चिपळूणचे राजन इंदुलकर ‘प्रयोगभूमी’ नावाचा आदिवासी शिक्षणाचा प्रयोग करण्यात गुंतले आहेत; त्यालाही वीस वर्षे झाली. त्यांच्या या केंद्रास ‘राष्ट्रीय मुक्त विद्यालयीन शिक्षण संस्थे’चे ‘मुक्त मूलभूत शिक्षण केंद्र’ म्हणून मान्यता मिळाली आहे. इंदुलकर चिपळूण तालुक्यातील (कोयनानगर) दुर्गम डोंगराळ भागात कोळकेवाडी येथे 1990 साली पोचले. त्यांनी तेथे ‘श्रमिक सहयोग’चे काम सुरू केले. संस्थेचे व इंदुलकर यांचे मुलांचे पालकांसोबत एप्रिल ते नोव्हेंबर या काळात होणारे स्थलांतर कसे रोखता येईल यावर विशेष प्रयत्न असतात. संस्थेमार्फत शिक्षणापासून वंचित अशा धनगर, कातकरी आणि इतर आदिवासी मुलांना नावीन्यपूर्ण पद्धतीचे शिक्षण देण्यावर त्यांचा भर होता. ती मुले शिक्षणापासून वंचित होती; त्यांना प्रयोगभूमीमुळे शिक्षण सुविधा प्राप्त झाली. या प्रयोगातील इंदुलकर यांची निरीक्षणे महत्त्वाची आहेत. ते म्हणतात, या प्रयोगातून धनगर मुले शिकून पुढे जातात, पण आदिवासी मुले मात्र अजूनही पुढे जाण्यास तयार होत नाहीत, ती शिकतात आणि त्यांच्या परिसरातच रमतात. आदिवासी मुले चटकन भावभावना व्यक्त करतात. नुसता मोबाइल हातातून काढून घेतला गेला तरी संतापतात याची खंत इंदुलकर यांना वाटते.

कोळकेवाडी भागातील स्थानिक लोक आजूबाजूच्या सधन शेतकऱ्यांच्या शेतात मजुरीसाठी जात. त्यांचा नदीत मासे पकडणे, उन्हाळ्यात जमीनदारांच्या आंबा-काजूच्या बागा राखणे व त्यातून मिळालेल्या तुटपुंज्या मजुरीवर गुजराण करणे हा जीवनक्रम होता. त्यातही त्यांचे बरेचसे पैसे हे दारूच्या व्यसनापायी खर्च होत. त्या लोकांची कामानिमित्ताने एका गावातून दुसऱ्या गावी भटकंती चालू असे. त्यांच्या मुलांनाही सोबत जावे लागे. त्यामुळे त्यांचे शिक्षण खंडित होई. ते ध्यानी घेऊन इंदुलकर यांनी त्या मुलांना एका ठिकाणी शिक्षण घेता येईल अशी सोय कोळकेवाडी येथे संस्थेतर्फे केली. ती सोय म्हणजेच ‘प्रयोगभूमी’. त्यासाठी इंदुलकर यांनी लोकवर्गणीच्या सहाय्याने निधी उभा केला. त्यातून सोळा एकर जमीन खरेदी केली. तेथे ‘प्रयोगभूमी’ हे शिक्षण केंद्र सुरू झाले. प्रयोगभूमी डोंगरउतारावर वसलेली आहे. संस्थेच्या सोळा एकर क्षेत्रापैकी सत्तर टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. पूर्वी तेथील वनाची तोड झालेली होती. मात्र गेल्या वीस वर्षांत ते वन श्रमिक सहयोगच्या प्रयत्नाने पुन्हा बहरले आहे. वनाचे संरक्षण आणि संवर्धन हा तेथील मुलांचा अभ्यासाचा विषय आहे. त्याचा समावेश आठवीच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आला आहे.
प्रयोगभूमीची पहिली इमारत दिवंगत शिक्षणतज्ञ लीला पाटील यांनी केलेल्या अर्थसहाय्यातून बांधण्यात आली. भोवतालच्या गावातील कातकरी, धनगर समाजातील पंचवीस-तीस मुले प्रयोगभूमीत राहून शिक्षण घेऊ लागली. तेथे पाच ते अठरा वर्षे वयाची मुले-मुली एकाच छताखाली राहतात. सकाळी सहा वाजता उठल्यापासून रात्रीपर्यंतचे वेळापत्रक ठरलेले असते. व्यायाम, शेतीची कामे, स्वयंपाक, वैयक्तिक व परिसर स्वच्छता, शालेय अभ्यास, खेळ, नृत्य, संगीत असा दिनक्रम ठरलेला असतो. शालेय अभ्यासात मुलांना शिक्षकांचे मार्गदर्शन मिळते, शिवाय इ-लर्निंगचा उपयोगही केला जातो. शालेय अभ्यास, तंत्र-वैज्ञानिक शिक्षण आणि कलाकौशल्य या तीन बाबींवर तेथील शिक्षणात मुख्य भर आहे. तेथील वीज, पाणी पुरवठा जोडणी, दुरुस्तीची कामे मुलेच करतात.
