मी वसुधा सहस्रबुद्धे. माझे माझ्या देशावर, महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर प्रेम आहे. परंतु मधल्या काळात राजकारणात इतक्या विचित्र अनाकलनीय घटना घडल्या, की मला भारतीय नागरिक म्हणून वाईट वाटले. त्यावेळी जनसेवेचे व्रत घेतलेल्या मृणाल गोरे यांची आठवण झाली. सध्याच्या तरुण पिढीला गोरे यांच्या निःस्पृह, निर्भय व आदर्श व्यक्तिमत्त्वाची ओळख करून द्यावी असे वाटले. अशा प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा परिचय एकपात्री प्रयोगातून सर्वांसमोर मांडावा असा प्रयत्न आहे. मनात असा विश्वास वाटला, की आजही एखादे असे व्यक्तिमत्त्व निर्माण होईल, की जे सर्वांना एकत्र घेऊन फक्त जनतेसाठी काम करेल ! त्यामुळेच मी मृणाल गोरे यांचे संघर्षपूर्ण जीवन काही प्रसंगांतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यावेळेला लक्षात आले, की मृणाल गोरे यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकल्यावर, महापालिकेतील व्यवहार हा मराठी भाषेतच व्हावा असा आग्रह धरला. त्यासाठी त्यांनी वाद घातला. त्यांच्याबरोबर त्यांचे फक्त दोन साथीदार होते. ते म्हणजे जॉर्ज फर्नांडिस आणि शोभनाथ सिंह. सभागृहातील इतर सदस्यांचा मराठीसाठी खास असा आग्रह नव्हता. उलट, त्यांचे मत इंग्रजीतून कामकाजाची जी परंपरा आहे तीच बरोबर आहे असे होते. महापौर निवडणुकीनंतर पहिल्याच दिवशीच्या मीटिंगमध्ये माजी महापौर विष्णुप्रसाद देसाई हे अध्यक्ष होते. काँग्रेस पार्टीकडून सभा सुरू झाली. त्या निवडणुकीत काँग्रेस पार्टीचे वासुदेवराव वरळीकर महापौर म्हणून निवडून आले होते. देसाई यांनी बोलण्यास सुरुवात केली, “I propose this house will proceed with the election of mayor of Mumbai.’’ एवढे एकच वाक्य ऐकल्यावर समाजवादी पक्षाच्या या तिन्ही सदस्यांनी (मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस आणि शोभनाथ सिंह) उठून बोलण्यास सुरुवात केली, “महोदय, मराठीमध्ये बोला. मराठी येत नसेल तर गुजराथीमध्ये बोला, परंतु इंग्रजीत नको. आता आपला देश स्वतंत्र झाला आहे. तुम्ही आपली भाषा का बदलत नाही?”
मृणाल गोरे यांना सभागृहातील बाकी इतर सदस्यांनी विरोध केला. परंतु त्या तिघांचा आवाज एवढा बुलंद होता, की इतर सर्वांचा विरोध निष्प्रभ ठरला ! मीटिंग पुढे होऊ शकली नाही. मात्र त्यानंतर पालिकेचा कारभार मराठी भाषेत सुरु झाला ! मृणाल गोरे कोणताही निर्णय त्यांच्या साथीदारांबरोबर चर्चा करून; तसेच, नियम व कायदा यांचा विचार करून घेत असत. परंतु त्या एकदा निर्णय घेतल्यावर कोणत्याही परिस्थितीत तो तडीस नेत.
– वसुधा सहस्रबुद्धे 9820009859 vasudha