Beyond Bollywood…

5

एक बातमी अमेरिकन वृत्तपत्रांमधून काल-परवाच डोकावलेली पाहिली. ‘डोकावली’ म्हणण्याचं कारण असं, की ती रुढार्थानं ‘झळकली’ नव्हती. पुरवणीच्या कोपऱ्यातच होती – पण माझ्यासारख्या भारतीय मनांना तिचं कौतुक झळकल्यासारखं जाणवलं. बातमी होती वॉंशिंग्टन येथील जगप्रसिद्ध स्मिथसोनियन म्युझियमतर्फे सादर होऊ घातलेल्या एका आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाबद्दलची. प्रदर्शन उभं राहाणार आहे डिसेंबर २०१३ मध्ये. आणि त्याचं नाव आहे  “Beyond Bollywood : Indian Americans Shape the Nation”.

भारतामधून अमेरिकेत स्थलांतर केल्यानंतर तिथे नव्याने रुजतानाचा भारतीयांचा प्रवास, विशेषत: विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील स्थलांतरित लोकांचे अनुभव आणि गेल्या शतकामध्ये त्या आव्हानांची बदलत गेलेली रूपं, आपला पाय अमेरिकेत रोवताना त्यांच्या भारतीय पावलांचे अमेरिकन संस्कृतीवर, राजकारणावर, समाजावर, कला-जीवनावर, शिक्षणपद्धतीवर,उद्योग-व्यवसायावर, विज्ञानावर, आध्यात्मिक विचारावर कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणी उमटलेले ठसे – या सगळ्याचा आढावा त्या प्रदर्शनात घेतला जाणार आहे.

प्रदर्शनाची कल्पना शीर्षकापासूनच विचार करायला लावणारी आहे! “Beyond Bollywood…Indian Americans Shape the Nation.”

बॉलिवूड…  !   खरेच, भारताबाहेरच्या लोकांना भारताबद्दलची कितीतरी वेळा काहीच माहिती नसते, माहीत असते ते बॉलिवूड ! अमेरिकन थिएटर्स मध्ये बॉलिवूडचे सिनेमे लागतात, टी व्ही वरच्या ‘डान्स शोज’ मध्ये बॉलिवूड झळकते. अमेरिकन हेल्थ क्लब्स किंवा जिम्समध्ये बॉलिवूड डान्स हा एरोबिक व्यायामाचा प्रकार म्हणून उपलब्ध असतो. बॉलिवूडची गाणी  माहीत असलेल्या अभारतीय लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. माझ्या ऑफिसमध्ये एक अमेरिकन मुलगी आणि तिच्या काही मैत्रिणी हिंदी सिनेमातील गाणी यू-ट्यूबवर आवडीने पाहतात. तिच्याशी बोलताना माझ्या लक्षात आले, की तिला वाटत होते भारतामध्ये फार विचित्र, झगझगीत कपडे घालून फ़िरणे  किंवा वाटेल तिकडे फ्लेंश-मॉब डान्स करणे या सर्रास, जाता-येता सहज पाहायला मिळणा-या गोष्टी आहेत. त्या तशा नाहीत, खरे तर मी फ्लेंश-मॉब डान्स हा प्रकार अमेरिकेत आल्यानंतर प्रत्यक्षात पाहिला! आणि हे सांगितल्यावर तिला आश्चर्य वाटलं.

तिच्यासारखे किती असे लोक जगात असतील की बॉलिवूडलाच भारताचं प्रतिबिंब समजत असतील आणि एक भारतीय म्हणून बॉलिवूडपलीकडे आपलं असलेलं खरंखुरं अस्तित्व आपल्या बाजूनं आपण जगापुढे कशा पद्धतीने मांडत आहोत? एकदा एक गोरा माणूस एका सेमिनारमध्ये भेटला. तो मोठ्या आश्चर्यानं, नवीन शोध लागल्यासारखा अवतीभोवतीच्यांना सांगत होता, “यू नो, बुद्धा ओरिजीनली केम फ्रॉंम इंडिया – आय जस्ट केम टू नो……”. माझ्यासारखे काही भारतीय तेथे हजर होते. आमच्यापैकी एक जण मजेने आमच्या-आमच्यात म्हणाला, “बॉलिवूड किंवा हॉलिवूड मधल्या कुणाला तरी पकडून विचारले पाहिजे, की गौतम बुद्धावर एखादा जोरदार सिनेमा काढता येईल का? व्यवस्थित अभ्यास करून काढला पाहिजे मात्र. जरा तेवढंच ‘जनरल नॉलेज’ वाढेल या लोकांचं.” कुणीतरी त्यावर अजून विनोद करत म्हणालं, “लोकांचं राहू दे, आपल्या मुलांचं नॉलेज जरी वाढलं त्यातून तरी सार्थक होईल सिनेमाचं.” आम्ही सगळे खळखळून हसलो खरे, पण गोष्ट जितकी मजेची, तितकीच तिला गंभीर झालर होती!