प्रयोगभूमीत सुरुवातीची चार वर्षे शासकीय वीज पुरवठा नव्हता. नागालँडमध्ये अभ्यासासाठी गेलेल्या राजन इंदुलकर व इंजिनीयर भार्गव पवार या कार्यकर्त्यांनी तेथील शासनाकडून पाण्यावर वीजनिर्मिती करणारे तीन केव्ही क्षमतेचे मशीन आणले. त्याद्वारे तयार करण्यात आलेली वीज ही प्रयोगभूमीतील पहिली वीज ठरली ! पुढे महाराष्ट्र शासनाची वीज आली. मात्र दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने ही पाण्यावरील वीज वापरली जाते. या वीजगृहाची देखभाल व दुरुस्ती मोठी मुले करतात. उर्जा स्वावलंबनाचा विचार पसरावा म्हणून दरवर्षी ऑगस्टमध्ये तेथे ‘चला वीज बनवुया’ कार्यक्रम साजरा केला जातो.
‘प्रयोगभूमी’ हे शिक्षण केंद्र मागील वीस वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे. ‘प्रयोगभूमी’तील शिक्षणात मुख्यतः तीन घटकांचा समावेश केला जातो. शासनाचा शालेय अभ्यासक्रम आखलेल्या पद्धतीप्रमाणे शिकवला जातो; तसेच, प्रत्येक शालेय विषय मुलांना पूरक व उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने हाताळला जातो. उदाहरणार्थ भाषा शिक्षणाची सुरुवात मुलांच्या काथोडी, धनगरी या त्यांच्या मातृभाषांतून केली जाते. सर्व विषयांची मांडणी नाविन्यपूर्ण रीतीने साधली जाते. मुलांना व्यवसायाभिमुख शिक्षण -त्यात मुलांच्या कुटुंबातील शेती, पशुपालन, त्यांचे पारंपरिक व्यवसाय, सुतारकाम, बांधकाम, प्लंबिंग असे उपयुक्त शिक्षण दिले जाते. त्याच बरोबर संगणकासारख्या आधुनिक व जीवनोपयोगी तंत्रज्ञानाचाही शिक्षणात समावेश आहे. त्यांना कलाकौशल्येही शिकवली जातात. उदाहरणार्थ संगीत, चित्रकला, हस्तकला, शिवणकाम, पाककला. मैदानी खेळांतही मुलांची प्रगती चांगली आहे. मी त्या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला गेलो असताना, त्यांतील काही मुली हार्मोनियम वादनाबरोबर शास्त्रीय रागातील बंदिशी गाताना दिसल्या. त्या मुलींची तयारी इंदुलकर यांनी आणि संगीत शिक्षिकेने करून घेतली आहे. इंदुलकर यांची कन्या शाहीन ही मुलांना चित्रकला शिकवते. मुलांनी भित्तिचित्रे काढली आहेत.
मागस मुलांमध्ये बौद्धिक क्षमता असतात; पण त्या ओळखून त्यांना खतपाणी घालावे लागते हा प्रयोगभूमीचा अनुभव आहे. शाळेतील संदीप निकम हा सहा-सात वर्षांचा मुलगा छान छान गोष्टी सांगतो. गोष्टींत त्याच्या आजूबाजूचा परिसर, प्राणी, पक्षी, झाडे, मासे, डोंगर, नदी, रान यांचे उल्लेख येतात. त्या गोष्टी ऐकून ‘श्रमिक सहयोग’ने संदीपच्या ‘काथोडी’ भाषेत पुस्तक प्रसिद्ध केले आहे. संस्थेने केलेल्या कामातून दिसून येते, की कष्टकरी समाजाच्या दैनंदिन जगण्यातील अनुभव आणि निसर्गात व एकूणच प्रतिकूल परिस्थितीत तगून राहण्याची त्यांची ऊर्जा व ज्ञान यांचा उपयोग शिक्षणासाठी केला गेला तर शालेय शिक्षण हे त्यांच्यासाठी सुलभ होते. तशा प्रकारच्या शिक्षणात मुलांचा सहभाग असतो. त्यात मोठ्या मुलांनी छोट्या मुलांना शिकवण्यासाठी मदत करणे, सतत नवनवीन पद्धतींचा व तंत्रज्ञानाचा वापर यांमुळे शिक्षणप्रक्रिया व्यापक व गतिमान होऊ शकते. संस्थेचा उद्देश हा शिक्षणपद्धत ही एकारलेली न राहता, तिच्यात सामाजिक व सांस्कृतिक ऊर्जेचा अंतर्भाव करून ती विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील पुढील वाटचालीस उपयोगी ठरावी असा आहे.
