविश्व’ हे हस्तलिखित साप्ताहिक चालवून बाल-कुमारांना लेखनास उद्युक्त करत असत. त्यांनी निळजे गावातील बाळांसाठी ‘बालमोहिनी’ खेळशाळा वयाच्या एक्याऐंशीव्या वर्षी सुरू केली. ती त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत, म्हणजे सात वर्षे सुरू होती. सर गावातील वीटभट्टी कामगारांच्या स्त्रिया व मुले यांच्यासाठी हंगामी शाळा चालवत असत.

ते दरवर्षी राष्ट्रीय सणांना त्यांच्या ‘सानेगुरुजी विनयमंदिर’ संस्थेतर्फे झेंडावंदन घडवून आणत. त्या वेळी रंजल्या-गांजल्या महिलांच्या हस्ते तिरंगा फडकावला जाई; त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला समाजात ती कोठे कमी नाही हे जाणवे. ‘अनिकेत’ या टोपणनावाने ते मुलांसाठी देशभक्तीपर गीतरचना, ध्वजगीते, बालगीते, प्रार्थनागीते, श्लोक आणि कविता करत असत. संगीतकार त्या गीतांना चाली लावून शाळाशाळांतून शिकवत. नवरात्रीसाठी नवा भोंडला ‘ऐलमा पैलमा भारतमाई’, ‘भारतमातेची आरती’, ‘स्वच्छ नारायणा’ची पूजा यांमुळे समाजमनावर आगळेवेगळे संस्कार होत असत.

सर मुंबईच्या साहित्य संघात हजारो अमराठी मुलांना मराठीचे धडे; तसेच, रात्रशाळांमधून कामकरी मुलांना शिक्षण देण्याचे काम निरपेक्षपणे करत. सरांना अनेक पुरस्कार, मानचिन्हे मिळूनही त्याचे आकर्षण वाटले नाही. प्रसिद्धी पराङ्मुखता त्यांच्या अंगी भिनली होती. ते त्यांचा बहुतांश वेळ बाल-कुमारांसाठी विधायक कार्य करण्यात व्यतीत करत असत. विद्यार्थिप्रिय शिक्षक असूनही, त्याहून अधिक ‘प्रेमळ माणूस’ म्हणून ते ओळखले जात. त्यांचे सुखसमाधान अपघातग्रस्तांची अहोरात्र सेवा, संकटग्रस्तांना निरपेक्ष मदत करण्यात सामावलेले असे. बेघर, गरजू, निराधार कुटुंबांना त्यांच्या घरात प्रेमळ आसरा देत असत. त्यांच्या तुटपुंज्या निवृत्तिवेतनातील बराच भाग ते समाजासाठी खर्च करत. त्या सर्व कार्यांत त्यांच्या सहधर्मचारिणी कविता यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असे. सरांच्या सद्गुणांचे अनेक किस्से सांगता येतील –

निशा ही एक निरक्षर मुलगी होती. समाजातील अडाणी चेहरे पाहून सरांच्या काळजाला घरे पडत असत. सरांनी स्वत: तिला काही वर्षे शिकवून शहाणे करून सोडले. ती कविताही करू लागली. तिचे लग्न सरांनी एका इंजिनीयर मुलाशी करून दिले. ती व तिचे कुटुंब सुसंस्कृत, सुखी झाले.

सुमा नावाची एक मुलगी मॅट्रिक होऊन, घरकाम करून पैसे मिळवत होती. ते सरांच्या मनाला सहन झाले नाही. त्यांनी तिला शिक्षक बनवण्याचा ध्यास घेतला. तिच्या शिक्षणाकरता विशेष मेहनत घेतली. सुमा शिक्षक झाली. तिला सरांनी त्यांच्या मैत्री शाळेत रुजू केले. सरांनी आणखी किती तरी महिला शिक्षक तयार केले.

निळजे गावात एक अपंग मुलगा दहावी नापास होऊन कोंबड्या विकत असे; घरी त्याला शिकू देत नव्हते. सरांनी त्याला कोल्हापूर येथील अपंगांच्या संस्थेत शिकण्यास ठेवले. सर डोंबिवलीहून कोल्हापूरला जाऊन-येऊन त्याची स्वत: काळजी घेत. तो चांगला अभ्यास करून दहावी-बारावी सत्तर टक्क्यांहून अधिक गुणांनी पास झाला. तो पुढील शिक्षण पूर्ण करून सरांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक बनला. त्याला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून विशेष मान आहे.