अमेरिकेत आल्यानंतरही  भारतीयांच्या रोजच्या जीवनात ‘बॉलिवूड’ इतका इतर कुठल्याही भारतीय गोष्टीचा इतक्या आवडीने अंतर्भाव टिकून नाही. भारतीयत्व जपताना कुणी ‘योगा’ला जवळ केलं आहे,  कुणी भगवद्गीतेच्या ‘क्लास’ला जातात, कुणी ‘मेडिटेशन’मधून ‘पीस’ मिळवतात. काही कुटुंबे धार्मिक कर्मं महत्त्वाची मानतात तर काही धर्मामधील शास्त्रीय संदर्भ शोधतात. बहुतेक सगळे भारतीय आपल्या मुलांना आवर्जून भारतीय संगीत, नृत्य किंवा त्यांच्या प्रांताची भाषा शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण बाकी काहीही असो अथवा नसो, न चुकता या सर्वांमधून, कमी-अधिक प्रमाणात का होईना, बॉलिवूड हे मुला-मोठ्यांमध्ये एक सार्वत्रिक धागा टिकवून राहिलेलं दिसून येतं. सिनेमाचं माध्यम जादूमय असतंच. पुढच्या पिढीतही ‘कटकट’ न वाटता ‘आपलीशी’ वाटणारी भारतीय गोष्ट कुठली असेल तर बॉलिवूड. परिणामी, त्याच आपल्या पुढच्या पिढीला आणि अभारतीय जगालाही अनेकदा भारतीय “संस्कृती”(!) चा झालेला पहिला परिचय हा बॉलिवूडमार्फत आहे. ‘गांधी’ किंवा ‘स्लम-डॉग मिलियनेअर’ सारखे सिनेमे, जरीही म्हणायला बॉलिवूडची अपत्यं नसली तरीही, बॉलिवूडशी अनेक पातळ्यांवर संलग्न आहेत. ते अभारतीय सर्वसामान्य माणसाच्या मनात भारताबद्दलच्या काही प्रतिमा बनवतात. आणि इतिहास-भूगोलाच्या पुस्तकांमधून जे कधीच ठसलं नसेल असं भारताचं रूप जगभर जनमानसात ठसवून जातात.

हे सगळे पाहू जाता ‘Beyond Bollywood’ या शब्दांचा भारताबाहेरील संदर्भ अतिशय समर्पक वाटतो. साहजिकच प्रश्न असा पडतो, की आमच्यासारख्या भारतीय संस्कृतीचा दुवा असलेल्यांना स्वत:ला बॉलिवूड कितपत प्रातिनिधिक वाटते? आणि नसेल वाटत, तर आपल्या स्वत:च्या मुलांपासून ते कुणाही अभारतीय माणसापर्यंत सर्वांच्या मनात भारताच्या काही बऱ्या-भुल्या कल्पना तयार करण्याचं काम सातत्यानं करणारा बॉलिवूडचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही नक्की काय करतो? थोडा खोलवर विचार केला तर असं जाणवतं, की आम्ही आमची भूमिका नेहेमी डोळसपणे आणि ताकदीनं हाताळतो असं नाही. आमच्या अस्तित्त्वाचा जगावर काही परिणाम होऊ शकतो, असे बहुतेक वेळा आम्ही मानतच नाही. आणि तेथेच विचाराचा धागा येऊन जुळतो तो प्रदर्शनाच्या शीर्षकाच्या उत्तरार्धाशी !  “……Indian Americans Shape the Nation”.

भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या आमच्यासारख्या बहुतांश मंडळींची खासियत आहे. आमच्यापैकी फार थोड्या मंडळींना त्यांच्या ‘Indian American’ या नवीन अस्तित्वाची खरी ओळख पटलेली असते. आमच्यासारखा सर्वसामान्य भारतीय माणूस हा परदेशी गेल्यावर त्याच्या जुन्या सांस्कृतिक संदर्भांना जिवापलीकडे महत्त्व देत, त्याचे स्वत:चे आणि त्याहूनही त्याच्या अमेरिकेत जन्मलेल्या – मोठ्या होत असलेल्या मुलांचे आयुष्य प्रसंगी भलतेच अवघड करून टाकताना दिसतो. आम्ही लहानाचे मोठे होत असताना आत्मसात केलेले भारतीय रीती-रिवाज, हसण्याबोलण्याच्या पद्धती, नातेसंबंधांतील बारकावे, खाण्या-पिण्याचे नियम या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या दृष्टीने ‘चांगल्या’ व्यक्तिमत्वाची लक्षणं! त्याहून काहीही निराळे घडू लागले की आम्ही अमेरिकेमुळे ‘बिघडू’ तर लागलो की काय अशी अनामिक भीती आमच्या मनामध्ये डोकावू लागते. आमच्यापैकी काही जण या बदलाला अपरिहार्य म्हणून स्वीकारतात. काही जण ते कसे त्यांच्या भारतीय मूल्यांना विसरलेले नाहीत हे आवर्जून सिद्ध करण्याच्या मागे लागतात. काही जण या ‘न झेपणाऱ्या’ अमेरिकन प्रभावाला कारणीभूत मानून भारतात परत जाण्याचा निर्णय घेतात. काही जण ठरवून स्वत:ला ‘अमेरिकन’ बनवण्यासाठी झटायला लागतात. आणि काही जण त्यांची नक्की भूमिका काय हे न उलगडल्यासारखे सतत तळ्यात-मळ्यात करत राहातात. त्यांची ‘इण्डिअन अमेरिकन’ ही नवी ओळख फार कमी लोक आनंदाने मिरवताना दिसतात. भारतीय मूल्ये जपताना अमेरिकन संस्कृतीशी सख्य करणं ही ‘तडजोड’ नसून स्वत:ची ‘निवड’ आहे, हेच अनेकदा लक्षात घेतले जात नाही. आणि हे लक्षात आल्यानंतरही बहुतेक वेळा आमच्या विचारांची गाडी ही ‘अमेरिकेने आमच्यामध्ये केलेल्या’ बऱ्यावाईट परिणामांच्या रुळावरूनच धावत राहते.

फारच कमी वेळा आम्ही त्यापलीकडे जाऊन ‘आपण अमेरिकेच्या सामाजिक, राजकीय किंवा औद्योगिक चित्रामध्ये आपल्या बाजूने कोणते रंग भरत आहोत’ याचा विचार करताना दिसतो. “……Indian Americans Shape the Nation”  हा कमी हाताळला गेलेला दृष्टिकोन फार चिंतन करण्याजोगा आहे. फक्त उत्तर अमेरिकेपुरता जरी विचार केला तरी कित्येक लाखांच्या संख्येत भारतीय इथे कायमस्वरूपी राहतात. अमेरिकेत राहणं म्हणजे जमेल तसं जुळवून घेत स्वत:ला सामावून टाकणं अशी भूमिका सर्वसामान्य भारतीय आपसूकच स्वीकारताना दिसतात. पण नेहेमी तशी गरज आहे का? तेही समूह म्हणून इतर स्थलांतरित लोकांच्या इतकेच किंबहुना अधिक प्रभावी आहेत. भारतीय मूळ असलेल्या कुटुंबाचे सर्वसाधारण उत्पन्न अमेरिकेच्या २०१० च्या अधिकृत गणनेनुसार अमेरिकेतील इतर कुठल्याही गटांपेक्षा जास्त आहे. अमेरिकन भारतीय लोकांमध्ये सत्तर टक्क्यांहून जास्त जणांकडे उच्च पदव्या आहेत, ती अमेरिकन सरासरी फक्त पस्तीस टक्क्यांच्या आसपास आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकन नागरिकत्वाचा हक्कही नसलेले आम्ही भारतीय एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातून मागे वळून पाहू लागलो, तर आम्हाला असं दिसतं, की अमेरिकेच्या राजकीय आणि सांस्कृतिक मातीमधे आपली मुळं चांगली रोवली गेली आहेत. विवेकानंदांपासून सुरू झालेला भारतीय संस्‍कृतीचा प्रवाह इथे चांगला फोफावला आहे.  अमेरिकेतील घरा-घरातून ‘योगा’चा अंतर्भाव झाला आहे. ‘आयुर्वेदा’ला ‘अल्टर्नेटिव्ह मेडिसीन’ म्हणून आपलंसं केलं जात आहे. भारतीय पद्धतीचं ‘मेडिटेशन’ अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. ‘जाझ फ़ेस्टिव्हल्स’मध्ये हिंदुस्तानी संगीताचे रंग भरले जात आहेत.  सतारतबल्यासारखी वाद्यं मुख्य प्रवाहाच्या संगीतात सातत्यानं स्थान मिळवू लागली आहेत. व्हाईट हाऊस मध्ये दिवाळी साजरी होत आहे. हॉलिवूडमध्ये कपाळावर कुंकू लावण्याची स्टाईल आली आहे. इंग्रजी भाषेत ‘कर्मा’, ‘मंत्रा’, ‘गुरु’, ‘पंडित’ असे भारतीय शब्द सर्रास रुजू झाले आहेत. भारतीय तत्वज्ञानाचा प्रभाव तर त्याहूनही प्राचीन, आणि आजही अध्यात्माच्या मार्गावर भारतीय आघाडीवर दिसतात. मूळ अनेक भारतीय अमेरिकन राज्यांमधून सरकारी पदांवर स्थानापन्न झाले आहेत, अधिकाधिक वरच्या जागा पटकावत आहेत आणि अमेरिकन राज्यव्यवस्थेवर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकत आहेत. मोठमोठ्या वित्तीय आणि औद्योगिक कंपन्यांचे भारतीय मुख्य अधिकारी जागतिक अर्थव्यवस्थेचा प्रवाह बदलत आहेत. नवनव्या अभिनव कल्पना घेऊन भारतीय शास्त्रज्ञ आणि उद्योजक विसाव्या शतकातून त्यांच्या ठळक पाउलखुणा उमटवत आले आहेत आणि एकविसाव्या शतकाला नवीन व्याख्या देऊ पाहत आहेत. आमचा ‘ब्राऊन’ वर्ण आम्हाला अडचण निर्माण करत नाही  तर आमची मान ताठ करत आहे.