संस्थेकडील जमिनीच्या सखल भागांतील खाचरांत सेंद्रिय शेती केली जाते. मुले त्या कामात सहभागी होतात. परसबागेत प्रत्येक मुलाचा वाफा असतो. त्याला मुले गुंठा म्हणतात. तेथे मुले त्यांच्या आवडीची लागवड करतात. गायी, शेळ्या, कोंबड्या असे छोट्या स्वरूपातील पशुपालन केले जाते. स्वयंपाक, शेती, पशुपालन, वनसंवर्धन, वीजनिर्मिती; तसेच इमारत परिसराची देखभाल अशा सर्व बाबतींत प्रत्यक्ष काम, नियोजन, हिशोब, नोंदी यांत मुलांचा सहभाग असतो. त्यामुळे ते जीवनशिक्षण बनते. गांधीजींनी मांडलेल्या बुनियादी शिक्षणाचा विचार येथे ठेवण्यात आला आहे. बुद्धी, मन आणि शरीराचा संतुलित विकास हे त्यामागील मुख्य सूत्र आहे. शिवाय आदिवासी परंपरेतील सामुहिक शिक्षणाचे सूत्रदेखील समोर ठेवण्यात आले आहे. त्यात शिक्षकाची भूमिका केवळ सहाय्यकाची, मित्राची असते.
‘प्रयोगभूमी’तून आतापर्यंत एकशेएक्याण्णव विद्यार्थी/विद्यार्थिनी शिकून बाहेर पडलेली आहेत. काही मुले उच्च शिक्षण घेत आहेत. तर बहुतांश मुले स्वतःच्या पायांवर आत्मविश्वासाने उभी आहेत. तेथे 2025 या वर्षी एकोणीस नवी मुले विद्यार्थी/विद्यार्थिनी म्हणून दाखल झाली आहेत. प्रयोगभूमीमध्ये मुलांचे शिक्षण आठवीपर्यंत होते. नंतर त्यांनी नेहमीच्या शाळांत जावे आणि दहावी व पुढील शिक्षण पूर्ण करावे अशी अपेक्षा असते.
वाडी शिक्षण केंद्र हे प्रयोगभूमी उपक्रमाचे वैशिष्टय ठरत आहे. कादवड, आकले आणि ओवळी या तीन गावांतील आदिवासी वाड्यांवर केंद्रे 2021 पासून सुरू झाली. आदिवासी समाजातील शिक्षित युवकांची त्यांसाठी नेमणूक करण्यात आली आहे. या वाडी शिक्षण केंद्रांत मध्येच शाळा सोडलेल्या आणि शाळेत न जाणाऱ्या मुलांसाठी खेळ, वाचन असे कार्यक्रम घेतले जातात. केंद्र हे शाळेची वेळ वगळता सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास असे दररोज चालवले जाते. रविवारी मोठ्या मुलांसोबत अभ्यासाव्यतिरिक्त खेळ, गप्पागोष्टी, परिसर सहल असे उपक्रम राबवले जातात. वाडी शिक्षण केंद्र उपक्रमांत 2025 या वर्षी पाच ते अठरा वयोगटांतील एकशेदोन मुले दाखल झाली आहेत.
