लातूरपासून काही किलोमीटर अंतरावरील हसेगाव या गावाच्या शिवारात रवी बापटले या तरुणाने एच.आय.व्ही.ग्रस्त मुलांसाठी ‘सेवालय’ हा आश्रम सुरू केला. त्या मुले-मुली मिळून एकूण बत्तीस जण राहतात. तेथे पहिलीपासून बारावी इयत्तेपर्यंतची म्हणजे सहा वर्षांपासून सोळा-सतरा वर्षांपर्यंतची मुले आहेत. ‘सेवालया’स मदत म्हणून एका शेतक-याने काही जमीन दान दिली, परिसरातील काही व्यक्तींनी ‘सेवालया’तील मुलांचे पालकत्व स्वीकारले, काहींनी आर्थिक मदत केली आणि ‘सेवालय’चे थोडेफार बांधकाम आमदार- खासदार फंडातून झाले. असे असले तरी प्रकल्पाला सरकारी अनुदान नाही. लोक पुढे येतात. तेच मदत करतात. रवी बापटले याचे समर्पण ही त्या प्रकल्पाची प्रेरणा आहे. रवी पांढरी कफनी, पांढरा सदरा आणि पांढरा गमछा लेवतो. तो पत्रकारितेची नोकरी करत होता. ती त्याने सोडली. लग्न न करण्याचा निर्णय केला. रवी ‘सेवालया’तील आश्रमात राहतो. अलिकडे रणजीत आणि विद्या हे जोडपे तेथे येऊन राहिले आहे. ते रवीच्या कामाला हातभार लावतात. आणखी एक-दोनजण आहेत. सगळे विनापगारी…
‘२६ जानेवारीला काही पत्रकार येणार आहेत, तुम्ही येऊ शकाल का?’ रवीने मला विचारले, मला जेथे ‘नाही’ म्हणता येत नाही, अशा ठिकाणांपैकी ‘सेवालय’ हे एक. मी ‘येतो’ म्हणालो. कार्यक्रमास ‘कृषीवल’चे संपादक संजय आवटे हेही येणार होते. रवीने पत्रकारितेची पदवी संपादन केल्यानंतर पहिली नोकरी ‘संचार’ दैनिकात केली होती. त्या वेळेस तेथे संजय आवटे संपादक होते. रवीच्या नेमणूक पत्रावर आवटे यांची सही. त्यामुळे संजयला रवी आपला गुरू मानतो. आपला गुरू येतोय म्हटल्यावर रवीने त्यांचा सत्कार ठेवला व त्या निमित्ताने काही पत्रकार मित्रांना आमंत्रित केले. शरद कारखानीस हे ‘एकमत’चे संपादक. त्यांचा ‘सेवालया’शी जिव्हाळ्याचा संबंध. अतुल देऊळगावकर, महारुद्र मंगनाळे, विजय स्वामी, अनिल पौलकर, जगताप, चान्नावीर असे सगळे मित्र या निमिताने एकत्र जमले. ‘सेवालया’तील मुलांनी पाहुण्या पत्रकारांना बालतरू भेट देऊन त्यांच्याशी दोस्ती केली.
रवी बापटले याने कार्यक्रमात बोलत असताना आपण या कामाकडे कसे वळलो ते सांगितले. ‘समोर जीवन असताना ते पाहून जगणे आणि समोर मृत्यू असताना तो पाहून जगणे यात खूप फरक असतो…’ त्याच्या बोलण्याची सुरुवात काळजात चर्र करणारी होती. रवी वक्ता नाही, पण त्याच्या शब्दाला तपश्चर्येची धार असल्यामुळे ते शब्द हृदयाचा ठाव घेतात. पण राणीचे शब्द मात्र हेलावून सोडतात. राणी ही पुण्याजवळची मुलगी. ती ‘सेवालया’त राहते. बारावीत शिकत आहे. आम्ही तिला अंबाजोगाईला झालेल्या लेखिका साहित्य संमेलनात बोलावले होते. राणी आत्मकथन करते तेव्हा मी संपूर्ण सभागृह अक्षरश: रडताना पाहिले होते. त्या दिवशीही ती बोलली… राणी बोलत असताना शब्दांतून व्यक्त होणारी वेदना काय असते ते अनुभवायला मिळते. अतुल देऊळगावकर यांनी प्रामाणिक माणसाच्या मनावर उमटणारे पडसाद व्यक्त केले. शरद कारखानीस यांनी मात्र मोठा आशावाद व्यक्त केला. जगात सुरू असलेल्या एच.आय व्ही.वरील संशोधनाचा आढावा घेऊन ते म्हणाले, ‘येत्या पाच-सात वर्षांत त्या रोगावर उपचार निघेल. सारे जग त्या क्षणाची वाट पाहात आहे. आपण या मुलांची त्या क्षणाशी गाठ घालून द्यायची आहे.’ संजय आवटे यांनी पत्रकारितेची सामाजिक बांधिलकी या विषयावर ‘प्रकट चिंतन’ केले. ते म्हणाले, ‘अंधाराचा गाजावाजा होतो, प्रकाशपुंज शांत असतात. असे प्रकाशपुंज पत्रकारितेतही आहेत.’ त्यांनी रवी बापटले यांच्या सोबत केलेल्या कामाच्या आठवणी सांगितल्या.
पत्रकार आले. चांगले चांगले बोलले. सुंदर विचार मांडून निघून गेले असे घडले असते तरी आजच्या ‘मीडिया’ युगात त्याचे कौतुक वाटले असते, पण या पत्रकारांनी एक पाउल पुढे टाकले.
‘सेवालया’तील एका मुलाचा महिन्याचा खर्च पंधराशे रुपये आहे. पंधराशे रुपये महिना नियमित देणा-यास पालक म्हटले जाते. पत्रकारांपैकी चौघांनी तेथील चार मुलांचे पालकत्व पत्करले. संजय आवटे (कृषीवल), अनिल पौलकर (दिव्य मराठी), गाथाची आई स्मिता पाटील (मिळून सा-या जणी) आणि सचिन चौधरी (छायाचित्रकार) या चौघांनी ती जबाबदारी घेतली.
माझ्या मनात विचार आला, की ‘चांगुलपणा आता अनाथ नाही.’ रवी बापटले याच्यासारखे लोक जेव्हा पुढे येतात, तेव्हा त्यांच्या पाठीशी उभे राहणारे लोकही समाजात सक्रिय होत असतात. रवीने काम सुरू केले तेव्हा त्याच्या मित्रात पत्रकारांत महारुद्र मंगनाळे आघाडीवर होते. अलिकडे शरद कारखानीसांसारखे अनुभवी पत्रकार सहकार्य करू लागले आहेत. आता संजय-अतुलसारखे नव्या दमाचे पत्रकार पुढे आले आहेत.