रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील नागाव (गोरेगाव) हे आमचे आजोळगाव. पण आमचेही तेच गाव झाले आहे. ते महाड-गोरेगावचे उपनगर वाटावे असे आहे. आमचे वास्तव्य मुंबईला असले तरी शाळेला सुट्टी पडली की पूर्ण अडीच महिने आम्ही गावाला असायचो. आमचे मोहित्यांचे गाव चिंचवली. ते नागाव जवळच आहे, पण तेथे आमचे काही नाही. वास्तविक, आमच्या गावाचा परिसर हा कातळी. त्यामुळे आंबा, फणस, नारळी यांच्या बागा… असा कोकणचा मेवा तेथे नाही. तेथे भातशेती ही मुख्य; रायगड जिल्ह्याला भाताचे कोठार म्हणत ना ! उन्हाळ्यात कलिंगड, टरबूज ही फळे येत; पावसाळी भाज्या भरपूर होत.
गावात असतील दोनशे घरे. तीन प्रमुख वस्त्या – बौद्ध, मातंग आणि कुणबी. नागाव ग्रामपंचायत थोडी मोठी आहे. त्यात आणखी वाड्या असतील. गावाची समाजरचना जमीनदार आणि खंडकरी शेतकरी, अशी. त्यामुळे ती शेती आम्ही आमच्याच गावातील कुणबी-मराठा यांच्याकडे ‘अधेली’ने – म्हणजे येणाऱ्या उत्पन्नातील अर्धा हिस्सा – दिली होती. त्यामुळे आम्हाला शेतीच्या उत्पन्नातील अर्धा हिस्सा मिळत असे. कुणबी मराठा हा समाज सधन, संघटित व शेतीमध्ये अग्रणी होता. शेती पिकल्यावर, त्यांच्या घरी आम्ही मुले आई किंवा मामासोबत आमचा हिस्सा मागण्यासाठी जात असू. गावात अस्पृश्यता (1978 पर्यंत) पाळली जाई. आम्ही दलित समाजाचे. त्यामुळे ते लोक आम्हाला बाहेर, ओसरीच्या कोपऱ्यातून बारदान काढून घेण्यास सांगून त्यावर बसण्यास सांगत. नंतर ते कौलांच्या सांध्यातून एक तांब्या व काही कान तुटलेले कप घ्यायचे. घरातून एकादा मध्यमवयीन पुरुष किंवा महिला एका तांब्यातून पाणी आणत असे. ते वरूनच आमच्या तांब्यात ओतत. नंतर आमच्या त्या कान तुटलेल्या हक्काच्या (!) कपातून आम्हाला वरूनच कोरा चहा ओतत. मग आम्ही अंगणात काढून ठेवलेला आमच्या शेतीच्या उत्पन्नाचा हिस्सा घेऊन घरी येत असू. गावात बाजारपेठ होती. गावातही, आम्ही पैसे देऊनसुद्धा आम्हाला तशाच प्रकारे चहा दिला जात असे. गंमत अशी, की तिन्ही समाजांची कुळदेवी व ग्रामदेवता एकच होती- बाळजाईदेवी. सर्व गावकऱ्यांना कुळदेवीचा विश्वास, आधार वाटत असे.
गावात दुष्काळ सलग 1971-73 अशी तीन वर्षे पडला होता. सगळीकडे रखरखीत ऊन असे. पिण्याच्या पाण्याने विहिरींचा तळ गाठला होता. एक व्यक्ती विहिरीत उतरून, वाटी-पेल्याने पाणी भरून ती कळशी/घागरीत ओतत असे. ती भरल्यावर दोराच्या साहाय्याने वर खेचत असत. एक कळशी वा घागर पाण्याने भरून वर ओढण्यास पाच-सात मिनिटे लागत. घरचे पाणी भरण्याचा कार्यक्रम तास-दोन तास चालत असे.
रेल्वेमंत्री मधू दंडवते यांच्या प्रयत्नांनी कोकण रेल्वेचे माती भराईचे काम निघाले तर दुसरीकडे, जिल्हा परिषदेच्या योजनांतून काळ पाणी प्रकल्प कालवा सुरू झाला. गावातील महिला मातीभराईच्या कामाला जाऊ लागल्या. गावातील लोकांची परिस्थिती थोडी सुधारली. खाण्याचे सुद्धा हाल होत. कामगारांना पौष्टिक खाद्य म्हणून तंतुमय सुकी सुकडी मिळत असे. गावकऱ्यांना त्या दिवसांत खूप कष्ट काढावे लागले. मुंबईहून वडील किंवा मामा येत तेव्हा ते तांदूळ आणत. शासनाने चाळीस पैसे किलो दराने परदेशातून लाल मिलोचा (लाल रंगाची ज्वारी) पुरवठा केला होता.