आमच्यासारख्या ‘बुद्धिमान’ समाजसमूहाला या सगळ्या घडामोडींची कल्पना नाही किंवा ती आकलन करण्याची क्षमता नाही असं म्हणणं अनाठायी ठरेल. प्रश्न आहे तो स्वत:ला त्या परिपूर्ण नजरेतून पाहण्याचा. जग जवळ येत चाललं आहे, आणि भारतीय माणसाची क्षितिजं रुंदावत आहेत. भारतीय अमेरिकनांची ओळख ते कुणाचे अनुयायी म्हणून राहिलेली नसून, ते अधिकाधिक दखलयोग्य, लक्षणीय बनत चालले आहेत. ही वाटचाल काही दशकांची आहे. गरज आहे ती त्यांनी स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन निकोप ठेवण्याची, स्वत:ची ताकद ओळखण्याची.

अमेरिकेवर आणि जगावर वाढत चाललेला भारतीयांचा प्रभाव भारतीयच अनेकदा दुर्लक्षित करताना दिसतात. तो प्रभाव जर आपण डोळसपणे पाहिला गेला, तर भारतीय अमेरिकनांची विद्यमान आणि पुढचीही पिढी स्वतःला अधिक बळकट, अधिक प्रभावशाली नजरेतून पाहू शकेल. आम्ही जी आव्हाने वैयक्तिक पातळ्यांवर झेलत आलो, ती आव्हाने आम्ही अधिक वरच्या पातळीवरून हाताळू शकू. भारतीय वंशाशी नाते असलेल्या, ‘People of Indian Origin’ म्हणवणाऱ्या एका ताकदवान समाजसमूहाचा आम्ही महत्त्वाचा घटक आहोत. स्मिथसोनियनचे आगामी प्रदर्शन निमित्तमात्र – त्यातून पुष्टी घेऊन पुढे जाणारा विचारप्रवाह खरा महत्वाचा!

सुजाता भिडे,
इमेल – sujataatul@yahoo.com

About Post Author

5 COMMENTS

  1. Superb I am hopeful that it
    Superb I am hopeful that it will get circulated in prominent Marathi/ English dailies.

  2. It is actually a nice and
    It is actually a nice and helpful piece of information. I am happy that you simply shared this helpful information with us. Please stay us informed like this. Thank you for sharing. fagcfkdeba

  3. खूप छान, अभ्यासपूर्ण…
    खूप छान, अभ्यासपूर्ण लिहिलंयस सुजाता! मस्त! लिहीत रहा!!?

Comments are closed.

Exit mobile version