संस्थेतर्फे आठ धनगर व चार कातकरी वाड्यांवर चौथीपर्यंत अनौपचारिक शाळा चालवल्या जातात. त्या शाळांत संस्थेने अध्ययन व अध्यापन पद्धतीत विविध प्रयोग केले आहेत. मुलांच्या मनात रुजलेला स्वतःविषयीचा, समाजाविषयीचा हीनभाव नष्ट करून, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे; तसेच, दैनंदिन जगण्यातील अनुभव, निसर्गाशी एकरूप होऊन राहिल्याने मिळालेले ऊर्जा, ज्ञान, सांस्कृतिक सामर्थ्य हे गुण, या साऱ्यांचा उपयोग मुलांच्या शिक्षणात करण्यावर भर देण्यात आला. धनगरी, काथोडी या मायबोलीतून भाषाशिक्षणाची रूजवात करून देणे, घरातील, भोवतालच्या प्रेरणादायी इतिहासातून व्यापक इतिहासाकडे जाणे अशा प्रकारे प्रत्येक अभ्यास-विषयात बारकाईने काम झाले. त्या शिक्षण पद्धतीविषयक कामात शिक्षणतज्ज्ञ दत्ता सावळे यांचे दीर्घकाळ मार्गदर्शन मिळाले. ते पंधरा वर्षे सातत्याने त्या कामात प्रत्यक्ष सहभागी होऊन मार्गदर्शन करत असत. या अनौपचारिक शाळांतील शिक्षकांचे अनुभव ‘मोर मित्रांची शाळा’ या पुस्तकरुपात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पुस्तकाचा समावेश शिक्षणविषयक संदर्भ साहित्याच्या यादीत झाला आहे.
उपक्रमातील शैक्षणिक व अन्य साहित्य यांसाठी लोकसहभागातून निधी मिळत असतो. शिक्षण केंद्र व प्रकल्प यांच्या कामात कारागीर, विशेषज्ञ, अभ्यासक यांची मदत होते. देणगीदार व्यक्तींच्या आणि एक-दोन छोट्या संस्थांच्या आर्थिक मदतीने संस्थेचे कार्य चालले आहे. दरवर्षी साठ-सत्तर व्यक्ती पाचशे रुपयांपासून ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य करत असतात. चिपळूणमधील महिला डॉक्टरांचा गट आणि मुंबईतील ‘वुई टूगेदर फाउंडेशन’ हे एक महिनाआड वस्तू/जिन्नस रुपाने देणगी देत असतात.
श्रमिक सहयोग संस्थेची स्थापना रत्नागिरी जिल्ह्यातील युवा गटाने 1984 साली केली. तो गट राष्ट्र सेवा दलाच्या लोकशाही समाजवादी विचाराने प्रेरित झालेला होता. सुरुवातीची दहा-बारा वर्षे त्या गटाने कोकणातील महत्त्वाच्या काही मुद्यांवर लोकजागृती आणि चळवळसदृश काम केले. पर्यावरणीय विकास पद्धतीचा आग्रह, बेदखल कुळे, मच्छिमार, विस्थापित आणि ग्रामीण स्त्रियांचे संघटन असे त्या कामाचे स्वरूप होते. पुढे वंचितांच्या शिक्षण पद्धतीविषयक काम अधिक सखोल आणि दीर्घकाळ करावे असा निर्णय या गटाने घेतला. संस्थेच्या विश्वस्त मंडळात अध्यक्ष श्रुती सुर्वे यांच्यासह भार्गव पवार, सुषमा जाधव-इंदुलकर, डॉ. गुलाबराव राजे, दादासाहेब रोंगे, प्रमोद जाधव, प्रकाश सरस्वती गणपत यांचा समावेश आहे. राजन इंदुलकर हे आरंभी, राष्ट्र सेवादलाचे पूर्णवेळ कार्य रत्नागिरी जिल्ह्यात करत होते. नंतर त्यांनी ‘श्रमिक सहयोग’च्या कार्यात पूर्ण वेळ लक्ष घातले. राजन इंदुलकर यांचे गाव चिपळूण तालुक्यातील पिंपळीखुर्द. त्यांचे शिक्षण बी ए पर्यंत झालेले आहे. त्यांच्या पत्नी सुषमा या माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झालेल्या आहेत. त्यांच्या शाहीन व सावित्री या दोन विवाहित मुली आहेत.
संस्थेच्या शैक्षणिक उपक्रमाची महाराष्ट्रातील प्रयोगशील शैक्षणिक उपक्रम म्हणून ‘युनिसेफ’ने नोंद ‘शिक्षण-आनंदक्षण’ या संशोधनपर ग्रंथात घेतली आहे. त्याखेरीज संस्थेला व राजन इंदुलकर यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनसहित अनेक पुरस्कार लाभले आहेत.
राजन इंदुलकर 9423047620 shramik2@rediffmail.com, indulkarrajan@gmail.com
– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com
खूपच विविध उपक्रम राबविले जात आहेत! कौतुकास्पद प्रयत्न! शुभेच्छा!