तीन देवांच्या तीन जत्रा पंधरा-पंधरा दिवसांच्या फरकाने चैत्र महिन्यात येत. आम्हाला लहानपणी गावची जत्रा म्हणजे स्वर्गाहून सुंदर वाटत असे. आमचा नवीन पोषाख, जत्रेत वेगवेगळ्या गावांहून आलेल्या काठ्या- त्यांना लावलेले रंगीत झेंडे, सजवलेल्या बैलगाड्या, लाकडी पाळणे या सर्व गोष्टींची मजाच वेगळी असे. गावाला आता जत्रा भरतात, पण त्यात राजकीय पोस्टरबाजी, चित्रपटगीतांचा धांगडधिंगा व व्यापारीकरण यांचा जोर जास्त असतो.
त्या काळी गावात वीज नव्हती. रस्ते नव्हते. ग्रामपंचायतीची मातीची सडक होती. त्यामुळे जगाशी संपर्क नव्हता. आमच्या चुलत मामांकडे बॅटरीवाला एक रेडिओ होता. तो मामा आम्हा सर्व मंडळींना घेऊन अंगणात सायंकाळी मोठ्या रुबाबात बसत असे आणि आकाशवाणी केंद्राच्या संध्याकाळच्या सातच्या बातम्यांची खबर आमच्या ज्ञानात भर घालत असे. बातमी ऐकण्याचा तसा आनंद पुन्हा कधी मिळाला नाही !
पुढे वर्ष-दोन वर्षांत गावात वीज आली- नळाद्वारे पाणीयोजना सुरू झाली. ए.आर.अंतुले मुख्यमंत्री झाले, त्यांची ती किमया. गावोगावी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस धावू लागल्या. गावाचे शहरीकरण होऊ लागले. आता तर घरोघरी मोटार सायकली आहेत. चार घरांपैकी एका घरात मोटार हमखास असते. दूरदर्शन संचाची संख्या वाढली. जुनी कुडाची, मातीची घरे लोप पावली, सिमेंट-काँक्रिटचे बंगले आले. लोकांना जशी साक्षरता आली तसे राजकारण (1982 नंतर) कळू लागले, पण त्याबरोबर पक्षीय गटबाजी झाली.
गावची माती तीच आहे. मातीचा सुवास आम्हाला गावाकडे खेचून नेतो. आमच्या बौद्धवाडीतील सुशिक्षित व प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून वसंत हाटे यांचा उल्लेख होतो. ते रेल्वेत अधिकारी होते. ते सेवानिवृत्त 2001 साली झाले. त्यानंतर त्यांनी गावासाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यांनी तरुणांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण केली. त्याचे फळ म्हणून आमच्या वाडीत शंभर टक्के उच्चशिक्षित तरुण आहेत. गावात ग्रामपंचायतीचीच शाळा आहे. सुभाष अनंत हाटे हे त्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांना ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ 2005 साली प्राप्त झाला. दुसरे संतोष महादेव हाटे यांना देशसेवेचा ध्यास होता, ते भारतीय सैन्यात दाखल झाले. ते 1991 मध्ये कारगिल युद्धात सहभागी होते. रामदास लक्ष्मण हाटे (पोलिस पाटील) हे पंधरा वर्षांपूर्वी नागावचे पहिले दलित सरपंच झाले. ते अल्पशिक्षित होते, पण त्यांचा न्यायनिवाडा असा होता, की गावात कितीही तंटे, वाद झाले तरी पोलिस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ आली नाही.
आमच्या गावातील कुणबी-मराठा समाज, बौद्ध समाज व मातंग समाज यांतील जातीय दरी संपुष्टात आणण्याचे कार्य करणाऱ्या यशवंत चंदू कासरेकर आणि शंकर बाबू कासरेकर; तसेच, शंकर शिर्के यांचा उल्लेख करावा लागेल. गावात कधीही जातीच्या व धर्माच्या नावाने दंगलीची झळ पोचलेली नाही. ती आमच्या सामाजिक एकोप्याची पोचपावती होय !
– सुदर्शन संभाजी मोहिते 7045558967