सीमा ही अशिक्षित मुलगी परगावातून येऊन निळजे गावात घरकाम व म्हशी धुण्याचे काम करत होती. तिला सरांनी त्या घरातून बाहेर काढून साक्षर केले. काही दिवस तिला डोंबिवलीतील एका सुशिक्षित घरात कामास लावले. तिच्या मनात शिकण्याची आकांक्षा निर्माण केली. तिला नियमितपणे शिकवले. नंतर तिचे चांगल्या मुलाशी लग्न लावून दिले. आता तिला दोन मुली असून, त्याही शिकत आहेत.

निळजेला सरांकडे करुणा घरकाम करत असे. ती निरक्षर होती, पण ती सर चित्रे काढताना त्यांच्याभोवती घुटमळत निरीक्षण करी. तिची चित्रकलेची आवड लक्षात घेऊन सरांनी तिला कागद, रंग, ब्रश आणून देऊन चित्रे काढण्याचा छंद लावला. तिची सुंदर-सुंदर चित्रे प्रदर्शनात मांडली; त्यांतील काही विकलीही गेली. तिने तिला लिहिता-वाचता येत नसूनही चित्रकलेच्या परीक्षा दिल्या. लवकरच ती चांगली चित्रकार बनली. ती सरांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला शिकवू लागली. तिचे तिच्या चित्रांसह फोटो विविध वर्तमानपत्रांतून झळकले. निळजे गावानेही तिचा सन्मान केला…

एक निराधार स्त्री, तिची परित्यक्ता मुलगी आणि दीड-दोन वर्षांचा नातू यांना आसरा नव्हता. त्या तिघांना सरांनी निळजे गावात आणून शेजारच्या चाळीत राहण्याची सोय केली. त्या बाईला घरात पगारावर काम दिले. तिला अक्षरे कळत नव्हती. पण सरांनी तिला कागद, रंग हाताळण्यास शिकवले. ती ब्रशने चित्र रंगवू लागली. सरांनी प्रदर्शनात तिची चित्रे मांडली. तिच्या हस्ते 26 जानेवारीला झेंडा फडकावला. एका मासिकाचे प्रकाशन तिच्या हस्ते केले. तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. तिच्या मुलीला कलाकुसरीच्या कार्यात गुंतवून तिला कमावती केले. ती चाळ मालकाने पाडण्यास घेतली. चाळीतील बेघर झालेल्या सर्वांना राहण्याची दुसरी सोय करावी लागली. परंतु त्या कुटुंबाला ते शक्य नव्हते. तेव्हा सरांनी त्या तिघांना स्वतःच्या जागेत आश्रय दिला. छोट्या नातवाला शिकवले; शाळेत घातले. सर आणि बाई यांच्या सहवासात शिकून तो मुलगा पहिल्या नंबराने पास होऊन सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. खास त्याच्यासाठी सरांनी अनेक काव्यरचना केल्या. तो त्याही कविता यांच्याकडून शिकून गाऊ लागला. त्याने चित्रकला, हस्तकला, मातीचे गणपती बनवून रंगवले. शाळेतही तो सर्वांचा आवडता झाला…

गावातील एका अशिक्षित कुटुंबात दोन लहान मुलींच्या लग्नाचा विषय चालल्याचे कळताच सरांनी त्या घरात शिक्षणाचे महत्त्व पटवून त्या मुलींना देवरुखला वसतिगृहात शिक्षणासाठी ठेवले. सरांनी निळजेहून देवरुखला वारंवार हेलपाटे मारून त्यांची काळजी घेतली. दोन्ही मुली चांगल्या शिकल्या. सरांनी शिक्षणासाठी अनेकांना वसतिगृहात ठेवले होते. सर जातीने त्या विद्यार्थ्यांसाठी झटत असत.

एक मुलगी दहावी पास होऊन सरांकडे आली. तिला पुढे कोणती शाखा निवडावी ते कळत नव्हते. सरांनी तिचा सर्व अभ्यास पाहून तिचे कलागुण ओळखले आणि योग्य मार्गदर्शन करून कला महाविद्यालयात चित्रकलेचे शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. ती कल्याणच्या प्रथितयश शाळेत कला शिक्षिका आहे. सरांनी पुष्कळ मुला-मुलींना ‘कलावंत’ म्हणून नावारूपास आणले आहे.

विद्या नावाची एक सुशिक्षित तेलुगू बोलणारी तरुण शिक्षिका डोंबिवलीतील तिच्या घरात तापाने फणफणली होती. तिचा नवरा आणि सासू मिळून तिला छळत होते आणि घराबाहेर काढू पाहत होते. तिला माहेरीही कोणी ठेवून घेत नव्हते. सरांच्या कानावर ती गोष्ट जाताच ते तिच्या मदतीला धावले. तिची विचारपूस करून तिला निळजेच्या घरी आणले. औषधपाणी केले. तिला तिच्या नवऱ्याकडे जायचे होते, पण ती नवऱ्याला नको होती. तो घटस्फोट मागत होता. सरांना त्यांचे नाते जुळवून आणावे असे वाटत होते. त्यासाठी त्यांनी तिला घेऊन कोर्टात केस केली. बरेच दिवस हेलपाटे घातले. ती सरांकडे राहून सर व बाई यांची कामे करून शाळेत शिकवण्यास जाई. तिला इंग्रजी व हिंदी चांगले येत होते. सरांनी तिच्या नवऱ्याला व सासूला खूप समजावले, पण त्यांनी ऐकले नाही. ती निळजेला सर व बाईंकडेच चार-पाच वर्षे होती. मग तिच्या बहिणीने तिला हैदराबादला बोलावून घेतले.

डोंबिवलीतील एका शाळेत पत्र्याचे छप्पर असलेले दोन वर्ग जोराच्या पावसामुळे (1975) कोसळले. त्यात सात-आठ वर्षांची बरीच मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली. त्यांना भराभर बाहेर काढले गेले. परंतु एक मुलगी खोलवर गाडली गेली असल्यामुळे सापडली नव्हती. इनामदार सरांनी तिला शोधून काढले. ती गंभीर जखमी झाली होती. तिचे आई-वडील तेथे पोचण्याच्या आत सरांनी तिला इस्पितळात दाखल करून तिच्यावर उपचार सुरू केले. तिला श्वासही घेता येत नव्हता. सरांनी व कविता यांनी रात्रंदिवस रोज तेथे राहून तिच्या आई-बाबांना धीर दिला. थोड्याच दिवसांत ती बरी झाली. ती वक्तृत्व आणि विविध स्पर्धा यांमध्ये भाग घेई. ती पुढे शिक्षक झाली.

एकदा सरांच्या समोरच्या चाळीतील सात-आठ वर्षांची मुलगी 1986 मध्ये पावसाने वीज गेल्यामुळे घराच्या बाहेर आली. तेव्हा शेजारच्या कच्च्या बांधकामाच्या विटा तिच्या डोक्यात पडल्या. सरांनी नेमके पाहिले आणि ते धावून गेले. ती रक्तबंबाळ, बेशुद्ध झाली होती. तिच्या घरात त्या वेळेस मोठे कोणी नव्हते. सर तिला उचलून घेऊन धावत हॉस्पिटलमध्ये गेले. सरांचे कपडे तिच्या रक्ताने माखले होते. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेत नव्हते. परंतु सरांनी डॉक्टरांना समजावून, विनवण्या करून तिला दाखल करून घेण्यास लावले. ती लवकरच बरी झाली. मग ती कविता इनामदार बाईंकडे गाणे शिकू लागली.

सरांच्या ठायी समता आणि बंधुता उपजत वसत होती. सरांच्या लेखी कोणीच वाईट नव्हते. जो जे मागेल, ते सर खुल्या मनाने देऊ करत. सरांच्या मनात सदैव प्रेम, करुणा वसत असे. समाजासाठी जे काही करता येईल, ते सर्व काही ते आजन्म करत राहिले. सरांनी 2017 मध्ये शेवटचा श्वास घेतला.

– मंजूषा इनामदार-जाधव 9004816287 manjusha.jdhv@gmail.com
————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. एक प्रेमळ कृतिशील व महान व्यक्तीमत्व! सादर प्रणाम!

Leave a Reply to Ashok Nandkar Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version